Saturday, December 9, 2023

कोकण रेल्वेची रो - रो सेवा.

दिनांक 19/02/2009.


नागपूर ते गणपतीपुळे मार्गे मुंबई या प्रवासात आम्ही. नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई हा प्रवास विदर्भ एक्सप्रेसने आणि पुढचा प्रवास हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई वरून लगोलग 10 मिनीटात सुटणा-या मांडवी एक्सप्रेसने. 







मांडवी एक्सप्रेस ही आम्हा रेल्वेफ़ॅन्समध्ये खादाडीसाठी जास्त ओळखली जाते. हिला आम्ही सगळे "फ़ूडी एक्सप्रेस" म्हणतो. काय आहे. मराठी शब्दांना इंग्रजीचा साज चढवला की बेटे कसे भारदस्त आणि वेगळेच वाटतात. जरा प्रतिष्ठित वगैरे वाटतात. आता हेच बघा ना. "खादाड" हा मराठी शब्द कसा थोडा अपमानास्पद वाटतो. पण त्याचा इंग्रजी पर्याय "फ़ूडी" कसा सन्मानजनक वगैरे वाटतो. प्रयोगच करायचा असेल तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या / तिच्या तोंडावर फ़ूडी म्हणून बघा आणि नंतर खादाड म्हणून बघा. दोन्ही वाक्यांनंतर त्या व्यक्तीची प्रतिक्रिया किती वेगवेगळी येते ते बघा.


तर सांगायचा मुद्दा हा की मांडवी एक्सप्रेसमधून खाण्यापिण्याच्या पदार्थांचा आस्वाद घेत आम्ही चाललेले होतो. मांडवी एक्सप्रेसमधले पॅंट्री कारमधून आलेले पदार्थ हे खरोखर भारतातल्या काही काही राजधानी एक्सप्रेसमधल्या पॅंट्री कारमधून आलेल्या पदार्थांपेक्षा उत्तम दर्जाचे असतात. स्वच्छता आणी चव यांचे इतके गूळपीठ मी राजधानी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसखेरीज इतरत्र कुठेही बघितलेले नाही.





कोकण रेल्वेच्या कोलाड रेल्वे स्टेशनवर मांडवी एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी थांबली होती. एकमार्गी रेल्वे असली की पुढून येणा-या गाडीला मार्ग देण्यासाठी थांबणे ही एक अपरिहार्य अडचण आहे. तसे त्यादिवशीही आम्ही थांबलेलो होतो. शेजारच्या ट्रॅकवर काहीतरी वेगळे होत असताना दिसले. मी आपला कॅमेरा सज्ज करीत कोचच्या दारात गेलो आणि कोकण रेल्वेने सुरू केलेला, खूप गाजावाजा झालेला रो - रो (रोल ऑन - रोल ऑफ़) सेवेचा व्हिडीयो काढण्यात आला.


1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनच तिचे विविध अभिनव उपक्रम हे माझ्या नेहेमी वाचनात असायचे. ते बघायला, अनुभवायला मिळायला हवेत ही मनोमन इच्छाही असायची. उदाहरणार्थ : "सुरक्षा धागा" हा मार्गावरील दरडी कोसळण्याची सूचना आधीच्या स्टेशन्सना देणारा प्रकल्प, मार्गावरील ट्रक्सची वाहतून रेल्वेने करून रस्ते मार्गावरील ट्रक्स कमी करणारी ही रो - रो सर्व्हिस, एकाच मार्गावरील समोरून येणा-या गाड्यांची टक्कर टाळणारी प्रणाली वगैरे. त्यातली ही रो - रो सेवा बघण्याचा आज योग आला. 


कोकण रेल्वेमार्गावरील कोलाड ते मंगळूरू या 780 किमीच्या मार्गावरील प्रत्येकी 2 - 2 ट्रक्स रेल्वेच्या एका फ़्लॅट बेड वॅगनवर आणून 50 फ़्लॅट बेड वॅगन जोडलेल्या एका मालगाडीतून साधारण 100 ट्रक्सची वाहतूक कोकण रेल्वे करत असते. कोलाडला एकदा का आपला ट्रक त्या वॅगनवर आणून तिथल्या साखळदंडांनी वॅगनला जोडला की ट्रक ड्रायव्हर्स, क्लीनर्स आराम करायला, जेवण वगैरे करायला मोकळे. शिवाय रेल्वेचा वेग हा रस्ते मार्गावरील ट्रक्सच्या वेगापेक्षा जास्त असल्याने ही वाहतूक जलद होणार, रस्तावरील हे 100 ट्रक्स कमी झाल्याने प्रदूषण कमी होणार, अपघात कमी होणार, इतर वाहनांना रस्ता मोकळा मिळणार हे फ़ायदे तर आहेतच आणि मंगळूरूला पोहोचल्यानंतर या 10 -12 तासात विश्रांती मिळालेले हे ट्रक ड्रायव्हर तिथून कर्नाटक - केरळ मधल्या आपापल्या गंतव्य स्थानी लगोलग रवाना होऊ शकणार म्हणजे वेळेची अधिक बचत.


ट्रकमालकांचाही इंधनाचा खर्च वाचतो. त्याच्या फ़क्त काही टक्के रक्कम या रो - रो वाहतूकीसाठी रेल्वेला देण्याच्या भाड्यापोटी खर्च होते. ट्रक्सच्या टायर्सची, इंजिनाच्या इतर भागांची झीज कमी होते हा वेगळा फ़ायदा. रेल्वेने कोलाड आणि मंगळूरू ला या ट्र्क्सच्या चढ उतारासाठी विशेष प्रकारचे प्लॅटफ़ॉर्म्स बांधून घेतलेले आहेत.


एक अभिनव सेवा इतक्या जवळून बघायला, अनुभवायला मिळाली हा आनंद. व्हिडीयो क्वालिटी तितकीशी उत्कृष्ट नाही. पण ब-यापैकी आहे. गोड मानून घ्यावा. (लिंक इथे आणि इथे)



- भारतीय रेल्वेच्या खूपशा गोष्टींचे कौतुक असणारा रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

No comments:

Post a Comment