Sunday, August 16, 2020

प्रेक्षणीय आणि श्रवणीय गाणे

 जीवनात सुदैवाने खूप उत्तम गायक गायिका मित्र मैत्रिणी म्हणून लाभलेत.

महाविद्यालयीन जीवन साहित्य, संगीत आणि इतर ललित कलांनी बहरले. समृध्द झाले. मैफिलीत आम्ही तानसेन नसलो तरी खूप उत्तम संगीत सातत्याने कानांवरून गेल्याने उत्तम कानसेन मात्र झालोत.
गाण्यात तल्लीन झालेल्या, गानसमाधी लागलेल्या, गायक / गायिकेच्या भुवयांमधे गाण म्हणताना मधेच एक सुखद वेदनेची झलक बघायला मिळणे म्हणजे श्रोत्यांच्याही आनंदाची परमावधी. एखाद्या अप्राप्य सुरासाठी त्या गायकाने / गायिकेने जी साधना केलेली असते ती अशा अनामिक क्षणी फलद्रूप होते, नेमका तो सूर गायकासमोर / गायिकेसमोर हात जोडून त्या सुराला गळ्याद्वारे / वाद्याद्वारे प्राकट्य देण्याची विनंती करतो, तो विजयाचा क्षण. अत्यंत सुखाचा.
गाणं श्रवणीय तर असतच पण प्रेक्षणीयही होत ते अशा क्षणांमुळेच.
- खूप उत्तम कलाकारांचा सहवास लाभल्याने कानसेन झालेला रामुभैय्या व-हाडवाले

Saturday, August 15, 2020

बाॅलीवुड चित्रपटांविषयी निरिक्षणेः

१. पहिल्या १५ मिनीटांमधे नायक आणि नायिका प्रेमात पडतात.

शेवटल्या ५ मिनीटांत लग्न करतात.
या धाटणीचे ९० % चित्रपट हाऊसफुल.

२. नायक नायिका पहिल्या १५ मिनीटांतच लग्न करतात. या धाटणीचे ९९ % चित्रपट फ्लाॅप.
लोकांना आपली अपूर्ण स्वप्ने पडद्यावर पहायला आवडतात, आपले जीवन जसेच्या तसे पहायला तेवढे नाही आवडत.
इंतजार में और दीदार में जो मजा है, वो आखिर प्यार में कहाँ ?
एका कवी हृदयातून "स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा.." उगाच थोडे उमटलेय ?
- एक कवीमनाचा चित्रसमीक्षक राम

Friday, August 14, 2020

श्रावणात जमून आलेला एक सुंदर फ़ोटो.

 आमचे दोन्हीही शेजारी केरळी आहेत. त्यातले एक संघ स्वयंसेवक. केरळात २०-२५ वर्षांपूर्वी संघाचे खूप काम केलेले गृहस्थ.

केरळी माणसे मूळचीच निसर्गप्रेमी असावीत. इंग्रजीत जसे "person with green fingers" तसे.
दोघांनीही दोन्ही बाजूंनी त्यांच्या त्यांच्या इवल्याशा आवारात आणि रस्त्याच्या कडेलाही भरपूर झाडे, वेली लावल्यात.
आता झाडे इतकी वाढलीत की
"बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी ?"
प्रमाणे त्यांची घनगर्द सावली आमच्या संपूर्ण तळमजल्याला व्यापून असते. आणि भर उन्हाळ्यात खालचा मजला थंडगार असतो. कुलरची अजिबात गरज भासत नाही.
आणि घरच्या देवांसाठी बारमाही फुले उपलब्ध असतात, ती वेगळीच.
एकाने मधुमालतीचा वेल लावलाय. खूप उंच झालाय. त्याच्या बहराने आमची प्रत्येक संध्याकाळ खूप सुगंधी आणि स्वर्गीय होत असते. घरात कुठेही त्या उमललेल्या फुलांचा स्वर्गीय दरवळ चित्तवृत्ती अगदी प्रफुल्लित करून टाकतो.
परवा सकाळी नेहेमीप्रमाणे परडी भरून जास्वंदाची फुले मिळालीत. सहज कन्येने क्लिक केले आणि अनपेक्षितपणे सुंदर रंगसंगतीचा फोटो मिळाला. लाल हिरव्या आणि पिवळ्या अशा सुंदर रंगसंगतीतला फोटो पाहूनच आम्ही सगळे खूष झालो नसतो तरच नवल.
- "वृक्षवल्ली आम्हा सोयरी" जिवापाड मानणारा श्रीतुकोबांचा भक्त राम.


Thursday, August 13, 2020

वेड्याचा अभिनय, चौकट राजा आणि दिलीप प्रभावळकर

 आजवर मानसिक रूग्ण असलेल्या व्यक्तिरेखा अनेक चित्रपटांमधे बघितल्यात. पण "चौकट राजा" मधल्या दिलीप प्रभावळकरांनी जे बारकावे दाखवलेत त्याला तोड नाही.

बहुतांशी मानसिक रूग्णांच्या डोळ्यात जे थिजलेपण असतं ते अभिनयातून दाखवणे खूप कठीण. ते फक्त आणि फक्त प्रभावळकरांनी दाखवलय.
व पु काळे त्यांच्या पंतवैद्य कथेत म्हणतात, "प्रतिभावान माणसाला मूर्खपणाचे सोंग करावे लागणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे." तसेच अत्यंत बोलक्या डोळ्यांच्या अभिनेत्याला असे थिजलेले डोळे दाखवणे म्हणजेही अभिनयाचे शिवधनुष्य पेलणेच होय.
आता सलमान खान, अरबाज खान वगैरे मंडळींची गोष्टच वेगळी. त्यांनाही असे थिजले डोळे दाखवायला विशेष प्रयत्न करावे लागतील. पण उलट बाजूने. मुळातच बथ्थड डोळ्यांना थिजलेले दाखवावे लागणे म्हणजे त्यात त्यांना थोडे तेज टाकावे लागेल. आणि जे त्या बिचार्यांना या जन्मात कळणारच नाही तर जमणार कसे ?
- प्रभावळकरांच्या बावन्नकशी अभिनयाचा खूप मोठ्ठा फॅन असलेला अभिनेता राम.

Wednesday, August 12, 2020

औंदाचा पाऊस : एक मजेशीर तुलना

 यंदाचा पाऊस पाहिल्यावर मला आॅस्ट्रेलियन क्रिकेट मधला मायकेल बेव्हन आठवतोय.

पठ्ठा ६ व्या नंबरवर खेळायला यायचा. म्हणजे टीम संकटात असतानाच. कारण वरचे वाॅ बंधू, गिलख्रिस्ट, पाँटिंग चांगले खेळले तर याचा नंबर यायचाच नाही. म्हणजे हा खेळायला आला तेव्हा टीम बहुतांशी "पतले हालातों में" असायची.
बरं, हा काही फार प्रेक्षणीय खेळ खेळायचा असेही नाही. (अर्थात स्टीव्ह स्मिथ एव्हढा कुरूपही खेळ नव्हता याचा.) आपला मध्यम.
सुरूवातीला खूप धावा पळायचा, चोरायचा. एकच्या जागी दोन, दोनच्या जागी तीन. आपले श्रीनाथ, गांगुली, व्यंकटेश प्रसाद सारखे "गढ्ढा" फिल्डर्स याला बरोबर सापडायचेत.
मधेच एखादा कटचा नाहीतर फ्लिकचा चौकार. सगळे भारतीय प्रेक्षक आॅस्ट्रेलियाचे पहिले ४ तगडे बॅटसमन कापून काढल्याच्या कौतुकात असताना बेव्हनच्या स्कोअरकडे कुणाचही लक्ष नसे.
बेव्हनकडे लक्ष जायचे ते त्याचा स्कोअर एकदम ४२ - ४३ झाल्यावरच. अरे ! हा आत्ता तर आलाय. एव्हढ्यात चाळिशी ? अशी आश्चर्ययुक्त प्रतिक्रिया सर्व भारतीय चाहत्यांची व्हायची.
२०० + वन डे खेळून जवळपास १०० च्या स्ट्राइकरेटने ५० + च्या वर सरासरी असलेल्या फलंदाजांच्या यादीत बेव्हन २ रा आहे. (पहिला कोण ? हे गुगल न करता सांगू शकाल ?)
यंदाचा पाऊस तसाच आहे. गाजावाजा न करता हळूहळू येऊन आपली सरासरी पूर्ण करतोय. दिवसा आपले "जलवे" वगैरे न दाखवता चुपचाप रात्री येऊन आपले काम पार पाडून जातोय.
- "Cricket analogy applications in neo - meteorolgy with special reference to one day internationals" या लठ्ठ प्रबंधाचे सडसडीत प्रबंधकर्ते प्रा. राम किन्हीकर.


Tuesday, August 11, 2020

लग्नसमारंभ : एक चिंतन.

 एक समाजघटक म्हणून न वागता , आपण किती आत्मकेंद्री झालो आहोत हे पडताळायचे असेल तर आजकालच्या कुठल्याही लग्न समारंभात जावे.

नवरदेव, नवरी मुलगी आणि गिने चुने, जवळचे नातेवाईक सोडले तर झाडून सगळ्यांना त्या कार्यक्रमात काहीच इंटरेस्ट नसतो. जो तो आपला "ह्यात" असतो.
पूर्वी (म्हणजे साधारण ३० वर्षांपूर्वी) लग्नात किमान १०० तरी नातेवाईक, पाहुणे राहुणे मंडळी कामाला, मदतीला असायची. फक्त त्यांच्याच जेवणाखाण्याची आणि मुलाकडल्या वर्हाड्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था लग्नात करावी लागत असे.
शहरातच राहणार्या, लग्न लावायला येणार्या इतर परिचितांची, लग्नाआधी लाल कागदात गुंडाळलेला पेढा आणि लग्नानंतर लाडू चिवड्याचे पाकिट देऊन बोळवण केली जात असे. आॅफिस वगैरेची घाई असणारे परिचित या पध्दतीत अपमान वगैरे मानीत नसत.
आजकाल तर सर्व वर्हाडी मंडळी लग्न (एकदाचे) लागले रे लागले की ब्युफेकडे "आक्रमण" करतात आणि आपल्या कामाचा मार्ग धरतात. लग्नातल्या इतर कार्यक्रमांशी निकटचे कुणी सोडले तर कुणालाही रस नसतो.
करोनानंतरच्या साजर्या होणार्या लग्नसमारंभांमधे सर्वत्रच हा जुना पॅटर्न (अपरिहार्य म्हणून का होईना) नक्की रूजायला हवाय.
- अगदी जवळच्याच लग्न समारंभात सहभागी होणारा, बुजरा, प्रा. राम.

Friday, August 7, 2020

मराठी भाषा मृतप्राय वगैरे होतेय काय ? एक ज्वलंत प्रश्न.

आजकाल

"जावे लागेल, करावे लागेल" अशा वाक्यरचनांऐवजी "जायला लागेल, करायला लागेल"
'स्वयंपाक' या शब्दा ऐवजी प्रतिशब्द 'जेवण'. 
"ती जेवण करतेय" म्हणजे स्वयंपाक करतेय ? की स्वतःच खातेय ? हे कळणे कठीण. आपण आपला आपला संदर्भानुसार अर्थ लावून घ्यायचा.
"माला" (मला या शब्दाऐवजी) 
"इकडे" (इथे ऐवजी) आणि "तिकडे" (तिथे ऐवजी) इत्यादी शब्द, वाक्यरचना सर्रास कानावर पडताना दिसतात.
अरेरे ! मराठी प्रमाण भाषेचा मूळस्त्रोतच असे दूषित प्रवाह स्त्रवू लागला तर सकल मराठी भाषेचे काय होणार ? हा प्रश्न आपणा सर्वांच्या मनात येईलही. पण काळजी नको, 
काहीही होणार नाही.

कारण आजवर मराठी टिकलेली आहे ती तिच्या असंख्य बोलींमुळे.
 
"आमचीच भाषा प्रमाण. तुम्ही वैदर्भीय, मराठवाडी, खान्देशी असली कसली रे अशुध्द भाषा बोलताय ?" हा गेली ५० वर्षे जपलेला वृथाभिमान आता...
मुले नातवंडे इंग्रजी माध्यमातून शिकून,

 "अरे बावन्न म्हणजे फिफ्टी टू", 
"ते विमान वगैरे नाही म्हणायचं, से एरोप्लेन",
"शी! परीक्षा वगैरे कसले डाउनमार्केट शब्द वापरताय ? 'एक्ज्ञाम्स' म्हणा."

 या आकलन पातळीवर आल्यामुळे यानंतर आपले (तथाकथित चिरंतन व 'अ क्षर'  वगैरे ) लेखन वाचणार कोण ? या चिंतेच्या (आणि थोड्या केविलवाणेपणाच्या) पातळीवर मराठी सारस्वतांचा अभिमान आलाय. "माझ्या साहित्यिक वगैरे असण्याची माझ्या घरच्यांच्या लेखीच किंमत शून्य आहे. आपले लेखन आपली मुले, सुना, लेक, जावई, नातवंडे वाचत नाहीत कारण त्यांना त्यातले काहीच कळत नाही." हे शल्य अगदी जिव्हारी बसणारे आहे. 
म्हणून मग "माझे लेखन मृतप्राय होतेय म्हणजे मराठी भाषाच मृतप्राय होतेय" या अहंमन्य समजूतीवर आधारीत ही मराठी भाषेविषयीची ओरड आहे.

त्यामानाने एकेकाळी हिणवल्या जाणार्‍या गडचिरोली, गोंदिया, धुळे, नांदेड, लातूर, सोलापूर एव्हढेच काय सिंधुदुर्गातही उत्तम मराठी बोलतात आणि संस्कृती टिकवतात असे म्हणावे लागेल. इतकेच कशाला महाराष्ट्राबाहेर इंदूर, बडोदा आणि ग्वाल्हेरला, तिथल्या अल्पसंख्य मराठी भाषिकांनी गेली ३५० वर्षे मराठी चांगली टिकवून ठेवलेली आहे.

माझ्या घरची मराठी अशी माझ्या डोळ्यांसमोर लयाला जायला लागल्यावर, मला अचानक "मराठी भाषा मृतप्राय होत चालली आहे." असा साक्षात्कार होण्याचे साहित्यिक आत्मभान वगैरे; गेल्या काही वर्षातच काहीकाही मराठी सारस्वतांना आले असण्याचे खरे कारण आपल्या लक्षात आले असेलच.

म्हणूनच गेली काही वर्षे, सातत्याने,
"मराठी भाषेची आजची अवस्था" , 
"मराठी भाषेचे भविष्य",
"मराठी सारस्वताची दशा आणि दिशा" यांसारख्या विषयांवर असंख्य साहित्य संमेलनांमधे परिसंवाद झडत गेलेत, घडवून आणले गेलेत. 
शिळ्या कढीला ऊत आणल्यासारखेच फोल, सपक आणि बेचव. त्यांचे फलितही शून्य. दर साहित्य संमेलनांनंतर शासनदरबारी जे ठराव वगैरे जातात ना ? त्यासारखेच.

असो. गेल्या ३५ वर्षात महाराष्ट्राची भरपूर भ्रमंती आणि विविध ठिकाणी वास्तव्य झाल्यामुळे दिसलेले जळजळीत वास्तव मांडलेय.

लिहीण्यासारखे, बोलण्यासारखे भरपूर आहे पण या माध्यमाची मर्यादा लक्षात घेऊन थांबतो.

- चांदा ते बांदा भटकंती केलेला आणि महाराष्ट्राच्या सर्वप्रांतीय वास्तव्यात तिथल्या भाषेचा आणि संस्कृतीचा डोळस अभ्यास केलेला मराठीप्रेमी राम परखडकर मास्तर (एक डाव धोबीपछाड फेम)

Thursday, August 6, 2020

गहन प्रश्न, नेत्रतज्ञ वगैरे

जेव्हा तुम्ही एखाद्या छान इमारतीसमोरून जाताना त्यावरील "अवनती" नाव पाहून असंख्य प्रश्नांच काहूर मनात उठवून घेता......
तेव्हा.......
तेव्हा काही नाही. सरळ नेत्रतज्ञांकडे जा कारण त्या इमारतीचे भल्या मोठ्या फाॅन्टमध्ये लिहीलेले नाव "अवन्ती" आहे हे तुमच्या डोळ्यांना दिसू शकले नाहीये.
अगदी खर्री खर्री गोष्ट हो. स्वावलंबी नगर चौकाआधी राधे मंगलमच्या चौकात ही इमारत आहे. आणि शेजारच्या पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खाण्याच्या भावसमाधीत दंग असताना माझ्याकडून घडलेला हा प्रमाद आहे.
- "कंदीला"चा नंबर वाढत असल्याची शंका असलेला रामभाऊ.
(यातला "कंदील" म्हणजे काय ? हे 70 s आणि 80 s मधल्या नागपुरी बालकांनाच कळेल.)


Wednesday, August 5, 2020

६ वर्षांपूर्वीचा एक वर्णनीय प्रवास.


काही कामांनिमित्त दोन दिवस नागपूरला घालवून सांगोल्याला परत निघालो होतो.
आदल्या दिवशी प्रवासाचे नियोजन करताना ६६० किमी साठी १४ तास ४५ मिनीटांचे नियोजन केले होते.


पण नागपूरवरून निघायलाच जवळपास अर्धा तास उशीर झाला.
खडकीला हनुमंताचे आणि कळंबला चिंतामणीचे दर्शन घेऊन निघालो तेव्हा गाडीतले दोन्ही पॅसेंजर्स (सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी) गाढ झोपी गेले होते. गेले दोन दिवस नागपुरात भरपूर भेटीगाठी, भटकंती आणि अपुरी झोप झाल्याचे परिणाम.
आर्णीला गाडीत पेट्रोल भरायला थांबलो तेव्हाही गाडीतल्या प्रवाशांची झोपमोड झाली नाही. मग मुद्दाम नाश्ता, चहासाठी थांबून या दोघींची झोपमोड करण्याचे माझ्या जिवावर आले.
सोबतीला कारच्या स्टिरीओवर भीमसेनजी, मालिनीताई, अभिषेकीबुवा, राशिद खानसाहेब सकाळचे राग गायला होतेच. एकेक बडा ख्याल आणि छोटा ख्याल एकेक तास चालणारा. मग काय ? त्याच सुरांवर तरंगत नाॅनस्टाॅप निघालो. मधे उमरखेड, हदगाव, नांदेड ही गावे कधी लागलीत ? आणि कधी मागे गेलीत ? कुणालाच कळले नाही.


दुपारी साधारण २ च्या सुमारास सौ. वैभवीची झोप उघडली.
"कुठपर्यंत आलोय ?
नाश्त्याला उमरखेडला थांबायचे ना ?"
अशी पृच्छा झाली.
"बाईसाहेब, नाश्ता विसरा. आता थेट २० किमी नंतर लातूरला जेवायलाच थांबू." माझे विजयी उत्तर.
थांबे घेतघेत गेलो की भरपूर वेळ जातो. तेच थांबे टाळून सर्वसामान्य वेगात जरी गेलो तरी भरभर अंतर कापले जाते याचा वस्तूपाठ देणारा हा प्रवास.
१४ तास ४५ मिनीटांऐवजी १४ तास ९ मिनीटांतच ६५७ किमी सुरक्षितरीत्या गाठल्याची कृतार्थता एका ड्रायव्हर लाच समजू शकेल.
- "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" या वचनावर विश्वास असलेला,
लांब पल्याचा सुरक्षित ड्रायव्हर रामराव गाडीवाले.

Tuesday, August 4, 2020

भक्ती. किती सोपी ? किती क्लिष्ट ?

"वो उन्हें याद करे, जिसने भुलाया कभी होगा.
हमने उनको न भुलाया, न कभी याद किया."
प्रेयसीसाठी लिहीलेला हा शेर परमेश्वराच्या भक्तालाही लागू होतो की नाही ?
जो (परमेश्वरापासून) विभक्त नाही तो भक्त.
अगदी सहज सोपे अध्यात्म आपण इतके क्लिष्ट का करतो ?
- साधासोपा भक्त, राम.

Monday, August 3, 2020

खर्ज, अभिनय वगैरे.

आता आमच्या घरी Movies Active वर Section 375 सिनेमा बघतोय.
अती खर्जात बोलण्याच्या नादात डाॅयलाॅगच ऐकू येत नाहीत हे नटांना आणि दिग्दर्शकांना कळेल तो सुदिन.
सबटायटल्स तरी द्यायचेत हो.
असाच दुसरा कानांवरचा छळवादी सिनेमा म्हणजे सरकार राज.
बच्चन साहेबांच्या लिप मुव्हमेंटवरून तरी डाॅयलाॅग्ज समजतील असे वाटले तर त्यांच्या दाढीमिशांच्या जंजाळात मुळातले ओठच दिसत नाहीत तर त्यांची हालचाल कशी समजावी ?
अंदाजे अंदाजे अर्थ लावूनच पूर्ण सिनेमा बघावा लागतो.
- फक्त हवा तिथेच खर्जाचा आवाज वापरणारा नट आणि फिल्लमबाज के. रामबाबू.

Sunday, August 2, 2020

काही पडलेले वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय प्रश्न

"सकाळचे नऊ वाजल्यावर सुधाकरच्या सांगण्यावरून आलोकने शालेय चॅनेलचे बटन दाबले.पडद्यावर फळ्याचे चित्र आले आणि त्या फळ्यापुढे वर्गशिक्षक चालत चालत आले. त्यांच्यासमोर देखील एक मोठा टीव्हीचा पडदा होता. त्यांच्याजवळ असलेल्या कंप्युटरवर प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद होती. प्रत्येक विद्यार्थ्याचा एक नंबर होता. तो दाबून मास्तरांना कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्या टी.व्ही. च्या पडद्यावर पाचारण करता येत होते. त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचे अभ्यासाचे रेकाॅर्ड कंम्प्युटरकडून त्यांना मिळू शके. जर त्यांना एखाद्या विद्यार्थ्याशी संभाषण करावेसे वाटले तर तशी सोय शालेय टी. व्ही. चॅनेलवर होती."
मार्च १९८३ मधे प्रकाशित झालेल्या आणि आमच्या बालपणी अनंत पारायणे केलेल्या, प्रख्यात जागतिक शास्त्रज्ञ, महाराष्ट्रभूषण, जयंत नारळीकर लिखित, प्रेषित या विझान कादंबरीतली ही वाक्ये.


बालपणी तर हे सगळे विश्व अशक्यप्रायच आणि कल्पनातीत वाटे. किंबहुना गेल्या १५ वर्षांपूर्वीही ही कल्पना आवाक्याबाहेरची वाटत होती ना ? पण आज सर्वत्र ही कल्पना सगुण साकार होताना आपण बघतोय. विज्ञानाची ही स्तिमीत करणारी झेप पाहून एका संपूर्ण युगंतराचा साक्षीदार असल्याची भावना माझ्या वयाच्या अनेकांमधे आहे.
मला नेहेमी प्रश्न पडतो. ही शास्त्रज्ञ माणसे खरेच इतकी द्रष्टी होती की पुढल्या काही शतकातल्या विज्ञानाच्या प्रगतीचा आलेख आजच मांडू शकायची ?
की
यांनी वेळोवेळी केलेल्या (शास्त्र आधारित) कल्पनाविलासाचा धागा पकडून पुढल्या पिढीतल्या संशोधक शास्त्रज्ञांनी आपले संशोधन केले ?
की
दोन्ही ?
- शास्त्र आणि तर्कशास्त्राचा जिज्ञासू अभ्यासक प्रा. राम किन्हीकर

Saturday, August 1, 2020

नवे आणि जुने




जुन्याकाळच्या सोनी इरीक्सन फोनमधून साध्या २ मेगापिक्सेल कॅमेर्यातून आलेले सुंदर फोटो.
आजच्या ३६ - ४० मेगापिक्सेलच्या कॅमेर्यातही ती मजा नाही.

- आपला फ़ोटोग्राफ़र राम