Thursday, May 30, 2024

भारतीय रेल्वेच्या एसी कोचेसमधील सेवेचा घसरता दर्जा

१९९५ - ९६ ते २००१ - ०२ पर्यंत रेल्वेच्या त्रिस्तरीय वातानुकूल शयनयान (थर्ड एसी) वर्गात प्रवासातली अंथरूणे पांघरूणे कोच मधला मदतनीस (अटेंडंट) प्रत्येक प्रवाशाला तो तो ज्या ज्या स्टेशनवरून चढणार असेल, तिथून चढल्यानंतर रात्री बेरात्री त्याच्या त्याच्या जाग्यावर आणून द्यायचा. गाडीच्या टीटीईसोबत त्याच्याकडेही एक रिझर्वेशन चार्ट असायचा त्यातून त्याला प्रत्येक प्रवाशाची चढण्या उतरण्याच्या स्टेशन्सची माहिती मिळत असे.


प्रतिष्ठित गाड्यांमध्ये ही अंथरूणे पांघरूणे पॅकबंद पाकीटांमध्ये असत. दोन पांढर्‍याशुभ्र धुतलेल्या, इस्त्री केलेल्या दोन चादरी, एक पांढराशुभ्र उशीचा अभ्रा आणि एक पांढरा हँड नॅपकिन हे त्या कागदी पॅकमध्ये सीलबंद असायचे. एक ब्लँकेट आणि अभ्र्याशिवाय असलेली उशी हे मात्र पॅकबंद नसायचे. इतका सगळा जामानिमा तो मदतनीस प्रवास सुरू झाल्यावर प्रत्येक प्रवाशाला बर्थवर आणून देत असे आणि प्रवास संपण्याआधी त्याच्याकडून गोळा करीत असे.


आजकाल हँड नॅपकिन तर त्रिस्तरीय वातानुकूल शयनयानात देतच नाहीत. हे नॅपकिन्स स्टँडर्ड सेटचा भाग असल्याचा रेल्वेचा नियम असल्याचे आपण त्या मदतनीसाला खूप खनपटीला बसून सांगितले तर नाईलाज झाल्यासारखा आणि कसातरी कळकट नॅपकिन तो आपल्याला देतो.


त्याहीपेक्षा भयानक म्हणजे आजकाल ही अंथरूणे पांघरूणे त्या त्या बर्थसच्या बे मध्ये एकावर एक रचून ठेवलेली असतात. "तुम्हाला हवी ती घ्या नाहीतर गेले उडत" असा आविर्भाव त्यात असतो. यात सुरूवातीच्या स्थानकावरून बसण्याच्या ठिकाणावरून बसणारी प्रवासी मंडळी त्या बे मध्ये असलेल्या पांघरूणांमधून त्यातल्या त्यात चांगली पांघरूणे, थोड्या जाड उशा निवडून स्वतःकडे घेतात आणि उरलेली निम्न दर्जाची पांघरूणे मधल्या स्थानकांवरून चढणार्‍या प्रवाशांच्या नशिबी येतात.



आजकाल तर द्विस्तरीय शयनयान (सेकंड एसी) आणि प्रथम वर्ग शयनयान (फर्स्ट एसी) वर्गातही ही पांघरूणे पहिल्या स्थानकापासूनच त्या त्या बर्थसवर ठेऊन देतात असा अनुभव येतोय. त्यातला प्रथम वर्ग वातानुकूल सोडला तर द्विस्तरीय वातानुकूल वर्गातही हा नॅपकिन वेगळा मागावा लागतो हा अनुभव आहे.


नवनवीन सोयीसुविधा प्रवाशांना देताना जुन्या सोयीसुविधा प्रवाशांना नियमपुस्तकाप्रमाणे मिळतायत की नाही ? हे बघणे रेल्वेची जबाबदारी आहे हे रेल्वे विसरत चाललीय का ?


दक्षिण रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये ब-यापैकी हे नियम पाळले जातात हा माझा अनुभव आहे. अशाच एका अनुभवाचे कथन इथे.




- रेल्वेच्या जनरल डब्यापासून ते फर्स्ट एसी पर्यंत सर्वच डब्यांमधून भरपूर प्रवास केलेला


आणि


प्रवासात अंथरूणे पांघरूणे अगदी घरच्यासारखी विना सुरकुती अंथरणारा व प्रवास संपल्यानंतर अंथरूण पांघरूणांची घरच्यासारखीच व्यवस्थित घडी घालून रेल्वेला परत करणारा नेटका प्रवासी पक्षी,


प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


मन हा मोगरा

 श्रीतुकोबांनी "मन हा मोगरा, अर्पूनी ईश्वरा" असे का म्हटले असेल याची प्रचिती आली.

बाजारात काल मोगरा छान आणि स्वस्त मिळाला म्हणून आणला आणि देवाला अर्पण केला. आज सकाळी देवघरात गेल्यानंतर बघितले की मोग-याची फ़ुले निर्माल्य झालेली आहेत, सुकून गेलेली आहेत पण त्यांचा सुवास कालइतकाच किंबहुना कालपेक्षाही जास्त दरवळतो आहे.



आपले मन इतके छान असावे की ते शिळे झाले, कुणी त्याला चुरगाळले, त्याचे निर्माल्य झाले तरी त्यातून अधिकाधिक सुगंधच बाहेर पडावा. जगाला त्याने आनंदच द्यावा. जग आपल्याशी कसे वागतेय याचा परिणाम आपला जगाशी वागण्यावर न व्हावा ही श्रीतुकोबांची इच्छा आहे.

- प्रा. वैभवीराम किन्हीकर, प्रभातचिंतन २७ मे २०२४.

Sunday, May 26, 2024

तिरूपती ते चेन्नई प्रवास. तिरूपती बस फ़ॅनिंग.

तिरूपतीला गेल्यानंतर दर्शन पार पाडून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी म्हणून चेन्नईकडे जाण्याची सोय बघू लागलोत. चेन्नई ते नागपूर असे आमचे राजधानी एक्सप्रेसचे तिकीट होते. तसा आमच्या हातात एक दिवस होता. न जाणो तिरूपतीला दर्शनाला एखादा दिवस जास्त लागला तर असो म्हणून आम्ही एक दिवस रिझर्वड ठेवला होता. पण नियोजित दिवशीच संध्याकाळी आमचे दर्शन झाले त्यामुळे पुढला एक संपूर्ण दिवस आम्हाला थोडा मोकळा मिळाला. 


तिरूपती ते चेन्नई जाणारी हिरव्या पिवळ्या रंगसंगतीतल्या कोचेसची आणि त्याला मॅचिंग अशा रंगांचे एंजिन्स मिळणारी सप्तगिरी एक्सप्रेस ही अत्यंत चांगली गाडी होती पण तिचे आरक्षण ऐनवेळी उपलब्ध नव्हते. तीनच तासांचा प्रवास असला तरी आरक्षण असल्याशिवाय परक्या प्रांतात कुटुंबकबिल्यासकट प्रवास करणे ही गोष्ट मला रूचणारी नव्हती. तरूणपणी विद्यार्थीदशेत असे धाडसी प्रवास मी भरपूर केलेले होते पण आता मात्र ते शक्य नव्हते. मग आमचा मोर्चा तिरूपतीच्या बसस्थानकाकडे वळला.


हिरव्या पिवळ्या रंगसंगतीचे डबे आणि तशाच रंगसंगतीचे इंजिन.

 
चेन्नई तिरूपती सप्तगिरी एक्सप्रेस तिरूपती रेल्वे स्थानकात येताना. आमच्या हॉटेलच्या खिडकीतून टिपलेले प्रकाशचित्र.

सप्तगिरी एक्सप्रेसच्या इंजिनचे मृण्मयीने काढलेले स्केच.

तिरूपतीचे बसस्थानक म्हणजे एका बसफ़ॅनसाठी चंगळच होती. आंध्र प्रदेश परिवहन, कर्नाटक परिवहन, केरळ परिवहन आणि तामिळनाडू परिवहन च्या बसेसची तिथे जत्राच लागलेली होती. काय बघू आणि काय नको ? अशी माझी अवस्था तिथे झालेली होती. एका सुंदर बसचा फ़ोटो काढतोय न काढतोय तोच दुसरी सुंदरी माझ्यासमोरून पसार व्हायची. बराच वेळ असे विविध बसेसचे फ़ोटोज काढण्यात रमल्यावर मग सुपत्नीने आठवण करून दिली की आपल्याला चेन्नईला जाणा-या बसचे रिझर्वेशन करायचे आहे. त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत.


तिरूपती आहे आंध्र प्रदेशात पण तामिळनाडूपासून फ़ार जवळ असल्याने तिरूपती ते चेन्नई बसेस फ़ार आहेत आणि विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. साधी एक्सप्रेस बस, डिलक्स बस, वातानुकुलीत डिलक्स बस. 


त्यातली ही साधी एक्सप्रेस बस. 





त्या बसेसचे रिझर्वेशन होतच नव्हते. ऐनवेळी या आणि जी जागा मिळेल ती पकडा अशी सिस्टीम त्या बसेसची होती. यातल्या सीटस आपल्या शहर बस सारख्या होत्या. 


ही तामिळनाडू राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आणखी एक साधी बस. वेगळ्या रंगसंगतीतली. नंतर जया अम्मा सत्तेवर आल्यात आणि सगळ्या बसेसना एकसारखी हिरवी पोपटी रंगसंगती दिल्या गेली. ते रंगीबेरंगी दिवस संपलेत.


३ ते ४ तासांचा हा प्रवास असला तरी  शहरबससारख्या अजिबातच हेडरेस्ट नसलेल्या त्या सीटसवर अत्यंत अवघडून बसून जाण्यापेक्षा डिलक्स किंवा वातानुकूल डिलक्सचा पर्याय आम्हाला चांगला वाटला. डिलक्स आणि वातानुकूल डिलक्स या बसेसच्या प्रवासभाड्यात फ़ारसा फ़रक नव्हता मग आम्ही एस. ई. टी. सी (तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाची एक उपकंपनी) च्या वातानुकुलीत बसचे आगाऊ तिकीट काढले आणि तिरूपती ते चेन्नई या दोन परराज्यांमधल्या मार्गावर प्रवासासाठी सज्ज झालोत. 


ही एस. ई. टी. सी. ची लक्झरी बस, बिगर वातानुकूल


                        ही एस. ई. टी. सी. ची लक्झरी बस, बिगर वातानुकूल


ही एस. ई. टी. सी. ची आणखी एक बिगर वातानुकूल लक्झरी बस, वेगळ्या रंगसंगतीतली


तिरूपती ते चेन्नई या मार्गावरची आंध्र प्रदेश परिवहन निगम ची एक्सप्रेस बस. नागपूर बस स्थानकावर नागपूर ते आदिलाबाद जाणा-या या प्रकारच्या बसेस दिसतात. चंद्रपूर बस स्थानकावरही चंद्रपूर ते निर्मल या मार्गावर जाणारी एक्सप्रेस बस आणि चंद्रपूर ते आसिफ़ाबाद जाणारी पल्ले वेलुगू (ग्रामीण बस सेवा) बस पण दिसते.



पल्ले वेलुगू (ग्रामीण बस सेवा) नवे डिझाईन


पल्ले वेलुगू (ग्रामीण बस सेवा) जुने डिझाईन








आंध्र प्रदेश परिवहन निगम ची तिरूपती - तिरूमला - तिरूपती बालाजी एक्सप्रेस सेवा. या मार्गावरील घाटांमध्ये या बसेस अगदी जोरदार चालवतात. त्यांना सवय असते पण पहिल्यांदाच प्रवास करणारे आपण अगदी जीव मुठीत घेऊन घाटातला प्रवास करतो. विशेषतः उतरताना. या प्रवासात जेव्हढे तन्मयतेने आणि श्रद्धेने आपण त्या बालाजीचे स्मरण करत असतो तेव्हढे जर आपण रोज केले तर बालाजी तिरूमलावरून आपल्या घरीच आपल्या संनिध येईल.

आंध्र प्रदेश परिवहन मधल्या एक्सप्रेस बसमधील आसन व्यवस्था. ही ३ बाय २ अशीच असली तरी तामिळनाडू परिवहन पेक्षा थोडी आरामदायक आहे.


ही आमच्या तिरूपती ते चेन्नई प्रवासाची साथी असलेली वातानुकुलित सुपर डीलक्स लक्झरी बस. या बसमधल्या प्रवासाचे सविस्तर वर्णन पुढल्या ब्लॉगमध्ये.


- महाराष्ट्र एस. टी. वर प्रेम असणारा आणि भारतभरच नव्हे तर जगभरच्या सार्वजनिक वाहतुकीविषयी कुतूहल असणारा बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Monday, May 20, 2024

रंग माझा वेगळा : भिलाई शेड WAM 4 आईसक्रीम रंगसंगती

मार्च १९७१ : पश्चिम बंगालमधल्या चित्तरंजन इथल्या इंजिन कारखान्यातून पहिले WAM 4 प्रकारचे एंजिन बाहेर पडले आणि भारतीय रेल्वेच्या सेवेत दाखल झाले. त्याचे नामकरण "रजत आभा" असे करण्यात आले आणि ते एंजिन तत्कालीन दक्षिण पूर्व (सध्याचे दक्षिण पूर्व मध्य) रेल्वेच्या भिलाई लोकोमोटिव्ह शेडमध्ये दाखल झाले. त्या एंजिनाचा नंबर होता 20400.


३८५० अश्वशक्तीच्या आणि १२० किलोमीटर प्रतितास हा महत्तम वेग घेऊ शकणा-या या एंजिनांनी १९७१ पासून थेट २०१५ भारतीय रेल्वेवर धावणा-या अनेक रेल्वेंगाड्यांना वेग दिला. भारतीय रेल्वेवरील एका एंजिनाचे आयुष्य साधारण ३० - ३२ वर्षे असते. त्यामुळे ही एंजिने हळूहळू सेवेतून निवृत्त झालीत.


नवे असताना एकेकाळी या एंजिनांनी राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस सारख्या प्रतिष्ठित गाड्यांना वाहून नेले असेल. गीतांजली एक्सप्रेस, तामिळनाडू एक्सप्रेस, आंध्रप्रदेश एक्सप्रेस यासारख्या अनेक प्रतिष्ठित सुपरफ़ास्ट गाड्यांना वेग प्रदान केला असेल.हळूहळू थकत गेल्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रे्स, कुर्ला - शालिमार एक्सप्रेस सारख्या नावाच्याच एक्सप्रेस असलेल्या गाड्यांसोबतही ही एंजिने रमली असतील. शेवटी शेवटी तर अनेक पॅसेंजर गाड्यांनाही या एंजिनांनी वाहिले असेल.


नवनवीन, जास्त ताकदवान, जास्त वेगवान अशा WAP 4, WAP 5, WAP 7 अशा एंजिनांची निर्मिती झाली आणि या WAM 4  एंजिनांनी हळूहळू निवृत्ती स्वीकारली. सगळ्यात शेवटी २०१९ मध्ये शेवटचे WAM 4  भारतीय रेल्वेवर धावले आणि आता फ़क्त शंटिंग वगैरे कार्यासाठी थोड्याफ़ार स्टेशनात उरून ह्या प्रकारची एंजिने नाहीशी झालीत.


खूप रंगसंगतींमध्ये रंगवलेली एंजिने हे या प्रकारच्या एंजिनांचे वैशिष्य़ होते. यापूर्वी फ़क्त डिझेल एंजिने वेगवेगळ्या रंगसंगतींमध्ये यायचीत. त्यापूर्वीची वाफ़ेवरची एंजिने एकजात सगळी कोळशासारखी काळीकुट्ट. नाही म्हणायला त्यांच्या कोळसा व पाणी वाहून नेणा-या "टेंडर" भागाला त्यांच्या त्यांच्या शेडनुसार वेगवेगळा रंग असायचा. वर्धा शेडचा हिरवा, भुसावळ शेडचा निळा, भिलाई शेडचा लाल वगैरे. पण डोळ्यात भरणारा रंग म्हणजे त्यांच्या बॉयलरच्या भागाचाच. अगदी काळा. 


पण ही WAM 4  एंजिने शेडगणिक वेगवेगळा रंग धारण करीत गेलीत. कधीकधी तर एकाच शेडची एंजिने तीन चार वेगवेगळ्या रंगसंगतीत दिसायचीत. भारतभर विविध रंगांची उधळण करीत जाणारी ही WAM 4  एंजिने.



या स्केचमध्ये दाखविलेल्या रंगसंगतीला आईसक्रीम रंगसंगती असे आम्ही रेल्वेफ़ॅन्स म्हणायचोत.


स्केच श्रेय : मृण्मयी राम किन्हीकर. 


Sunday, May 12, 2024

महाराष्टीय घरातली कुलदैवते आणि त्या त्या घरची संस्कृती

 माझे एक निरीक्षण आहे. बघा तुम्हालाही तो अनुभव आलाय का ?

रेणुका देवीचे उपासक किंवा ज्यांच्याकडे माहूरची रेणुका कुलदेवता आहे त्या घरातले पुरूष शीघ्रकोपी असतात. पण आपला कोप लक्षात आल्यानंतर कोप आवरून लगेचच शांतही होतात. अत्यंत प्रेमळ असतात. दीर्घकाळ कुणाचा राग धरून बसणे व योग्यवेळ पाहून बदला घेण्याची, टोमणा मारण्याची क्षमता किंवा धीर त्यांच्यामध्ये नसतो.
या घरातल्या स्त्रियाच एकूण घराचे धोरण ठरवितात. आपल्या नवरोजींना सुरूवातीच्या काळात बिचकणार्या या स्त्रिया संसारात चांगल्या मुरल्यावर नवरोजींना चांगले ओळखून घेऊन त्यांच्या कोपकाळात अत्यंत धोरणीपणाने वागून नंतर शांततेच्या काळात युक्ती प्रयुक्तीने स्वतःचे धोरण मान्य करून घेतातच घेतात.
गणपतीची उपासना ज्यांच्याकडे आहे त्या गाणपत्य पंथातल्या घरातली पुरूष मंडळी जात्याच शांत असतात. ही मंडळी घरातल्या वादविवादात फारशी सहभागी नसतात आणि व्हावे लागले तरी अत्यंत सर्वसमावेशक भूमिका घेत समेट घडविण्याच्या मागे लागतात. या घरात शांतता असते. ही मंडळी अत्यंत विचार करून बोलणारी आणि शांत असतात.
या घरांमधल्या गृहिणींवरही पुरूषांचा प्रभाव असतोच. त्या सुध्दा शांतपणे, सर्वसमावेशकतेने कार्य करीत राहतात. कलह, वादविवाद टाळण्याचे प्रयत्न करतात.
श्रीबालाजी किंवा श्रीविष्णुंच्या दशावतारापैकी कुणीही ज्यांचे कुलदैवत आहे अशा वैष्णव घरांमधली पुरूष मंडळी अत्यंत धोरणी असतात. आपल्या मर्जीप्रमाणेच संपूर्ण घर चालले पाहिजे यावर त्यांचा फार कटाक्ष असतो. पण कधीमधी भगवान विष्णु स्वतःच्या मर्यादा मान्य करून त्या महालक्ष्मीसमोर आपली आयुधे टाकून तिची आराधना करतात तसेच या घरातली पुरूष मंडळीही एखाद्या अत्यंत महत्वाच्या प्रसंगी आपल्या गृहस्वामिनीला सूत्रे सोपवतात. ती गृहस्वामिनीही आपल्या "अहों" चा स्वभाव, त्यातले कंगोरे, खाचाखोचा माहिती असल्याने स्वतःचे कौशल्य पणाला लावून पण आपल्या नवरोजींच्याच पठडीतला, त्यांना रूचणारा निर्णय घेते आणि "अहो" अगदी खुष होऊन जातात. गृहस्वामिनीच्या कामावर आणि त्याहीपेक्षा जास्त तिच्यावर जबाबदारी सोपविण्याच्या आपल्या निर्णयावर.
ज्यांच्याकडे शंकर कुलदैवत असतात त्या घरातले पुरूष मात्र खरोखर भोळे आणि जगमित्र असतात. त्यांचा हा स्वभाव लक्षात घेऊन त्या त्या घरातल्या पार्वतीबाईंनाच अत्यंत धोरणीपणे व नेटका संसार करावा लागतो. या शैव घरातले पुरूष आपल्या दैवताप्रमाणे एकतर लवकर संतापत नाहीत आणि एकदा संतापलेत की कधीच लवकर शांत होत नाहीत. त्यांच्या संतापानंतरचा विध्वंस टाळण्यासाठी त्या घरातल्या गृहस्वामिनींना कायम दक्ष रहावे लागते.
भावांनो, वहिनींनो, बहिणींनो आणि जिजाजींनो, खरेय ना ?
- "मराठी घरातली कुलदैवते आणि त्या त्या घरांमधले पतीपत्नींचे मानसशास्त्र व तदअनुषंगिक सौहार्द" या अतिप्रचंड ग्रंथाचे सडसडीत लेखक प्रा. वैभवीराम वैशाली प्रकाश किन्हीकर.

Saturday, May 11, 2024

तव्यावरल्या पोळीचे चटके

तव्यावरून पानात आलेली पोळी हा सगळ्यांना एकदम आवडणारा पदार्थ असला तरी तो एक खास वैदर्भिय / मराठवाडीय मालगुजारी सरंजामी मनोवृत्तीचा परिपाक आहे हे माझे आजवरचे निरीक्षण आहे. तव्यावरची पोळी सरळ पानात येताना खाणारा 'एकटाच नालोब्या' असेल तर ते अत्यंत सुखावह आहे पण चारपाच जणांना जोराची भूक लागलीय, हे सर्व जण पंक्तित वाट बघत बसलेयत आणि घरातली एकटीच गृहिणी दरवेळी  तव्यावरच्या ताज्याताज्या पोळीचे चारपाच तुकडे करून सगळ्यांना वाढतेय, या उपद्व्यापात एकाचीही भूक पूर्ण भागत नाही आणि घरातल्या गृहिणीचाही पिट्टा पडतो तो निराळाच.


मग एकदोन पोळ्यांनंतर एकदोन समजूतदार मेंबर्स मग बाकीच्यांना वाॅक ओव्हर देतात. "होऊ द्या तुमचे निवांत. आम्ही थांबतो." असे म्हणत भुकेलेल्या पोटांनी हात वाळवत ताटावर बसून अक्षरशः ताटकळत राहतात. ही स्थिती आपल्या घरी आलेल्या एखाद्या अतिथी / अभ्यागतावर येणे हे यजमान म्हणून माझ्यासाठी तरी दुःखदायक असते.


त्यात महालक्ष्म्या आणि इतर महत्वाच्या कुळाचारांच्या साठीच्या स्वयंपाकात पुरणपोळीचा बेत असेल, यजमान असा मालगुजारी / सरंजामी थाटाचा असेल आणि वाढणार्‍या अनेक स्त्रियांमधली एक जरी गृहिणी फक्त "माझा नवरा आणि मुलगा" एवढ्याच ताटांकडे लक्ष देणारी व पंक्तिप्रपंच करणारी असेल तर मात्र पंक्तितल्या इतर अभ्यागतांवर अगदी अनवस्था प्रसंग गुदरतो आणि यजमानाला ओशाळवाणे व्हायला होते. पंगत पूर्ण होण्याचा कालावधी वाढतो तो निराळाच. या ओशाळवाण्या प्रसंगांचा दोनतीन वेळा अनुभव घेतल्यामुळे मी अधिकारवाणीने बोलतोय.


म्हणून "तव्यावरून पानात"  ही संकल्पना कितीही गोड वगैरे असली तरी ती खाजगीत, एकास एक राबवण्याची पध्दत आहे. "एक किंवा दोन पुरेत" ही एकेकाळी कुटुंबनियोजनाच्या जाहिरातीची टॅगलाईन होती. ती टॅगलाईन "तव्यावरून पानात" या संकल्पनेसाठीही लागू पडते, ५ - १० लोकांच्या पंक्तिसाठी लागू पडत नाही हे माझे अनेक शोचनीय अनुभवांती बनलेले मत आहे.


श्रीक्षेत्र गाणगापूरला एकदा तिथल्या क्षेत्रोपाध्यांकडे प्रसाद भोजन करण्याचा योग आला होता. नेमके त्यादिवशी त्या उपाध्यांचा मंदिरातल्या प्रत्यक्षात गुरूमूर्तीच्या प्रसादसेवेचा दिवस होता. त्यादिवशी त्यांनी तिथल्या प्रथेविषयी जे सांगितले ते प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाने काळजावर कोरून ठेवण्यासारखे आहे.


ते म्हणालेत, " गुरूमहाराजांना पंक्तिप्रपंच अजिबात चालत नाही. गुरूमहाराजांच्या नैवेद्याच्या ताटात जितके पदार्थ असतील तितके सगळे पदार्थ, अगदी मीठ, लिंबू, कोशिंबिरींसकट, सगळ्या अतिथी / अभ्यागतांना वाढल्या जायला हवेत हा स्वतः गुरूमहाराजांचा दंडक आहे. त्यात चूक झालेली गुरूमहाराजांना चालत नाही."


आपणही या गोष्टीचा सूक्ष्मातून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण भोजनाचे निमंत्रण देऊन आपल्या घरी आणलेला अभ्यागत असो किंवा तिथी न कळवता (पूर्वसूचना न देता) अचानक भोजनासाठी आलेला अतिथी असो, यांच्यासाठी पंक्तिप्रपंच टाळता येणे आपल्यासाठी कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही.


मग ही "तव्यातून पानात" संकल्पना कितीही आकर्षक वाटत असली तरी ती खाजगीत आचरण करून सार्वजनिक जीवनात याबाबतीत चांगले दंडक पाळण्याचा आपण निश्चय करून, अतिथी अभ्यागतांना तृप्त करून पाठवणे हे आपल्याला सहज शक्य आहे. 

- "तव्यावरून पानात" या व्यर्थ अट्टाहासात फजित पावलेला एक यजमान आणि पंक्तिप्रपंचाचे अनेक कटू अनुभव आलेला एक अभ्यागत, राम.




Wednesday, May 8, 2024

फुले फळे नसणारी झाडे

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या सौभाग्यवती माझ्या मेव्हणीशी फोनवर बोलत होत्या. बोलता बोलता त्या आमच्या गॅलरीत गेल्यात. घरासमोर तीनचार झाडांची घनगर्द सावली आहे. अनेक पक्षांचा किलबिलाट तिथे दिवसभर अविरत सुरू असतो. माझ्या मेव्हणीला फोनवरूनच तो किलबिलाट खूप भावला. "ताई, हा किलबिलाट किती छान वाटतोय गं ! किती छान पाॅझिटिव्ह वाटत होतं" अशी दादही तिने दिली.


रोज आम्हाला पहाटे पहाटे त्यांच्यापैकीच एका पक्षाच्या अतिशय सुमधूर आणि लयबध्द गाण्याने जाग येते आणि आमची खरोखरच सुप्रभात होते हे आमचे अहोभाग्यच.


आई गेल्यानंतर एक स्नेही समाचारासाठी घरापर्यंत आलेले होते. ती झाडे, ते पक्षी पाहून ते पण म्हणाले होते की ही झाडे नुसती सावलीच देत नाहीत तर ती स्वतःमध्येच एक परिपूर्ण इकोसिस्टीम असतात. अनेक पक्षांना आधार असतात, अनेकांची घरटी एकतर त्यांच्यात असतात किंवा घरटी बांधण्यासाठी उपयुक्त साहित्य ही झाडे पुरवितात.


आमच्याही घरासमोर अशीच चार मोठी झाडे आहेत. आम्हाला ती सुंदर सावली देतात. यांच्या सावलीमुळे गेली ५ वर्षे खालच्या मजल्यावर भर उन्हाळ्यातही छान थंडावा असतो. कूलर लावावा लागत नाही. त्यातली दोन झाडे तर फुले, फळे काहीही देत नाहीत. फक्त सावली देतात. ही झाडे लावताना आपण कुठल्या विचाराने ही झाडे लावलीत ? असा स्वार्थी विचार मनात येतोही पण त्यांचे असे उपकार स्मरले की मनातला हा संभ्रम नाहीसा होतो.


जुन्याकाळी एकत्र कुटुंबांमध्ये अशी फुले फळे न देणारी माणसे असायचीत. एखादा ब्रम्हचारी किंवा मुलेबाळे नसलेला विधूर काका, मामा, आत्येभाऊ, मामेभाऊ, चुलतभाऊ. एखादी बालविधवा असलेली, मुलेबाळे नसलेली आत्या, मामी वगैरे. आजच्या व्यावहारिक जगात ही सगळी फुले फळे नसलेली झाडेच. पण तत्कालीन एकत्र कुटुंबात त्यांचा सांभाळ व्हायचा. त्यांच्या अन्न पाण्याची, औषधांची, कपड्यालत्त्यांची यजमान कुटुंबाच्या आहे त्या परिस्थितीत पूर्तता व्हायची. त्या झाडांचीही त्याहून अधिक अपेक्षा नसे. घरात पडेल ते काम करणार्‍या आणि आपली उपयुक्तता या ना त्या मार्गाने पटवून देण्याची कमाल कोशिस करणार्‍या ह्या व्यक्ती. त्यांच्या घरातील उपयुक्ततेपेक्षा त्यांची सावली घराला हवीहवीशी असायची. मग घरातलं कर्तेधर्ते कुणी वडीलधारे देवाघरी गेलेत तर ह्याच व्यक्ती घरादारावर आपली शीतल छाया धरायच्यात. आपण फळाफुलांनी उपयुक्त ठरू शकत नाही याची खंत यांना कायम मनात बोचत असेलही पण त्याची कमतरता या आपल्या स्नेहपूर्ण वागणुकींनी आणि घरात सगळ्यांवरच  निरपेक्ष अकृत्रिम प्रेम करून भरून काढू पहायच्यात.


कालचक्रात ही झाडे हळुहळू वठायचीत आणि एकेदिवशी कालवश व्हायचीत. आपल्यामागे एखाद्या कापडी पिशवीत असलेली एखादी धोतरजोडी (एकदोन पातळे), एखादा अडकित्ता, एखादी पानाची, काथचुन्याची डबी एव्हढाच स्थावर जंगम ऐवज ही मंडळी सोडून जायचीत तरीही कुठलासा भाचा, पुतण्या यांचे दिवसवार करायचेत. "जिजीमावशी गेली आणि उसन उतरवण्याचा मंत्र टाकणारं कुणी उरलंच नाही गं", "मंदाताई काय वाती करायची ? एकसारख्या आणि सुंदर." "सुधाच्या हातच्या शेवया म्हणजे काय विचारता ? केसांसारख्या बारीक आणि लांबसडक तरी किती ?" किंवा "विलासकाकाला किती आर्त्या पाठ असायच्यात ना ! तो गेला आणि तशी मंत्रपुष्पांजली कुणीही म्हणत नाही." अशा आठवणी यांच्यामागे कायम निघत रहायच्यात. खर्‍या श्राध्द कर्मापेक्षा आपल्यामागे असा आपला गौरव झालेला पाहूनच यांच्या आत्म्यांना समाधान लाभत असावे, मुक्ती मिळत असावी. शेवटी श्राध्द म्हणजेही श्रध्देने केलेली आठवणच की नाही ?


आज मुळातच एकत्र कुटुंबे दुर्लभ झालीत. त्यात अशा व्यक्तींना कोण सांभाळणार ? आज झाडे लावतानाच "आजोबांनी लावलेल्या आंब्याची फळे नातू खाईल." यावर आपला विश्वास नाही. आम्ही लावलेल्या आंब्याला पुढल्या ५ - ७ वर्षात फळे लागली पाहिजेत हा आपला अट्टाहास. अशात दूरचा काका, दूरची आत्या हिला कोण विचारतो ? 


फळे देणार्‍या झाडांचीच आपण निगा राखतोय, त्यांनाच खतपाणी देतोय. पण अशा फळे फुले नसलेल्या झाडांचा सावली देऊन आपल्या जीवनात थंडावा देण्याचा गुण आपण पारच दुर्लक्षित करतोय का ?


- सगळ्या फळे फुले देणार्‍या आणि क्वचित नुसतीच सावली देणार्‍या समस्त जीवसृष्टीविषयी कृतज्ञ असलेला मनुष्यमात्र, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.