सणासुदीचे, लागून असलेल्या लांब सुट्ट्यांचे दिवस आलेत की नागपूर - पुणे - नागपूर या मार्गावरच्या प्रवाशांची वर्दळ वाढते. विदर्भात होणा-या विकासाची वाट बघून बघून विदर्भातले टॅलेंट सगळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात नोकरीनिमित्त गेलेले आहे. अशा सुट्ट्यांच्या निमित्ताने त्यांना आपल्या आप्तजनांना भेटावेसे वाटते किंवा त्यांचे आप्तजन त्यांना भेटायला जातात आणि साहजिकच नागपूर - पुणे - नागपूर या प्रवासाला सर्वत्र गर्दी होते.
नागपूर ते पुणे जायला भरपूर जागा उपलब्ध असलेल्या दोनच रेल्वेगाड्या आहेत. सकाळी नागपूरवरून निघणारी आणि दुस-या दिवशी पहाटे पुण्याला पोहोचणारी महाराष्ट्र एक्सप्रेस आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास नागपूरवरून निघून दुस-या दिवशी सकाळी पुण्याला पोहोचणा-या नागपूर - पुणे एक्सप्रेस / गरीब रथ एक्सप्रेस / बिलासपूर - पुणे एक्सप्रेस. तसे तर आजकाल रोज संध्याकाळी 7 वाजून 50 मिनीटांनी अजनीवरून निघणा-या काही एसी एक्सप्रेस गाड्या, विशेष भाडे असलेल्या एक्सप्रेस गाड्याही आहेत पण त्या पुण्याला दुस-या दिवशी दुपारी उशीरा पोहोचतात त्यामुळे थोड्या गैरसोयीच्याच आहेत.
मग प्रवाशांची धाव ट्रॅव्हल्सच्या बसेसकडे येते. पण अगदी कितीही वातानुकूल शनयान असलेल्या आणि 12 ते 14 तासात नागपूर ते पुणे पोहोचणा-या या बसेस ज्येष्ठ नागरिक आणि स्त्री प्रवाशांसाठी या बसेस अत्यंत गैरसोयीच्या आहेत. त्यांचे वेळी अवेळी असणारे थांबे. तिथे अस्तित्वात नसलेली स्वच्छ स्वच्छतागृहे. ज्येष्ठ नागरिक बहुतांशी मधुमेही असल्याने त्यांना वेळी अवेळी टॉयलेटला जावे लागणे. त्यासाठी बस थांबवावी लागण्यास अनुत्सुक ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स. शिवाय सणासुदीला, लागून आलेल्या लांब सुट्यांच्या वेळी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी केलेली काहीच्या काही भाडेवाढ. त्यामुळे ट्रॅव्हल्सचा प्रवास म्हणजे बहुतांशी लोकांना अगदी नाईलाजाने करण्याची गोष्ट असते. या विषयावर यापूर्वी मी लिहीलेल्या पोस्ट्च्या लिंक्स इथे आणि इथे.
यावर आता एक मार्ग आलेला आहे. माझ्यातल्या रेल्वेफ़ॅनने एका बातमीची नोंद घेतली आणि सगळ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक गोष्ट मला सर्वांसमोर मांडावीशी वाटली.
आजवर 12120 अप अजनी - अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस संध्याकाळी 6.30 ला नागपूरवरून सुटायची आणि रात्री 9.50 ला अमरावती येथे पोहोचून तिथेच थांबायची. हीच गाडी आपला परतीचा प्रवास 12119 डाऊन या नंबरने पहाटे 5.30 ला सुरू करून नागपूरला सकाळी 8.15 ला पोहोचायची. तिथे अजनी यार्डात दिवसभर तिचा मेण्टेनन्स झाला की पुन्हा संध्याकाळी अमरावतीला परत जायची.
पण महिन्याभरापूर्वी मध्य रेल्वेने पुणे - भुसावळ इंटरसिटी एक्सप्रेस अमरावतीपर्यंत वाढवली आणि या गाडीचा व अमरावती - नागपूर इंटरसिटीचा रेक शेअरींग होऊ लागला. म्हणजे पुण्यावरून सकाळी 11.05 ला निघालेली 11025 डाऊन पुणे - अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस रात्री 12 वाजून 55 मिनीटांनी अमरावतीला पोहोचू लागली आणि रात्रभर मुक्काम करून सकाळी 5.30 ला अमरावती - अजनी इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून निघू लागली.
हीच गाडी अजनी, नागपूरवरून संध्याकाळी 6.30 निघून रात्री 9.50 ला अमरावतीला पोहोचते आणि पुढे तासभर थांबून रात्री 10.50 ला हीच गाडी 11026 अप अमरावती - पुणे इंटरसिटी म्हणून निघते आणि पुण्याला दुस-या दिवशी सकाळी 11.05 ला पोहोचते. या गाडीला एक एसी चेअर कार, नऊ नॉन एसी चेअर कार्स आणि चक्क एक नॉन एसी स्लीपर कोच लागतो आहे. या गाडीने नागपूर ते अमरावती आणि अमरावती ते पुणे अशी दोन वेगवेगळी तिकीटे काढून स्लीपर कोचमध्ये केवळ 500 रूपयांच्या आसपास, एसी चेअर कार मध्ये 800 - 850 रूपयांच्या आसपास तर नॉन एसी चेअर कारमध्ये 250 -300 रूपयांच्या आसपास हा 16 तास 30 मिनीटांचा नागपूर ते पुणे प्रवास शक्य होईल. आणि साधारण आठवडाभर आधीही या गाडीची तिकीटे उपलब्ध असतील.
10 - 12 वर्षांपूर्वीचा नागपूर ते पुणे प्रवास आठवा. एस. टी. च्या किंवा खाजगी गाड्यांच्या स्लीपर कोच येण्यापूर्वी आपण एस. टी. च्या किंवा खाजगी गाड्यांच्या चेअर कार असलेल्या बसेसमधूनच आपण प्रवास करायचो. त्यातून बसमध्ये बसून केलेला प्रवास आणि रेल्वेच्या एसी चेअर कार मधला प्रवास यात जमिन आस्मानाचा फ़रक आहे. रेल्वेत टॉयलेटस उपलब्ध असणे, वेळप्रसंगी पाय मोकळे करण्यासाठी गॅंगवेमधून चालता येणे यामुळे रेल्वेप्रवास हा फ़ारच सुखकर आहे. त्यामुळे सध्या ऐनवेळी प्रवास आखावा लागल्यास आणि ट्रॅव्हल्सने गैरसोय करत जायचे नसल्यास नागपूर - अमरावती - पुणे हा नवा प्रवासमार्ग सोयीचा आहे.
परतीच्या प्रवासात मात्र ही पुणे - नागपूर थेट सेवा नाही बरं का. याचे कारण म्हणजे पुण्याला सकाळी 11.05 ला पोहोचलेली अमरावती - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस दिवसभर पुणे यार्डात थांबून संध्याकाळी 5.55 ला 12157 डाऊन पुणे - सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस म्हणून रवाना होते. सोलापूर येथे रात्री 9.40 ला पोहोचून ही गाडी रात्रभर सोलापूरलाच थांबते. सोलापूर यार्डातच तिची देखभाल होते आणि दुस-या दिवशी सकाळी हाच रेक 12158 अप सोलापूर - पुणे हुतात्मा एक्सप्रेस म्हणून सोलापूरवरून सकाळी 6.30 ला निघून पुण्याला सकाळी 10.30 ला पोहोचतो. तिथून लगेच 11.05 ला 11025 डाऊन पुणे - अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून निघतो आणि अमरावतीला उत्तररात्री 12.55 ला पोहोचतो.
त्यामुळे परतीच्या प्रवासात सोलापूर ते पुणे आणि पुणे ते अमरावती / अकोला / शेगाव असा स्वस्त, मस्त आणि कमी शीण आणणारा आरामदायक प्रवास या गाडीने शक्य आहे. पण अमरावतीला हा रेक रात्रभर पडून राहून दुस-या दिवशी पहाटे नागपूरला निघत असल्याने पुणे ते नागपूर या प्रवासासाठी ही गाडी थोडी गैरसोयीची आहे.
या सगळ्या रेक्सचे रेक शेअरींग अशा प्रकारे आहे.
तर करणार का हा प्रयोग ? अगदी आपद धर्म म्हणून करायला हरकत नाही. ट्रॅव्हल्सवाल्यांची दादागिरी आणि गैरसोय मोडून काढायची असेल तर नागपूर आणि विदर्भातल्या लोकांनी हा प्रयोग जरूर करायला हवा.
- आजवर आपल्या स्वतःच्या बस आणि रेल्वे फ़ॅनिंगचा आपल्या संपर्कातल्या नातेवाईक मित्रमंडळींना फ़ायदा करून देणारा आणि आजनंतर हा फ़ायदा सगळ्या जनतेला व्हावा या निश्चयाने असे लिखाण वारंवार करण्याचे ठरवलेला, रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
It is a good idea!
ReplyDeleteTrue, but it should be implemented.
DeleteRambhau pun Pune Amravati train Nashik warun palavli aahe. Tya mule Nashik kar mhanun me naraaz aahe
ReplyDeleteBut there are too many trains from Nashik to Mumbai and Nashik to Pune road travel takes quite less time than this train that was taking Nashik - Panvel - Pune route.
ReplyDelete