मध्य रेल्वेच्या हावडा - मुंबई किंवा दिल्ली - चेन्नई रेल्वेमार्गाने नागपूर दोन भागात विभागलेले आहे. सांस्कृतिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्यासुध्दा.
नागपुरात पूर्वापार "पुलाच्या अलिकडले" (पूर्व नागपुरातले) आणि "पुलाच्या पलिकडले" (पश्चिम नागपुरातले) हा भेद आहेच आहे.
आमच्या बालपणी महाल, इतवारी, नंदनवन भागात आम्ही रहात असताना पुलाच्या पलिकडल्या धंतोली, धरमपेठ मधल्या आमच्या नातेवाईकांकडे जायचे असले म्हणजे आमच्या मनावर अकारण दडपण येई. आपण तिथे गावंढळसारखे काहीतरी बोलून जाऊ का ? आपल्या वागण्याने आपले आणि आपल्या आईवडिलांचे हसे तर होणार नाही ना ? या भितीमुळे का होईना आम्ही खूप cautios होत असू. तसे थोडे polished वागत, बोलत असू.
काही कालावधीत आम्हीही "पुलाच्या पलिकडले" पश्चिम नागपूरकर झालोत आणि बालपणी आम्हाला येणार्या टेन्शनचे आम्हालाच हसू येऊ लागले.
पण गेल्या ५ वर्षात पुन्हा "पुला-अलिकडले" आणि "पुला-पडिकडले" हा फरक प्रकर्षाने जाणवायला लागला आहे. याला कारण म्हणजे दोन्ही बाजूंकडल्या वाहतुकीच्या शिस्तीतला फरक.
घरून रेशिमबागेकडे, महालाकडे जाताना नरेंद्रनगरचा पुल, बारा सिग्नलचा पुल, अजनीचा पुल ओलांडेपर्यंत शिस्तीत असलेली, ट्रॅफिक सिग्नल्सचे बर्यापैकी पालन करणारी वाहने पूर्व नागपुरात दाखल होताच अचानक सैरावैरा, सैरभैर का होतात ? हे मला न सुटलेले कोडे आहे.
तसेच महाल, रेशिमबागेतून पश्चिम नागपुरातल्या घरी परतताना बारा सिग्नलचा, अजनीचा किंवा नरेंद्र नगरचा पुल ओलांडून पश्चिमेत दाखल झालो की ड्रायव्हर म्हणून आपल्याला कसे हायसे वाटते, आपला जीव कसा भांड्यात पडतो हे मी खूपवेळा अनुभवलेले आहे.
"पुलाच्या अलिकडले" MH -49
आणि
"पुलाच्या पलिकडले" MH-31
यामध्ये आणखी एक फरकाचा पाॅइंट वाढला. "वाहतुकीची शिस्त आणि ती पालन करण्याची मानसिकता"
- महाल - इतवारी - नंदनवन भागात संपूर्ण बालपण गेल्याने या भागाशी मनाने कायमचा जोडल्या गेलेला,
पण हल्ली तिथल्या बेशिस्त आणि मस्तवाल वाहतुकीमुळे तिथे जाणे टाळणारा, (आणि हाच बेशिस्त वाहतुकीचा त्रास टाळण्यासाठी पुणेकर होणे होता होई तो टाळणारा)
"पुला पलिकडला" पश्चिम नागपूरकर, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment