Wednesday, December 25, 2024

एस टी ची शिवशाही आणि सूर्यग्रहण

आपल्या प्रवाशांना यापुढे होणारे सूर्यग्रहण एस टी तून दाखवण्यासाठी एस टी आपल्या गाड्या धुवत नाही असे ऐकलेय. ते जर खरे असेल तर एस टी च्या या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अत्यंत कौतुक करावेसे वाटते.

परवा चंद्रपूर वरून परतताना दिसलेल्या एस टी च्या शिवशाही बसेस. सगळ्या एकजात अत्यंत मळलेल्या. एकदा एस टी बस डेपोत आली की ती कधीच धुतली जात नाही हे खरे असावे. शिवशाही सारख्या प्रीमियम सेवेची ही अवस्था तर इतर साध्या बसेसबद्दल तर विचारायलाच नको.

त्या बस होस्टेस वगैरे ठेवण्यापेक्षा प्रत्येक डेपोत बस धुण्याचे अत्याधुनिक आणि स्वयंचलित यंत्र दिले तर खूप संवेदनशील निर्णय घेतल्याचे श्रेय मिळेल. प्रत्येक बस प्रवासाला निघताना आतून आणि बाहेरून स्वच्छ धुवूनच बाहेर पडली पाहिजे हा दंडक हवा. खाजगी बसेसशी स्पर्धा करताना हे अत्यावश्यक आहे. आपल्या शेजारच्या राज्यांमधील तेलंगण, आंध्र, कर्नाटक राज्यातल्या साध्या बसेसही चकाचक दिसतात आणि त्यामुळेच खूप वर्षे टिकतात हे सत्य आपण कधी लक्षात घेणार ?


बाय द वे, युतीची सत्ता आली की परिवहन खाते कायम सेनेकडे कसे आणि कशासाठी जाते ? हे मला न उलगडलेले राजकीय कोडे आहे. इतके वर्षे मुंबईची बेस्ट सेवा अत्यंत कार्यक्षम पणे हाताळण्याचा अनुभव म्हणून हे खाते त्यांना दिले असे म्हटले तर गेल्या ५ - ६ वर्षात बेस्ट सेवेचे धिंडवडे आणि खाजगीकरण आपण बघितलेले आहे.
१९९५ मध्ये युतीची सत्ता असताना नवलकर, किर्तीकर, रावते परिवहन मंत्री झालेत. त्यांनी त्यापूर्वी एस टी वर असलेल्या पिवळ्या पट्ट्या ऐवजी भगवा पट्टा मारण्याचा एक अनाकलनीय निर्णय घेतला. तेवढंच आपलं हिंदुत्ववादी सरकार आल्याचा फील. भगव्याला माझा विरोध नाही पण त्यापेक्षा कितीतरी चांगल्या गोष्टी करण्यासारख्या होत्या हे मला वाटून जाते.
नंतर २०१४ ते २०१९ पुन्हा रावते आणि आता खुद्द मुख्यमंत्री परिवहन खाते सांभाळत आहेत पण मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून बस होस्टेस सारखे वरवर लिपापोती करणारे निर्णयच बघायला मिळत आहेत. त्यामानाने कॉग्रेसच्या देवतळे, आदिक, सुरूपसिंग नाईक, अंतुले यांनी अत्यंत संवेदनशील रीतीने एस टी खाते हाताळले आणि पुढे नेले असे म्हणावे लागेल.
आता पुन्हा युतीची सत्ता जर आलीच तर एस टी ला ऊर्जितावस्थाप्राप्त करून देणारा एखादा अत्यंत संवेदनशील आणि पूर्णवेळ मंत्री मिळावा हीच प्रार्थना.
- एस टी चा हितचिंतक, एस टी प्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment