Sunday, December 3, 2023

मर्सिडिजचा तारा म्हणतो, बळवंतराव होरा चुकला...

काही काही साहित्य पुन्हा पुन्हा वाचण्याची ओढ का लागते ? याचा मी विचार केला तर माझ्या लक्षात आले की जे साहित्य पुन्हा नव्याने वाचताना त्यातले मागील वाचनात न कळलेले काही नवीन संदर्भ आपल्याला कळतात आणि तेच साहित्य पुन्हा वाचत असलो तरी ते नव्याने वाचत असल्याची अनुभूती येते. असे साहित्य पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते आणि त्यातले नवनवे संदर्भ आपल्याला लागतायत का ? याचा धांडोळा घ्यावासा वाटतो.


महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, मराठी साहित्याचे मानबिंदू, महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणाबाबत मी गेली पंचेचाळीस वर्षे हाच अनुभव घेतोय. माझ्या वाचनप्रेमी, साहित्यप्रेमी वडिलांनी मी वाचायला सुरूवात केल्यापासूनच पुलं च्या साहित्याशी माझा परिचय करून दिला. बालपणी आणि पौगंडवस्थेत असताना विनोदी साहित्य म्हणून पुलंचे लिखाण वाचणारा मी थोडा प्रौढ झाल्यानंतर त्याच लिखाणातले नवनवे संदर्भ जाणवल्याने पुलंच्या प्रतिभाशक्तिच्या, त्यांच्यातल्या विचारवंताच्या लेखनप्रेमातच बुडून गेलो. समग्र पुल अनेकवेळा वाचूनही दरवेळी पुल वाचताना एक नवीनच साहित्य वाचत असल्याची अनुभूती येणे हे पुलंच्या लिखाणाच्या सार्वकालिकतेचे गमक आहे असे मला वाटते. 


मुंबईत नोकरीनिमित्त जवळपास एक तप घालवूनही पुलंच्या पार्ल्याशी केवळ तोंडओळख झालेली होती. पण माझ्या पी एच डी च्या कोर्सवर्क साठी NMIMS च्या विलेपार्ले कॅंपसमध्ये जाण्यासाठी दर शनिवार - रविवार शिरपूरवरून पार्ल्यात जावे लागे. शुक्रवारी रात्री शिरपूरवरून निघून शनिवारी सकाळी पार्ला (ईस्ट) ला उतरलो की पार्ला (वेस्ट) येथे असलेल्या माझ्या कॉलेजची नियत वेळ होईपर्यंत ला मी पार्ल्यात फ़िरून बालपणी वाचलेल्या पुलंच्या साहित्यातील पार्ल्याचा शोध घेत असे. तो महात्मा गांधी का नेहरू का चित्तरंजन रोड, तो न तोडलेला पिंपळ, लोकमान्य सेवा संघ ही सगळी बालपणी पुलंच्या साहित्यात वाचलेली एवंगुणविशिष्ट स्थळे मला दरवेळी भुरळ घालीत आणि त्यानंतर शिरपूरला पोहोचल्यानंतर पुन्हा पुलंचे साहित्य वाचून मी पुलंच्या काळात जात असे. माझ्या कल्पनेने त्या काळाला जगत असे.


पुलंची अशीच एक कविता "काही (च्या काही) कविता" मध्ये मी "एक होती ठम्माबाई" ही कविता वाचली. 


एक होती ठम्माबाई


एक होती ठम्माबाई

तिला सोशल वर्कची घाई

रात्रंदिवस हिंडत राही

पण वर्कच कुठे उरले नाही


वर्क थोडे बाया फार

प्रत्येकीच्या घरची कार

नोकर - शोफर - बेरा - कुक

घरात आंबून चालले सुख


घराबाहेर दुःख फार

करीन म्हणते हलका भार

कार घेऊन निघते रोज

हरेक दुःखावरती डोज -


पाजीन म्हणतेः पिणार कोण ?

सगळ्या जणींना करते फोन

‘‘ मला कराल का हो मेंबर ?’’

‘‘ अय्या , सॉरी , राँग नंबर !’’


‘‘ सगळ्या मेल्या मारतात बंडल ’’

म्हणून स्वतःच काढते ‘ मंडळ ’!

आया होऊन येतात इथे

त्यांच्या मागून मागून फिरतात

त्यांच्या तारुण्याची भुते


टिळकांचाहि पुतळा आता

सारे काही पाहून थकला

मर्सीडिजचा तारा म्हणतो

बळवंतराव होरा चुकला



विनोदी कविता म्हणून बालपणी वाचली पण नंतर हळुहळु त्यातल्या "मर्सीडिजचा तारा म्हणतो बळवंतराव होरा चुकला" या ओळी कळेनात. मर्सिडिजचा "तारा" म्हणजे काय़ ? हेच कळेना. आणि लोकमान्य टिळकांचा होरा चुकला का ? हा सुद्धा एक प्रश्नच होता. पुलंप्रमाणे पुलंचे दैवत असलेल्या लोकमान्य टिळकांविषयीही आम्हाला बालपणापासूनच आदर. आपल्या अलौकिक प्रतिभेने लोकमान्य टिळकांनी ग्रह, नक्षत्र, तारे यांचा वेग, त्यांचे परिभ्रमण आणि वेदांग ज्योतिष्याचा अगदी सखोल अभ्यास केलेला होता हे आम्हाला माहिती होते. त्यांनी केलेला अभ्यास समजण्याइतकीही आपली पात्रता नाही हे आम्ही जाणून होतो. पण एखाद्या सखोल पंचांगकर्त्याचा होरा आणि मर्सिडिज चा काय संबंध ? हे काही केल्या मला कळत नव्हते.


2017 मध्ये नागपूरला आलो. तोपर्यंत मर्सिडिजच्या गाड्या अनेक बघितल्या होत्या. त्यांचा तो अगदी जगप्रसिद्ध लोगो (उलटा Y) खूप वेळा बघितला होता. पण जागतिकीकरणामुळे खुद्द नागपूर शहरात मर्सिडिजच्या गाड्यांची नवी शोरूम उघडली आणि त्या शोरूमचे नाव "Central Star" वाचून उलगडा झाला. थोडे इंटरनेटवरून संदर्भ बघितलेत आणि मग लक्षात आले की मर्सिडिजचा लोगो हा ता-यासारखा दिसतो. म्हणून नागपुरातल्या मर्सिडिजच्या शोरूमचे नाव "Central Star" आहे आणि टिळकांसारख्या वेदांग ज्योतिष्यातल्या विद्वानाला आकाशातले तारे आणि त्यांचे होरे समजले पण मर्सिडिज घेऊ शकणा-या श्रीमंत मंडळींच्या वागण्याचा अंदाज आला नाही. मर्सिडिजचा "तारा" त्यांना कळला नाही आणि त्यांचा होरा इथे चुकला...




टिळकांच्या काळात राजकारण हे तुलनेने स्वच्छ होते. देशहिताला प्राधान्य देणारे होते. वैयक्तिक संपत्ती जमविण्यासाठी राजकारण हा व्यवसाय झालेला नव्ह्ता. पुलंनी बघितलेल्या काळात त्यात "राजकारणासाठी पैसा ओतणे आणि तो पैसा वसूल करण्यासाठी राजकारण करणे, त्यासाठी कुठल्याही थराला जाणे." या गोष्टींची सुरूवात झाली असावी आणि हे असे राजकारण होणार आहे असा अंदाज टिळकांना आला नाही आणि त्यांचा होरा चुकला असेही पुलंना सुचवायचे असेल.


वरवर विनोदी वाटणा-या लिखाणात एखाद्या लेखकाचे किती चिंतन आणि किती अभ्यास असतो हे नव्याने कळले आणि पुन्हा आनंद झाला.


- लिखाणातला आनंद मला माझ्या बालपणापासून देणा-या पुलंचा परमभक्त, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 


No comments:

Post a Comment