Showing posts with label Mandovi Express. Show all posts
Showing posts with label Mandovi Express. Show all posts

Sunday, June 22, 2025

फ़ूडी एक्सप्रेस

आजकाल खादाडपणाला "फ़ूडी" असे आंग्लभाषेतले नाव प्राप्त झालेले आहे ही गोष्ट आमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेली नाही. मराठी शब्दांना असा आंग्ल साज चढवला की त्यांना काय प्रतिष्ठा प्राप्त होते, नाही ? एखाद्याला "खादाड" म्हणणे हा त्याचा अपमान ठरू शकतो पण त्याच माणसाला तुम्ही "फ़ूडी" म्हणून बघा. तो माणूस ती पदवी कशी अभिमानाने मिरवतो ते बघा.


तर थोडक्यात सांगायचे म्हणजे आम्ही असे "फ़ूडी" प्रवासी आहोत. रस्ता मार्गे जाताना कुठेकुठे कायकाय उत्त्तम मिळते या बाबतचा आमचा शोध सतत सुरू असतो. अर्थात त्यात काही रॉंग नम्बर्स लागतातही, नाही असे नाही. पण पूर्वी जर असे ५० % रॉंग नम्बर्स लागत असतील तर आजकाल त्यांचे प्रमाण फ़क्त २५ % वर आलेले आहे ही त्यातल्या त्यात दिलासाजनक बाब. 


छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावर असणारा "अमृतसर पंजाबी" हा अगदी पंजाबी चव देणारा ढाबा, देऊळगाव राजा इथला मराठी माणसाने चालवलेला आणि एका उत्कृष्ट चवीसोबत उत्कृष्ट संस्कृतीचेही दर्शन घडविणारा ढाबा, अशाच एका सुसंस्कृत व्यवस्थापनाने चालवलेला आणि तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांची चव आपल्याला करवून देणारा धुळे - मुंबई नॅशनल हायवेवर मालेगावच्या आधी असलेला साई कार ढाबा. आमच्या आजवरच्या भ्रमंतीत अशा अनेक हि-यांचा शोध आम्ही कायम घेत असतो.


रेल्वे प्रवासात मात्र त्या त्या रेल्वेच्या पॅंट्री कारमधून येणा-या किंवा एखाद्या मधल्या स्टेशनवर थांबल्यानंतर तिथल्या प्लॅटफ़ॉर्मवर मिळणा-या पदार्थांवरच अवलंबून रहावे लागे. रेल्वेत एखाद्या स्थानिक रेस्त्रॉ मधून ऑनलाईन पदार्थ मागवता येण्याची सुविधा साधारण २०१३ पासून सुरू झाली होती आणि नवनवीन असताना आम्ही आमच्या गोंदिया ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर प्रवासात या सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. पण गोंदिया ते मुंबई प्रवासात अकोल्याला आणि मुंबई ते सोलापूर प्रवासात पुण्याला ते जेवण घेऊन येणारी व्यक्ती आलीच नाही. फ़ोन केला असताना "पोचतोय, पोचतोय" म्हणून उत्त्तरे मिळालीत. बरे झाले गोंदिया ते मुंबई प्रवासात धाकटा भाऊ नागपूरला भेटायला आलेला असताना त्याने थोडे खाण्याचे पदार्थ आणलेले होते. त्यावर आम्हाला गुजराण करावी लागली आणि आदल्या रात्रीच्या अनुभवाने शहाणे होऊन मुंबई ते सोलापूर प्रवासात आम्ही कर्जतला वडे, पुण्याला सॅंडविचेस वगैरे खाऊन घेतलेले होते. त्यामुळे उपाशी रहावे लागले नाही तरी या बेभरवशाच्या सेवेमुळे आम्हाला अर्धपोटी नक्कीच रहावे लागले होते. म्हणून ऑनलाईन मागवण्यापेक्षा रेल्वेच्या पॅंट्री कारची विश्वसनीयता जास्त हा आमचा ग्रह झालेला आहे.


आमच्या लाडक्या महाराष्ट्र एक्सप्रेसला कधीच पॅंट्री कार नव्हती. खरेतर तिच्या २७, २८ तासांच्या प्रवासासाठी तिला पॅंट्री कार मिळायला हवी असा आमचा ग्रह फ़ार वर्षे होता. "डेक्कन क्वीन ला तिच्या अवघ्या ३, ३.५ तासांच्या प्रवासासाठी पॅंट्री कार मिळते आणि आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळत नाही म्हणजे काय ? हा मुंबई - पुणे करांनी आमच्या विदर्भावर केलेला अन्याय आहे." असे टिपीकल नागपुरी विचार आमच्या मनात यायचेही. आम्ही ते जाहीररित्या बोललेलोही आहे. पण रेल्वेचे एखाद्या गाडीला पॅंट्री कार देण्याचे किंवा न देण्याचे निकष निराळे असतात आणि डेक्कन क्वीनची पॅंट्री कार ही नुसती पॅंट्री कार नसून पॅंट्री कम डायनिंग कार आहे, तो भारतीय रेल्वेचा एक मानबिंदू आहे हे कळले आणि आमचा विरोध मावळला. 


महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गाडी नागपूरवरून निघून वर्धेपर्यंत पोचली की सेवाग्राम (पूर्वीचे वर्धा पूर्व स्टेशन) स्टेशनवर डाळवडे यायचेत. टिपीकल पूर्व विदर्भाची, चंद्रपूरची उत्कृष्ट चव असणारे हे डाळवडे मी सेवाग्राम स्टेशनशिवाय इतरत्र कुठेही बघितले नाहीत, अगदी सेवाग्राम स्टेशनपासून ३ किलोमीटर अंतर असलेल्या वर्धा स्टेशनवर सुद्धा. 


वर्धा स्टेशनवर मिळणारा चहा मात्र अत्यंत मचूळ असायचा आणि आहे. अत्यंत बोगस चहाची माझी व्याख्या वर्धा आणि पुणे स्टेशनवर मिळणारा चहा अशी आहे. एखादेवेळी घरी चहा पिताना जर माझ्याकडून "वा ! फ़र्स्ट क्लास" अशी नेहेमीची दाद गेली नाही याउलट चहा पिताना चेहेरा आंबट झाला असेल तर सुपत्नी विचारायची, "एकदम पुणे किंवा वर्धा स्टेशनचा चहा झालाय का रे ?" इतका तो चहा कुविख्यात होता. मला वाटत उकळलेल्या पाण्यात कोळशाची भुकटी टाकली तरी ते मिश्रण वर्धा स्टेशनच्या चहापेक्षा चवदार लागेल. 


बडनेरा स्टेशनवर मात्र बरीच वर्षे एक चाचा आपली केळ्यांची गाडी घेऊन "केला बढिया है" अशी टिपीकल आरोळी मारत केळी विकायचेत. केळी चांगली असायचीत. खुद्द जळगाव स्टेशनात मात्र कधी असे केळी विकणारे कधी दिसले नाहीत. "पिकत तिथे विकत नाही" या म्हणीला साजेसा हा व्यवहार.


अकोला स्टेशनवर काही खास वस्तू विकत घेतल्याचे मला तरी आठवत नाही कारण अकोल्यानंतर लगेचच अर्ध्या तासात शेगावचे वेध लागतात. गाडी मंदिरासमोरून जात असताना सगळे एंजिनचालक एक मोठ्ठा हॉर्न देतातच. महाराजांना मानवंदना म्हणून. आणि गाडीतले जाणकार मंदिराच्या कळसाकडे गाडीतूनच पाहून मनोभावे हात जोडतात. "बोलाव रे देवा लवकर दर्शनाला" अशी भाक देतात. शेगाव स्टेशन मात्र टिपीकल शेगाव कचोरी साठी प्रसिद्ध आहे. पण इथे मात्र बरोबर चांगली कचोरी मिळण्यासाठी नशीबच पाहिजे. ५० - ५० पर्सेन्ट चान्सेस असतात. एखादेवेळी मस्त गरमागरम आणि ताजी कचोरी मिळून जाते तर कधी थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेल्या गाडीसाठी तळलेली पण तिथे खप न झाल्यामुळे तशीच ठेवलेली कोमट किंवा थंड कचोरी घाईघाईत आपल्याला खपविली जाते. अर्थात खुद्द महाराजांचा पाय लागल्यामुळे शेगाव स्टेशन हे इतके पवित्र आहे की आपण ती थंड कचोरी सुद्धा प्रसाद म्हणून खाऊन टाकतो.


भुसावळ स्टेशन हे प्रवाशांच्या बाबतीत कॉस्मॉपॉलिटन. इथे उत्त्तरेकडून येणा-या गाड्यांमधल्या भय्या लोकांसाठी (भुसावळच्या उत्त्तरेला सगळे भैय्या राहतात हा एक टिपीकल मराठी माणसाचा समज आहे. जसा मलकापूरच्या पश्चिमेला राहणारे सगळे लोक "मुंबई - पुणेकर" हा टिपीकल वैदर्भीय माणसाचा गैरसमज आहे अगदी तसाच.), नागपूर , छत्त्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल इथून येणा-या पुरभैय्यांसाठी, दक्षिणेकडून येणा-या दाक्षिणात्यांसाठी सर्व प्रकारची व्यंजने उपलब्ध असतात. केळी पट्ट्यातली केळी जळगाव स्टेशनवर मिळत नसली तरी भुसावळला मिळतात. पण हे स्टेशन प्रकृतीने कॉस्मॉपॉलिटन असल्याने स्वतःचे वैशिष्ट्य असे काही नाही.


महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये म्हणा किंवा विदर्भ एक्सप्रेसमध्ये म्हणा भुसावळ ते मनमाड ते दौंड आणि भुसावळ ते मनमाड ते कल्याण हा प्रवास रात्री होत असे. त्यामुळे मधल्या चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर इथल्या स्टेशन्सवरच्या खाद्यसंस्कृतीचा फ़ारसा परिचय झाला नाही. तसेच मुंबईला जाताना नाशिक स्टेशनचे व्हायचे. पण परतताना, विशेषतः सेवाग्राम एक्सप्रेसने परतताना कसारा स्टेशनवर आजूबाजूची स्थानिक मंडळी पळसाच्या पानांची शंक्वाकृती आकाराचे (Conical Shape) द्रोण करून त्यात तिथल्या स्थानिक करवंदांची (रानाची मैना) विक्री करायचीत ती मात्र अप्रतिम. अर्थात आपल्या विदर्भात करवंद वेगळी असतात आणि ठाणे जिल्ह्यात ज्याला करवंदे म्हणतात ती संपूर्ण वेगळी असतात. इथली करवंदे जांभळांसारखी काळी जांभळी आणि खायला अप्रतिम गोड असतात. कसारा स्टेशनवर पुढे घाट चढण्यासाठी म्हणून गाडीला मागून दोन तीन एंजिने लावतात त्यामुळे गाडी तबियतेने थांबलेली असते. ही करवंद विकणारी मंडळी अगदी शोधून काढता येतात आणि त्यांच्यापर्यंत जाऊन आपण ती करवंदे विकत घेऊ शकतो.


बाकी कल्याण, ठाण्यापासून तर मग स्टेशनवर वडापावचेच अनभिषिज्ञ साम्राज्य सुरू होते. अर्थात तो वडापाव बाहेरगावावरून येणा-या मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी नसतोच मुळी. तो वडापाव मुंबईच्या लोकलशी आपली नशीबे जोडून लांबलांब प्रवास करीत आपले आयुष्य घडविणा-या चाकरमान्यांसाठी असतो. त्यातही एखादा चलाख चाकरमानी ठाण्यापर्यंत एका लोकलने येऊन पटकन बाहेर जाऊन अगदी ठाणे स्टेशनबाहेर मिळणारा कुंजविहारचा वडा (राम मारूती रोडवरचा राजमाता वडापाव फ़ारच लांब पडला असता) घेऊन मागून चारच मिनीटांनी येणा-या दुस-या लोकलमध्ये बसून बदलापूर किंवा टिटवाळा गाठतो हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे.


विदर्भ एक्सप्रेसमधल्या एका खाद्यपदार्थाचा शोध मला फ़ार उशीरा लागला याची मला खरोखर खंत आहे. विदर्भ एक्सप्रेसला सुद्धा पॅंट्री कार नाही. विदर्भ मुंबईवरून सुटतासुटता एका वेताच्या मोठ्या टोपलीत मावतील इतक्या कुल्फ़्या घेऊन (पारशी डेअरीच्या कुल्फ़्या) एक विक्रेता साधारण S - 2  किंवा S- 3 कोचमध्ये शिरतो. त्याचा प्रवास S - 2  पासून S - 1 कडे आणि पुढे वातानुकुलीत कोचेसकडे होत असतो. पण पहिल्या वातानुकुलीत कोचमध्ये येईपर्यंतच त्याच्याकडल्या सगळ्या कुल्फ़्या संपलेल्या असतात. म्हणून जाणकार मंडळी गाडी सुटली रे सुटली की S - 2  कडे धाव घेतात. साधारण एका छोट्या ताटलीच्या आकाराची, थोडेसे दूध लागलेल्या चवीची ती अप्रतिम कुल्फ़ी खरेच खूप छान असते आणि इतके वर्ष एकच चव राखण्याचे त्यांचे कसब म्हणजे त्यांना एखादे ISO सर्टिफ़िकेटच दिले पाहिजे या मताचा मी आहे.


तसे तर हावडा मेल आणि गीतांजली गाड्यांनाही पॅन्ट्री कार फ़ार पूर्वीपासून असायच्यात. त्यातली कटलेटस सोडलीत तर इतर काही खाण्याची इच्छा होत नाही. न जाणो, सामिष आणि निरामिष (ही रेल्वेची खास भाषा. सामिष = मांसाहारी आणि निरामिष  = शाकाहारी. हे दोन संस्कृत शब्द रेल्वेतल्या कुठल्या पंडिताने कुठून शोधून काढले कोण जाणे ?) जेवणात यांनी भेसळ केली तर ? ही शंका कायम मनात असते.


बाकी कधीकधी एखाद्या अनोळखी जागीसुद्धा अप्रतिम चवीचे खाद्यपदार्थ खायला मिळतात यावर माझा विश्वास आहे बर का. अहो म्हणूनच तर दरवेळी एखाद्या अनोळखी जागेला एकदम खारीज करून न टाकता तिथली चव बघूयात तरी म्हणत आपण खात असतो ना. काहीवेळा रॉंग नंबर्स लागतीलही पण कधीकधी असा अनपेक्षित खजिनाही हाती लागतो. आम्ही सगळे कुटुंबिय दिल्ली स्टेशनवरून जम्मू मेलने जम्मू कडे निघालेलो होतो. आदल्या दिवशी दगदगीमुळे दिवसा आणि रात्रीही कुणाचेच नीट जेवण झालेले नव्हते. जम्मू मेल सकाळी ८ च्या सुमाराला पठाणकोट स्टेशनमध्ये दाखल होत असे. तिथे तिचे एंजिन उलट बाजूने येऊन लागत असे आणि तिचा पुढला प्रवास सुरू होत असे. आता जम्मू मेल पठाणकोट स्टेशनवर जात नाही. या स्टेशनला बायपास करणा-या चक्की बॅंक स्टेशनवरूनच पसार होते. पण तेव्हा ती पठाणकोट स्टेशनवर जायची. 


गाडी प्लॅटफ़ॉर्मला पुरती लागण्याआधीच "ए, छोले भटुरे" अशा आरोळ्यांनी सर्व विक्रेत्यांनी आपापल्या गाड्या घेऊन गाडीच्या कोचेसवर आक्रमण केले होते. आम्हा सर्वांना भुका तर लागल्याच होत्या. पण त्या भटु-यांचा आकार बघूनच आमच्यापैकी काहींनी "राम, आपल्याला ही डिश दोघांमध्ये एकच पुरे होईल. तसाच ऑर्डर दे." अशी मला सूचना केली. मी पण त्याचे पालन केले. पण सगळ्यांनाच सपाटून लागलेली भूक, त्यात त्या छोल्यांची अप्रतिम आणि अस्सल पंजाबी चव, ते मोठे मोठे दिसणारे पण अजिबात तेलकट नसलेले आणि तोंडात सहज विरघळणारे भटुरे यामुळे एकापाठोपाठ एक किती डिशेस आम्ही मागवल्यात आणि फ़स्त केल्यात याचा हिशेब आमच्यापैकी कुणालाच नव्हता. त्या विक्रेत्याकडे तो हिशेब होता म्हणून ठीक झाले. गाडी तिथे फ़क्त अर्धाच तास थांबली म्हणून बरे नाहीतर आमच्या गटाने तिथल्या सगळ्याच छोले भटु-यांचा फ़डशा पाडला असता. आज जवळपास २१ वर्षांनंतरही पठाणकोट स्टेशनवरच्या त्या छोले भटु-यांची चव अगदी माझ्या जिभेवर आहे.


या सगळ्यात अग्रगण्य म्हणजे मुंबई - मडगाव मांडवी एक्सप्रेसची पॅन्ट्री कार. ही गाडी आम्हा सर्व रेल्वे फ़ॅन्समध्ये "फ़ूडी एक्सप्रेस" म्हणून प्रसिद्ध आहे. आयुष्यात देवदयेने राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्ग वातानुकुलीत या सर्वोच्च वर्गाने प्रवास करण्याचे योग आलेत. या गाड्यांमध्ये प्रथम वर्ग प्रवाशांचे जे खाण्यापिण्याचे लाड होतात त्याला तोड नाही. सहसा हा डब्बा त्या गाडीच्या पॅन्ट्री कारच्या शेजारीच असतो आणि रेल्वेचे नियम या वर्गाच्या प्रवाशांसाठी खूप वेगळे आहेत. 


राजधानीत इतर वर्गाच्या प्रवाशांसाठी अन्न आणि पेये हे प्लॅस्टिक कन्टेनर्स मधून किंवा कागदी पेल्यांमधून आणि टेट्रा पॅक्समधून दिले जातात पण प्रथम वर्ग वातानुकूल प्रवाशांसाठी अगदी पद्धतशीरपणे चिनीमातीची भांडी, कप्स आणि स्टीलचे चमचे वापरले जातात. शीतपेये किंवा आईसक्रीम्स वगैरे काचेच्या भांड्यांमधून दिले जातात. जेवण करत असताना शेजारच्या पॅन्ट्री मधून कॅसरॉलमधून गरमागरम पोळ्या घेऊन तिथला सेवक येतो आणि आग्रह करकरून आपल्याला वाढतो. त्यामुळे या वर्गाचे तिकीट जरी विमानापेक्षा महाग असले तरी ती किंमत तिथे मिळणा-या या राजेशाही वागणुकीची आणि सेवेची असते. एकापाठोपाठ एक आपल्यावर खाण्यापिण्याचा इतका भडिमार राजधानी एक्सप्रेसमध्ये होत असतो की "बरे झाले, आपले तिकीट नागपूरपर्यंतच आहे. पुढे भोपाळपर्यंत किंवा नवी दिल्लीपर्यंत तिकीट असते तर बहुतेक आपल्याला या डब्यातून स्ट्रेचर आणूनच बाहेर काढावे लागले असते इतकी आपली पोटे तुडुंब आणि ताबडून भरलेली आहेत" अशी आमची भावना दरवेळी व्हायची.





गाडीतल्या कोचमध्ये शिरल्याशिरल्या प्रवाशांचे हे स्वागत. फ़ुले आणि टॉफ़ीज देऊन



चहापानाचा इंतजाम. सगदी सरंजामशाही पद्धत.



अगदी राजेशाही नाश्ता


अगदी राजेशाही नाश्ता



भारतीय रेल्वेतल्या अगदी टॉप क्लास गाडीतला सर्वोच्च दर्जाचा वर्ग

पण तरीही मांडवी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारचे एक निराळेच वैशिष्ट्य आहे. इथे मिळणा-या पदार्थांची रेंज आणि त्यांची चव अगदी अतुलनीय आहे. आहुजा नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरला या गाडीचा हा पॅन्ट्री कारचा कॉन्ट्रॅक्ट मिळत आलेला आहे आणि त्यांनी आपला दर्जा कायम ठेवलेला आहे. केवळ भरपूर पदार्थ आणि उत्त्तम चव असून भागत नाही, ते पदार्थ स्वच्छ भांड्यांमधून प्रवाशांना मिळायला हवेत आणि आपल्या पॅन्ट्री कारचीही स्वच्छता तितकीच उत्त्तम असायला हवी यावर त्यांचा कटाक्ष असल्याचे कायम दिसते. मी जेव्हा जेव्हा मांडवी एक्सप्रेसने प्रवास केलाय तेव्हा तेव्हा मी आवर्जून त्या पॅन्ट्री कार मध्ये जातो आणि तिथली स्वच्छता, नीटनेटकेपणा पाहून पुन्हा पुन्हा समाधानी होतो. किंबहुना मुंबईवरून कोकणात किंवा गोव्याला जायला मांडवी एक्सप्रेसच्या आधी जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस असे अनेक सोयीचे आणि जलद पर्याय उपलब्ध झालेले असले तरी खरा फ़ूडी रेल्वेफ़ॅन मांडवी एक्सप्रेसचाच पर्याय निवडत असतो.


मुंबई - मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस. 



स्वच्छ धुतलेल्या स्टीलच्या डब्यामधून आलेला अप्रतिम चवीचा उपमा आणि तितकेच चविष्ट सॅंडविच.



जेवण हे साधेसेच असले तरी चव केवळ अप्रतिम. जिभेवर रेंगाळणारी.


मांडवी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमधील मेन्यू. दर २००९ मधले आहेत हे ध्यानात घ्यावे.

एखाद्या स्टेशनवर मिळणा-या किंवा एखाद्या रेल्वेगाडीच्या पॅन्ट्री कारमध्ये मिळणा-या एखाद्या खास चवीच्या पदार्थाविषयी तुमच्याही अशाच काही आठवणी असतील तर नक्की कॉमेंटमध्ये लिहून कळवा. आमचाही डेटाबेस त्यामुळे विस्तारेल आणि लेख वाचणारी सगळी मंडळी त्यांच्या पुढल्या प्रवासांमध्ये ती चव घेऊन पाहतील.



- एक फ़ूडी रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. (खरेतर "खादाडखाऊ, लांडग्याचा भाऊ" असेच स्वतःला विशेषण लावणार होतो. पण उगाच आमच्या गरीब बिच्चा-या बंधूराजांना उगाचच लांडग्याची उपमा मिळाली असती म्हणून तो शब्दप्रयोग टाळला.)


रविवार, २२ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५



Sunday, December 10, 2023

धिटाई खाते मिठाई...

मी माझ्या मागील लेखात माझ्या नागपूर ते गणपतीपुळे प्रवासासाठी नागपूर - मुंबई विदर्भ एक्सप्रेस आणि मुंबईवरून पुढे मांडवी एक्सप्रेसच्या प्रवासाचा उल्लेख केला आणि मला त्या प्रवासाचे नियोजन आठवले.


नागपूर - मुंबई विदर्भ एक्सप्रेस नागपूरवरून (तेव्हा) संध्याकाळी 5.15 ला सुटायची आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुस-या दिवशी सकाळी 6.50 ला पोहोचायची. तर मांडवी एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून लगेच सकाळी 7.05 ला निघायची. त्यामुळे मधला वेळ हा फ़क्त 15 मिनीटांचा होता. विदर्भ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फ़लाट 14 किंवा 15 वर जाणार तर मांडवी एक्सप्रेस फ़लाट क्र. 12 किंवा 13 वरून सुटणार. शिवाय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जिने चढ उतार करण्याची गरज नसल्याने या फ़लाटावरून त्या फ़लाटावर नुसते चालत जायचे असल्याने हे 15 मिनीटांचे बफ़र मला सुरक्षित वाटत होते. शिवाय विदर्भ एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 95 % वेळा अगदी वेळेवर जात असल्याचा डेटाही माझ्या सोबत होता. म्हणून मी ही धिटाई करण्याचा निर्णय घेतला होता.


पण समजा प्रवासाच्या नियोजित दिवशी विदर्भ एक्सप्रेस 10 मिनीटे उशीरा मुंबई हद्दीत पोहोचली असती, तर दादर स्टेशनला उतरण्याचा माझा प्लॅन बी तयार होता. विदर्भ एक्सप्रेस दादर स्टेशनला सकाळी 6.35 ला पोहोचायची तर मांडवी एक्सप्रेस दादरला सकाळी सकाळी 7.15 ला यायची. तिथे मला जवळपास 40 मिनीटांचे बफ़र होते. विदर्भ एक्सप्रेस 10 ते 15 मिनीटे उशीरा मुंबई हद्दीत आली असती तर मी दादरला उतरण्याचा निर्णय घेतला असता. दादरला मध्य रेल्वेच्या फ़लाट 6 वरून फ़लाट 5 वर जिना चढ उतार करून जावे लागले असते पण तेवढे बफ़र माझ्याकडे होते.


जर त्याहून वाईट स्थितीत विदर्भ एक्सप्रेस मुंबई हद्दीत 30 मिनीटे ते 1 तास उशीरा आली असती तर माझा प्लॅन सी तयार होता. त्या परिस्थितीत मी ठाण्यालाच उतरलो असतो. ठाण्याला विदर्भ एक्सप्रेस पहाटे 5.50 ला यायची तर मांडवी एक्सप्रेस तब्बल सकाळी 8.00 वाजता यायची. त्यामुळे विदर्भ एक तासभर उशीरा आली असती तरी चालण्यासारखे होते.


हा सगळा खटाटोप नागपूर ते रत्नागिरी हा प्रवास 20 तासात अतिजलद होण्यासाठी आणि मांडवी एक्सप्रेसच्या बहुचर्चित पॅण्ट्री कार मधले विविध पदार्थ चाखण्यासाठी होता. शिवाय कोकण रेल्वेचा प्रवास हा भरदिवसा करण्यातच खरी मजा आहे. कुतुबमिनारपेक्षा जास्त उंचीच्या 10 पिलर्सवर तोलला असलेला पानवलचा पूल, आशिया खंडातला दुस-या नंबरचा 6.5 किलोमीटर लांब असलेला करबुड्याचा बोगदा आणि कोकणचे अमर्याद असलेले सगळे निसर्गसौंदर्य बघायचे तर दिवसाच हा प्रवास व्हायला हवा हा माझा आग्रह. यासाठी विदर्भ एक्सप्रेस - मांडवी एक्सप्रेस यातल्या कमी वेळाची ही रिस्क घ्यायला मी आणि माझे कुटुंब तयार झालो होतो. मुंबई हद्दीत शिरल्याशिरल्या वेळाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे प्लॅन ए - बी - सी निवडून ऐनवेळी सामानसुमान घेऊन पळापळ करायला आम्ही सगळेच मानसिकरित्या तयार होतो. पळापळ काही मिनीटांसाठी होईल पण हे विलक्षण अनुभव आयुष्यभरासाठी सोबत राहतील ही माझी आणि माझ्या जीवनसंगिनीची मनोधारणा होती. त्यामुळे आम्ही ही धिटाई केली आणि तशी मिठाई खाल्ली.






आज नागपूरवरून कोकणात जाणारी मंडळी हा विदर्भ एक्सप्रेस - मांडवी एक्सप्रेस हे कनेक्शन यातल्या रिस्कमुळे घ्यायला तयार होत नाहीत. यातले प्लॅन ए - प्लॅन बी - प्लॅन सी त्यांना समजावून सांगूनही त्यांची ही रिस्क घेण्याची तयारी नसते. मग त्यातली बहुतांशी मंडळी नागपूर ते पुणे हा प्रवास बसने - रेल्वेने करून पुण्यावरून रात्री निघणा-या एखाद्या बसने कोकण / गोवा गाठतात. गंतव्य गाठण्यात मजा असते पण प्रवासातच खरी मजा येते हे त्या मंडळींना पटतच नाही. त्यामुळे कोकणात एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधी प्रवासातले कोकण ही मंडळी बघतच नाहीत. दोन दिवस एखाद्या ठिकाणी गेले. तिथे रमले आणि परतले एव्हढाच यांचा अनुभव मर्यादित असतो. म्हणूनच मला क्षणात इकडून तिकडे नेणारा विमानप्रवासही तितकासा भावत नाही. अगदी आवश्यक असल्याशिवाय विमानप्रवास टाळण्याकडे माझा कल असतो.




आता नागपूरवरून कोकण रेल्वे मार्गाने थेट मडगावला जाणारी एक्सप्रेस सुरू झालेली आहे. ती गाडी पनवेलला पहाटे पोहोचते आणि कोकणातला प्रवास दिवसा करते खरी पण ती आठवड्यातून दोनच दिवस धावते. आणि पनवेलपर्यंत वेळेत येणारी ही गाडी पनवेलनंतर कोकण रेल्वेत खूप रखडते. त्यामुळे इतर दिवशी हा प्रवास करण्यासाठी, कोकणातला खरा अनुभव घेण्यासाठी थोडी धिटाई आवश्यक आहे असे माझे मत आहे. ही धिटाई नको असेल तर आदल्या दिवशी मुंबईत येऊन, हॉटेलमध्ये किंवा कुणा नातेवाईकाकडे मुक्काम ठोकून दुस-या दिवशी सकाळच्या गाड्या आरामात पकडता येईल. पण यात हॉटेलचा खर्च, नातेवाईकांना होणारी अडचण वगैरे गोष्टी येतीलच.


- प्रवासात अत्यंत धीट आणि आपल्या सहप्रवाशांना व्यवस्थित सांभाळून घेऊन कमीत कमी धोक्यात जास्तीत जास्त धाडसी व सुंदर प्रवास आखणारे, प्रवासी पक्षी प्रा, वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, September 26, 2021

रेल्वेफॅनिंग आणि खाद्यभ्रमंती - १

सगळे खवय्ये रेलफॅन्स नसलेत तरी सगळे railfans खवय्ये असतातच. रेल्वेतल्या खवय्येगिरीच्या प्रत्येकाच्या एक एक कथा असतातच. पु ल म्हणतात त्याप्रमाणे मथुरेच्या आसपास "ब्डीय" म्हणजे रबडी विकणारा आहे हे ज्याला कळले त्याला रेल्वे भरपूरच घडली आहे असे समजावे. तसेच "ट्यँय सांड्या" म्हणजे Times Of India, "सालादू" म्हणजे मसाला दूध आणि "चॅग्रँम" म्हणजे चहा गरम या हाका समजायला रेल्वेत किंवा रेल्वेच्या फलाटावर भरपूर वेळ व्यतित व्हायला हवा. 

बालपणी रेल्वेने दूरवर जाण्याचे योग तसे विरळाच आलेत. धाकटी मावशी तत्कालीन मध्यप्रदेशात दुर्गला रहायची. काही सणवार उत्सवप्रसंगांनी ती मंडळी इकडे आलीत की आमची ती मावसभावंडे दुर्ग ते नागपूर या ६ - ७ तासांच्या प्रवासात (तेव्हा ६ - ७ लागायचेत हो. आजकाल सुपरफास्ट रेल्वेने चार ते साडेचार तासात जाता येते) त्यांनी केलेल्या खादाडीची वर्णने करायची आणि आमच्या तोंडाला पाणी सुटायचे. ते खात असलेला "कटलेट" हा पदार्थ केवळ रेल्वेच्या पँट्री कारमध्येच मिळतो अशी आमची बरीच वर्षे प्रामाणिक समजूत होती. कारण हाॅटेलिंगची घरून फारशी परवानगी नव्हती आणि घरची सगळी मंडळी मिळून आम्ही हाॅटेल्समध्ये गेल्यानंतर खाण्याचे पदार्थ मर्यादित. दोसा नाहीतर वडासांबार. क्वचित वेळा आमचे दादा (वडील) राईस प्लेट मागवायचेत. पण कटलेट कधीच नाहीत. कटलेट हा शाकाहारी पदार्थ आहे की मांसाहारी पदार्थ आहे याविषयी आमच्या जन्मदात्यांच्या मनातच गोंधळ असावा म्हणून हा पदार्थ हाॅटेल्समध्ये कधीच आमच्या टेबलावर आला नाही. 

त्याकाळी सेंट्रल ऍव्हेन्युवरच्या चंद्रलोक बिल्डींगसमोरच्या इमारतीत शिवराज नावाचे हाॅटेल होते. आमच्या दादांना तिथली राईसप्लेट फार आवडायची. राईसप्लेट मागवली की "दादा, आज आपण नुसता भातच खायचा का हो ?" असा भाबडा प्रश्न आम्ही दादांना किंवा आईला विचारायचो. दादा नुसते हसायचेत. पण राईसप्लेट पुढ्यात आली की आमचे प्रश्न विरून जात. दादांच्या हसण्याचा गूढार्थ कळत असे. पण रेल्वे प्रवासाचे फारसे योग न आल्याने रेल्वेत खाण्याचेही फारसे योग आले नाहीत. १९८९ मध्ये कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यावर दरवेळी तो २५ तासांचा प्रवास करताना असे भरपूर योग यायला हवे होते. पण हाय रे, दुर्दैवा ! आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला पँट्री कारच नव्हती. (अजूनही नाही.) नागपूर ते कराड जाताना आई अत्यंत मायेने दोन तीन जेवणांचा डबा देत असे. त्या मायेसमोर स्टेशनवरच्या पंचपक्वान्नांची किंमत अत्यंत तुच्छ होत असे. फारतर दुसर्‍या दिवशी सकाळी नीरा स्टेशनवर मिळणारी फळफळावळ आम्ही आवर्जून खात असू. 

महाराष्ट्र एक्सप्रेसही नीरा स्टेशनात तब्येतीने थांबत असे. नीरा स्टेशननंतर सातार्‍याकडे जाताना लोणंद, वाठार, आदर्की असा घाट लागत असे. जुन्या काळी कोळसा एंजिनांमध्ये पाणी भरण्यासाठी गाड्या तिथे भरपूर वेळ थांबत असत. एंजिनांमध्ये पाणी भरण्याची ती मोठी सोंड निरा स्टेशनात बरीच वर्षे होती. कोळसा एंजिने जाऊन डिझेल एंजिने आलीत तरी वेळापत्रकात फारसा बदल झालेला नव्हता. कराड ते नागपूर प्रवासात 'घरी परतायचय' या आनंदात भुकेची फारशी जाणीव नसायचीच. तरीही पुण्याला गाडी ४० मिनिटे थांबत असल्याने आमच्यातली काही धाडसी मंडळी पुणे स्टेशनवर गाडी आल्याआल्या पटकन बाहेर पडून स्टेशनबाहेरच्या हाॅटेल्समध्ये पोटपूजा आठोपून अगदी गाडी हलण्याच्या वेळेला परतायचीत. आमच्यात तेव्हढी हिंमत नसल्याने आम्ही स्टेशनवरच्या हातगाड्यांवर मिळणारे गारेढोण वडासांबार किंवा भल्या सकाळी केलेल्या आणि रात्री १० पर्यंत कुल्फीसारख्या थंड आणि कडक असलेल्या इडल्या पोटात ढकलून आमची केवळ क्षुधा शमवीत असू. 

बाकी पुणे स्टेशन आणि वर्धा स्टेशनवर चहाचा काँट्रॅक्ट हा एका कुणालाच मिळत असावा अशी माझी खात्री आहे. दोन्हीकडे तीच सपक, पाणीदार फुळकवणी चव आणि तोच कोमट चहा. घरी कधी चहा बिघडला तर वेड्यावाकड्या झालेल्या माझ्या चेहेर्‍याकडे पाहून सौभाग्यवती विचारते, "खरंच का रे पुणे स्टेशन क्वालिटीचा झालाय का आजचा चहा ?" निम्नतम दर्जाचा benchmark म्हणजे वर्धा आणि पुणे स्टेशनचा चहा. धामणगाव स्टेशनवर छान चहा मिळायचा. तिथल्या माझ्या मुक्कामात अनेक रात्री आमच्या नाट्यचर्चा धामणगावच्या फलाटावर या चहाच्या साथीनेच रंगलेल्या आहेत. या चहाची कीर्ती ऐकून बर्‍याच सरळ जाणार्‍या (थ्रू) मालगाड्याही, सिग्नल हिरवा असतानाही, दोन मिनिटे धामणगावच्या अप थ्रू किंवा डाऊन थ्रू लाइनवर थांबायच्यात. असिस्टंट लोको पायलट धावपळीत खाली उतरून आपल्याजवळील थर्मास भरून चहा घेऊन घाईघाईतच एंजिनात परतायचे आणि गाडी पुन्हा हलायची. 

विदर्भ एक्सप्रेसने नागपूरकडे येताना रात्री कल्याण सोडल्यानंतर किंवा सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे येताना संध्याकाळी इगतपुरी सोडल्यावर "व्हेज बिर्याणी" नावाचा जो प्रकार गाडीत विक्रीसाठी येतो तो म्हणजे, एकदोन उकडलेले बटाटे, दोनतीन अर्धवट उकडलेली फुलकोबी (फ्लाॅवर) आणि अजिबात न उकडलेल्या फरसबीचे बारीक तुकडे भातासोबत असलेला पदार्थ. मिठा - तिखटाची चव ज्याला लागली त्याने आपल्या स्टेशनवर ताबडतोब लाॅटरी विकत घ्यावी ,नक्की लागेल. 

१२ वर्षांच्या मुंबईच्या वास्तव्यात मुंबई - नागपूर हा प्रवास अक्षरशः शेकडो वेळा केलाय. पण एका जिन्नसचा शोध बर्‍याच उशीरा लागल्याची खंत मला कायम राहील. विदर्भने मुंबई सोडल्यानंतर एस - २ कोचमध्ये एका मोठ्या टोपलीत पारशी डेअरीची कुल्फी घेऊन एक विक्रेता चढतो. गोल गरगरीत आणि छोट्या ताटलीच्या व्यासाच्या आकाराच्या आणि एक इंच जाडीच्या या कुल्फ्या म्हणजे अप्रतिम चवीचा एक नमुना असतात. तो विक्रेता सोबत गोल कागदी प्लेटस आणि आईसक्रीम स्टीक्स घेऊन चढतो. (अर्ध्या तासानंतरही ती कुल्फी इतकी कडक असते की तुकडा पाडण्यासाठी ती तोडताना बहुतांशी त्या आईसक्रीम स्टीकचाच तुकडा पडतो.) एस - २, एस - १ हे डबे करून तो बी - ५, बी - ४, बी - ३ असा वातानुकुलीत डब्यांकडे आपली वाटचाल करतो. ज्या खवय्यांना ही गोष्ट माहिती आहे ते सगळे त्या विक्रेत्याला एस - २ किंवा एस - १ मध्येच जाऊन गाठतात आणि कल्याणनंतर टिटवाळा येईपर्यंतच त्याची टोपली रिकामी होते. बर्‍याच जणांची निराशाही होते. थोड्या लागून आलेल्या दुधाची ही कमी गोड आणि घट्ट कुल्फी अशी हातोहात संपते. पहिल्या वेळेला ते दूध असे लागून आलेले असणे मला अपघात वाटला होता पण नंतर जाणवले की तोच याचा USP आहे. अतिशय अप्रतिम चव. विदर्भ एक्सप्रेसने केलेल्या शेवटल्या १० - १५ प्रवासात आम्हाला हा शोध लागल्यानंतर आम्ही आमचा डबा सोडून ४ - ५ डबे दूर आतून चालत चालत जात ती कुल्फी एखाद्या ट्राॅफीसारखी हस्तगत करीत असू. 

कलकत्त्याकडे जाणार्‍या हावडा मेल आणि गीतांजलीच्या पँट्रीत मिळणार्‍या कटलेटससारखी कटलेटस संपूर्ण भारतात कुठेच मिळत नाहीत. बंगाल्यांना दूध फाडून पदार्थ बनविण्यात आणि कटलेटस बनविण्यात विशेष नैपुण्य आणि रूची असली पाहिजे. मुंबई ते मडगाव जाणार्‍या मांडवी एक्सप्रेसला सगळे रेलफॅन्स "फुडी एक्सप्रेस" म्हणून ओळखतात ते केवळ तिच्या स्वच्छ, सुंदर सर्वोत्कृष्ट पँट्रीमुळे, मेन्युतल्या वैविध्यामुळे आणि अप्रतिम चवीमुळे. राजधानी गाड्यांमध्येही इतका सर्वसमावेशक मेन्यु नसतो. 








बाकी आम्ही एकदा चेन्नई ते नागपूर या प्रवासात राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्गाच्या आदरातिथ्याचा अनुभव घेतलाय. चेन्नईवरून निघाल्यानिघाल्या चाॅकलेटस, गाडी गुमीडपुंडीपर्यंत येते न येते तोच थर्मासभरून चहा आणि दुसरा थर्मासभरून दूध व सोबत बाऊलभरून काॅर्नफ्लेक्स, सुलुरूपेटा येईपर्यंत उपमा, ब्रेड, कटलेटस असा पोटभर नाश्ता आणि सोबत पुन्हा चहा. ओंगोल नेल्लोरपर्यंत थ्री कोर्स लंच आणि विजयवाड्याला जेवण संपवून वामकुक्षीची वेळ साधायला जातो न जातो तोच केबिनच्या दारावर टकटक आणि आमच्यासाठी आईसक्रीम आणल्याची वर्दी घेऊन रेल्वेतला सेवक उभा. वारंगलपर्यंत वामकुक्षी, लाॅबीमध्ये फेर्‍या वगैरे मार्गाने खाल्लेले अन्न जिरवण्याच्या प्रयत्नात असताना वारंगलनंतर "हाय टी" म्हणून चहा, समोसा, शेव, बिस्कीटे तयार. संध्याकाळी बल्लारशावरून निघाल्यानंतर वरोर्‍याला पुन्हा सकाळइतकेच जेवण. "बरे झाले, आपले तिकीट नागपूरपर्यंतच आहे. भोपाळ किंवा झाशीपर्यंत असते तर एवढे खाल्यानंतर आपण पार आडवेच झालो असतो आणि स्ट्रेचरवरूनच आपल्याला बाहेर काढावे लागले असते" या भावनेने व आमची तत्पर सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना मनापासून धन्यवाद देत आम्ही नागपूरच्या फलाटावर पाय ठेवला होता. रेल्वे आणि खानपान सेवेच्या अशा अनंत आठवणी आहेत. विस्तारभयास्तव हा भाग इथेच थांबवतो. 






पुढचा भाग लगेचच आपल्या सेवेत सादर करेन. (क्रमशः)

 - सर्व रेल्वेफॅन्ससारखाच खादाड रेल्वेफॅन, राम प्रकाश किन्हीकर.