हा पुण्यातला पेशवाई वाडा नाही. माहूरच्या दत्तशिखरावर प.पू. महाराजांची जी विशाल गढी आहे त्यातल्या प्रदक्षिणा मार्गावरचे एक अतिशय जुने आणि छान घर आहे.
या पहाडावर सर्व बाजूंनी वाहणारा भणाण वारा, दूरवर वाहणारी अरूणावती नदी, सगळ्या बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेला आणि वाघ, अस्वलादि वन्य प्राण्यांचे हमखास अस्तित्व असलेला पर्वत, जवळच्या गावाशी संपर्क साधण्याच्या व दळणवळणाच्या तुटपुंज्या सोयी एव्हढेच नव्हे तर संध्याकाळी ७.३० नंतर दर्शनासाठी कुणीही येत नसल्याने मनुष्यमात्रांचे दुर्लभ दर्शन.
अशा या वातावरणात हे अगदी "हिलस्टेशन" जरी असले तरी इथे राहण्यासाठी विशेष हिंमत लागते रे बाॅ.
गजबजाटाच्या, वहिवाटीच्या हिलस्टेशनवर आरामदायक राहणे निराळे आणि जगापासून अलिप्त असलेल्या या ठिकाणी फक्त वैराग्यच पांघरून राहणे निराळे.
भगव्या वस्त्रांमधली अंतरातली तीव्र वैराग्याची आग आणि परमेश्वराच्या अस्तित्वाच्या अनुभूतीचे शीतलतम चांदणे या दोन्हींचा सुरेख मिलाफ इथे अनुभवायला मिळतो.
- परमेश्वरी स्वरूपाची अनुभूती घेण्यासाठी उत्सुक असलेला, तरीही पर्यटनावर प्रेम करणारा एक संवेदनशील प्रवासी पक्षी, राम.
No comments:
Post a Comment