Saturday, January 10, 2026

भारतीय रेल्वेचा लतेरेपणा भाग - ४ (जनशताब्दी एक्सप्रेस)

भारतीय रेल्वेच्या १४९ व्या वाढदिवशी म्हणजे १६ एप्रिल २००२ रोजी पहिली जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई ते मडगाव धावली. तत्कालीन रेल्वेमंत्री नितीशकुमार यांनी २००२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या नव्या प्रकारच्या गाडीची कल्पना मांडली होती.


त्यापूर्वी भारतीय रेल्वेत फ़क्त राजधानी आणि शताब्दी ह्या दोनच प्रकारच्या विशेष रेल्वेगाड्या होत्या.नितीशकुमार हे समाजवादी नेते. त्यामुळे राजधानी आणि शताब्दी या गाड्यांना मिळणारा विशेष दर्जा, त्या त्या रेल्वे विभागात या गाड्यांना संचलनासाठी मिळणारे प्राधान्य या गाड्यांमध्ये मिळणारी विशेष खानपान सेवा सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात आलेली असली पाहिजे, सर्वसामान्यांनाही जलद प्रवासासह गाडीतल्या गाडीत असे विशेष खानपान उपलब्ध झाले पाहिजे म्हणून हा दर्जा त्यांनी रेल्वेत आणला. शताब्दी गाड्यांप्रमाणे जनशताब्दी गाड्यासुद्धा आपला प्रवास हा दिवसाच्या वेळात करणा-या होत्या त्यामुळे त्यांच्या रेकमध्ये शयनयान या प्रकारचे डबे नव्हते. विना वातानुकूल खुर्ची यान आणि वातानुकून खुर्ची यान हे दोनच प्रकार सुरूवातीच्या जनशताब्दी गाड्यांमध्ये असायचेत.







एकूणच हे समाजवादी विचारवंत फ़ारच पुस्तकी असतात. यांच्या कल्पना कितीही उदात्त आणि रम्य वाटल्या तरी त्यांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली की हे गळपटतात. आणि मग ती कल्पना फ़सली की शब्दांचा खेळ करून ही कल्पना कशी उत्तम राबवली हे निरर्थकपणे पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. "गिरे तो भी टांग उपर"ही यांची कायम भूमिका असते आणि त्यामुळेच भारतीय समाजजीवनातून आणि राजकारणातून हे हद्दपार झालेत.


अशीच एक संकल्पना जनता पक्ष सरकारमधले समाजवादी रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांनी १९७८ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात मांडली होती. "वर्गविरहित रेल्वेगाडी". गीतांजली एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, हिमगिरी एक्सप्रेस वगैरे सुपरफ़ास्ट गाड्या वर्गविरहित गाड्या म्हणून सुरू झाल्यात. या गाड्यांना प्रथम दर्जाचे डबे नव्हते आणि आजही या गाड्यांच्या रेकमध्ये प्रथम दर्जाचा डबा नसतो. पण नंतर या गाड्यांमध्ये बिगर वातानुकूल प्रथम वर्गापेक्षा महाग तिकीट असलेले वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान (AC Three Tier popularly called as Third AC) वातानुकूल द्विस्तरीय शयनयान (AC Two Tier Popularly called as Second AC) हे डबे जोडले जातात ते सर्वांना चालतात. फ़क्त "फ़र्स्ट क्लास हे नाव त्या गाडीच्या रेकमधल्या कुठल्याही कोचचे नको" हा शुद्ध समाजवादी ढोंगीपणा आहे. आणि तो आपण इतके वर्ष चालवून घेतला आहे.


जनशताब्दी गाड्यांमध्ये द्वितीय खुर्ची यान वर्गात सुद्धा खानपान सेवा उपलब्ध असायची. या गाडीच्या प्रत्येक कोचमध्येच त्या त्या कोचला लागणारे खाद्यपदार्थ गरम - थंड करण्याची व्यवस्था असलेली पॅण्ट्री कार होती. म्हणजे डबे बनवितानाच डब्यांच्या एका बाजूला असलेली दोन स्वच्छतागृहे काढून टाकून त्याऐवजी त्या जागेत ही पॅण्ट्री कार त्या डब्यांना होती. म्हणजे एका डब्यात चार स्वच्छतागृहे असण्याऐवजी फ़क्त दोनच स्वच्छतागृहे होती.


२००३ च्या जानेवारीत आम्ही ठाणे ते रत्नागिरी हा प्रवास या गाडीच्या द्वितीय श्रेणी बिगरवातानुकूल खुर्ची यानातून (नॉन एसी चेअर कार) केला होता. ठाण्याहून निघाल्या निघाल्या चहा, बिस्कीटे आणि चिपळूण जवळ नाश्ता आम्हाला मिळाला होता. तिकीटांच्या किंमतीतच. दोन्ही खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला होता. त्यामुळे जनशताब्दी ही सर्वसामान्यांची शताब्दी गाडी ही संकल्पना सुरूवातीची १ - २ वर्षे तरी चांगली राबविली गेली. या गाडीचे थांबेपण एखाद्या प्रिमीयर गाडीसारखे (म्हणजे राजधानी, शताब्दी) कमी होते आणि त्यामुळे वेग चांगला होता. मुंबई - ठाणे - पनवेल - चिपळूण - रत्नागिरी - कुडाळ - थिवीम आणि मडगाव एव्हढेच थांबे या गाडीला सुरूवातीला होते. त्यामुळे मुंबईवरून सकाळी निघालेली ही गाडी रत्नागिरीला चक्क ४ - ४.३० तासात जायची. मडगावला ७ - ७.३० तासात.


पण १ - २ वर्षांनंतर लोकांच्या या खानपानसेवेबद्दल तक्रारी सुरू झाल्यात आणि खानपान सेवेचे शुल्क ज्या प्रवाशांनी भरले त्यांनाच ही सेवा उपलब्ध असणार हा निर्णय रेल्वेने घेतला. इथेच या गाडीचा सर्वसामान्यांसाठीची "शताब्दी" हा दर्जा घसरला कारण तेव्हा राजधानी आणि शताब्दी गाड्यांना जेवणखाण्याचा खर्च हा तिकीटांच्या खर्चातच समाविष्ट असायचा. (आता राजधानी, शताब्दी आणि अगदी वंदेभारतसारख्या प्रिमीयर गाड्यांनाही हा खर्च समाविष्ट नसतो हे कळले.) केवळ दिवसाच्या प्रवासासाठी असलेल्या इतर कुठल्याही एक्सप्रेस गाडीसारखी एक गाडी असा या गाडीचा दर्जा उरला.


सुरूवातीला फ़िकट निळा आणि खिडक्यांच्या वर क्रीम रंग अशी या गाडीची रंगसंगती होती. मग काही वर्षांनी काही काही रेल्वे डब्यांच्या कार्यशाळांनी पूर्ण निळा रंग आणि खिडक्यांच्या रूंदीत क्रीम पट्टा अशी रंगसंगती आणली. एकाच रेकमध्ये असे विजोड डबे दिसू लागलेत. एकाच प्रकारच्या रंगसंगतीतले डबे लागलेली जनशताब्दी आम्हा सगळ्या रेल्वे फ़ॅन्ससाठी आकर्षणाचा आणि विशेष व्हिडीयोचा विषय ठरू लागली. तशा प्रकारची शेवटली नवी दिल्ली ते कोटा जनशताब्दी राजस्थानातल्या एका भटकंतीत पाहिलेली होती. एका प्रकारच्या गाड्यांचा एकसारखा रंगसुद्धा रेल्वेला जतन करता येऊ नये आणि तसे निर्देश आपल्या वेगवेगळ्या विभागांना देता येऊ नयेत हा रेल्वेचा लतेरेपणाच आहे.








आता एल एच बी कोचेस मिळायला लागल्यापासून तर सगळा आनंदीआनंदच आहे. दिवसाच्या वेळी प्रवास करणा-या इतर रेल्वेगाड्यांना ज्या निळ्या रंगाचे डबे मिळतात तसेच जनशताब्दी गाड्यांनाही मिळतात. वेगळे विशेष डबे नाहीत. तिकीटांच्या किंमतीत खानपान सेवा तर केव्हाच बंद पडलीय. इतर एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे या गाड्यांना अनेक जादा थांबेही मिळालेत. मग केवळ नावात "जनशताब्दी" आहे म्हणून वेळ तेव्हढाच लागत असताना, सोयीसुविधांमध्ये काहीही फ़रक नसताना रेल्वेला आपण हा गाड्यांसाठी जादा सुपरचार्ज का देतो आहोत ? हा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडतो आहे. सुपरफ़ास्ट सेवेसाठी लागणारा ५५ किलोमीटर प्रतितास (सुरूवातीच्या स्थानकांपासून शेवटल्या स्थानकापर्यंतचा सरासरी वेग) हा वेगही काहीकाही गाड्यांना नाही. (उदा. हजरत निझामुद्दीन - डेहराडून जनशताब्दी) तरीही केवळ नावासाठी आपण हा भुर्दंड भरतोय.


एका उदात्त संकल्पनेची भारतीय रेल्वेने कालौघात कशी माती केलीय याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जनशताब्दी. आता गेल्या अनेक वर्षांपासून नवीन जनशताब्दी गाड्या मिळालेल्या नाहीत. या गाड्यांसाठी विशेष कोच बांधणी तर केव्हाच बंद झालीय आता काही वर्षात या गाड्याही वंदे भारतच्या झंझावात बंद होतील असा अंदाज आहे.


- प्रत्येक रेल्वेमंत्र्याने आपला ठसा असलेली अशी एखादी विशेष गाडी सुरू केलीच पाहिजे या काळातल्या रेल्वेमंत्र्यांनी सुरू केलेल्या नवनवीन गाड्या आणि त्यानंतरच्या रेल्वेमंत्र्याने आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या गाड्यांचा सत्यानाश केलेला पाहिलेला एक जागृत रेल्वेफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



१० जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


No comments:

Post a Comment