Wednesday, December 25, 2024

सुखी आणि मानसिक रित्या निरोगी माणसाची भूमिका

"एकविसाव्या शतकात जगात सगळ्यात मोठा रोग हा मानसिक रोग असेल." असे WHO ने म्हटलेले आहे त्याचा गेल्या १० -१५ वर्षात फारच पडताळा यायला सुरूवात झालेली आहे.

सगळ्यांचे स्वतःपेक्षा दुसर्यांच्या सुखाकडे जास्त लक्ष जायला लागलेय. खरेतर प्रत्येकाला त्याची / तिची सुखदुःखे असतातच. पण काही व्यक्ती दुःखात सुध्दा प्रसन्न चित्ताने जगात वावरण्याची कला आत्मसात करतात.
अशा व्यक्तींकडे पाहून त्या व्यक्तिपेक्षा सुध्दा लौकिक अर्थाने सुखी असणार्या पण कुढ्या स्वभावाच्या माणसाला त्या व्यक्तीविषयी अकारण असूया वाटत राहते आणि "हा / ही लेकाचा / ची सुखी कशी राहू शकते ?" हा प्रश्न त्या दुसर्या व्यक्तीचे काळीज कुरतडत राहतो आणि त्याला अधिकाधिक दुःखी करतो.
"Grass is greener always on the other side of the fence"
किंवा
"परदुःख हे कायम शीतल असते"
या उक्ती आपण सगळेच जणू विसरूनच गेलोय. आणि दुसर्यांच्या सुखाने दुःखी होऊन बसण्याचा नतद्रष्ट उद्योग करतोय.
एकेकाळी माणसे आपले दुःख लपवून सुखी आहोत असा आभास निर्माण करण्याच्या प्रयत्नात असायचीत. आज अगदी उलट झालय. आपल्याला नेमकं किती सुख हवय ?आपण किती सुखी झालोय ? हा विचारच कुणी करायला तयार नाही. त्यामुळे लौकिकार्थाने सुखी माणसेही स्वतःच्या नसलेला दुःखाचा बाजार मांडण्यात रमताना दिसतात.
व. पु. काळे त्यांच्या "हसरे दुःख" कथेत म्हणतात त्याप्रमाणे "दुःखावर आधारित दुःख कुठलं ? आणि मनाच्या कोतेपणावर आधारित दुःख कोणतं ? हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं दुःखच कळत नाही."
आज आम्ही आमच्या सगळ्याच संवेदना इतक्या गमावून बसलोत की स्वतःचे सुख आणि दुःख हे ही आपल्याला कळेनासे झालेय. ही समाजधारणा अशीच दृढ होत गेली तर एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच आपणा सगळ्यांनाच कायम मानसोपचारांची गरज लागेल.
विचार करा.
- समाजातले बदल सूक्ष्म रितीने अभ्यासणारा आणि समाजासाठी व्यथित होणारा एक संवेदनशील (आणि म्हणूनच सुखी असलेला) माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment