सध्या इलेक्ट्रिक वाहनांना थोडे बरे दिवस आलेत. पण अजूनही लोकमानस तिकडे फ़ारसे वळलेले दिसत नाही. याच्या मुख्य कारणांचा शोध घेतला असता माझ्या असे लक्षात आले की या वाहनांची सुरूवातीची किंमत खूप असणे हा या वाहनविक्रीतला एक अडथळा आहेच त्याशिवाय याच्यातले तंत्रज्ञान अजूनही विकसनशिल अवस्थेत आहे हा सुद्धा एक मोठा परिणामकारक घटक आहे. कारण पाच वर्षे ही गाडी वापरून झाल्यानंतर गाडीच्या किंमतीच्या 50 % ते 70 % रकमेची नवी बॅटरी गाडीत टाकावी लागणे हा सामान्य ग्राहकांना घाबरवून टाकणारा एक महत्वाचा घटक आहे.
त्यामुळे सध्या या गाड्यांची फ़ार मागणी आणि विक्री नाही म्हणून त्यातले तंत्रज्ञान फ़ारसे वेगाने विकसित होत नाही आणि तंत्रज्ञान पुरेशा वेगाने विकसित होऊन गाड्यांच्या किंमती आवाक्यात नाहीत म्हणून विक्री नाही अशा दुष्ट चक्रात इलेक्ट्रिक कार्स अडकल्या आहेत. इंग्रजीत जसे evenly poised म्हणतात तसे.
भारतात मोबाईल फ़ोन्स आलेले होते तेव्हा सुरूवातीच्या काळात नेमकी अशीच परिस्थिती त्यांच्या तंत्रज्ञानाबाबत आणि किंमतीबाबत झालेली होती. पण मोबाईल तंत्रज्ञान झपाट्याने विकसित झाले. पहिल्यांदा फ़क्त राजकारणी आणि गॅंगस्टर्स यांचीच मक्तेदारी असलेले मोबाईल फ़ोन्स सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेत.
इलेक्ट्रिक कार्सच्या तंत्रज्ञानानेही तशी झेप घेतली पाहिजे. कार्सच्या किंमती आणि बॅटरीचे आयुष्य व किंमत यात सर्वसामान्य जनतेला परवडू शकेल असे तंत्रज्ञान विकसित झाले की भारतातून पेट्रोल / डिझेल कार्स झपाट्याने हद्दपार होतील यात शंका नाही. फ़क्त यात जागतिक स्तरावरील बलाढ्य असलेल्या पेट्रोल / डिझेल लॉबीचे हितसंबंध आड येत असतील तर ती लॉबी असे तंत्रज्ञान विकसित होऊ देणार नाही किंवा या तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग वाढू देणार नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.
- "विकासाचा वेग आणि तंत्रज्ञानाची झेप यांच्यातली सांगड आणि बाह्य बाजारातील शक्तींचे त्यावरील नियंत्रण, भ्रमणध्वनी व इलेक्ट्रिक कार्स : एक तौलनिक अभ्यास" या (भावी) लठ्ठ प्रबंधाचे किडमिडीत लेखक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment