Showing posts with label राम सदगुरू मायबाई महाराज. Show all posts
Showing posts with label राम सदगुरू मायबाई महाराज. Show all posts

Tuesday, June 10, 2025

चिंतनक्षण - ९




"अपमान ही साधकाची परीक्षा आहे, पण मान ही त्याची त्याहून कठीण परीक्षा आहे." - डॉ. सुहास पेठे काका :"चिंतनक्षण"


पुलंच्या "रावसाहेब" मध्ये एक चिंतनात्मक वाक्य आहे. "माणसे अपयशापेक्षा यशानेच अधिक मुर्दाड बनतात." आणि आपल्या सर्वांनाच हे समाजात वावरताना अनुभवायला येते. तसाच विचार अध्यात्मात श्री. पेठे काकांनी मांडला आहे.


अपमान झाला आणि तो सकारण असो वा अकारण असो मनाला वाईट वाटतेच. अपमान सकारण झाला असेल तर ती आपलीच चूक झाली आणि ती चूक आपण पुन्हा करता कामा नये असा विचार जे मन करते ते अत्यंत सकारात्मक मन असते. 


आणि आपला अकारण अपमान झाला असेल तर समोरच्या (अपमान करणा-या) व्यक्तीने आपल्याला, त्यावेळी असलेल्या परिस्थितीला समजावून न घेता तो अपमान केला आहे. त्या व्यक्तीला काही कालावधीने खरी परिस्थिती कळेल आणि आपला अकारण अपमान केल्याबद्द्ल त्या व्यक्तीला वाईट वाटेल किंवा कदाचित वाटणारही नाही. तो माझ्या चिंतनाचा आणि कर्माचा विषय नाही. पण सत्य वेगळे आहे त्यामुळे आपल्या अशा अकारण झालेल्या अपमानाचा आपण कधी स्वीकारच केलेला नाही त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची किंवा प्रतिसाद देण्याची आपल्याला गरजच नाही आणि त्यामुळेच ते कर्म मला बाधण्याची शक्यता नाही अशी भूमिका जे मन घेते ते तर अत्यंत सुदृढ आणि प्रगल्भ मन असते.


वरीलपैकी दोन्हीही प्रतिक्रिया मनात सहज उमटायला त्या मनाला साधनेची बैठक लागते. एखादे साधक मनच अशा सकारण किंवा अकारण अपमानाचा अशा प्रकारे स्वीकार करू शकते. आणि आपल्या कर्मांचा विचार करून पुढे मार्गक्रमण करू शकते.


पण साधकाला एकदा मान मिळायला लागला की त्याची खरी परीक्षा सुरू होते. त्यावेळी अपमान पचवणा-या मनापेक्षाही अधिक सुदृढ आणि अधिक प्रगल्भ मन लागते. मान मिळायला लागला की एखाद्या कच्च्या साधकाच्या आयुष्यात अखंड घसरणच सुरू झाल्याचे अनेक अनुभव आपण दैनंदिन जीवनात बघतो. मान मिळायला लागला की अधिकाधिक मानाची अपेक्षा मनात निर्माण होते. मग त्या अपेक्षांची आणि त्या साधकाच्या आसपास वावरणा-या इतरांची सांगड नीट बसत नाही त्यामुळे साधकाला अपेक्षित असलेल्या मान मरातबापेक्षा थोडासुद्धा कमी मान साधकाला एखादेवेळी मिळाला की तो त्याला अपमान वाटतो आणि असे अनेक प्रसंग घडलेत की तो साधक सामान्य जनांच्या आदर्शाचा विषय नव्हे तर हेटाळणीचा विषय होतो. आणि त्यानिमित्त्ताने नास्तिक मतांच्या लोकांना एकूणच अध्यात्मावर आणि त्यानिमित्त्ताने भारतीय संस्कृतीवर कोरडे ओढायला निमित्त्त मिळते.


हार तुरे, सत्कार, स्तुतीपर कवने, मान मरातब, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आपल्या देहाला मिळालेल्या नसून त्या देहात वास करत असणा-या चैतन्यरूप परमेश्वराला मिळालेल्या आहेत ही वैचारिक बैठक ज्या साधकाची अगदी मनापासून पक्की असते तो त्या मानात वाहून जात नाही. जगदगुरू श्री तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे त्या साधकाची भूमिका "मी तो हमाल, भारवाही" अशी असते. माझ्या देहात असलेले सगळे गुण त्या एका विश्वचैतन्याचे आहेत आणि  मी केवळ त्यांचा वाहक आहे, मी केवळ एक माध्यम आहे अशी त्या साधकाची पक्की मनोभूमिका झाली की तो त्या मानसन्मानात वाहून जाण्याची भिती उरत नाही. 


म्हणूनच अपमानापेक्षा मान प्राप्त होणे ही साधकाची खरी कठीण परीक्षा असते.



- राम सदगुरू  मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" जेष्ठ पौर्णिमा शके १९४७ 


मंगळवार, १० जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५

Wednesday, January 8, 2025

चिंतनक्षण - ८

 

"साधना म्हणजे अनेक अडथळ्यांची सात्विक शर्यतच आहे." - डॉ. सुहास पेठे काका


एखाद्या मुमुक्षूने साधना करायची ठरवली आणि त्यादृष्टीने पावले टाकायला सुरूवात केली की आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की त्यात अनेक अडथळे येतात. त्यातल्या अडथळ्यांचा आपण अधिक सूक्ष्म विचार केला तर आपल्या लक्षात येईल की यातले जास्तीत जास्त अडथळे केवळ आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळेच आपल्या साधनेत येत असतात. त्या अडथळ्यांना कुठलीही बाह्य परिस्थिती जबाबदार नसते.


साधनेला सुरूवात केल्यानंतर आपल्यात सात्विक गुणांची वृद्धी होऊ लागते. राजस आणि तामस गुण हळूहळू क्षीण व्हायला सुरूवात होते. आणि नेमका हाच क्षण स्वतःला सांभाळण्याचा असतो. आपल्या सात्विकतेचा सुद्धा अहंकार आपल्याला आपल्या साधनेच्या उद्दिष्टांपासून दूर नेऊ शकतो. आपण आता अध्यात्मात "बन चुके" झालोय, अध्यात्मात आपल्याला बरेच काही साध्य झालेय हा अहंकार आपल्याला हव्या त्या दिशेने प्रगती करू देत नाही हे सर्व साधकांनी कायमच लक्षात ठेवायला हवेय.


म्हणूनच साधनेला सुरूवात केल्यानंतर साधकाने स्वतःच्या मनाला विशेष रूपाने जागृत ठेवून कुठलही अहंकार आपल्या मनाला शिवू नये हा विचार ठेवला तरच त्यांच्या साधना मार्गात अडथळे येणार नाहीत आणि साधकांना त्यांचे अंतिम ध्येय गाठता येईल.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध नवमी शके १९४६ दिनांक ८ / १ / २०२५

Tuesday, January 7, 2025

चिंतनक्षण - ७

 

"कर्तृत्वाने हरला आणि ते माणसाला कळले म्हणजे भगवंताची कृपाच झाली म्हणायचे." - डॉ. सुहास पेठे काका


मनुष्य आपल्या कर्तृत्वावर फार विश्वास ठेवतो आणि माझ्या कर्तुत्वामुळेच माझ्या जीवनातल्या सगळ्या चांगल्या घटना घडत आहेत हे मानून चालतो. पण आपल्या लक्षात येईल की मनुष्य जीवनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचे अगदी ९९ % श्रेय जरी त्या मनुष्याच्या कर्तृत्वाला दिले तरी त्यात उरलेला १ % त्याच्यावर असलेल्या परमेश्वरी आधाराचा भाग असतो. यात कापूस आणि ठिणगीचा दृष्टांत चपखल बसतो. अगदी १०० किलो कापूस जरी असला तरी तो स्वतःहून पेट घेणार नाही. पण त्यावर एका अर्ध्या ग्राम वजनाची ठिणगी जरी पडली तरी तो धडाडून पेटेल. तसे मनुष्याच्या ढीगभर कर्तृत्वाला कणभर तरी परमेश्वर कृपा आधाराला असतेच. 


पण ज्याक्षणी अशी कर्तृत्वावान माणसे जीवनात पराभवाला सामोरे जातात तेव्हा त्यांना फार विषण्णता येते. आपले नक्की काय चुकले हेच त्यांना कळेनासे होते. आपले कर्तृत्व कुठे कमी पडले याचाच ते गांभीर्याने विचार करू लागतात. 


ज्याक्षणी अशा कर्तृत्ववान मनुष्याना आपले कर्तृत्व आणि त्याला हवी असलेली परमेश्वरी कृपेची जोड यातला दुवा लक्षात येतो त्याक्षणी ती सगळी माणसे परमेश्वरी अनुसंधानासह पुन्हा आपापले कर्तृत्व गाजवायला सिद्ध होतात आणो पुन्हा नवी झेप घेतात. नवी क्षितीजे धुंडाळण्यासाठी, नव्या आकांक्षांना साकार करण्यासाठी. 


ज्यांना फक्त आपलया कर्तृत्वावरच विश्वास ठेवायचा असतो, त्यांना मात्र नक्की काय चुकले हे काळातच नाही आणि पुढला मार्ग सापडत नाही. म्हणजे आपले कर्तृत्व सर्व काही घडवू शकत नाही हे ज्या माणसाला कळले त्याचा पुढील अभ्युदयाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून अशा मनुष्यावर भगवंताची कृपाच झाली असे म्हणावे लागेल.  


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध अष्टमी  शके १९४६ दिनांक ७/ १ / २०२५

चिंतनक्षण - ६

 

"प्रपंच मोडू नये व परमार्थ सोडू नये, हा आपला मध्यम मार्ग आहे. " - डॉ. सुहास पेठे काका


गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमांना आधारभूत आहे हे जर खरे असले तरी त्यातच कायम गुरफटून राहणे हा काही ईश्वरप्राप्तीचा मार्ग नव्हे. "आधी प्रपंच करावा नेटका" हे जरी समर्थांनी सांगून ठेवले असले तरी त्यानंतर "मग साधी परमार्थ विवेका" हे सुद्धा त्यांनी सांगितलेच आहे. प्रपंच हा कितीही केला तरी पुरा होत नाही, त्यात खरे समाधान मिळत नाही हे मनुष्यमात्रांच्या आज ना उद्या नक्की अनुभवायला येतेच. पण तोवर उशीर होऊन गेलेला असतो. 


संसारातली आपली सगळी कर्तव्ये सोडून परमार्थात जाणे आणि साधू बनणे  हे सुद्धा सगळ्यांच्याच आवाक्यातले नाही आणि त्याचा आपल्या शास्त्रांनी निषेध सांगितला आहे. प्रपंचात रहात असताना परमार्थ विचार जागृत ठेवणे आणि आपली कर्तव्ये पार पाडत असताना भगवंत स्मरणात राहणे हे आपल्या शास्त्रांना मंजूर आहे किंबहुना अशा प्रकारच्या प्रपंचाला आपल्या शास्त्रांनी संन्यासाचे फळ सांगितलेले आहे. 


क्रिकेटमधले उदाहरण घेऊ यात. १ बाद २०० या धावसंख्येवर येऊन शतक झळकावणे आणि ५ बाद ६० या धावसंख्येवर येऊन आपल्या संघासाठी शतक झळकावणे यात श्रेयस्कर दुसरी परिस्थिती आहे. तसेच सर्वसंग परित्याग करून हिमालयात निघून जाणे आणि संन्यास घेणे ह्यात आणि संसारातल्या तापत्रयात राहून ईश्वराचे अनुसंधान ठेवणे यातही अधिक श्रेयस्कर दुसरी परिस्थिती आहे. म्हणूनच संसारात पूर्ण गुरफटून जाणे आणि सर्वसंग परित्याग करून केवळ परमार्थाच करीत रहाणे या दोन्ही टोकाच्या मार्गांपेक्षा संसारात राहून परमेश्वराचे अनुसंधान ठेवणे हा सर्व साधकांच्या आयुष्यातला मध्यम आणि श्रेयस्कर मार्ग आहे. 


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध सप्तमी शके १९४६ दिनांक ६/ १ / २०२५

Sunday, January 5, 2025

चिंतनक्षण - ५

 



"भक्ताला परिस्थिती अनुकूल - प्रतिकूल नसते तर ती भगवंताकडे जायला फ़क्त उपयुक्त असते" - डॉ. सुहास पेठे काका


भक्ताची वृत्ती एकदा भगवंताकडे दृढपणे लागली की या जगातल्या अनुकूलतेची किंवा प्रतिकूलतेची त्याला तमा नसते. असलेल्या कसल्याही परिस्थितीचा वापर करून घेऊन भगवंताची भक्ती करायची, आहे ती परिस्थिती ही माझ्या भगवत्भक्तीत साह्यकारीच ठरणार आहे असा ख-या भक्ताचा दृष्टीकोन असतो.


याबाबत तीन संतांचे उदाहरण आहे. श्रीतुकोबांनी "बरे झाले देवा बाईल कर्कशा" अशा शब्दात आपल्या पत्नीचे वर्णन केले आणि अशी पत्नी दिली म्हणून देवा मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकलो नाहीतर संसारातच गुरफ़टून गेलो असतो, तुझा विसर पडला असता असे वर्णन केले.


संत एकनाथ महाराजांना एकाने विचारले की महाराज तुमचा परमार्थ इतका चांगला, नेटका कसा झाला ? त्यांनी उत्तर दिले की माझी पत्नी अतिशय सात्विक आहे आणि माझ्या अध्यात्मसाधनेत तिची पूर्ण साथ मला आहे.


समर्थ रामदासांना हाच प्रश्न कुणीतरी विचारला असता तर त्यांनी उत्तर दिले असते की मला पत्नी नव्हतीच त्यामुळेच मी फ़क्त परमेश्वराकडे पूर्ण लक्ष देऊ शकलो.


म्हणजे परिस्थिती वेगवेगळी असली, अनुकूल - प्रतिकूल असली तरी ख-या भक्ताच्या, भगवंतप्राप्तीच्या ध्येयाआड ती येत नाही. उलट असलेल्या परिस्थितीचा आपल्या ध्येयप्राप्तीसाठी वापर कसा करून घ्यायचा हे भक्ताला माहिती असते.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध षष्ठी शके १९४६ दिनांक ५ / १ / २०२५

Saturday, January 4, 2025

चिंतनक्षण - ४

 


"बागेत लावलेल्या रोपाची आपण काळजी घेतो तेव्हढी तरी आपल्या साधनेतल्या संकल्पाची घ्यायला हवी." - डॉ. सुहास पेठे काका


जिज्ञासू साधक काहीतरी संकल्पाने साधना सुरू करतात खरे पण काही कारणांनी तो संकल्प पूर्णत्वास जायला अडचणी निर्माण व्हायला लागतात. परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की संकल्प छोटा असावा पण तो शाश्वताचा असावा. आपण साधक आपल्या शक्तीला न बघता फ़ार मोठे संकल्प करतो मग ते सिद्धीला कसे जातील याची काळजी आपल्याला लागून राहते.


बागेत रोप लावले की त्याने मूळ धरून ते मोठे होईपर्यंत त्याला सतत जपत रहावे लागते. तसे साधकांनी आपापल्या संकल्पांना तो दृढ होऊन आपल्या वृत्तीत मुरेपर्यंत, आपल्या अत्यंत सवयीचा होईपर्यंत, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होईपर्यंत जपत राहिला पाहिजे. त्या संकल्पाला फ़ळे धरेपर्यंत (अर्थात ख-या साधकाचा त्याच्या संकल्पाला फ़ळे आलीच पाहिजेत हा अट्टाहास कधीच नसतो म्हणा) तो संकल्प सगळ्या भल्या बु-या वासनांपासून दूर, गुप्त ठेवता आला पाहिजे, त्या संकल्पाला आपल्या रोजच्या उपासनेचे जल समर्पित करायला हवेच. मधेमधे त्या संकल्पात आपल्या सदचिंतनाचे खत आणि सदगुरू विश्वासरूपी खाद्य देता यायला हवे. त्या संकल्पात विकल्पाचे तण साठायला सुरूवात झालीच तर दृढ निश्चयरूपी खुरपण्याने ते काढून टाकता यायला हवे.


एकदा संकल्पाने दृढ मुळे धरलीत तो चांगला पक्का झाला की साधक ही त्याच्या साधनेत स्थिर होतो आणि मग त्याला त्याच्या साधनेपासून दूर करणा-या शक्ती त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाहीत.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन"
पौष शुद्ध पंचमी शके १९४६ दिनांक ४ / १ / २०२५

Friday, January 3, 2025

चिंतनक्षण - ३

 


"शरणागती ही अवस्था आहे, काही साधण्याचा मार्ग नव्हे." - डॉ. सुहास पेठे काका


एखाद्या माणसाला किंवा सत्पुरुषाला आपण शरण जातो कारण तो त्याच्या जीवनात योग्य मार्गावर मार्गक्रमण करतो आहे याची आपल्याला खात्री पटलेली असते. आणि त्याला शरण गेल्यानंतर तो सत्पुरुष आपल्यालाही योग्य त्या  मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन करेल आणि त्यायोगे आपलाही उद्धार होईल याची आशा आपल्याला असते.  

 

शरणागतीत हा अगदी सात्विक असला तरी थोडा स्वार्थाचा, स्वतःसाठी काहीतरी साध्य करण्याचा मार्ग आहे. अशा प्रसंगी परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराजामचे सत्शिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांचे उदाहरण आपण सगळ्यांनी आदर्श म्हणून ठेवण्यासारखे आहे. बुवा त्याकाळी काशीला जाऊन उच्च विद्या प्राप्त करते झाले. संस्कृतात त्यांनी प्राविण्य मिळवले. इतरही अनेक विषयात ते प्रवीण झालेत. पण जेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजांना त्यांनी बघितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराजांकडे जे सामर्थ्य, जे समाधान, जे ज्ञान आहे ते त्यांच्याजवळ नाही. त्यांच्याजवळ केवळ स्वतःच्या लौकिक विद्येचा अभिमान आहे.

 

त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांचे  पाय घट्ट पकडले आणि म्हणाले "तुझी सगळी विद्या मी आजपासून घेतली असे म्हणा तरच हे पाय सोडीन.मला या लौकिक विद्येचा उगाचचा भार झाला आहे. तो भार तुम्ही घेतो म्हणा." परम पूजनीय महाराजांनी त्यांना तसे वचन दिले आणि मगच त्यांनी परम पूजनीय महाराजांचे पाय सोडलेत.

 

ही शरणागती अपेक्षित आहे. मी शरण आलोय. मला काहीही नकोय. मोक्ष, मुक्ती  अशी माझी काहीही मागणी नाही. मी कुणीही नाही फक्त तूच आहेस हे मला पटलेय म्हणून मी शरण आलोय. मला तुझ्या पदरात घे ही शरणागती सदगुरुंना किंवा प्रत्यक्ष पॅरमेश्वरालाही अपेक्षित असते. ती साधल्या जायला हवी. काहितरी मिळवण्यासाठी, काही अंतस्थ हेतू (कितीही सात्विक असला तरी) साधण्यासाठी शरणागती नको.

 

- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन"

पौष शुद्ध चतुर्थी शके १९४६ दिनांक / / २०२५

Thursday, January 2, 2025

चिंतनक्षण - २

 


"नामाचे खरे महत्व समजण्यास मानवी जीवनातील अपूर्णत्वाची कल्पना येऊन ते मान्य व्हावयास हवे." - डॉ. सुहास पेठे काका


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराजांनी आयुष्यभर नाम याच एका साधनाचा पुरस्कार केला. कलियुगात भगवंत प्राप्तीच्या इतर (तप, यज्ञ, याग इत्यादि) साधनांनी भगवंत प्राप्ती किती दुष्कर आहे आणि कलियुगात नाम या एकाच साधनाने भगवंत कसा सहज साध्य आहे हे परम पूजनीय महाराजांनी कायम प्रतिपादन केले.


मानवी जीवन अनेक अर्थाने अपूर्ण आहे. कलियुगात आपल्याला आयुष्य अत्यंत कमी आहे. या आयुष्यात आपण तप, यज्ञ याग इत्यादि साधनांनी भगवंत प्राप्ती करायची म्हटले तर अनेक जन्म जातील. बरे पुढल्या जन्मात मागील जन्माचे स्मरण, मागील जन्माची पुण्याई सोबत असेल तर मागील जन्माची तपश्चर्या पुढे चालू ठेवता येईल पण हे होईलच याची निश्चित खात्री नाही. त्यामुळे दर जन्मी असे भगवत्प्राप्तीची अनेक अपूर्ण प्रयत्न करून शेवटी भगवत्प्राप्ती होईलच याची खात्री नाही.


पण नामस्मरण हेच एक साधन या कलियुगात आपल्याला भगवत्प्राप्ती करून देऊ शकते. नामासाठी प्रत्येक मनुष्यमात्रांनी सर्वस्व द्यायला हवे. पण हे नामस्मरणाचे खरे महत्व आपल्याला तेव्हाच उमजेल जेव्हा आपण आपल्या मर्यादा, आपले अपूर्णत्व समजून घेऊ आणि याच जन्मात स्वतःचा सर्वार्थाने उद्धार करण्यासाठी योग्य प्रयत्न (नामाचा ध्यास) करू.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध तृतीया शके १९४६ दिनांक २ / १ / २०२५

Wednesday, January 1, 2025

चिंतनक्षण - १

 

"साधना करणे हा माणसाला मिळालेल्या मर्यादित कर्मस्वातंत्र्याचा सर्वश्रेष्ठ उपयोग होय." - डॉ. सुहास पेठे काका


मनुष्य जन्माला आलो म्हणजे आपण सगळे मागील काहीतरी प्रारब्धभोग भोगायला आलेलो आहे. मग मागील जन्मातल्या चांगल्या कर्मांमुळे या जन्मात सगळे छान छान चालू असो किंवा गेल्या जन्मांमधील काही चुकीची कर्मे भोगायला लागल्याने या जन्मात काही भोग भोगायला लागलेले असोत. मग सगळेच जीवन असे पराधीन, गत जन्माधीन आहे का ? मग मानवाचे कर्तृत्व ते काय ? परमेश्वराने मनुष्यप्राण्याला जी विचार करण्याची, आपले कर्म निवडण्याची शक्ती दिलेली आहे ती काय फ़क्त आपल्या जीवनात घडत असलेल्या गत जन्मार्जित घटना मूकपणे बघण्यासाठी ?


"मागील जन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे" असे संतकवी दासगणू श्रीगजाननविजय ग्रंथात लिहून गेलेले आहेत. या जन्मात आलेलो आहोत तर कर्मे करावीच लागणार. कर्मे न करता कुणीही मनुष्यप्राणी राहू शकत नाही. मग नवी कर्मे म्हणजे नवे संचित, नवे काहीतरी भविष्य निर्माण होणार. कर्मे चांगली असोत किंवा वाईट ती पुढल्या जन्मात भोगावीच लागणार. नव्हे ती कर्मे भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागणारच.


विचारी मनुष्याला पुढला जन्म नको असतो. या जन्म मरणाच्या फ़े-यातून विचारी मनुष्याला मुक्ती हवी असते. पण प्रत्येक कर्मातून काहीतरी नवे संचित निर्माण होऊन त्यातून नवा जन्म मिळणार असेल तर नक्की काय करावे. विचारी मनुष्याला आपली कर्मे करण्याचे स्वातंत्र्य असे मर्यादित आणि अडचणीचे असते.


म्हणून मनुष्याला जे थोडे कर्मस्वातंत्र्य मिळालेले आहे त्यात त्याने जर साधना केली तर त्याला कळून येईल की सगळी कर्मे जर ईश्वरस्मरणात केलीत, नामस्मरणात केलीत, कर्तव्य बुद्धीने केलीत आणि सर्व कर्मे ईश्वराला अर्पण केलीत तर आणि तरच त्याच्या संचितात नव्या कर्मांचा आणि त्यायोगे भोगाव्या लागणा-या ब-या वाईट फ़ळांचा संचय होणार नाही. हे ज्ञान, ही समज केवळ साधनेत राहिल्याने मनुष्याला कळू शकेल. आणि एकदा कर्माचा हा सिद्धांत आणि संचितातून मोकळे होऊन मुक्तीपथावर चालण्याचा आनंद जर मनुष्यमात्रांना कळला तर तो आपली साधना निरंतर सुरूच ठेवेल. साधना करणे हा मनुष्याला मिळालेला विशेष कर्तव्याधिकार आहे.


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध द्वितीया शके १९४६ दिनांक १ / १ / २०२५