Showing posts with label Lessons. Show all posts
Showing posts with label Lessons. Show all posts

Tuesday, January 6, 2026

कोरोना सेमीफ़ायनल ? मग फ़ायनल ?

कोरोनाची महालाट येऊन गेली. त्या लाटेत समस्त मनुष्यजात हतबल झालेली बघितली. मनुष्यमात्रांचा स्वतःच्या क्षमतांवर आणि एकूणच या जगातल्या स्वतःच्या अस्तित्वावर असलेला अभिमान निसर्गाने चूर्ण करून टाकलेला पाहिला. मनुष्यमात्रांचा अनावश्यक हस्तक्षेप कमी झाल्याने निसर्ग पुन्हा मोहरलेला पाहिला. ऐन उन्हाळयात संध्याकाळी छान गारवा आणि कधीकधी एखाद्या पावसाचा शिरवा अनुभवला. असे वाटले की मनुष्यजात या लाटेपासून काहीतरी शिकेल. या जगात आपले अस्तित्व किती क्षुद्र आहे आणि निसर्गाच्या एका फ़टका-यासरशी तो आपल्याला कसा यःकश्चित करू शकतो यातून मनुष्यमात्र नम्र होतील. या लाटेचा धडा लक्षात ठेऊन यापुढे वागतील.


तसे तर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचे, भूकंपांचे, महापुराचे, महादुष्काळाचे फ़टके मनुष्यमात्रांना यापूर्वीही अनेकदा बसलेले होते. पण त्यांचा परिणाम स्थानिक होता. त्यांची व्याप्ती काहीशे किंवा काही हजार मनुष्यांपर्यंत मर्यादित होती. अगदी १०० वर्षांपूर्वी युरोपात आली होती तशी ब्युबॉनिक प्लेगची साथ म्हणा किंवा भारतासह उपखंडात १०० वर्षांपूर्वी आली होती तशी एन्फ़्लुएंझाची म्हणा त्या त्या लाटांचा प्रभाव हा स्थानिकच म्हणावा इतकी ही कोरोनाची लाट संपूर्ण विश्वव्यापी होती आणि तितकीच महाभयंकर होती. पण ही कोरोनाची लाट ओसरल्या ओसरल्याच सगळी मनुष्यजात दुप्पट आवेगाने उसळली. म्हणजे कोरोनाच्या काळात वाया गेलेली वर्षे दोन वर्षे जणू भरूनच काढायची आहेत इतक्या आवेगाने आपण आपापल्या कामांना आणि सृष्टीच्या विनाशाला लागलो. कोरोना काळातून काहीही न शिकता. ही आपल्या मनुष्याची फ़िनिक्स पक्षासारखी भरारी घेण्याची जिद्द म्हणावी की या समग्र चर आणि अचर सृष्टीचे आपणच मालक आहोत आणि या सृष्टीतल्या सगळ्या पक्षी प्राणीमात्रांनी केवळ मनुष्यांसाठीच जन्म घेतलाय ही व्यर्थ मग्रुरी म्हणावी हेच कळत नाही.


या काळात राजापासून रंकापर्यंत सगळी मंडळी घरी बसली होती. कोरोना काळात असे घरच्या वातावरणाचे सुख अनुभवायला आल्यानंतर कोरोनानंतर मंडळींनी आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये थोडेसे बदल करून आपापल्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवायला आणि ते दिवस काही अंशांनी पुन्हा जगायला सुरूवात करण्याचा विचार करायला हवा होता. पण बहुतांशी मंडळींचा हा हिशेब चुकला. असे वाटले होते की मनुष्यमात्र स्वतःचे, स्वतःचे अस्तित्वाचे, इतर सृष्टीशी असलेल्या त्याच्या नात्याचे मूल्यमापन करेल आणि सगळी मनुष्यजातच नम्र आणि विवेकी होईल. पण कोरोनात आपण शिकलो ते केवळ बिस्कीटांचे केक्स बनविणे आणि डालगोना कॉफ़ी करणे. (बाय द वे त्या डालगोना कॉफ़ीचा संदर्भ मी कोरोना काळापूर्वी कधीच ऐकला नव्हता आणि कोरोना काळानंतरही आजवर कधीच ऐकलेला अथवा वाचलेला नाही. तिला डालगोना कॉफ़ी ऐवजी कोरोना कॉफ़ी हे नाव अगदी शोभून दिसेल.)


असे वाटले होते की माणसे आपल्या आरोग्यविषयक सवयी बदलतील. या काळात आधुनिक वैद्यकाच्या अत्यंत उघड्या पडलेल्या मर्यादा लक्षात घेऊन स्वतःचे शरीर स्वतःच अंतर्यामी जाणून घेऊन स्वतःच्या शरीरासाठी नक्की कुठली जीवनशैली अंगीकारावी याचा गूढगर्भ विचार करतील. बदललेल्या जीवनशैलीद्वारे आपल्या रोगांवर नियंत्रण ठेवू शकतील. किमान स्वतःशी तरी संवाद साधतील आणि त्यातून होणा-या स्व आकलनाद्वारे आपल्या जीवनाचा एकूणच वेग नियंत्रित ठेवतील. आपल्या जीवनावर  आपल्याच मनातील विवेकाद्वारे सूक्ष्म लक्षही ठेवतील.


पण तसे काही व्यापक प्रमाणात होताना अनुभवायला आले नाही. एकूणच मनुष्यांमध्ये, त्यांच्या बेबंद, बेताल वागण्यामध्ये काही फ़रक पडलेला कुणालाही दिसला नाही. आता फ़क्त एव्हढीच भिती वाटतेय की निसर्गाने कोरोना लाटेला एक ट्रायल म्हणून आपल्याला सुधारण्यासाठी पाठवले होते. गल्ली क्रिकेटमध्ये मॅच सुरू होण्याआधी पहिला बॉल हा "ट्रायल" म्हणून टाकतात ना तसे. जर त्या निसर्गनामक शक्तीने पुढचा बॉल "रियल" टाकला तर आपल्या आपणच सर्वश्रेष्ठ या वृथा अभिमानाने वागणा-या आपल्या सगळ्यांच्या दांड्या किती दूर उडतील ? पुन्हा अनेक युगे या विश्व सृजनाची वाट बघावी लागेल. पुन्हा अनंत युगे त्या पिंपळपानावर स्वतःचाच अंगठा चोखत उमलणा-या त्या बाल मुकुंदाला जन्म घेण्याची आस लागेल.


- स्वतःसकट या विश्वाचे अत्यंत तटस्थ निरीक्षण करणारा एक निसर्गप्रेमी, ऋग्वेदी, प्राध्यापक वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



६ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६