Tuesday, October 29, 2024

दुर्मिळ ते काही - (८)

यापूर्वीचे लेख


दुर्मिळ ते काही ... (१)

दुर्मिळ ते काही ... (२)

दुर्मिळ ते काही ... (३)

दुर्मिळ ते काही ... (४)

दुर्मिळ ते काही ... (५)

दुर्मिळ ते काही ... (६)

दुर्मिळ ते काही ... (७)

प्रवासी गाड्यांना मालगाडीचे इंजिन लागल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. माझ्या आवडत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला तर बऱ्याचदा मालगाडीचे इंजिन लागल्याच्या घटना आहेत. नुकतेच आमच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल महाबळेश्वर, कोयना, कास पठार इथे गेली होती तेव्हाही त्यांच्या नागपूर ते सातारा या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या प्रवासात त्यांना WAG 9 या इंजिनाने नेले होते.





W = Wide Gauge (Broad Gauge)

A = AC traction Engine 

G = Goods train loco.


या मालगाडीच्या इंजीनांची भार खेचण्याची ताकद जास्त असते त्यामानाने त्यांचा वेग कमी असतो तर प्रवासी गाड्यांच्या इंजीनांना वेग जास्त असतो त्यामानाने त्यांच्यात भार खेचण्याची क्षमता कमी असते. ट्रॅक्शन मोटर्स चे सिरीज कॉम्बिनेशन आणि पेरॅलेल कॉम्बिनेशन ज्या अभियंत्यांनी शिकले असेल त्यांना हा टॉर्क् आणि स्पीड चा फंडा कळू शकेल.


२००८ मधल्या दक्षिण भारताच्या प्रवासात तिरुवनंतपुरम ते तिरूपती या प्रवासात शोरानूर स्थानकात हे अजब आणि भारतीय रेल्वेवर दिसणारे अतिशय दुर्मिळ चित्र दिसले.


दक्षिण रेल्वेच्या इरोड शेडचे WAP 4 हे प्रवासी इंजिन चक्क मालगाडी ओढत होते. 




W = Wide Gauge (Broad Gauge)

A = AC traction Engine 

P = Passenger (प्रवासी) train loco.


हा माझा फोटो माझ्या परवानगीशिवाय तेव्हा खूप रेल्वेफॅन्सच्या ग्रूप्सवर शेअर झाला होता इतकी ही दुर्मिळ घटना होती.


- नाविन्याचा चहाता, दुर्मिळाचा अभ्यासक रेल्वेफॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Monday, October 28, 2024

मरणाचे स्मरण असावे...

तसा विचार केला तर मानवी जीवनात मृत्यू हेच एक अंतिम आणि संपूर्ण सत्य उरते. आपण आपल्या जन्मापासून इतर अनेक आपापली सत्ये "मृत्यू" या एकाच सत्याभोवती रचित जात असतो. कधी त्याच्या भीतीने तर कधी त्यामुळेच त्याला ताठपणे सामोरे कसे जावे ? याचा विचार करताना. आणखी खोल विचार करताना लक्षात येत की आपल्या आयुष्यातले इतर तीन पुरुषार्थ "धर्म, अर्थ आणि काम" हे सुध्दा आपण अखेरचा जो पुरुषार्थ "मोक्ष" कसा साधला जाईल याच्या विचारातच करीत असतो. मृत्यू म्हणजेच खरेतर मोक्ष नाही. या जगतातल्या सगळ्या सगळ्या भौतिक गोष्टींमधली आपले सगळे ममत्व संपले आणि आपण आपल्या जीवनासकट जगातल्या सगळ्या गोष्टींकडे साक्षीभावाने जगायला शिकलो की मोक्षच. याउलट जीवन संपून गेले तरी या जगातल्या भौतिक गोष्टींमधली आपली तृष्णा संपलीच नाही तर तो मोक्ष नव्हे. पण या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांनाच मृत्यूचे जवळून दर्शन झाल्यावरच जाणवतात हे ही तितकेच सत्य आहे. म्हणून सुरूवातीलाच प्रतिपादन केले की मृत्यू हेच आपल्या सगळ्यांच्या जीवनातले एक अंतिम सत्य असते आणि आपण सगळेच आपले संपूर्ण जीवन याच एका सत्याच्या जाणिवेत जगत असतो.

- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.