"आठवणी नागपूरच्या" या फ़ेसबुक गटात मध्यंतरी एका सदगृहस्थांची सुरेश भट सभागृहातील त्यांनी बघितलेल्या एका नाटकाबद्दल पोस्ट वाचली. सुरेश भट सभागृह हे नाट्यसंस्कृतीला कसे योग्य नाही आणि आयोजकांचा एकूणच गलथानपणा यावर त्यांनी कोरडे ओढलेले होते. मला स्वतःला आजवर सुरेश भट सभागृहात जाण्याचा कधी योगच आलेला नाही त्यामुळे त्यावर तर मी भाष्य करणारच नाही पण नागपुरातल्या नाट्य संस्कृतीविषयी मला वाटलेले प्रांजळ चिंतन मी याठिकाणी प्रकट करू इच्छितो.
महाराष्ट्रातल्या इतर शहरांइतकेच नागपूर हे नाट्यप्रेमी शहर आहे. नागपूरने मराठी नाट्यभूमीला अनेक उत्तम नट, दिग्दर्शक, लेखक आणि इतर नाट्यकर्मी दिलेले आहेत. नाट्य वर्तुळातील रूसवेफ़ुगवे, हेवेदावे, एकमेकांची कापाकापी या सगळ्या गोष्टीही नागपूरमध्ये इतर शहरांसारख्याच, त्याच प्रमाणात होत असता. पण मुंबई शहराच्या विशालतेमुळे आणि त्यामुळे साहजिकच तिथल्या फ़ार संख्येने असलेल्या मराठी नाट्यरसिकांमुळे मुंबईत व्यावसायिक रंगभूमी बहरली तितकी ती नागपुरात बहरू शकली नाही. पुणे आणि नाशिक ही शहरे सुद्धा मुंबईवरून एका दिवसात जाऊन प्रयोग करून परतण्यासारखी असल्यामुळे तिथेही नागपूरच्या तुलनेत जास्त नाट्यप्रयोग होत असतात. मुंबईत यशस्वी ठरलेल्या व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकाचा प्रयोग नागपूरला होण्याचा योग वर्ष सहा महिन्यातून एकदाच होत असतो. त्या नाट्य संस्थेचा विदर्भ दौरा निघाला की मग अमरावती - नागपूर - चंद्रपूर असे प्रयोग करून ती नाट्यसंस्था परत मुंबईत जाते. या प्रवासासाठी एकूणच खर्च जास्त येत असतो आणि त्यामुळे त्या नाट्यसंस्थेचे व्यावसायिक गणित जुळावे म्हणून स्वाभाविकच इथल्या प्रयोगांची तिकीटे तुलनेने महाग असतात.
नागपूरकर नाट्यरसिक अशी वर्षातून सठीसामासी होणारी व्यावसायिक नाटके बघण्यासाठी हा जादा तिकीटांचा भार पण सहन करायला तयार असतो. "आपल्याला कुठे पुण्या मुंबईसारखी दर महिन्याला नाटके बघायला मिळतायत ? एखाद्या वेळेला जास्त तिकीट भरावे लागले तर भरू." हा त्याचा विशाल वैदर्भीय दृष्टीकोन असतो. पण इथे खरी गंमत सुरू होते.
नागपुरातल्या ज्या संस्थेने मुंबईतल्या नाट्य संस्थेशी संपर्क साधून या नाटकांचे आयोजन नागपुरात केलेले असते ती नाट्यसंस्था स्वतःसाठी पहिल्या ४ - ५ रांगांमधली तिकीटे राखून ठेवते. म्हणजे अगदी ५०० ते १००० रूपयांचे तिकीट काढून अशी चांगली नाटके बघायला जाणा-या नाट्यरसिकांना प्रिमीयम रांगांमध्ये बसून नाटक अनुभवण्याचा योग येत नाही. कुठेतरी आपण डावलले गेल्याची भावना मनात निर्माण होते. नागपुरातल्या दर्दी आणि स्वतःच्या खिशाला खार लावून नाट्यानुभव घेऊ इच्छिणा-या रसिकांवर हा अन्याय का ? हा मला न उलगडलेला प्रश्न आहे.
बरे या नाटकांचे आयोजक असलेली नागपुरातली नाट्यसंस्था ही प्रिमीयम तिकीटे आपल्याच सग्यासोय-यांना, दोस्तमित्रांना देत असते. त्या सगळ्यांनाच नाट्याविषयी आवड आणि तशी दृष्टी असेलच असे नाही. त्यामुळे हे नाट्यनिमंत्रण त्यातल्या अशा न नाट्य रसिकांना केवळ स्वतःचे स्टेटस, स्वतःची प्रौढी मिरवण्याची संधी वाटते आणि नाटक सुरू असताना पाळावयाचे अगदी साधे नियम या रसिकांनी न पाळल्यामुळे नाट्यसरिकांचा आणि नाट्य कलावंतांचाही अगदी रसभंग होतो.
मध्यंतरी काही वर्षांपूर्वी प्रशांत दामलेंचे एक विक्रमी नाटक असेच नागपूरला आलेले होते. वसंतराव देशपांडे सभागृहातच नाटक होते. बुकिंग सुरू झाल्याच्या अगदी पहिल्या दिवशी पहिल्या काही मिनीटांमध्ये तिकीट काढूनही आयोजक नाट्य संस्थेने पहिल्या ५ रांगा स्वतःकडे राखून ठेवल्याने चक्क ६ व्या रांगेतून सगळ्यात महाग तिकीटे काढून नाटक बघण्याच्या योगाला आम्ही सामोरे गेलो. ठीक आहे. हरकत नाही म्हणत आम्ही सकस नाट्यानुभवासाठी आणि आनंदासाठी सभागृहात प्रवेशकर्ते झालो.
त्या नाटकात पहिल्या अंकाच्या सुरूवातीला त्या नाटकाच्या नायिका कविता लाड - मेढेकर यांचे एक मोठ्ठे स्वगत आहे. रंगमंचावर नाटक सुरू न होता हे नाटक प्रेक्षागृहातच सुरू होते. प्रेक्षकांशी संवाद साधता साधता कविता लाड - मेढेकर या प्रेक्षकांमधूनच रंगमंचावर जातात आणि मग रंगमंचावर नाटक रंगते. त्या नाटकादरम्यान पहिल्या पाच रांगांमधल्या अशाच एका फ़ुकट पासावरच्या निमंत्रित न नाट्य रसिकाने आपले मूल तिथे आणले होते. आजकाल सार्वजनिक वावराची मुलांना शिस्त लावणे हे आईवडिलांचे कर्तव्य उरलेले नसल्याने ते मूल प्रेक्षागृहात उंडारतच होते. पण कविता लाड - मेढेकरांचा हा महत्वाचा प्रवेश सुरू झाल्यावर तर ते मूल थेट त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या अंगाला हात लाव, स्वतःकडे त्यांचे लक्ष वेधून घे असले प्रकार करू लागलेत. कविता लाड - मेढेकरांच्या चेहे-यावर "एक लगावून द्यावे कार्ट्याला" असे वाटत असल्याचे भाव होते. पण रंगमंचावरील कलावंतांच्या मर्यादा सांभाळत त्यांनी ते स्वगत आपले बेअरींग न घालवता पूर्ण केले. त्यादिवशी त्यांच्याविषयी, त्यांच्या अभिनयाविषयीचा आदर द्विगुणित झाला. पण नाट्यरसिकांना रसभंग झाला तो झालाच. त्या प्रसंगानंतरही त्या निमंत्रितांच्या रांगेतून रसभंग होईल असे अनेक प्रसंग घडलेत. प्रेक्षागृहात इतर प्रेक्षकांमधून असे रसभंग होणे आणि अगदी समोरच्या ५ रांगांमधून असे प्रकार होणे यात त्या रंगमंचावरच्या कलावंतांची काय परिस्थिती होते ? हे एक नाट्यकर्मी, नट म्हणून मी स्वतः अनुभवलेले आहे. "नागपूरकर रसिकांना नाटकाची आवडच, चवच नाही." हे मत घेऊन मुंबई - पुण्याची मंडळी आपापल्या गावात जातात हे नागपूरसाठी खरोखर लांछनास्पद आहे.
नागपूरकर नाट्यरसिक आणि नाट्यसंस्थांनी यावर सखोल विचार करावा ही अपेक्षा.
- नागपूर आणि वैदर्भिय नाट्य सृष्टीत नट, संगीत नियोजक, रंगमंचामागील कामगार, वृत्तपत्रातील नाट्यसमिक्षक आणि मुंबईत बारा वर्षे घालवून अनेक उत्तमोत्तम नाटके कुटुंबिय आणि मित्रमंडळींसह पहिल्या दोन रांगांमधून बघितलेला एक नाट्यरसिक, नाट्यकर्मी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
१८ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६











No comments:
Post a Comment