आमच्या बालपणी संस्कृत सुभाषितमाला अभ्यासताना आम्हाला खालील श्लोक अभ्यासाला होता. आमचे संस्कृत शिक्षक श्री. हरिभाऊ महावादीवार सर होते. अत्यंत व्युत्पन्न पंडित आणि तितकेच आम्हा मुलांमध्ये रमणारे. त्यामुळे पाचव्या, सहाव्या, सातव्या वर्गात अभ्यासलेली संपूर्ण सुभाषितमाला आम्हाला अजूनही तोंडपाठ आहे. अगदी "अयं निजः परो वेती...." पासून सुरू करून "...तपः सर्वम समाचरेत." पर्यंत सगळे 200 - 250 श्लोक आजही आम्हाला सलग पाठ आहेत.
त्यातलेच काही काही श्लोक मध्ये मध्ये मला आठवत असतात आज त्यातला श्लोक आठवला आणि जाणवलं की अरे, आजच्या युगात आपण सारेच मूर्ख ठरतोय की.
खादन्न गच्छामि हसन्नजल्पे
गतन्न शोचामि कृतन्नमन्ये |
द्वाभ्यांतृतीयो न भवानि राजन
केनास्मि मूर्खो वद कारणेन||
कवी कालिदास राजाला विचारतोय की "हे राजा, मी खाता खाता चालत नाही, पाणी पिता पिता हसत नाही, दोन व्यक्ती आपसात बोलत असताना मी मध्ये बोलत नाही मग मी कुठल्या कारणाने मूर्ख आहे ?"
थोडक्यात श्रीसमर्थांनी मूर्खांची लक्षणे लिहून ठेवण्याआधी कालिदासाने त्यातली काही लक्षणे आपल्या काव्यातून मांडलेली होती. आजचा विचार केला तर ब्युफ़े नामक संस्कृतीने आपल्यावर इतके आक्रमण केले आहे की त्यामुळे आपण खाताखाता चालतोय आणि मूर्ख ठरतोय हे आपल्या लक्षात येण्यापलिकडे गेलेले आहे. तसे सगळेच जुने विचार, आपलीच संस्कृती आपण माळ्यावर टाकून दिलेली आहे फ़क्त सणावारांपुरती त्यातली आपल्याला सोयीस्कर संस्कृती आपण बाहेर काढतो. घासून पुसून मिरवतो आणि आपले काम संपले की पुन्हा तिची रवानगी माळ्यावर करतो. आपल्या एकंदर समृद्ध आणि श्रीमंत संस्कृतीची ही कथा तर कालिदास तर बोलून चालून माणूसच. त्याला कोण विचारतो. आपण प्रगत झालोय, अवकाशात चाललोय, अत्यंत व्यस्त वगैरे झालोय, कालिदास तर कुठला कोण ?
सोयीचा पडतो, सोयीचा पडतो म्हणत ब्युफ़े आपण इतका स्वीकारलाय की श्राद्धाच्या जेवणाचाही आपण ब्युफ़े लावतोय ! ब्युफ़ेच्या समर्थनार्थ काही मुद्दे आणि त्याचा प्रतिवाद.
1. ब्युफ़ेमुळे आपल्याला पहिजे तेव्हढे अन्न आपले आपल्याला वाढून घेता येते आणि अपव्यय टळतो.
प्रतिवाद: जुन्या काळी पंक्तींमध्ये खूप आग्रह करकरून पदार्थ वाढले जायचेत आणि त्यामुळे काही पदार्थ वाढले असल्याच्या प्रमाणात खाता न आल्याने अन्न ताटात उरायचे आणि अपव्यय व्हायचा. हे अगदी खरे.
पण आज जर पंक्तीत भोजन केले आणि वाढप्याच्या आग्रहाला बळी न पडता त्याला आपल्याला हवे तेव्हढेच वाढायला सांगितले तरी सुद्धा अपव्यय टळू शकेल. आजकाल आग्रह करणारे जुन्यासारखे राहिले नाहीत आणि जुन्याकाळी आग्रहाला "नाही" म्हटल्यावर अपमान वाटून घेणारी माणसे राहिली नाहीत. त्यामुळे आज आपण आपल्याला हवे तेव्हढेच वाढायला पंक्तीतल्या वाढप्यांना सांगू शकतो आणि अपव्यय टाळू शकतो.
याउलट आजकाल ब्युफ़ेमध्ये लांबच लांब रांगेत उभे राहिल्यानंतर आपला नंबर त्या खाद्य काऊंटरवर लागल्यानंतर, या लांबच लांब रांगेत पुन्हा आपला नंबर कधी लागेल याची शाश्वती नसल्याने आपसूकच सगळी मंडळी जादाच पदार्थ आपल्या डिशमध्ये वाढून घेतात आणि भरमसाठ अन्न वाया जाते.
2. ब्युफ़ेमुळे पंक्तीं संपेपर्यंत ताटकळत बसावे लागत नाही. ब्युफ़े सोयीस्कर पडतो.
प्रतिवाद: आजकाल समजा 500 पाहुण्यांना आपण आपल्या समारंभाला निमंत्रित केले तर 500 पाहुण्यांचे ब्युफ़े जेवण संपेपर्यंत अडीच तास जातात हे माझे निरीक्षण आहे. या ऐवजी जर 100 - 100 पाहुण्यांच्या 5 पंक्ती केल्यात तर एका पंक्तीला अर्धा तास याप्रमाणे हिशेब धरला तर पंकीसुद्धा अडीच तासातच संपतील.
पंक्तीत जेवण्यामुळे सगळ्यांनाच जेवल्याचे खरे समाधान लाभते, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना. एका हातात तुडुंब भरलेली थाळी घेऊन इतरांच्या गर्दीतून आपली खुर्ची शोधत चालणे किंवा उभ्या उभ्या जेवणे हे ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायकच जाते आणि जेवणाचा आनंद घेता येत नाही.
अगदी ताट पाटाच्या पंक्ती अपेक्षित नाहीत. आजकाल जमिनीवर मांडी घालून बसणे भल्याभल्या तरूणांना जमत नाही तर ज्येष्ठ नागरिकांची तर गोष्टच वेगळी. आपण साधारण 25 वर्षांपासून आपले भारतीय पद्धतीचे संडास सोडून सर्वत्र कमोड सिस्टीम अंगीकारली त्याचे हे दुष्परिणाम. अर्थात हा निराळ्या लेखाचा विषय आहे. आज तरूणांनाही जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही हे वास्तव आहे त्यामुळे ताटा - पाटाच्या पंक्ती शक्य नाहीत पण टेबल खुर्च्यांवरच्या तर पंक्ती शक्य आहेत ना ? 500 पाहुण्यांच्या ब्युफ़ेसाठी जर जेवणाचे व्यवस्थापन सांभाळायला 20 माणसे लागत असतील तर 100 माणसांच्या 5 पंक्तींमध्ये वाढण्यासाठी 25 माणसे लागतील. पण एकंदर सर्वांना समाधान देणारे भोजन तर लाभेल.
पण आज आपण सारासार विचार करणारी आपली बुद्धी गमावून बसलेलो आहोत. कुठल्याही गोष्टीला आपल्याच फ़ायद्यासाठी पारखून, तावून सुलाखून मग ती गोष्ट स्वीकारण्याची प्रथा आपणच कालबाह्य केलेली आहे. मग ब्युफ़े सोयीचा पडतो, सोयीचा पडतो म्हणत आपण तो स्वीकारलेला आहे. मग तो कालिदास आपल्याला "मूर्ख" का ठरवेना. त्याचं काय जातय ? इथे कुणी येतय का पंक्ती वाढायला ? हे आपले खरे दुखणे आहे.
पूर्वी माणसे माणसांना जोडून होती. आज आपण अकारण एकमेकांपासून दूर गेलोय. शिष्टपणा करायला लागलोय. कुणाच्याही घरी न कळवता अत्यंत आत्मीयतेने जाणारा माणूस असभ्य ठरायला लागलाय. "अरे, फ़ोन करून आला असतास तर बरे" असे आपल्या तोंडावर आपल्याला ऐकवण्याइतके आपण "श्रूड" आणि "स्ट्रेट्फ़ॉरवर्ड"झालेलो आहोत. ज्याला भेटायला जातोय तो काही फ़ार गहन कार्यात गुंतलेला असतो असे नाही. तो सुद्धा बर्म्युडा - बनियन वर घरच्या सोफ़्यावर तंगड्या पसरून नुसता टी. व्ही. च पहात असतो पण "अरे, फ़ोन करून आला असतास तर बरे"
आजकाल लग्न कार्यात, घरच्या इतर समारंभांमध्ये आपल्या आप्तांकडून, मित्र सुहृदांकडून मेहेनतीच्या स्वरूपात मदत मागणे आपल्याला कमीपणाचे वाटायला लागले आहे. म्हणून मग पंक्ती कोण वाढणार ? आलेल्या पाहुण्यांकडे, त्यांच्या आदरसत्काराकडे लक्ष कोण देणार ? यासाठी घरची, जवळची विश्वासातली माणसे मिळत नाहीत. आपल्या वाढत्या समृद्धीच्या कैफ़ात आपण सगळेच जवळचे दूरचे केल्या्नंतर अशी माणसे मिळणार तरी कशी ? मग कॅटररच्या माणसांवर अवलंबून राहून त्यांना ब्युफ़ेचे कंत्राट दिले की आपण लग्नात मेकपचे थरच्या थर थापायला, वरातीत नाचायला आणि "संगीत" च्या कार्यक्रमात (हे एक नवीनच फ़ॅड पंजाबी संस्कृतीतून आपण अलिकडे स्वीकारलेय. सीमांतपूजन डाऊन मार्केट झालेय) कॅरोके लावून भसाड्या आवाजात गायला आणि कोरिओग्राफ़र बोलावून बसवलेल्या अत्यंत गचाळ नाचांवर नाचायला मोकळे. आजकाल लग्नात भटजी ठरवण्याआधी कोरिओग्राफ़र ठरवतात म्हणे. एव्हढा खर्च करूनही ऐनवेळी बेंगरूळ, पूर्णपणे को ओर्डिनेशन हरवलेला नाच निमंत्रितांना बघावा लागतो. खाल्ल्या अन्नाला (ब्युफ़ेला) स्मरायचे म्हणून कुणी तोंडावर टीका करीत नाहीत पण मनोमन आपली खिल्लीच उडवत असतात. हे आपल्यालाही माहिती असते पण त्या खिल्लीला आपल्या अंगाला लागू न देण्याइतकेही आपण निगरगट्ट झालेलो आहोत.
थोडक्यात काय ? कालिदासाला काय जातय "खाता खाता चालणारा मूर्ख" म्हणून संबोधायला ? काळाबरोबर बदलायला नको का ?
काळाबरोबर बदलता बदलता आपण इतके बदललोय की आपण कोण ? आपली मुळे कुठे रूजलेली आहेत ? चांगलं काय ? वाईट काय ? श्रेयस्कर काय ? शास्त्रीय काय ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधणे सोडून दिले आहे. कारण या प्रश्नांची खरी उत्तरे आपल्याला अस्वस्थ करणारी असतील, अंतर्मुख करणारी असतील आणि आपल्याला बदलणारी असतील हे आपल्याला मनोमन ठाऊक आहे. कोण एव्हढे सव्यापसव्य करतोय ? त्यापेक्षा "Eat, Drink and Be Merry" हे चार्वाक तत्वज्ञान आपल्याला आपल्या सोयीचे वाटायला लागले आहे.
2024 च्या माझ्या संकल्पांमध्ये "ब्युफ़ेत जेवण टाळणे" हा एक अत्यंत दृढ संकल्प सामील आहे. माझ्या ब्युफ़ेत न जेवण्याने ब्युफ़े थांबणार नाहीत आणि कोणालाही काहीही फ़रक पडणार नाही हे मला पक्के माहिती आहे पण माझ्या परीने मी या लाटेचा विरोध एव्हढाच करू शकतो, प्रवाहपतित होण्याचे नाकारू शकतो.
कुणी सांगावं
"मै अकेलाही चला था, जानिबे मंझिल मगर, लोग मिलते गएं, कारवां बनता गया"
असेही होऊ शकेल.
- कालिदासाने वर्णन केलेला "मूर्ख" होण्याचे नाकारलेला, समाजातल्या चुकीच्या प्रथांचा कायम विरोधक, त्यासाठी जगाच्या विरूद्ध जावे लागले तरी स्वीकारणारा, आणि आज नाही तर उद्या आपल्याला सगळ्या जगाची साथ लाभेल अशी आशा कायम बाळगणारा एक अत्यंत आशादायी नागरिक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.