Friday, October 14, 2022

सौंदर्य आणि भाषा (भाषेचे सौंदर्य नव्हे)

 त्या रामबंधू मसालेच्या जाहिरातीत सौ. माधुरी श्रीराम नेने "चकली"त ला  "च" हा "चिवडया"तला "च" सारखा करतात. ते कानाला खूप खटकते. खरेतर "चकली"त ला  "च" चा उच्चार हा "चवी" तल्या "च" सारखा करायला हवा. बालपणापासून हे असेच ऐकायची सवय झालेली असल्याने ते कानाला खटकते. बरं, हे खटकणे दुस-या कुठल्या तरी सर्वसामान्य मॉडेलकडून खपून गेले असते पण माधुरी सारख्या आमच्या तारुण्यात आमच्या दिलाची धडकन वगैरे असलेल्या सौंदर्यवतीकडून हे असले ऐकणे म्हणजे शिक्षाच आहे. या चुकीच्या उच्चारणामुळे तिच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दलचा आदर उणावल्याची अनेक उदाहरणे वय वर्षे ४० ते ६० या तरूणांच्या गटात संपूर्ण भारतात आढळतील. 

यानिमित्ताने मला माझ्या मावसभावाचा एक किस्सा आठवला. साधारण १९९३-१९९४ मधला. तो किस्सा त्याच्याच शब्दात वाचायला मजा येईल. मी केलेले निवेदन मजा देणार नाही. मग वाचायचा हा किस्सा त्याच्याच शब्दात ?

"तेव्हा आम्ही नागपूर विद्यापीठ परिसरात (नागपूरच्या प्रचलित भाषेत "कॅम्पस") M. Sc. (Mathematics) ला शिकत होतो. महालातल्या नटराज सिनेमाजवळ आम्ही तेव्हा रहायचोत. दररोज सकाळी ९.१५ वाजता अयाचित मंदीरकवरून सुटणा-या अयाचित मंदीर - विद्यापीठ परिसर या शहर बसने नटराज सिनेमा या थांब्यावरून १० वाजेपर्यंत कॅम्पस ला पोहोचायचो. मी आणि माझा एक मित्र. आमचे दोघांचेही वय २२-२३. तारूण्याचे. नवनवीन स्वप्नांचे, स्वप्नाळू जीवनाचे वगैरे.


आणि आमच्या सुदैवाने एकेदिवशी एका ’सुबक ठेंगणी’ चा बसमध्ये प्रवेश झाला. म्हणजे आम्ही आमच्या नेहमीच्या "नटराज" थांब्यावरून बसमध्ये बसलो तेव्हा बसमध्ये "ती परी अस्मानीची" आधीपासूनच बसलेली होती. अयाचित मंदीरया सुरूवातीच्या थांब्यावरूनच ती बसलेली असणार हे उघड होते कारण नटराज हा दुसराच थांबा होता. शहर बस सेवेत अशी एखादी अप्रतिम सुंदर मुलगी दिसणे हे त्याकाळी (आणि आत्ताही) अप्रूपच होते. आमचा पहिला दिवस हा आनंदाचा आणि अप्रूपाचाच गेला.

दुस-या दिवशी नेहमीपेक्षा थोडे जास्तच तयार वगैरे होऊन, जरा जास्त पावडर वगैरे लावून (त्याकाळी ते डिओ, स्प्रे वगैरेंचे आजएव्हढे फ़ॅड नव्हते.) आम्ही पुन्हा आमच्या शहरबस थांब्यावर गेलोत. आज जरा जास्त उत्सुकता होती. नेहमीची बस भोसला वेद शाळेपासून येताना दिसल्यानंतर आम्हा दोघांच्याही हृदयाची धडधड एकमेकांना ऐकू जाईपर्यंत वाढली होती. एव्हढी वाट तर आम्ही आमच्या दहावीच्या निकालाचीही पाहिली नव्हती. 

बस आली आणि ती ’सुबक ठेंगणी’ बसमध्ये पुन्हा कालच्याच जागेवर बसलेली पाहून आमचे चेहेरे उजळलेत. आज तिच्यासोबत तिची एक मैत्रिण पण तिच्या बाजूला बसलेली होती. आम्ही दोघेही एक दोन रांगा सोडून त्या दोघींच्या मागील रांगांमध्ये बसलोत. त्या दोघीही बसच्या अखेरच्या थांब्यावर उतरल्यात. त्या दोघीही आपल्यासोबत "कॅम्पस" मधल्या कुठल्यातरी विद्याशाखेत विद्यार्थिनी आहेत हे कळले आणि उत्साह वाढला. त्या दिवशी दुपारी आम्ही आमचा "लंच" लवकर आटोपून "कॅम्पस" मधले विविध विभाग पायी पालथे घातलेत. ती ’सुबक ठेंगणी’ नेमक्या कुठल्या विभागात शिकते याची उत्सुकता. आमच्यासोबत शिकणा-या इतर सहाध्यायांना आम्ही आमच्या या ’सहली’ची अजिबात भनक लागू दिली नाही. उगाच कशाला आपल्याला असलेली स्पर्धा वाढवून घ्या ? हा उदात्त विचार त्यामागे, बाकी काही नाही.

मग हे रोजचेच सुरू झाले. शनिवार रविवार आम्हा दोघांनाही अजिबात करमायचे नाही. इतर दुनियेला सोमवार नकोसा वाटत असेल पण आमच्यासाठी सोमवारची सकाळ ही नवी धडधड, नवी उत्सुकता घेऊन यायची. एव्हाना त्या दोघींनाही आम्ही त्यांच्यासोबत "कॅम्पस" पर्यंत रोज असतोय हे कळले असावे. त्यांच्या आमच्याकडे बघण्याच्या नजरा सरावाच्या झाल्या होत्या. दोन आठवड्यानंतर आम्ही दोघेही घरून पंधरा मिनिटे लवकर निघून चक्क पायीपायी अयाचित मंदीरपर्यंत अर्धा किलोमीटर चालून जाऊन पहिल्या थांब्यापासून बस पकडायला लागलो होतो. आम्ही दोघांनीही ’नटराज’ ऐवजी पहिल्या थांब्यावरून बस पकडल्याची नोंद तिच्या नजरेने पहिल्याच दिवशी घेतली आणि तिने नोंद घेतल्याची नोंद आम्ही दोघांनीही घेतली. मनात नवनवीन कविता स्फ़ुरत होत्या. अचानक गझला आवडू लागल्या होत्या. आमच्या घरी आमचा आरशासमोरचा मुक्काम अचानक वाढला होता. दाढी करण्याची फ़्रिक्वेन्सी आठवड्यातून दोन ऐवजी दररोज झाली होती. दाढी झाल्यावर ब्रशला उरलेला साबणाचा फ़ेस स्नानाआधी संपूर्ण चेहे-याला फ़ासून आम्ही त्याच खर्चात फ़ेसपॅकचा आनंद आणि अनुभव घेत होतो. तिच्याशी सूत जुळले तर आपल्या घरून, तिच्या घरून कितपत विरोध, किती पाठिंबा वगैरे मिळेल या कल्पनेने आम्ही विचाराधीन होत होतो.

महिना, दीड महिन्याने एका शुभदिनी आम्ही आमच्यामधले हे अंतर कमी करण्याचे ठरवले. त्यादिवशी आम्ही त्या दोघी बसमध्ये ज्या आसनांवर बसल्या होत्या त्यांच्यापासून दोन रांगा सोडून न बसता अगदी त्यांच्या अगदी मागच्या आसनावर जागा पटकावली. बसमधल्या खिडकीतून येणारा मंद वारा, त्या मंद वा-यावर उडणारे तिचे नीट निगा राखलेले केस, तिच्या ड्रेसचा, त्यांच्या रंगांचा चॉईस हे सगळेच आम्हाला आवडणारे होते. तुम्हाला सांगतो अयाचित मंदीर ते "कॅम्पस" पर्यंतचा प्रवास हा स्वर्गसुखाचा प्रवास वाटे. वाटेत बसने हळूहळू जावे, प्रवास संपूच नये असे वाटे. माझ्यापेक्षा माझ्या मित्राची घालमेल जास्त होतेय हे माझ्या लक्षात आले आणि मी खिलाडूपणे त्याला वॉकओव्हर द्यायचे ठरवले. 


आमच्या या शहर बसच्या सहप्रवासाला दोन महिने झाले असावेत. एका शुभदिनी माझ्या मित्राने "आज ’आर या पा्र’ करायचेच" हा निर्णय घेतला. आज तिला ती ’कॅम्पस’ ला

उतरली की एकदाचे विचारूच हा त्याचा निर्धार झाला. मी सुद्धा "लढ बाप्पू लढ" म्हणत त्याला सक्रिय आणि बाह्य पाठिंबा दिला होता. त्यादिवशीही आमचा प्रवास अयाचित मंदीरपासून सुरू झाला. एक गोष्ट मात्र खरी ती आपल्या मैत्रिणीशी अगदी हळू आवाजात बोलत असे. इतक्या हळू की तिचा आवाज, तिचे बोलणे अगदी मागच्या आसनांवर बसलेल्या आम्हाला अगदी कुजबुजता ऐकू येत असे. बोलणे कळत नसले तरी तेव्हा तो कुजबुजता आवाजही आम्हाला खूप भावायचा. आजही प्रवासात त्या दोघींची तशीच कुजबूज सुरू होती आणि मागल्या आसनांवरचे आम्ही दोघे आपली धडधड तिला ऐकू जाऊ नये या प्रयत्नात. तिला आज विचारायचे असल्याने "काय होईल ?" या आशंकेने माझ्या मित्राची धडधड आज तर आणखीच वाढलेली होती. 

नरसिंग सिनेमा - गांधी गेट - शुक्रवार तलाव - आग्याराम देवी - कॉटन मार्केट - शनी मंदीर - आनंद टॉकीज - बर्डी असे थांबे मागे टाकत आमची बस अलंकार टॉकीज समोरून जाऊ लागली. आणि अलंकारला लागलेले "डर" सिनेमाचे भलेमोठे पोस्टर पाहून अचानक समोरच्या आसनांवरून चित्कारवजा आवाज आला "चालते का व संगू डर पायले ? चाल न व, जाऊ न दोघीबी." हे चित्कारवजा उदगार त्या ’सुबक ठेंगणी’ चेच होते हा धक्का पचवायला आम्हा दोघांनाही जरा वेळ लागला. ही टिपीकल व-हाडी भाषा आम्हाला नवीन नव्हती आम्ही ही भाषा चांगली बोलत असू पण आत्ता तिचे सौंदर्य आणि तिची भाषा यांचा असा व्यस्त संबंध पाहून आमचा प्रचंड हिरमोड झाला. आम्ही आमच्याच मनातल्या मनात तिच्या भाषेविषयी, बोलण्याविषयी बांधलेली स्वप्ने चुराडा झाली होती. त्यादिवशी पुढल्याच थांब्यावर, शंकरनगरला आम्ही उतरलोत. "कॅम्पस" पर्यंत गेलोच नाही. तिकडून परतणा-या बसने घरी आलोत. दुस-या दिवशीपासून "कॅम्पस" च्या आमच्या नेहमीच्या बसचा नाद सोडला. मुकाट थोडे आधी निघून रवीनगरपर्यंत जाऊन तिथून "कॅम्पस" पर्यंत पायीपायी जाऊ लागलोत. आमचा अव्यक्त प्रेमाचा मोठाच भंग झाल्याची भावना पुढली दोन वर्षे आमच्यासोबत राहिली. कॅम्पसच्या इतर अनेक आठवणी आहेत पण त्यातली ठळक लक्षात राहिलेली ही एक मोठीच आठवण."

- मराठीतल्या सर्व बोलीभाषांवर सारखेच प्रेम असणारा पण तरीही अनपेक्षित जागी अनपेक्षित भाषा ऐकल्यानंतर दचकणे म्हणजे काय होत असेल ? याचा असा (पर)अनुभव असलेला मराठी प्रेमी राम प्रकाश किन्हीकर.



1 comment: