Showing posts with label गोकुळगमन. Show all posts
Showing posts with label गोकुळगमन. Show all posts

Tuesday, August 4, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३५ अक्रूराचे गोकुळगमन

भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा वृंदावनात, गोकुळात अशा लीला, क्रीडा करीत असताना मथुरेत कंसाला आकाशवाणीद्वारे वार्ता कळली. नंदबाबांच्या घरी वाढणारा श्रीकृष्ण हा वसुदेव आणि देवकीचा आठवा पुत्र आहे आणि रोहिणीमातेच्या उदरी आलेला बलराम हा त्याचाच बंधू आहे. हे दोघेही मिळून तुझ्या रक्षकांचा आणि तुझा वध करणार आहेत. कंस भयभीत झाला. श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेत आलेच तर त्यांचा प्रतिकार करण्याला त्याने आपले अंगरक्षक तयार ठेवलेत. श्रीकृष्ण आणि बलराम या दोन भावांना मथुरेत बोलविण्यासाठी त्याने मथुरेत एका मोठ्या धनुर्यागाचे आयोजन केले. त्यातच एका आखाड्यात श्रीकृष्ण आणि बलरामाला मल्लयुद्धाचे आव्हान देऊन आपल्या अंगरक्षकांद्वारे त्यांना ठार मारण्याची योजना केली.


श्रीकृष्ण आणि बलरामाला गोकुळाहून निमंत्रण देऊन बोलाविण्यासाठी त्याने अक्रूराला पाचारण केले आणि वृष्णीवंशी व यदुवंशीयांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावेत या हेतूने श्रीकृष्णासह बलरामाला या धनुर्यागाचे निमंत्रण दे असे सांगून अक्रूराला गोकुळाकडे रवाना केले.


अक्रूर आपल्या रथातून श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेत आणण्यासाठी म्हणून मथुरेहून निघाला. गोकुळ जसेजसे जवळ येऊ लागले तसेतसे त्याला श्रीकृष्णाविषयी प्रेम दाटून येऊ लागले. प्रत्यक्ष जगचालक असलेल्या त्या परब्रह्माला आपण भेटल्यानंतर त्याच्या चरणावर कोसळून आपण त्याच्या चरणांवर अश्रूंचा अभिषेक करू असा त्याचा दृढ संकल्प होत होता.



प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि बलराम या मूर्ती पुढ्यात आल्यानंतर अक्रूर अत्यंत भावविभोर झालेत. त्याने श्रीकृष्णांच्या चरणांवर कोसळून आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय धुतलेत. श्रीकृष्ण आणि बलरामांनी अक्रूरांना उठविले आणि त्यांना दृढ आलिंगन दिले. त्यांचे कुशल विचारून त्यांची सेवा केली. अक्रूरांनी आपला गोकुळ आगमनाचा हेतू या दोघांनाही कथन केला. कंसवधाची वेळ जवळ आली असल्याचे ओळखून श्रीकृष्ण आणि बलराम अक्रूरांबरोबर मथुरेला जायला निघालेत.



अक्रूर येऊन आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला मथुरेला घेऊन जाणार हे कळल्याबरोबर गोपांना फ़ार दुःख झाले आणि श्रीकृष्ण विरहाच्या कल्पनेत गोपी तर अक्रूराला अक्षरशः शिव्याशाप देऊ लागल्यात. त्यांचा लाडका कान्हा त्यांच्यापासून दूर नेणारा अक्रूर त्यांना अगदी खलनायकासारखाच भासला यात नवल ते काय ? पण सगळ्यांची माया दूर सारून भगवंत बलरामदादांसह मथुरेत जायला निघालेत. जगातल्या दुष्ट प्रवृत्तींचा, अकारण संतापाचा नाश करण्याची वेळ जवळ आली होती.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण षष्ठी शके १९४८ दिनांक  ४ / ८ / २०२६


४ ऑगस्ट २०२६