Showing posts with label Shivaji University. Show all posts
Showing posts with label Shivaji University. Show all posts

Saturday, June 21, 2025

जीवनातला एक महत्वाचा दिवस २९/११/१९८९

आज मी माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या दिवसाबद्दल आणि माझ्या अनुभवाबद्दल लिहीणार आहे. ही गोष्ट माझे त्याकाळचे रूम पार्टनर्स, माझे आईवडील आणि माझे अगदी खास मित्र यांच्यापर्यंतच आजवर मर्यादित होती. हा दिवस माझ्या आयुष्यात मी विसरूच शकत नाही. 


शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे सप्टेंबर १९८९ पासून आमचे प्रथम सत्र अभियांत्रिकी सुरू झाले होते. खरेतर इथले सत्र जुलै अखेरीसच सुरू झालेले होते. आमचे प्रवेश व्ही. आर. सी. ई. नागपूर येथून झाल्याने आणि आमचा प्रवेश अगदी तिस-या राऊंडला झाल्याने आम्ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात इथे आलो होतो. आम्हाला हॉस्टेल मिळाले होते. त्याकाळी हॉस्टेल छान होते आणि मुख्य म्हणजे हॉस्टेलचा खर्च रूपये ६५ प्रतिवर्ष एव्हढा होता. हॉस्टेलला गरम पाण्यापासून इतर सर्व सोयीसुविधा मिळायच्यात. ज्यांना मेरिटनुसार हॉस्टेल मिळू शकले नाहीत असे आमचे काही मित्र कराड शहरात खोली करून रहायचेत. खोलीचे भाडे किमान १०० रूपये प्रतिमहिना होते. शिवाय खोली्च्या वापरावर तिथल्या घरमालकांचे अनेक निर्बंध होते. खोलीत गरम पाण्यासाठी गिझर लावायचा नाही. रात्री अमुक एका वेळानंतर लाईटस लावायचे नाहीत वगैरे वगैरे. त्यामुळे खर्चाच्या मानाने आणि अभ्यासासाठीही हॉस्टेल हा सर्वोत्त्तम पर्याय होता. शिवाय शहरात खोली करून राहिलोत तर रोज कॉलेजपर्यंत येणे जाणे हे शहर बसने करावे लागे. त्याचा खर्च वेगळाच.


प्रथम वर्षाला आम्हाला हॉस्टेलला आमचे रूम पार्टनर्स निवडण्याची मुभा नव्हती. द्वितीय वर्षापासून आपण आपले आपले रूम पार्टनर्स निवडू शकायचो. प्रथम वर्षाला रूम पार्टनर्सचे अगदी रॅंडम अलोकेशन होत असे. नशीब एव्हढेच होते की एकाच विद्यापीठ क्षेत्रातून आलेली मुले एकाच रूममध्ये आणि शक्यतो हॉस्टेलच्या एकाच विंगमध्ये असायची. त्यामुळे आम्हा नागपूर विद्यापीठकरांची एक विंग, पुणे विद्यापीठातून आलेल्या पुणे - नाशिक - नगरकरांची एक विंग, शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातल्या सोलापूर - कोल्हापूर - सांगलीकरांची एक विंग असे वेगवेगळ्या हॉस्टेल विंग्जमध्ये आमची रहाण्याची व्यवस्था होती. आणि मेस म्हणजे सहकार तत्वावर चालणारी, विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी चालवलेली मेस अशी सुंदर मेस होती. आमच्य महाविद्यालय आवारातच. आमच्या हॉस्टेल पासून अगदी ५० पावलांवर. त्यावेळी मेसचे महिन्याचे बिल १२५ ते १५० रूपये प्रतिमहिना येत असे. गावात खोली करून राहिल्यावर तिथे मेस शोधावी लागत असे. ती जरा दूरच असे आणि तिचे बिलही हॉस्टेलच्या मेसपेक्षा जास्त येत असे. गावात राहण्याचा हा आणखी एक तोटा.


प्रथम वर्षाला आम्ही उशीरा गेलो खरे पण तिथे आमच्या पूर्वी, ॲडमिशनच्या पहिल्याच राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेला एक मुलगा आम्हाला तिथे रूम पार्टनर म्हणून मिळाला. आमच्या काही दिवस आधी इथे आल्यामुळे त्याने आमच्यावर जरा सिनीयारिटी गाजवायला सुरूवात केली. त्यातून त्याचे कोणीतरी जवळचे नातेवाईक त्याकाळच्या तंत्रशिक्षण मंडळावर उच्च्पदस्थ होते त्यामुळे त्याची स्वतःबद्दल थोडी वेगळी कल्पना होती. स्वतःला काही वेगळे विशेषाधिकार आहेत याच गुर्मीत आणि धुंदीत तो किमान पहिले सत्र तरी तो तिथे वावरत होता.


मी आणि माझ्यासारखाच नागपूरवरून गेलेला आणखी एक विद्यार्थी आणि आधीपासून तिथे असलेला आमचा काही दिवसांचा सिनीयर असे आम्ही तिघे रूम नंबर 007 चे रहिवासी झालोत. आमच्या अभ्यासाच्या सवयींवर आणि इतर वागण्यावरही या काही दिवसांच्या सिनीयरने लक्ष ठेवायला आणि अकारण टीका करायला सुरूवात केली. एकतर आमचे प्रवेश उशीरा झाल्याने आमचा साधारण महिन्याभराचा अभ्यास बुडला होता. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग चालवून आत्त्तापर्यंत झालेला अभ्यास भरून काढण्याचे प्रयत्न वगैरे त्यांच्याकडून शक्यच नव्हते. घरापासून पहिल्यांदाच इतके दूर राहणे, सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःच मॅनेज करणे, पैशांचे नियोजन बघणे आणि चालू असलेला अभ्यास समजावून घेताना झालेला अभ्यास स्वाभ्यासाद्वारे भरून काढणे अशी आमची तारेवरची कसरत तिथे पहिल्या सत्राला सुरू होती आणि रूमवर हे सिनीयर महाशय आम्हाला प्रत्येक गोष्टीत हतोत्साहित करायला बसले होते. आम्ही अभ्यासाला बसलोत की "अरे लेको, असा अभ्यास कराल तर तुम्ही डी. सी.(६ पैकी ३ विषयांपेक्षा जास्त विषयात नापास) व्हाल. माझ्यासारखा अभ्यास करा." अर्थात हे वय त्याचेही न कळते असे होते. प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण, प्रत्येक व्यक्तीची शक्तीस्थळे (Strong Points), मर्मस्थळे (Weak Points) वेगवेगळी असू शकतात हे समजण्याइतका तो प्रगल्भ नव्हता आणि मनात कुठेतरी स्वतःविषयी अकारण श्रेष्ठतागंड (Superiority Complex) असल्याने तो दररोज आम्हा दोन्हीही पार्टनर्सना हतोत्साहित करीत होता. आणि मी दिवसेंदिवस मनातून खचत चाललेलो होतो.


दिवाळी झाली, पहिल्या सत्राचे शिकवणे संपले, आम्हाला परिक्षेआधी अभ्यासाच्या सुट्या (Preparation Leaves) लागल्यात. जेवढे समजून घेता येईल, तेव्हढे समजून माझा अभ्यास सुरू होता. त्यात पहिल्या सत्राला विषय तर कसले भारी होते. 


अ) इंग्रजी: ह्या विषयाची धास्ती नव्हती. हा विषय साधारण १२ व्या वर्गाच्या पातळीचा असायचा. त्यामुळे हा विषय सहज पास करू शकू हा आत्मविश्वास होता.


आ) गणित: हा विषय पण साधारण १२ व्या वर्गाच्या पातळीचाच होता पण या विषयाच्या तयारीबद्दल मला स्वतःलाच बिलकुल आत्मविश्वास वाटत नव्हता. १२ व्या वर्गात एकाच टॉपिकवरचे शेकडो गणिते सोडवून आलेला आत्मविश्वास इथे मात्र पूर्ण ढासळलेला होता.


इ) भौतिकशास्त्र: हा विषय सुद्धा १२ व्या वर्गाच्या पातळीपेक्षा सोपा वाटत होता.


ई) रसायनशास्त्र: हा विषय सुद्धा भौतिकशास्त्राप्रमाणेच आम्हाला १२ व्या वर्गाच्या तुलनेने आम्हाला सोपा वाटत होता.


उ) इंजीनीअरींग ड्रॉईंग: हा विषय आम्हाला पूर्णपणे नव्याने शिकावा लागला होता आणि त्यातही आमची ॲडमिशन उशीरा झाल्याने सुरूवातीच्या ज्या मूलभूत संकल्पना शिकवल्या गेल्यात त्या आम्हाला कळल्याच नव्हत्या. त्यामुळे एखाद्या इमारतीच्या अत्यंत भुसभुशीत पायासारखी आमची या विषयाची अवस्था होती. म्हणायला इमारत तर आहे पण मूलभूत संकल्पनांचा पायाच नसल्याने ती कधीही कोसळून पडेल अशी नाजूक अवस्था.


ऊ) अप्लाईड मेकॅनिक्स: हा विषय सुद्धा आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदात शिकत होतो. आणि हा विषय सुद्धा इंजीनीअरींग ड्रॉईंग प्रमाणे मध्येच शिकावा लागत असल्याने या सुद्धा विषयासंबंधी आमच्या मूलभूत संकल्पना नव्हत्याच. नंतर कळले की अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षाच्या निकालात सगळ्याच विद्यापीठांमध्ये हा विषय मुख्य खलनायकाची भूमिका बजावत असतो. 


शिवाजी विद्यापीठात त्यावेळी अंतर्गत गुण आणि सत्रांत परिक्षांचे गुण असे वेगवेगळे नसत. नागपूर विद्यापीठात शिकत असणा-या आमच्या मित्रमंडळींना वर्षभराच्या मेहेनतीचे २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन व्हायचे आणि सत्रांत परिक्षांमध्ये फ़क्त ८० गुणांची परिक्षा द्यावी लागत असे. त्यामुळे इकडे अंतर्गत गुणांमध्ये २० पैकी १७, १८, १९ किवा २० गुण मिळवलेत की तिकडे सत्रांत परिक्षांमध्ये पास होण्यासाठी ८० गुणांपैकी अनुक्रमे २३, २२, २१ किंवा २० च गुण पुरेसे ठरत असत. शिवाजी विद्यापीठात तसे नव्हते. अंतर्गत मूल्यमापन हा घटकच नव्हता. सगळी मदार १०० गुणांच्या सत्रांत परिक्षांवर. त्यात किमान ४० गुण मिळवावेच लागत. (ही ४० गुणांची गोष्ट सुद्धा मला २९/११/१९८९ या दिवशीच पहिल्यांदा कळली. तो खुलासा योग्य त्या ठिकाणी येईलच.)

 

आमचे शिवाजी विद्यापीठ परिक्षांचे वेळापत्रक आणि निकाल यांच्याबाबत किती काटेकोर होते याबाबतचे विवेचन मी इथे  केलेले आहे.  


आमची सत्रांत परिक्षा दिनांक २७/११/१९८९ ला सुरू झाली. पहिलीच वेळ होती की घरून आईवडीलांचा आशिर्वाद वगैरे न घेता मी परिक्षेला निघालेलो होतो. पहिला पेपर इंग्रजीचा होता आणि चांगलाच गेला. आम्ही आमच्या दुस-या पेपरच्या तयारीला लागलोत. दुसरा पेपर गणिताचा होता. आणि आमच्या रूमवर आमच्या अभ्यासाच्या तयारीवर, आत्मविश्वासावर सतत विरजण घालणारा रूम पार्टनर होताच. आधीच त्याविषयाची अपुरी तयारी आणि आहे त्या आत्मविश्वासावर पडणारे सततचे हे विरजण यामुळे आमचा आत्मविश्वास अगदी तळाशी पोचलेला होता.


२९/११/१९८९: सकाळी ९.३० ला गणिताचा पेपर सुरू झाला. परिक्षाकेंद्र आमचेच महाविद्यालय होते. जशी स्वतःला जमतील. आठवतील तशी मी गणिते सोडवीत होतो. १२ व्या वर्गाच्या परिक्षेत गणिते सोडवून १०० पैकी ९५ ते १०० गुण मिळविण्याचा आत्मविश्वास मात्र त्या परिक्षा हॉलमधल्या आमच्या कुणाचाच नव्हता हे नक्की.


दुपारी १२.३० ला पेपर आटोपून रूमवर परतलो. पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील याची टोटल स्वतः स्वतःशीच केली. माझ्या अंदाजाप्रमाणे मला ३७, ३८ गुण मिळायला हरकत नव्हती. तोपर्यंत मला वाटत होते की इतर सगळ्या परिक्षांसारखे अभियांत्रिकीतही १०० पैकी ३५ गुण म्हणजे पास. अभियांत्रिकीत पासिंगसाठी कमीतकमी ४० गुण लागतात ह्या वस्तूस्थितीपासूनसुद्धा मी अनभिज्ञ होतो.


मेसमध्ये जेवण करून रूमवर परतल्यानंतर नेहेमीप्रमाणे आमच्या त्या विरजणाने आमची झाडाझडती घ्यायला सुरूवात केली. मी सांगितले की मी या विषयात काठावर का होईना पास होईन. मला ३७, ३८ गुण मिळतील असे वाटते. हे ऐकल्यावर त्याच्या वाणीला आणि निर्भत्सनेला अधिकच जोर आला. "अबे, तेरेको ४० मार्क्स पासिंगके लिये लगते है इतना भी नही पता, तू क्या पास होगा बे ? तू क्या इंजीनीअर बनेगा बे ? तू तो डी सी ही हो जायेगा." (या संभाषणात प्रत्येक वाक्याच्या सुरूवातीला आणि शेवटी हॉस्टेलला राहणा-या मुलांच्या तोंडात असतात तसल्या शिव्या. तबियतदार तज्ञांनी त्या ओळखून तिथे तिथे शिव्या टाकून घ्याव्यात.) 


हे ऐकल्यावर माझा आजवरचा आशेचा क्षीण बांधसुद्धा कोसळला. आपण काहीही करू शकत नाही. आपण साधी एक परिक्षासुद्धा पास होऊ शकत नाही. आपल्या आईवडीलांची आपल्याविषयीची स्वप्ने आपण चक्काचूर केलेली आहेत असे अनेक निराशाजनक विचार मनात एकदम आलेत. मी खोल खोल नैराश्यात गेलो. त्या नैराश्यातच "आता आपण हे इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. घरी परत जाऊयात." या अत्यंत घातक विचाराने मनात उचल खाल्ली आणि मी माझी बॅग भरायला घेतली. एव्हाना दुपारचे २ वाजत होते. नागपूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस दुपारी ४.००, ४.३० ला कराडवरून निघणार होती. मला तिथे थांबणे असह्य झाले होते. बहुतेक सगळ्या सामानाची गठडी वळून मी हॉस्टेलच्या बाहेर पडलो. स्टेशनवर जायला. मला स्टेशनपर्यंत सोडायला माझे दोन्हीही रूम पार्टनर्स माझ्यासोबत निघालेत. आम्हा तिचांची ही वरात महाविद्यालय परिसरात एका टोकाला असलेल्या आमच्या हॉस्टेलपासून महाविद्यालय परिसराच्या प्रवेश / निर्गम दारापर्यंत निघाली. तिथून रिक्षा करून आम्ही कराड स्टेशनवर जाणार होतो आणि तिथून मी अभियांत्रिकी शिक्षणाला रामराम करून कायमचा नागपूरला. नागपूरला गेल्यावर या शिक्षणाऐवजी काय करायचे ? आई वडीलांना असे अर्धवट शिक्षण सोडून आल्यावर काय वाटेल ? कशा कशा विचार डोक्यात त्यावेळी नव्हता. हे हॉस्टेल सोडून लगोलग नागपूरपर्यंत जाण्याचा अविचारच मनावर ताबा मिळवून होता.


आमची वरात कॉलेज कॅण्टीनसमोरून जात असताना तिथे आमच्या अंतिम वर्षाची काही सिनीयर मंडळी दुपारचा चहा वगैरे पीत बसलेली होती. त्यात आमचा त्यावर्षीचा कॉलेज जी. एस. असलेला भट्टा उर्फ़ टी. व्ही. एस. भट्टात्रिपाद सुद्धा होता. मी आमच्या फ़्रेशर्समध्ये काही नकला, काही गाणी वगैरे सादर केल्यामुळे तो मला ओळखत होता. परिक्षांच्या काळात असे कुणी सामानसुमानासह महाविद्यालय परिसरातून बाहेर जाणे ही घटना सर्वथैव अनपेक्षित होती आणि भट्टाच्या अनुभवी नजरेने ती हेरली. त्याने आणि त्याच्यासोबतच्या आमच्या सिनीयर्सनी आम्हाला कॅण्टीनसमोरच थांबवले आणि का जाताय ? कोण जातय ? वगैरे प्रश्नावली सुरू केली.


मी माझ्या अपयशाचा पाढा आणि माझी कैफ़ियत त्याच्यासमोर मांडली आणि माझा अभियांत्रिकी शिक्षणातला रस कसा संपलाय हे त्याला विषद केले आणि म्हणून मी आता सगळे सोडून घरी निघालोय हे प्रांजळपणे सांगितले. त्याने ते सगळे ऐकले आणि सगळ्यात पहिल्यांदा मला स्टेशनवर सोडायला निघालेल्या माझ्या रूम पार्टनर्सवर तो बरसला. आपल्या मित्राला धीर द्यायचे सोडून त्याच्या अशा अविचारात साथ देताना तुम्हाला लाज वाटत नाही का ? वगैरे वगैरे. त्याने त्यांना रूमवर पिटाळले आणि मला घेऊन तो कॅन्टीन्शेजारच्याच एका कट्ट्यावर बसला. माझ्या सामानसुमानासकट, गादीसकट मी पण नाईलाजाने तिथे विसावलो. तो आमच्या महाविद्यालयाचा जी. एस. होता आणि एक आदरणीय सिनीयर होता. त्याचे म्हणणे डावलणे मला शक्यच नव्हते.


मी वारंवार माझा इथला रस कसा संपलाय हे त्याला सांगत होतो तर तो वारंवार "एव्हढी परिक्षा पूर्ण होऊ दे आणि मगच घरी जा" असे मला सांगत होता. दोघांच्या युक्तीवादात तोडगा निघेना तेव्हढ्यात त्याने एक सर्वमान्य तोडगा सुचवला. तो म्हणाला, "बघ, पराग लपालीकर आता परिक्षेसाठी परिक्षा हॉलमध्ये आहे. त्याची परिक्षा संध्याकाळी ५ वाजता संपेल, त्याला तू भेट आणि तो सांगेल तसे कर." हा तोडगा मला पटला. तरीही भट्टाचा माझ्यावर विश्वास बसला नाही. तो माझ्यासोबत त्या कट्ट्यावर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बसून राहिला. न जाणो माझा विचार पालटला आणि मी रिक्षा करून स्टेशनवर निघून गेलो तर म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आपला अभ्यास टाकून तो माझा सिनीयर माझ्यासोबत तिथे गप्पा मारत बसून राहिला.


कराडला ॲडमिशन मिळाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ओळख म्हणून मी नागपूरचाच असलेला, माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला आणि महालातला कट्टर संघ कार्यकर्ता असलेल्या पराग लपालीकरची ओळख घेऊन कराडला गेलो होतो. दोनच वर्षात परागने कराडला उत्त्तम जनसंपर्क आणि आपला प्रभाव निर्माण केल्याचे माझ्या लक्षात आले होते. तो तिथला माझा मेंटर होता हे सगळ्यांनाच माहिती होते. तिथल्या संघ वर्तुळात आमचा प्रवेश करवून देणे, विद्यार्थी परिषदेच्या कामात आम्हाला अगदी प्रथम सत्रापासून समाविष्ट करून घेणे आणि मला योग्य ते मार्गदर्शन करणे अशा अनेक महत्वाच्या जबाबदा-या परागने माझ्याबाबतीत पार पाडलेल्या होत्या. त्यामुळे परागचा त्यादिवशीचा पेपर संपल्यानंतर तो जसा बाहेर आला तसे भट्टाने मला त्याच्याकडे सोपवले आणि दुस-या दिवशी असलेल्या स्वतःच्या परिक्षेची तयारी करायला तो हॉस्टेलकडे रवाना झाला.


मग परागने माझा ताबा घेतला. "हे बघ, आजची महाराष्ट्र एक्सप्रेस तर गेलेली आहे. तू आजच्या दिवशी थांब. आपण यावर थोडी चर्चा करू. वाटल्यास तू तुझ्या रूमवर नको जाऊस. हॉस्टेलवर माझ्या रूमवर थांब, काही प्रॉब्लेम नाही. आपण बोलू मग तू ठरव जायचे की नाही तर." वगैरे माझी समजूत घालून तो मला माझ्या बाडबिस्त-यासकट त्याच्या रूमवर घेऊन गेला. त्याची रूम म्हणजे संपूर्ण महाविद्यालयात अत्यंत हुशार आणि हरहुन्नरी रूम म्हणून प्रसिद्ध होती. त्याचा एक रूम पार्टनर म्हणजे संकेत आंबेरकर, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट क्वीझपटू आणि अभ्यासात विद्यापीठात कायम पहिल्या पाचात असणारा हुशार विद्यार्थी,. दुसरा रूम पार्टनर म्हणजे अभिनव बर्वे. महाविद्यालयाकडून विद्यापीठाच्या क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन झालेला अतिशय उत्त्तम क्रिकेट खेळाडू, अतिशय उत्त्तम वक्ता आणि संकेतशी स्पर्धा करणारा अतिशय हुशार विद्यार्थी. पराग लपालीकर म्हणजे त्या दोघांच्याही तोडीचा विद्यार्थी, एक उत्त्तम नट आणि अतिशय उत्त्तम संघटक. हे तिघेही सगळ्या महाविद्यालयात अतिशय लोकप्रिय होते. 


परागच्या रूमवर गेलो खरा पण मानेवर वेताळ बसलेला असतानाही हट्ट न सोडणा-या राजा विक्रमादित्याप्रमाणे मी आपला नागपूरला परतण्याचा हेका सोडला नाही. एक दिवसाच्या सुट्टीनंतर दुस-या दिवशी माझा पेपर होता. भौतिकशास्त्राचा. पण मी ढिम्म अभ्यासच करत नव्हतो. परागच्या रूममधले माझे सगळे सिनीयर्स पुढच्या पेपरच्या तयारीला लागले पण त्या रात्री मी ढिम्म पुस्तक उघडले नाही आणि झोपी मात्र गेलो. माझ्या हटवादी मनाला समजून माझी समजूत घालण्याचा आणि मला "अभ्यास कर" म्हणण्याचा अजिबात प्रयत्न न करण्याची प्रगल्भता परागने आणि त्याच्या दोन्हीही रूम पार्टनर्सने दाखविली.


दुस-या दिवशी उठल्यावर पराग हळूच म्हणाला, "थांबलाच आहेस तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर्स देऊनच जा नं. तसे हे पेपर्स १२ व्या वर्गाच्या पेपर्सपेक्षा सोपे असतात. बघ म्हणजे." मला तो विचार पटला. हे दोन पेपर्स देऊन मग आपण नागपूरकडे निघू हे मी मनाने ठरविले. परागची परवानगी घेऊन माझ्या 007 रूमवर परतलो. तोपर्यंत माझी अवस्था जाणून परागने आणि इतर सिनीयर्सनीही माझ्या त्या विरजण घालणा-या आणि कायम हिणवणा-या रूम पार्टनरला चांगला दम भरला होता त्यामुळे उरलेले दिवस तो माझ्या वाट्याला फ़ारसा गेला नाही.


भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर्स चांगले गेलेत. आता काय उरलेले दोनच पेपर्स. ते तर तीन दिवसांत संपतीलच. मग काय सगळ्यांनीच आपापल्या घरी जायचय हा विचार मनात आला आणि मी उरलेले ते दोन्हीही पेपर्स देऊन ८ डिसेंबरला सगळ्यांच्याच सोबत घरी परतायचे ठरवले. हॉस्टेलला असताना शेवटले एक दोन पेपर्स उरलेत की आमची घरी परतण्याची ओढ इतकी शिगेला पोचत असे की आमच्या सामानाचे पॅकींग वगैरे आम्ही दोन दिवस आधीपासूनच करून ठेवत असू. अगदी अंगावरच्या शर्ट पॅंटसह तसेच दोन दिवस वावरत असू. आणि दुपारी १२.३० ला शेवटचा पेपर आटोपला की पटापट जेवून दुपारी २ वाजताच कराडच्या स्टेशनवर जाऊन आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट बघत बसत असू. शेणोली स्टेशनच्या बाजूने कराड स्टेशनकडे येताना रेल्वेमार्गाला एक चढाव होता. त्या चढावावर धूर सोडत, धापा टाकत चढत असलेले महाराष्ट्र एक्सप्रेसला लागलेले डिझेल एंजिन बघणे हे आम्हा सर्वांचे सर्वात आवडते दृश्य होते.


त्याप्रमाणे मी घरी, नागपूरला परतलो. घरी प्रांजळपणे सगळा प्रकार सांगितला. हा सत्रात गणित, ड्राइंग आणि मेकॅनिक्स हे तीन विषय बॅक राहू शकतात याचीही कल्पना दिली. घरच्यांनी परिक्षा सोडून परतण्याच्या निर्णयाबद्दल थोड्या कानपिचक्या दिल्यात आणि मला तिथे सहाय्य केल्याबद्दल परागचे मनापासून आभार मानलेत. आणि पुढल्या सत्रात पहिल्यापासून चांगला अभ्यास करून त्या सत्राचे आणि ह्या सत्रात कदाचित बॅक राहिलेत तर या सत्राचे असे विषय काढून टाक, नक्की निघतील, काळजी करू नको असा धीरसुद्धा दिला.


जानेवारी १९९० च्या पहिल्या आठवड्यात आम्ही दुस-या सत्रासाठी पुन्हा कराडला पोचलो. जुने नैराश्य झटकून, नव्या दमाने, नव्या आशेने. पहिल्या सत्राचा आमचा निकाल लागला आणि काय आश्चर्य ! ज्या गणित विषयात मला ३७, ३८ गुण मिळतील असा अंदाज होता त्यात मला तब्बल ४८ गुण होते आणि मेकॅनिक्समध्ये तर १०० पैकी ७० गुण मिळाले होते. मी चक्क फ़र्स्ट क्लास मिळवून पास झालो होतो. ताबडतोब तार करून ही आनंदाची बातमी घरी कळविली. सोबतच गुणपत्रिकेची कॉपी करून एका पत्राद्वारे घरीही पाठविली. त्यादिवशी आमचा टॉपर असलेल्या मुलांपेक्षा माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव जास्त झाला. परिक्षा कठीण गेली म्हणून अर्धवट शिक्षण सोडून परत निघालेल्या मुलाला त्याच परिक्षेत प्रथम वर्ग मिळाला होता. त्याचे स्वतःविषयीचे एकंदर आकलन किती नैराश्यपूर्ण होते याचा धडा त्याला मिळाला. कोणी कितीही हतोत्साहित केले तरी स्वतःवर, स्वतःच्या नैसर्गिक आणि प्रयत्नांनी सिद्ध केलेल्या क्षमतांवर स्वतःचा विश्वास पाहिजे हा धडा त्याला मिळाला होता. बहुतांशी हिंदी सिनेमांप्रमाणे या प्रकरनाचा शेवटही गोड झाला होता. 


सगळ्यात कहर म्हणजे "अभ्यास कसा करावा ?" याचे कायम डोस पाजणा-या आणि "तुम्ही नापासच होणार" अशी भविष्यवाणी करणा-या त्या विरजणाला मात्र या परिक्षेत कसाबसा सेकंड क्लास मिळवता आला होता. त्याचे भवितव्य त्याला अधिक भेडसवायला लागलेले होते कारण त्या काळी आमच्या महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटला येणा-या टेल्को, एल. ॲण्ड टी. सारख्या चांगल्या कंपन्या विद्यार्थ्यांकडून सगळ्या सेमिस्टर्समध्ये फ़र्स्ट क्लासची अपेक्षा करीत असत. एका सेमिस्टरमध्ये मिळवलेला सेकंड क्लास त्यांना चालत नसे. मग उरलेले सत्र या विरजण महाशयांनी आमच्याशी अभ्यासाबाबत पंगा घेतला नाही. आणि दुस-या सत्रातही आम्ही फ़र्स्ट क्लास तर मिळवलाच आणि डिस्टींक्शनच्या भोज्याला हात लावून थोडक्यात परतलो.


२९/११/१९८९, माझ्या जीवनातला एक अत्यंत महत्वाचा दिवस. मला इंजीनीअरींगच्या ट्रॅकवर ठेवणारा, माझा क्षणैक अविचार हाणून पाडणारा, मला माझे करियर देणारा एक अत्यंत महत्वाचा दिवस. या दिवशी भट्टात्रिपाद तिथे नसता, परागने मला समजून घेतले नसते, त्याच्या रूम पार्टनर्सनी मला सहाकार्य केले नसते तर माझे काय झाले असते ? या विचाराने आजही माझ्या अंगावर काटा आणणारा दिवस. माझ्या त्या सगळ्या सिनीयर्सशी जीवनभराची कृतज्ञता बाळगण्याचा हा दिवस. मला प्रौढ, प्रगल्भ करणारा महत्वाचा दिवस.


- त्या प्रसंगानंतर माणसांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणारा आणि हतोत्साहित करण्यापेक्षा माणसांना कायम धीर देता आला पाहिजे या दृढ समजुतीचा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शनिवार, २१ जून२०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Sunday, June 1, 2025

एक स्पर्धा ? नव्हे एक सुरेल मैफ़ल : कायमची मनात रूतून बसलेली.

एप्रिल १९९३. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूरचे विस्तीर्ण प्रांगण. शिवाजी विद्यापीठाचा विद्यापीठ स्तरीय युवक महोत्सव. यात उत्स्फ़ूर्त वक्तृत्व, समूहगायन, एकल गायन, वादविवाद, एकल वाद्यवादन अशा विविध स्पर्धांचे आयोजन. यात सामील असणारी विद्यार्थी मंडळी म्हणजे फ़ेब्रुवारी १९९३ मध्ये जिल्हावार झालेल्या युवक महोत्सवांमधून त्या त्या गटात पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवलेली गुणी मंडळी. 


शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तेव्हा सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशा चारच जिल्ह्यांचा समावेश होत होता. (नंतर २०१० च्या आसपास सोलापूर विद्यापीठाने स्वतःची वेगळी चूल मांडल्यावर सध्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात फ़क्त तीनच जिल्ह्यांचा समावेश आहे.) म्हणजे या सगळ्या स्पर्धांसाठी त्या त्या क्षेत्रातली गिनीचुनी आठच स्पर्धक मंडळी आलेली होती. स्पर्धा अगदी चुरशीची होणार हे निश्चित होते. 


आदल्या दिवशी आमची उत्स्फ़ूर्त वक्तृत्व स्पर्धा झालेली. एकापेक्षा एक सुंदर भाषणे आणि त्यातले विचार सगळ्यांना ऐकायला मिळालेले होते. ही भाषणे ऐकायला स्पर्धक तर होतेच पण कोल्हापूर शहरातले काही हौशी नागरिक पण स्पर्धास्थळी आलेले होते. दुस-या दिवशी एकल गायन स्पर्धा होती.


तिन्हीसांजेची कातर वेळ. एका छोट्याशा ऑडिटोरियम वजा वर्गखोलीत ही स्पर्धा आयोजित केलेली होती. तिथे थिएटरसारखे समोर एक स्टेज आणि समोर पायरीपायरीने चढत गेलेली प्रेक्षकांची बैठकव्यवस्था. छोट्याशा स्टेजवर ही तानसेन मंडळी गाणार होती. त्यांच्या सोबतीला केवळ तबला, पेटी आणि तानपुरा अशी मोजकीच वाद्ये होती. आजसारखा कॅराओके चा कल्लोळ नव्हता. आणि त्याकाळी हा कॅराओके असता तरी तिथे शक्य नव्हता. कारण स्पर्धेच्या नियमानुसार यापूर्वी रेडिओवर आणि इतरत्र रेकॉर्ड झालेली गाणी त्या अंतिम फ़ेरीत गायलेली चालणारच नव्हती. फ़क्त अनरेकॉर्डेड गाणी.


आज कॅराओके च्या कल्लोळात गायकाला गाणी पाठ असणे ही मूलभूत गरज आपण विसरत चाललेलो आहोत. व्यावसायिक गायक जेव्हा पहिल्यांदा एखादे गाणे म्हणतात तेव्हा माईकसमोर गाण्याचा, नोटेशन्सचा कागद लावून त्यांनी गाणी म्हणणे आपण समजू शकतो. त्यांच्यासाठी अनोळखी असलेली ती गाणी ते लोक केवळ दोन तीन तालमींनंतर म्हणत असतात. पण आज आपण सहस्र वेळा ऐकलेली, सगळी नोटेशन्स पाठ असलेली, शब्द पाठ असलेली गाणी एका हातात मोबाईल धरून दुस-या हातात तो कॅराओकेचा माईक धरून (त्यातही त्या मोबाईलची स्क्रीन ऑफ़ झाली की माईक धरलेल्या हाताने ती स्क्रीन पुन्हा सुरू करत) ते गाणे कसेबसे म्हणण्याची काय फ़ॅशन आलीय कोण जाणे ? यात त्या गाण्याचे काय भजे होते याचा विचार कुणीही करीत नाही. जे गाणे आपण श्रोत्यांसमोर सादर करतोय, ते लोकप्रिय आहे, आपल्याला आवडलेले आहे म्हणूनच सादर करतोय ना ? मग आपल्याला आवडलेले गाणे, लोकप्रिय गाणे आपल्याला त्यांच्यातल्या सुरावटीसकट पाठ असायला नको ? आणि ते गाणे आपल्यालाच अनोळखी असेल तर त्याच्या सादरीकरणात श्रोत्यांनाही मजा येत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. असो काळ बदललाय हे स्वीकारूयात.


१९९३ च्या स्पर्धेत मात्र सगळी सामील स्पर्धक मंडळी खूप तयारीने आलेली होती. आयोजकांनी स्पर्धेआधीच सगळ्या स्पर्धकांना ते कुठली कुठली गाणी म्हणणार आहेत ? त्या गाण्यांचे राग कुठले कुठले आहेत ? याची चौकशी करून त्यानुसार गाण्यांचे क्रम ठरवलेले होते. हे अत्यंत महत्वाचे असते. कारण यासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये दुस-या तिस-याच स्पर्धकाने जर बिलासखानी तोडी किंवा भैरवीत गाणे गायले तर त्यापुढली गाणी कितीही चांगली गायली गेली तरी श्रोत्यांसकट परिक्षकांच्याही कानांना भावत नाहीत. आणि त्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यानुसार स्पर्धकांचा क्रम ठरवताना आयोजकांनी तशी काळजी घेतलेली होती.


पहिलेच गाणे आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्पर्धक आणि आमचा मित्र सतीश तानवडेने सादर केले. भवानीशंकर पंडितांचे अत्यंत अर्थगर्भ, श्रीनिवास खळ्यांच्या अत्यंत कठीण सुरावटीत रचलेले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अत्यंत तयारीने गायलेले "गेले ते दिन गेले". सतीशला त्यापूर्वी हे गाणे गाताना आम्ही अनेक हॉस्टेलला, अनेक खाजगी मैफ़िलीत ऐकलेले होते. हे गाणे तो हातखंडा म्हणत असे. पण तरीही त्यादिवशी त्या छोट्याशा सभागृहात त्याने गायलेले गाणे त्याचे तोपर्यंतचे गायलेले सर्वोत्कृष्ट गाणे होते. खूप ताकदीने आणि खूप मन लावून त्याने गाणे सादर केले होते हे आम्हा सर्व मित्रांना आतून जाणवत होते. संधिप्रकाश. सूर्य मावळतोय. आणि सोबतीला खूप तयारीने सादर केले गेलेले "गेले ते दिन गेले" सारखे मन कातर करणारे गाणे. गाणे संपताना केवळ आम्हा मित्रांचीच नव्हे तर सर्व श्रोत्यांचीही मने कातर झालेली त्यांच्या चेहे-यांवरून कळत होते. 


त्यानंतर दोन तीन स्पर्धकांचीही अशीच सुंदर तयारीची गाणी सादर झालीत. त्याकाळी रेकॉर्डिंग करण्याची साधने होती खरी पण ती अत्यंत मर्यादित होती. स्वतःचा वॉकमन वगैरे असण्याची चैन महाविद्यालयातल्या एखाद्या विद्यार्थ्याला परवडत असे. त्यामुळे आजसारखी रेकॉर्ड करण्याची साधने असती तर त्यादिवशी सगळ्या स्पर्धकांनी गायलेली गाणी तिथल्या सगळ्याच श्रोत्यांनी रेकॉर्ड करून ठेवली असती आणि आपापल्या आयुष्यभर अनंत हळव्या संध्याकाळी ती मैफ़ल ऐकली असती. इतकी ती सुंदर मैफ़ल त्यादिवशी त्या छोट्याशा ऑडिटोरियममध्ये जमून आलेली होती. ती स्पर्धा आहे ही गोष्ट स्पर्धकांसकट सगळेच जणू विसरलेच होते. परिक्षकांना मात्र ही स्पर्धा आहे हे लक्षात ठेवणे भाग होते. इतर श्रोत्यांप्रमाणे ते त्या मैफ़िलीत वाहून जाऊ शकत नव्हते. मला त्यादिवशी त्या परिक्षकांची खरोखर कीव आली. सगळीच गाणी प्रथम क्रमांकाची झालेली असताना केवळ स्पर्धा म्हणून त्या बिचा-यांना परिक्षण करणे भाग होते.


सगळे अशा भावपूर्ण अवस्थेत असताना सगळ्यात शेवटचा स्पर्धक स्टेजवर आला. आणि त्याने भैरवीतले "दे दुवा किंवा दवा" हे गाणे गायला सुरूवात केली. तिथे उपस्थित असलेली सगळी मने त्या भैरवीच्या सुरांमध्ये आणि त्या अर्थपूर्ण शब्दांमध्ये अक्षरशः भिजली. भावगीतातले "भाव", शब्दप्रधान गायकीतले शब्दांचे महत्व याविषयावर त्यापूर्वी शेकडो लेख वाचले असतील पण त्यादिवशी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी त्या शब्दप्रधान गायकीची अनुभूती घेतली. अत्यंत सुरेल गळ्यांच्या साक्षीने.


त्या स्पर्धकाचे शेवटल्या कडव्याचे शेवटले शब्द "अग्नी दे माझ्या शवा, दे दुवा किंवा दवा" हे शब्द ऐकले मात्र आणि अत्यंत भावगर्भ शब्द, भैरवीचे कातर सूर, संध्याकाळची कातर वेळ या तिन्हीचा परिणाम म्हणून त्यादिवशी त्या सभागृहात सगळ्यांची भिजलेली मने त्यादिवशी सगळ्यांच्याच डोळ्यांमधून बाहेर पडत होती. "कोणते नाहीत डोळे आज ओले, आसवांनी आसवांना काय द्यावे ?" अशी एकूण एक श्रोत्यांची अवस्था झालेली होती. टाळ्या वाजवायला सुद्धा सगळे विसरले होते कारण टाळ्या वाजविणा-या हातांपैकी एक हात डोळे पुसण्यात मग्न होता. काही सेकंदांनंतर डोळे तसे वाहते ठेवत सगळ्यांचे हात टाळ्या वाजवण्यात गुंतले. अभूतपूर्व असा टाळ्यांचा कडकडाट झाला. 


स्पर्धेचा निकाल स्पर्धेच्या दुस-या दिवशी (युवक महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी) अधिकृतरित्या जाहीर होणार होता. पण सर्वांच्या मनात स्पर्धेचा निकाल तर त्याक्षणीच लागलेला होता. पण त्या निकालाचे महत्व त्यात सामील असलेल्या स्पर्धकांसह कुणालाही फ़ारसे नव्हते. एक अत्यंत दुर्मिळ, दुर्लभ भावगीत मैफ़िल आपण ऐकली याचे समाधान तिथल्या सर्व श्रोत्यांना आयुष्यभर पुरणार होते.


- शब्दांवर आणि सुरांवरही तितकाच प्रेम करणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


रविवार, १ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#जून२०२५ 


Saturday, December 5, 2020

महाविद्यालयीन जीवनातले आमचे psephology चे प्रयोग.

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराडला सप्टेंबर १९८९ मध्ये आमची ऍडमिशन झाली आणि लागलीच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध पदांसाठी अंतर्गत निवडणुकांचे वारे वाहू लागले. तत्पूर्वी नागपूर विद्यापीठात या निवडणुका व्हायच्यात पण राजकीय पक्षांचा हस्तक्षेप फ़ार वाढू लागल्याने त्यात हाणामा-या आणि राडेच जास्त होऊ लागलेत. ही वाढती डोकेदुखी नको म्हणून नागपूर विद्यापीठाने सर्व प्रकारच्या विद्यार्थी निवडणुका रद्द करून विविध पदांसाठी थेट नियुक्त्यांचे धोरण अवलंबिले होते. पण आमच्या शिवाजी विद्यापीठात मात्र या निवडणुका अगदी गांभीर्याने आणि शांततेच्या वातावरणात व्हायच्यात.

त्यावेळी आमच्या महाविद्यालयात २२ जागांसाठी निवडणुका व्हायच्यात. General Secretary, Social Gathering Secretary, Debating and Cultural Secretary, Magazine Secreatry, Cricket Secretary, Football Secretary अशा २२ जागा आणि प्रत्येक वर्गाचा Class Rpresentative (CR) अशा जागांसाठी निवडणुका घेतल्या जायच्यात. त्यातले General Secretary (GS) आणि Social Gathering Secretary (SGS) म्हणजे वर्षभरासाठीचे जणू पंतप्रधान आणि गृहमंत्री असा त्यांचा थाट असायचा. Debating and Cultural Secretary कडे वर्षभराच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी असे तर Magazine Secreatry कडे महाविद्यालयाच्या भित्तीपत्राची (मुक्तांगण) चावी असे. त्यावर दर आठवड्याला कुणाकुणाचे लेख प्रकाशित करायचे ? वगैरे निर्णय तो / ती स्वतंत्रपणे घेऊ शकत असे आणि दरवर्षीच्या महाविद्यालयीन वार्षिकांकाची प्रकाशन जबाबदारी असे. सगळ्याच जागांसाठीच्या निवडणुका मोठ्या हिरीरीने लढल्या जात.



या निवडणूकांचे संचालन करण्यासाठी निवडणूक आयोगाप्रमाणे आमच्याच महाविद्यालयातील काही प्राध्यापकांची समिती असे. त्यांच्याकडून निवडणुकीची तारीख, अर्ज भरण्याची तारीख, परत घेण्याची तारीख, प्रचाराची आदर्श आचारसंहिता, इत्यादि नियम जाहीर होत असत. अर्ज भरले जात, अक्षरशः लोकसभा निवडणुकीसारखी प्रचाराची रणधुमाळी वगैरे होई. मतदान पत्रिकांवर मतदान होई. पांढरी मतदान पत्रिका महाविद्यालयीन स्तरावरच्या २२ जागांसाठी आणि रंगीत मतपत्रिका Class representatives साठी अशी विभागणी असे. त्यासाठी आमच्या कार्यशाळेतली शिक्षकेतर कर्मचारी मंडळी मतपेट्या तयार करीत. आमची प्राध्यापक मंडळीच निवडणुकांची निरीक्षक असत. मतपत्रिकेची पहिली उभी घडी नंतर आडवी घडी, निवडणूक समितीने दिलेल्या विशिष्ट प्रकारच्या पेननेच विशिष्टच ( √ किंवा x ) खूण करून मतदान हा सगळा तामझाम अखिल भारतीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांसारखाच असे.

निवडणुकीत दोन पॅनेल्स असायचीत. विदर्भाच्या विद्यार्थ्यांचे "फ़्रेंडस पॅनेल" आणि विदर्भाव्यतिरिक्त (जळगाव, सोलापूर , कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई) विद्यार्थ्यांचे "शिवाजी पॅनेल". कराडला तेव्हा फ़क्त तीनच शाखांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सोय होती. स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) आणि यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering).  एका शाखेत एका वर्गात साधारण ६० ते ७० विद्यार्थी असे प्रत्येक शाखेचे (७० x ४ =) २८० विद्यार्थी तर तीन शाखांचे मिळून ७०० ते ८०० च्या आसपास एकूण विद्यार्थीसंख्या असे. तेव्हा नागपूर विद्यापीठ कोट्याचे (तेव्हा नागपूर विद्यापीठाच्या अधिक्षेत्रात एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नव्हते. म्हणून नागपूर विद्यापीठ क्षेत्रातील मुलांचा कराड, सांगली, नांदेड, VJTI मुंबई, SPCE मुंबई आणि COE पुणे येथे काही विशिष्ट जागांचा कोटा असे. या सगळ्या ऍडमिशन्स विश्वेश्वरय्या प्रांतिक अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फ़े व्हायच्यात.) प्रत्येक वर्गात १२ विद्यार्थी असायचे. म्हणजे नागपूरच्या विद्यार्थ्यांची ( किमान १२ विद्यार्थी x ३ शाखा x ४ वर्षे) १४४ ते १७० संख्या असे. ७०० - ७५० मध्ये १७० मध्ये आम्ही अल्पसंख्येतच असायचो. पण या निवडणुकांमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांची एकजूट आणि नागपूरव्यतिरिक्त दुस-या गटांच्या काही विद्यार्थ्यांना शेवटल्या क्षणी आपल्याकडे वळवून घेण्याचे कसब खरोखर वाखाणण्याजोगे होते. 

मला आठवतेय १९८९ च्या निवडणुकीत जळगाव आणि सोलापूर गटाचा पाठिंबा आदल्या दिवशी मिळवून आमच्या ’फ़्रेंडस पॅनेल" ने आपला General Secretary (GS) बसविला होता. निवडणुकांच्या आदल्या रात्री खूप उशीरा आमच्या सिनीयर विद्यार्थ्यांनी काहीतरी बैठक घेतली आणि आम्हा सगळ्या नागपुरी मतदारांपर्यंत मतदानाचा पॅटर्न असलेल्या चिठ्ठ्या पोहोचल्यात. General Secretary (GS) आपला आणि Social Gathering Secretary (SGS) त्यांचा बसवायचा असा तो पॅटर्न होता. त्यांच्या पॅनेलच्या सोलापूर आणि जळगावच्या मतदारांपर्यंतही General Secretary (GS) साठी फ़्रेंडस पॅनेल ला मतदान करण्याचे निरोप गेलेत आणि अल्पमतात असतानाही आम्ही टी. व्ही. एस. भट्टात्रिपाद या आमच्या अंतिम वर्षातल्या उमद्या सिनीयरला General Secretary (GS) म्हणून निवडून आणले होते. त्यावर्षी निवडणुकांनंतर शिवाजी पॅनेलमध्ये  हे फ़ुटीर विद्यार्थी आणि निष्ठावंत विद्यार्थी यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप रंगलेत.

निवडणूकांसाठी विद्यार्थ्यांच्या खूप सभा वगैरे व्हायच्यात. कॅण्टीनसमोर असलेला पिंपळाचा बांधलेला पार हे स्टेज असायचे. एकापेक्षा एक जोरदार भाषणे व्हायचीत. आज महाराष्ट्रातले ख्यातनाम साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले मिलींद जोशी तेव्हा अगदी बाळासाहेब ठाक-यांसारखीच शाल वगैरे अंगावर पांघरून त्यांच्याच शैलीत "उद्याचा सूर्य उगवणार तो शिवाजी पॅनेलच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच." वगैरे गर्जना करायचेत. गर्दी सगळ्या भाषणांना व्हायची. टाळ्या मिळायच्यात, हुर्यो उडायची. भारतीय निवडणुकांसारखाच एक दिवस आधी जाहीर प्रचार थंडावत असे. मग वैयक्तिक भेटीगाठी, सेटलमेंट वगैरेंवर भर असायचा. एकंदर मोठी मौज असे.

पण तरीही निवडणुका या खूप छान वातावरणात व्ह्यायच्यात. दोन वेगवेगळ्या पॅनेल्समधून एकाच पोस्टसाठी निवडणूक लढवायला निघालेले दोन तरूण बहुतांशी एकत्र चहा पिताना कॅण्टीनमध्ये दिसत असत. कधीकधी ते एकमेकांचे रूम पार्टनर्सपण असत. त्यामुळे राजकीय विरोध हा वैयक्तिक विरोधापर्यंत कधीच जात नसे. ब-याचदा तर एखाद्या पोस्ट साठी हरलेला विद्यार्थी पुढे वर्षभर त्या जिंकलेल्या आपल्या मित्राला त्याच्या कार्यात सल्ला देताना (आणि तो जिंकलेला मित्रही तो सल्ला ऐकून अंमलात आणताना) दिसायचा. हिरीरीने निवडणुका लढवल्या गेल्यात तरी वातावरण अगदी निरोगी असायचे.

व्दितीय वर्षात जाईपर्यंत बरेच समविचारी मित्र जमलेत. मैत्रीमध्ये सारखीच कौटुंबिक पार्श्वभूमी, सारख्या आवडीनिवडी हे जुळून आले. मग कुठेतरी नाशिकजवळच्या ओझरच्या विजय कुळकर्णीचे (आता कै. विजय. २०११ मध्ये त्याचे अपघाती दुःखद निधन झाले.) घट्ट मैत्र नागपूरच्या रामशी जमले, सांगलीचा गायक सतीश तानवडेचे सूर नागपूरच्या नकलाकार रामशी चांगलेच जुळले. आम्हा सर्वांनाच निवडणुकीच्या राजकारणात स्वारस्य नव्हते. निवडणुकांमध्ये भाग घेणारे भावी उमेदवार म्हणून आमच्याकडे बघितले जायचे.  आमच्या अंतिम वर्षात Social Gathering Secretary म्हणून सतीशच उभा राहणार याविषयी आमच्या दुस-या वर्षात इतर मुलांची खात्री झाली होती. विजयचे नाव भावी Magazine Secretary  म्हणून आणि माझे नाव भावी Debating and Cultural Secretary  म्हणून घेतले जात होते. दरम्यान आम्ही सगळेच विद्यार्थी परिषदेच्या कामात गुंतलो होतो. सातारा जिल्ह्याच्या तत्कालीन कार्यकारिणीत आम्हा सगळ्यांना विविध जबाबदा-याही मिळालेल्या होत्या. (याविषयीची गंमत कथा नंतर कधीतरी.)  त्यामुळे महाविद्यालयातल्या निवडणुका लढवायला आम्ही अगदी नाखुषच होतो. पण तृतीय वर्षात त्या लढवाव्या लागतीलच अशीच चिन्हे सगळीकडे दिसत होती.







मग त्यावर आम्ही एक उपाय शोधला. निवडणूक आणि त्याच्याशी संबंधित कामे टाळण्यासाठी आमच्या डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली. आम्ही त्याकाळचे प्रणव रॉय आणि योगेंद्र यादव झालोत. (त्या काळचे हं. त्याकाळी प्रणव रॉय आणि योगेंद्र यादव प्रत्येक निवडणुकांचे सखोल आणि निःष्पक्ष विश्लेषण हे दोघे सादर करायचेत त्यामुळे तेव्हा ते आदर्श होते. प्रणव रॉय दर आठवड्याला The World This Week हा सुंदर कार्यक्रम दूरदर्शनवर सादर करायचेत. आम्ही सगळे तरूण त्या कार्यक्रमाचे फ़ॅन होतो. ) 

आमच्या निवडणूक अधिका-यांची या ओपिनियन पोल साठी आम्ही अधिकृत परवानगी घेतली आणि एक फ़ॉर्मच टाईप करून आणला. त्या दोन पानांच्या "निवडणूक निकाल अंदाज वर्तवा स्पर्धेच्या" फ़ॉर्मवर 

१. General Secretary (GS) कोण होणार ?

२. Social Gathering Secretary (SGS) कोण होणार ?

..

..

..

२३. सगळ्यात जास्त मार्जिनने कोण जिंकणार ?

२४. सगळ्यात कमी मार्जिनने कोण जिंकणार ?

२५. तुमच्या वर्गाचा Class Representative ( C. R. ) कोण होणार ?

वगैरे प्रश्न होते. तो फ़ॉर्म आम्ही आमच्या महाविद्यालयात असलेल्या फोटोकॉपी सेंटरवर (झेरॉक्स सेंटर) ठेवला. निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत सहभागी होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी तो फ़ॉर्म भरून आमच्या रूमवर आणून द्यायचा आणि १ रूपया स्पर्धा सहभाग शुल्क द्यायचे असे ठरले. प्रथम क्रमांकाला १५० रूपयांचे, व्दितीय क्रमांकाला १०० रूपयांचे आणि तृतीय क्रमांकाला ५० रूपयांचे बक्षीस जाहीर केले. त्याबद्दल "निवडणूक निकाल अंदाज वर्तवा स्पर्धा" असे बॅनर्स मुक्तांगण (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) आणि इतरत्र चिकटवलेत. आणि आमची हॉस्टेल रूम प्रतिसादाची वाट पाहू लागली. त्याकाळी आमचा महिनाभराचा सगळा खर्च (मेसबिल वगैरे धरून) ४५० ते ५०० रूपयांमध्ये भागायचा. तेव्हा एक रूपया गुंतवणुकीत १५० रूपये बक्षीस हे प्रलोभन मोठे होते. 

निवडणुकीच्या आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत प्रतिसाद जवळपास नव्हताच. अर्थात या उपक्रमात आमची गुंतवणूक २० रूपयांच्या वर नव्हतीच. (फ़क्त फ़ॉर्म टायपिंगचा खर्च) त्यामुळे आम्ही त्याबाबतीत निश्चिंत होतो. फ़क्त या स्पर्धेला प्रतिसाद मिळायला हवा असे आम्हा तिघांनाही मनापासून वाटत होते.

संध्याकाळी ६ नंतर जबरदस्त प्रतिसादाला सुरूवात झाली. रात्री ११.३० पर्यंत ७५० मतदारांपैकी जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आमच्याकडे वट्ट ७०० रूपये ७०० प्रतिसाद जमा झालेत. आमच्या महाविद्यालयातल्या मुली या सगळ्याच राजकारणापासून दूर रहात असल्याने त्यांच्यापैकी कुणाचा फ़ारसा प्रतिसाद नव्हता. 

७०० पैकी ३०० रूपये बक्षीसात वाटल्यानंतर आम्हा तिघांच्या वाटेला उरलेले ४०० रूपये येणार असल्याने आम्ही खुष होतो. Cambridge कंपनीचा Gold शर्ट त्याकाळी १५० रूपयात येत असे.  Cambridge च्या शोरूम समोरून जाताना तसला शर्ट विकत घेण्याची एकमेकांची मनिषा तिघांनाही माहिती होती. लगेचच तो विकत घेण्याची नामी संधी आम्हा तिघांनाही चालून आलेली होती. त्यामुळे आम्ही हरखलो होतो पण..

त्यापेक्षाही एक नामी गोष्ट त्या रात्री आम्हा तिघांच्याही लक्षात आली. निवडणूकीत मतदार संख्येच्या २.५ टक्के ते ३ टक्के मतदारांचा कौल ही योगेंद्र यादव, प्रणव रॉय सारखी Psephologist मंडळी गोळा करतात आणि त्यावर आपले निवडणूक निकाल अंदाजाचे कार्यक्रम चालवतात. आमच्याकडे उद्याच्या निवडणूकीतल्या ९० % मतदारांचा कौल आमच्या हातात होता. उद्याच्या निवडणुकीतले सगळे निकाल आदल्या दिवशीच आमच्या हातात होते. आम्ही सगळे फ़ॉर्म्स चाळलेत. उद्याच्या निवडणूकीत कोण जिंकणार ? कुठल्या पोस्ट वर धक्कादायक निकाल लागणार ? याची सगळी माहिती आमच्याजवळ होती. फ़क्त सगळ्यात जास्त मार्जिन आणि सगळ्यात कमी मार्जिनने जिंकणा-या उमेदवाराची होती.

निवडणूका झाल्यात. त्याच्या पुढल्या दिवशी मतमोजणी होती. मतमोजणीही भारतीय निवड्णूक आयोगाप्रमाणे, उमेदवाराचा प्रतिनिधी, काऊंटिंग टेबल्स, प्रत्येक टेबलवर निरीक्षक अशा पद्धतीने मोठ्ठ्या ड्रॉइंग हॉलमध्ये व्हायची. आम्ही आमच्या निवडणूक निकाल अंदाज स्पर्धेच्या निमित्ताने अधिकृत परवानगी काढून आत प्रवेश मिळवला. अधिकृतरित्या सर्वाधिक मार्जिन, सर्वात कमी मार्जिन याबाबत आकडे आम्हाला आमच्या निवडणूक आयोगाकडूनच मिळाले असते. आणि तेच प्रमाण मानून बक्षीसे द्यायची होती.

आमच्या माहितीप्रमाणेच निकाल लागलेत. साहजिकच ७०० पैकी बहुतांशी मुलांची सगळी उत्तरे बरोबर होती. विजयी उमेदवार ठरला तो "सर्वात जास्त मार्जिन" आणि "सर्वात कमी मार्जिन" अचूक वर्तवणारा विद्यार्थी.

Psephology विषयी आकर्षणातून केलेला पहिला प्रयोग यशस्वी ठरला. आम्ही निवडणूकीच्या राजकारणातून स्वतःला अलिप्त ठेवण्यात यश मिळवले, उद्या होणा-या निवडणूकांचे निकाल आदल्याच दिवशी कळल्याचे सुख अनुभवले आणि स्वतःसाठी स्वकमाईतून एक एक Cambidge Gold चा शर्टही मिळवला.


- तरूण Sephologist रामेंद्र रॉय यादव.