मी माझ्या मागील लेखात माझ्या नागपूर ते गणपतीपुळे प्रवासासाठी नागपूर - मुंबई विदर्भ एक्सप्रेस आणि मुंबईवरून पुढे मांडवी एक्सप्रेसच्या प्रवासाचा उल्लेख केला आणि मला त्या प्रवासाचे नियोजन आठवले.
नागपूर - मुंबई विदर्भ एक्सप्रेस नागपूरवरून (तेव्हा) संध्याकाळी 5.15 ला सुटायची आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुस-या दिवशी सकाळी 6.50 ला पोहोचायची. तर मांडवी एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून लगेच सकाळी 7.05 ला निघायची. त्यामुळे मधला वेळ हा फ़क्त 15 मिनीटांचा होता. विदर्भ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फ़लाट 14 किंवा 15 वर जाणार तर मांडवी एक्सप्रेस फ़लाट क्र. 12 किंवा 13 वरून सुटणार. शिवाय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जिने चढ उतार करण्याची गरज नसल्याने या फ़लाटावरून त्या फ़लाटावर नुसते चालत जायचे असल्याने हे 15 मिनीटांचे बफ़र मला सुरक्षित वाटत होते. शिवाय विदर्भ एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 95 % वेळा अगदी वेळेवर जात असल्याचा डेटाही माझ्या सोबत होता. म्हणून मी ही धिटाई करण्याचा निर्णय घेतला होता.
पण समजा प्रवासाच्या नियोजित दिवशी विदर्भ एक्सप्रेस 10 मिनीटे उशीरा मुंबई हद्दीत पोहोचली असती, तर दादर स्टेशनला उतरण्याचा माझा प्लॅन बी तयार होता. विदर्भ एक्सप्रेस दादर स्टेशनला सकाळी 6.35 ला पोहोचायची तर मांडवी एक्सप्रेस दादरला सकाळी सकाळी 7.15 ला यायची. तिथे मला जवळपास 40 मिनीटांचे बफ़र होते. विदर्भ एक्सप्रेस 10 ते 15 मिनीटे उशीरा मुंबई हद्दीत आली असती तर मी दादरला उतरण्याचा निर्णय घेतला असता. दादरला मध्य रेल्वेच्या फ़लाट 6 वरून फ़लाट 5 वर जिना चढ उतार करून जावे लागले असते पण तेवढे बफ़र माझ्याकडे होते.
जर त्याहून वाईट स्थितीत विदर्भ एक्सप्रेस मुंबई हद्दीत 30 मिनीटे ते 1 तास उशीरा आली असती तर माझा प्लॅन सी तयार होता. त्या परिस्थितीत मी ठाण्यालाच उतरलो असतो. ठाण्याला विदर्भ एक्सप्रेस पहाटे 5.50 ला यायची तर मांडवी एक्सप्रेस तब्बल सकाळी 8.00 वाजता यायची. त्यामुळे विदर्भ एक तासभर उशीरा आली असती तरी चालण्यासारखे होते.
हा सगळा खटाटोप नागपूर ते रत्नागिरी हा प्रवास 20 तासात अतिजलद होण्यासाठी आणि मांडवी एक्सप्रेसच्या बहुचर्चित पॅण्ट्री कार मधले विविध पदार्थ चाखण्यासाठी होता. शिवाय कोकण रेल्वेचा प्रवास हा भरदिवसा करण्यातच खरी मजा आहे. कुतुबमिनारपेक्षा जास्त उंचीच्या 10 पिलर्सवर तोलला असलेला पानवलचा पूल, आशिया खंडातला दुस-या नंबरचा 6.5 किलोमीटर लांब असलेला करबुड्याचा बोगदा आणि कोकणचे अमर्याद असलेले सगळे निसर्गसौंदर्य बघायचे तर दिवसाच हा प्रवास व्हायला हवा हा माझा आग्रह. यासाठी विदर्भ एक्सप्रेस - मांडवी एक्सप्रेस यातल्या कमी वेळाची ही रिस्क घ्यायला मी आणि माझे कुटुंब तयार झालो होतो. मुंबई हद्दीत शिरल्याशिरल्या वेळाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे प्लॅन ए - बी - सी निवडून ऐनवेळी सामानसुमान घेऊन पळापळ करायला आम्ही सगळेच मानसिकरित्या तयार होतो. पळापळ काही मिनीटांसाठी होईल पण हे विलक्षण अनुभव आयुष्यभरासाठी सोबत राहतील ही माझी आणि माझ्या जीवनसंगिनीची मनोधारणा होती. त्यामुळे आम्ही ही धिटाई केली आणि तशी मिठाई खाल्ली.
आज नागपूरवरून कोकणात जाणारी मंडळी हा विदर्भ एक्सप्रेस - मांडवी एक्सप्रेस हे कनेक्शन यातल्या रिस्कमुळे घ्यायला तयार होत नाहीत. यातले प्लॅन ए - प्लॅन बी - प्लॅन सी त्यांना समजावून सांगूनही त्यांची ही रिस्क घेण्याची तयारी नसते. मग त्यातली बहुतांशी मंडळी नागपूर ते पुणे हा प्रवास बसने - रेल्वेने करून पुण्यावरून रात्री निघणा-या एखाद्या बसने कोकण / गोवा गाठतात. गंतव्य गाठण्यात मजा असते पण प्रवासातच खरी मजा येते हे त्या मंडळींना पटतच नाही. त्यामुळे कोकणात एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधी प्रवासातले कोकण ही मंडळी बघतच नाहीत. दोन दिवस एखाद्या ठिकाणी गेले. तिथे रमले आणि परतले एव्हढाच यांचा अनुभव मर्यादित असतो. म्हणूनच मला क्षणात इकडून तिकडे नेणारा विमानप्रवासही तितकासा भावत नाही. अगदी आवश्यक असल्याशिवाय विमानप्रवास टाळण्याकडे माझा कल असतो.
आता नागपूरवरून कोकण रेल्वे मार्गाने थेट मडगावला जाणारी एक्सप्रेस सुरू झालेली आहे. ती गाडी पनवेलला पहाटे पोहोचते आणि कोकणातला प्रवास दिवसा करते खरी पण ती आठवड्यातून दोनच दिवस धावते. आणि पनवेलपर्यंत वेळेत येणारी ही गाडी पनवेलनंतर कोकण रेल्वेत खूप रखडते. त्यामुळे इतर दिवशी हा प्रवास करण्यासाठी, कोकणातला खरा अनुभव घेण्यासाठी थोडी धिटाई आवश्यक आहे असे माझे मत आहे. ही धिटाई नको असेल तर आदल्या दिवशी मुंबईत येऊन, हॉटेलमध्ये किंवा कुणा नातेवाईकाकडे मुक्काम ठोकून दुस-या दिवशी सकाळच्या गाड्या आरामात पकडता येईल. पण यात हॉटेलचा खर्च, नातेवाईकांना होणारी अडचण वगैरे गोष्टी येतीलच.
- प्रवासात अत्यंत धीट आणि आपल्या सहप्रवाशांना व्यवस्थित सांभाळून घेऊन कमीत कमी धोक्यात जास्तीत जास्त धाडसी व सुंदर प्रवास आखणारे, प्रवासी पक्षी प्रा, वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
Excellent!!!!!
ReplyDeleteThank you.
Delete