Tuesday, October 4, 2022

तातचरण ते वंदनीय रे शततीर्थांचे धाम...

 "बाप" या व्यक्तित किती माया दडली आहे याचा प्रत्यय माझ्या वडीलांच्या बाबतीत मला फ़ार उशीरा आला. त्यांच्या घरी ते थोरले भाऊ. तशी त्यांच्याहून थोरली एक बहीण होती पण ती पण लाडाने त्यांना "दादा" म्हणायची. इतर लहान भावंडे त्यांना "दादा" म्हणायचेत इतकेच काय आमची आजीही त्यांना "दादा"च म्हणायची म्हणून आमच्या जन्मानंतर घरातले सगळे त्यांना "दादा" म्हणताहेत हे पाहिल्यावर आम्ही भावंडेही त्यांना "दादा"च म्हणायचोत. 



हातात कमालीची कलाकुसर असलेले, डोक्याने अत्यंत शार्प, तीक्ष्ण बुद्धीमत्तेचे वरदान (त्यांच्या आईकडून) घेऊन आलेले आणि अफ़ाट निर्मितीक्षम प्रतिभेचे आमचे दादा अत्यंत करारी स्वभावाचे होते. अर्थात त्यांच्या करारी स्वभावाचा आम्हा मुलांना कधी त्रास झाला नाही पण त्यांच्या स्वभावाची जरब मात्र आम्हा सगळ्यांना होती. आपण जी गोष्ट करतोय ती आपल्या दादांना आवडेल का ? या प्रश्नाने आम्हाला आमच्या तरूणपणात सहज उपलब्ध असणा-या आणि सहज मोह होणा-या अनेक निसरड्या पायवाटांना टाळायला भाग पाडले होते. किंबहुना त्या मोहवाटांनी आम्हाला कधी भूल घातलीच नाही. ज्या वाटेने जायचेच नाही तिचा पत्ता तरी का विचारा ? हा साधा सरळ विचार आम्हाला अनेक घसरणींपासून सावरत आला. आज कळतय त्यामागे आमच्या दादांच्या साध्या, सरळ जीवनाचा आदर्श आमच्यासमोर होता त्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्यात हे निर्णय अगदी सहजपणे घेता आले. मोहवाटांना सहज टाळता आले.

कराडला, नागपूरवरून ११०० किमी दूर शिक्षणासाठी जायला निघालो तेव्हा निघण्याच्या दिवशी आमच्या आईचा बांध फ़ुटला होता. घरात मी मोठा. पहिल्यांदाच इतक्या लांब शिक्षणासाठी जायला निघालो होतो. पण आमच्या दादांच्या मनात आतल्या आत किती बांध फ़ुटत असतील ? याची पुसटशी जाणीव तेव्हाही मला होती. जरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश घेतला असला त्यामुळे तिथली अगदी कमी फ़ी सोडली तरी तिथे राहण्या जेवण्याचा खर्च आणि नागपूरला येण्याजाण्याचा खर्च त्यांच्या तत्कालीन पगारानुसार ओढाताणीचाच होता. ती पैशांची ओढाताण, त्याची चिंता, सोळा वर्षे पूर्ण झाल्यामुळे नुकताच "मित्र"त्वाकडे आलेला पोटचा गोळा दूर जातोय पण मोकळेपणाने रडू शकत नाही याचा ताण, घरी दोन मुले आता वाढत्या वयाची आहेत त्यांच्याही पुढच्या शिक्षणाची चिंता आणि करारी स्वभाव असल्याने आतून हललो असलो तरी वरून न दाखवणे या सगळ्या तारेवरच्या कसरतीची पुसट कल्पना तेव्हा आली होती. मला घेऊन निघणा-या महाराष्ट्र एक्सप्रेसने प्लॅटफ़ॉर्म सोडला, वळणावरून गाडी दिसेनासी होईपर्यंत प्लॅटफ़ॉर्मवरचा दादांचा हात आणि गाडीतल्या दारात उभा असलेला माझा हात हलत होता. त्या हलणा-या हातामागचे काळीज किती हलत होते याची कल्पना येऊन आज, ३३ वर्षांनीही ही माझा थरकाप उडतो आहे.

दरवेळी आम्ही कराडवरून परतलो तरी कितीही उशीर झाला तरी आम्हाला घ्यायला आलेले दादा प्लॅटफ़ॉर्मवर थांबून असायचेत. आम्हाला पाहिल्यावर त्यांच्या चेह-यावर खूप आनंद दिसायचा. पण तो आनंद ते फ़ारसा शब्दांमध्ये व्यक्त करू शकायचे नाहीत. घरी गेल्यावर आई आम्हा "माहेरवाशिणीं"साठी आमच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ पिऊ घालायची, "वाळलास रे हॉस्टेलला" म्हणून तिच्या मनातले प्रेम प्रगट करायची, सुट्ट्या संपवून पुन्हा परत जाताना आमच्यासोबत आमचे आवडते भरपूर पदार्थ द्यायची. तिचे प्रेम व्यक्त व्हायचे पण आमच्या दादांचे आमच्याविषयीचे प्रेम, माया अव्यक्तच रहायची. "माझा मुलगा हॉस्टेलला राहिला तरी घरातले बाळबोध आणि नेमस्त संस्कार जपून राहतोय." हा आमच्याविषयीचा त्यांना वाटणारा अभिमान त्यांच्या मित्रांसोबतच्या संभाषणांमध्ये ब-याचदा व्यक्त होत असे. किंबहुना या बाबतीत त्यांची मान सदैव ताठ रहावी म्हणून आपण कायम दक्ष राहिले पाहिजे हा आमचा निर्धारच आमचे आजचे व्यक्तिमत्व घडवून गेला.

अंतिम वर्षाला असताना मी खूप स्पर्धांमध्ये भरपूर बक्षिसे जिंकलीत. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अगदी विद्यापीठस्तरावर सुद्धा. मध्ये दोन महिने असे गेलेत की दर रविवारी स्पर्धा व्हायची आणि त्यात पहिले बक्षीस मी पटकावून यायचो. काव्यवाचन, वक्तृत्व, वादविवाद, काव्यलेखन, नाट्य़. एकही क्षेत्र मी सोडले नाही. मिळालेल्या ढालींनी आणि बक्षीसांच्या ट्रॉफ़ीजनी माझी हॉस्टेलची खोली भरून गेलेली होती. ती सगळी बक्षिसे आणि कॉलेज संपल्यानंतर इतरही चंबुगबाळे आपण एकत्र नेऊ शकणार नाही या जाणीवेने मी कॉलेज संपण्यापूर्वी एप्रिल महिन्यात नागपूरला फ़क्त एका आठवड्याची सुट्टी घेऊन आलो होतो. येताना सगळी बक्षिसे घेऊन आलो होतो. सगळी बक्षिसे मावण्यासाठी चार मोठ्या सूटकेस बॅग्ज लागल्यात. त्या हॉस्टेलच्या मित्रांकडून जमवल्या होत्या आणि पाचवी माझी कपड्यालत्त्यांची बॅग. अशा विशालकाय सामानासह अस्मादिक नागपूर स्टेशनला उतरले. दादा मला घ्यायला आलेले होतेच. इतक्या बॅग्ज एकावेळी न्यायच्यात म्हणून मी स्टेशनवर ट्रॉली ठरवली. निर्गमदाराशी टीसीने आमची ट्रॉली अडवली. एका तिकीटात किती सामान नेऊ शकतो याचे काही नियम असतात आणि तेव्हा त्याची कल्पना मला नव्हती. त्यामुळे ११० रूपये कराड ते नागपूर तिकीट असण्याच्या काळात जवळपास ४४० रूपये दंड या अधिकच्या सामानापोटी दादांना भरावा लागला होता. मुलाच्या बक्षीसांचे कौतुक मनात दाटले असताना आपल्या पगाराचा जवळपास ३० % भाग असा दंडापोटी भरावा लागणे यात किती सुखाचे आणि किती दु:खाचे मिश्रण त्यांच्या मनात झाले असेल ? याची जाणीव आजही माझ्या पापण्या ओलावून जाते. आणि त्यात हे सुख दुःख मोकळेपणाने व्यक्त करण्याची मुभा नाही. त्या मनाला पडणारे पीळाचे घट्टे आजही माझ्या मनावर उमटलेले आहेत.

आश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी "नवमीचे दिवशी नऊ दिवसांचे पारणे हो, सप्तशती जप होम हवने सदभक्ती करूनी हो." अशी देवीची आर्ती आहे. आठ दिवसांच्या उपवासादि कडक साधनेनंतर नवमीला कृतकृत्य होऊन आपली साधना देवीच्या चरणी अर्पण करायची असते आणि उपवासाचे पारणे करायचे असते. तसेच आमच्यासाठी, आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या आयुष्याचीच कडक साधना केलेले आमचे दादा आजच्या, महानवमीच्याच दिवशी आपली साधना संपवून देवीचरणी विलीन झाले. दस-याच्या दिवशीच त्यांच्या आत्म्याने देहाचे सीमोल्लंघन केले. आमच्या आयुष्यात सावली कायम रहावी म्हणून स्वतःच्या आयुष्याच्या होम करणारा बाप आज २५ वर्षे झालीत तरी आम्हाला रडवून जातो. त्याकाळी त्यांच्या अंतरातली माया थोडीशीच कळली पण आज स्वतः "बाप" झाल्यावर त्यांच्या अंतरात त्याकाळी कायकाय झाले असेल ? आणि त्यांनी किती मायेने, धीराने आणि भावनांना लपवून त्या परिस्थितीला तोंड दिले असेल ह्याची कल्पना करून आमच्यातले "बाप" आजही स्तिमीत होतात, आतून हलून जातात आणि नतमस्तक होतात.

दादा, आज तुमचे २५ वे श्राद्ध. श्रद्धेने केलेले स्मरण म्हणजे श्राद्ध. आमच्या कुडीत प्राण आहे तोवर आम्ही दररोज तुमचे श्राद्ध करीत राहू. यावर्षी तर तिकडे तुम्हाला आईचापण सहवास मिळाला आहे. दोघेही मिळून तुमच्या मुलांच्या प्रगतीकडे डोळे भरून बघत असाल आणि आनंदित होत असाल आणि इकडे आमचे डोळे मात्र तुमच्या आठवणींनी वारंवार भरून येत आहेत.

- तुमच्या आठवणींनी कायम गहिवरलेला, कृतज्ञ राम प्रकाश किन्हीकर. (महानवमी शके १९४४, ०४/१०/२०२२)

3 comments:

  1. Dada ch ase karu shakle. Itar koni naste karu shakle.

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिहीले .पापण्या ओलावल्या ति.स्व दादांनाभावपूर्ण श्रद्धांजली


    ReplyDelete
  3. वडील ही काय चीज असते हे स्वतः बाप होऊन मुलांसाठी काळजी केल्या शिवाय कळत नाही. सर्व पित्याना विनम्र अभिवादन

    ReplyDelete