Thursday, January 15, 2026

चिंतनक्षण - १०


 "परमार्थात दंभ आला की तो प्रपंचच झाला." - डॉ. सुहास पेठे काका


आपले जीवन अधिक उन्नत व्हावे ही सगळ्या मनुष्यमात्रांची इच्छा असते. आपले जीवन अधोगतीला जावे असे कुणालाही कधीच वाटत नाही. आणि वाटूही नये. उन्नतीकडे मन धावणे ही मनुष्यमात्रांची स्वाभाविक वृत्ती आहे.


जीवनात थोडे कडूगोड अनुभव घेतल्यानंतर मग आपल्या मनुष्यमात्रांच्या सर्वसामान्य आकलनाच्या पलिकडे एक शक्ती आहे आणि त्या शक्तीकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या तिच्या आराधनेने आपल्याला मिळू शकतात हे सुद्धा मनुष्यमात्रांना जाणवते. त्या शक्तीला ईश्वर, सदगुरू अशी अनेक नावे प्रत्येकजण आपापल्या अनुभवांती देतो आणि तिची उपासना करू लागतो.


उपासना करीत असताना त्या त्या मनुष्य मात्रांना निरनिराळे अनुभव येत असतात. हे अनुभव कधी आपल्या इंद्रियांना जाणवणारे असतात तर ते कधी इंद्रियांनी वर्णन करता न येण्याइतके परेंद्रिय असतात. त्या मनुष्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. त्या सिद्धी प्राप्त करून स्वतःच्या आणि इतरांच्याही आयुष्यात सुखानुभव प्राप्त होऊ शकतात हे सुद्धा त्या सिद्धीप्राप्त व्यक्तीच्या लक्षात येते. इथेच नेमका सांभाळण्याचा क्षण असतो.


आपण ही उपासना, ही साधना जर या जगातल्या गोष्टींसाठी सुरू केलेली असेल तर बरीच मंडळी या सिद्धीप्राप्तीनंतर थांबतात, सिद्धींना भुलतात, सिद्धीत गुंततात. जी ईश्वरी शक्ती आहे ती थोडी विचारी आहे. सगळ्यांनाच आपल्यापर्यंत पोहोचू न देता विविध टप्प्यांवर विविध परिक्षा पाहून, तावून सुलाखून निघालेल्या साधकांनाच केवळ आपल्या चरणाशी अक्षय्य प्रवेश देणारी आहे. म्हणून कवी म्हणतो


मुझे जो कराना था पथ पार

बिठाए उसपर भूत पिशाच्च

रचाए उसमे गहरे गर्न

और फ़िर करने आया जॉंच.


खरा साधक जर या सिद्धींना भुलला तर तो ती ईश्वरी शक्तीची परिक्षा नापास झाला असे समजले जाते. आपली उपासना, साधना ही या जगातल्या गोष्टींसाठी आहे ? की त्या सर्वशक्तीमान ईश्वरावरील प्रेमापोटी, त्याला जाणण्यापोटी आहे याचा विवेक सगळ्या साधकाने सदैव जागृत ठेवला पाहिजे. हा विवेक नसला की त्या साधकाचा सर्वसामान्य संसारी मनुष्य होतो. कितीही उंची गाठली तरी अंतिमतः परमार्थात त्याचे अधःपतनच होते. लौकिक आयुष्यातली सर्व सुखे त्याला व त्याच्या अनुयायांना मिळतात पण ज्या कार्यासाठी ही साधना आरंभिली होती ते कार्य मात्र अनेक जन्म दूर राहते.


परम आणि अर्थ हे दोन शब्द मिळून परमार्थ हा शब्द तयार होतो. परम म्हणजे सर्वोच्च आणि अर्थ म्हणजे प्राप्त करून घेण्याची वस्तू. मनुष्य जीवनात प्राप्त करून घेण्याची सर्वोच्च वस्तू म्हणजे परमार्थ. पण इथेच भलेभले चुकतात. परम वस्तू ऐवजी सहज पुरूषार्थाने प्राप्त होणा-या गोष्टी अशा व्यक्ती निवडतात आणि आपल्याच जीवनाला धन्य मानतात. 


एका गुरू आणि शिष्याची अशीच एक बोधकथा आहे. तो शिष्य बरीच साधना करून पाण्यावरून चालत जाण्याची सिद्धी प्राप्त करतो आणि एकेदिवशी आपल्या गुरूजींना सांगतो "गुरूजी, आता तुम्हाला ही आपल्या आश्रमासमोरील नदी ओलांडून पैलतीरावर जाण्यासाठी या नावेक-यांची मनधरणी करण्याची, त्यांना त्यांच्या नावेतून प्रवासासाठी प्रवासमूल्य देण्याची गरज नाही. अनेक वर्षांच्या साधनेनंतर मी पाण्यावरून चालण्याची सिद्धी प्राप्त केलेली आहे. मी तुम्हाला अतिशय भक्तीभावाने माझ्या खांद्यावरून रोज पैलतीरी नेऊन सोडेन आणि परतही घेऊन येईन."


ते गुरूजी खिन्नपणे हसतात आणि म्हणतात. "अरे वत्सा. ज्या गोष्टीचे लौकिक मूल्य केवळ काही रूपये आहे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तू आपल्या आयुष्यातली काही वर्षे आणि इतकी मोठी साधना खर्ची घातलीस ? ही सिद्धी तर मला ब-याच वर्षांपासून येते. पण ती वापरून मी माझी साधना खर्ची घातली नाही."


शिष्य खजील होतो आणि परमार्थात आजवरच्या साधनेचा बॅलन्स शून्य झालाय हे मनी उमजून नव्याने साधनेला लागतो.


आपण हा परमार्थ मार्ग का निवडलाय ? आपल्याला यातून नक्की काय साधायचे आहे ? हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला अगदी प्रांजळपणे विचारावे. जर या जगातल्या लौकिक गोष्टींसाठी, सोयी सुविधांसाठी, क्षणैक प्रसिद्धीसाठी आपण हा मार्ग निवडला असेल तर आपण परमेश्वरप्राप्तीच्या आपल्या अंतिम ध्येयाला कधीही पोहोचू शकणार नाही हे नक्की लक्षात ठेवावे. हा सगळा दंभ आहे. आणि परमार्थात हा दंभ म्हणजे संसारच आहे. या अविवेकी मार्गाने आपल्याला पुढले अनेक जन्म घेत रहावे लागतील आणि त्यातही आपली साधना, आपला अक्षय्यपदाचा शोध सुरूच ठेवावा लागेल हे पक्के लक्षात ठेवावे.


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष वद्य द्वादशी शके १९४७ दिनांक १५ / १ / २०२६


१५ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


No comments:

Post a Comment