Monday, October 5, 2026

अवघाची संसार की अवघ्यांचा संसार ?

जीवनात रस घेऊन जगावे, नीरस जगू नये, अगदी रसरशीतपणे जीवन जगावे हे जरी खरे असले तरी सगळ्या गोष्टीत अगदी अट्टाहासाने जीवन जगू नये. हे म्हणजे मुठीत वाळू घट्ट धरून बसण्यासारखे आहे. बोटांच्या बेचक्यांमधून वाळू कधी निसटून जाते ते कळत नाही. कळेकळेपर्यंत हातात काही उरत नाही. अट्टाहासाने जीवन जगत राहणार्‍यांची जीवनाअखेर अशीच अवस्था होते.


ना खुदाई मिला

ना विसाले सनम

ना इधरके रहे

ना उधरके रहे हम.


समर्थांच्या उक्तीप्रमाणे "आधी प्रपंच करावा नेटका" हे जरी खरे असले, आपला प्रपंच अगदी नेटकेपणाने, समर्थपणे, व्यवस्थित चालवणे अगदी आवश्यक  असले तरी स्वतःचा प्रपंच करताना आपल्या मुलाबाळांचाही, नातेवाईकांचा, अगदी शेजार्‍यापाजार्‍यांचाही प्रपंच अट्टाहासाने करणे म्हणजे जीवन जगणे नाही. हे बर्‍याच जणांना कळतच नाही आणि म्हणून लौकिकदृष्ट्या अत्यंत चांगल्या जगत असलेल्या अशा व्यक्ती आतल्या आत असमाधानी, अस्वस्थ असतात आणि मानवी जीवनाचे गमक न गवसता अतृप्ततेत आयुष्य  जगतात.


आपल्याला कसे जगायचे आहे ? सहज शांततेत, आनंदात की अकारण अट्टाहासाच्या धावपळीत ? हे प्रत्येकाने विचाराने विवेकाने ठरवायचे आहे. आम्हा लेखक, चिंतकांचे काम म्हणजे समाजाला समाजजीवनाचा आरसा दाखवणे हेच.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर माध्यान्हचिंतन आषाढ कृष्ण नवमी अविधवा नवमी शके १९४८, ०४/१०/२०२६. 

Friday, October 2, 2026

बापुकुटी: तरल मने असणा-यांसाठी एक विश्रामधाम




गांधीजी जिवंत असताना आणि त्यानंतरही या जागेवर असंख्य भाविकांनी अगदी मनापासून त्या एका वैश्विक शक्तीची प्रार्थना केली असेल.


त्या सगळ्या प्रार्थनांची स्पंदने अजूनही या जागेवर जाणवतात. एकतर तुकोबारायांच्या  "वृक्षवल्ली आम्हा सोयरी" या उक्तीनुसार असे अनेक सोयरे इतिहासाचे मूक  साक्षीदार बनून इथे आहेत. त्या असंख्य प्रार्थनांचे साक्षीदार इथली वृक्षराजी, कुटी, भूमी. यांनी ती सगळी स्पंदने ग्रहण केली असतील आणि इथे येणार्‍या मोकळ्या मनाच्या, निष्पाप जिवांच्या हृदयापर्यंत ती स्पंदने पोहोचवण्याचे काम इथली वृक्षराजी, कुटी, भूमी करत असतेच असते.


आपण फक्त तिथल्या वातावरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न तेवढा करायचा.



- असले निसर्गसन्निध जीवन जगायला मनापासून आवडणारा एक जीव, वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 


Wednesday, September 30, 2026

अहंकार

स्वतःच्या कर्तृत्वाच्या तामसी अहंकारापेक्षा मी इतरांपेक्षा कुणीतरी वेगळा आहे, मोठा आहे, ईश्वराचा लाडका आहे, सदगुरूंच्या जवळचा आहे हा आध्यात्मिक अहंकार जास्त घातक असतो.


काय होतं ? एखाद्या व्यक्तीला योग्यवेळी योग्य तो सत्पुरूष भेटतो, त्याला जीवनाचे योग्य ते मार्गदर्शन मिळते आणि त्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते. या प्रवासात सातत्य राखले तर त्या व्यक्तीला काही सिद्धींची प्राप्ती सुद्धा होते. दुस-याच्या मनातले ओळखणे, दुस-याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणून घेता येणे, बोललेले वाक्य खरे होणे वगैरे. या सिद्धी खरे तर भगवंताची कृपा असतात पण इथेच ती व्यक्ती फ़सण्याची शक्यता असते. ती व्यक्ती या सिद्धींना आपले साध्य मानते आणि त्यातच अडकून राहते. ही सिद्धी मला मिळाली म्हणजे मी कुणीतरी विशेष आहे अशी तिची भावना होते.



मग सुरू होते इतर जगाविषयी, जगातल्या इतर कमी नशिबवान व्यक्तींविषयी अनादराची भावना. तुच्छतेची भावना. आपण कुणीतरी विशेष आहोत, ईश्वराचे लाडके आहोत ह्या विशेषाधिकाराची भावना. इथेच त्या साधकाची आध्यात्मिक आणि आधिभौतिक घसरण सुरू होते. या क्षणैक सिद्धी लयाला जायला आणि त्या साधकाला आत्त्तापर्यंत गाठलेल्या साधनेच्या पायरीवरून पुन्हा तळाशी यायला वेळ लागत नाही. 


पुरातन काळी एखाद्याने फ़ार तपःश्चर्या सुरू केली आणि तो देवलोकात सामील होण्यास पात्र होऊ लागला की त्यात अडथळे आणण्यासाठी देवलोकच पुढाकार घ्यायचेत. त्या तपस्वीसमोर ही देवमंडळी प्रलोभनांचे अनेक निसरडे डोंगर उभे करीत असत. जो तपस्वी हे अनंत प्रलोभनांचे, जगातल्या मोठेपणांचे डोंगर पार करून आपली तपस्या, साधना कायम राखीत असे, तोच शेवटी देवपदाला जाऊन पोहोचत असे. तसे आजही होत आहे.


या जगात मिळणारा मान, मोठेपणा हा महत्वाचा ? की आपल्या सदगुरूने सांगितलेल्या मार्गावरून जाऊन शेवटी होणारी परमेश्वराची प्राप्ती महत्वाची ? हा विचार प्रत्येक ख-या साधकाने आपल्या मनाशी करून इथल्या प्रलोभनांमध्ये, मान मरातबात, वैभवात किती गुंतायचे हे निश्चित करायला हवे. कारण या मार्गाच्या सुंदरतेतच गुंतून राहिलोत तर अंतिम ध्येय कसे आणि कधी गाठणार ? प्राचार्य राम शेवाळकरांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "येथल्या खेळात पाची प्राण माझे गुंतलेले" अशीच अवस्था आपल्या सगळ्यांची राहणार. आणखी किती कोटी जन्मे ? कुणास ठाऊक ? म्हणून इथे न गुंतता, आपल्या साधनेचा, आजवर आपण गाठलेल्या आध्यात्मिक उंचीचा अहंकार अजिबात न बाळगता, त्याविषयी अजिबात कुठेही वाच्यता न करता आपला मार्ग क्रमित राहणे हाच खरा ध्येयापर्यंत निश्चित पोहोचण्याचा उपाय आहे.


- सायंचिंतन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर, भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १९४८, 30/09/2026


संगीत आणि नखरे

खरा संगीतप्रेमी तोच ज्याचे फ़ार नखरे नसतात. तसे पाहिले तर जे खरे नसतात तेच "न खरे" असतात, हो की नाही ? जाऊद्या. मुद्दा तो नाहीच. खरा संगीतप्रेमी कोण ?

सकाळी उठल्या उठल्या पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचा "शिवमत भैरव" ऐकल्यानंतर मोबाईलवर लगेचच पुढले गाणे जर कुमार शानूचे "संभाला है मैने"लागले आणि त्यानंतर "नैणो की मत माणियो" लागले तर ती सगळी गाणी ज्याला सारख्याच तीव्रतेने आवडू शकतात तो खरा संगीतप्रेमी.

- तानसेन नसला तरी चांगला कानसेन असलेला, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



Tuesday, September 29, 2026

जमा खर्चाच्या जुन्या नोंदी : केवळ आर्थिक महत्व ? छे, छे.

माझे तीर्थरूप दिवंगत श्री. प्रकाश जयराम किन्हीकर यांच्या १९९० च्या रोजमेळाच्या डायरीचे एक पान.



पेट्रोलः १३ रूपयांना १ लीटर + सिंगल आॅइल (लुना डबल प्लस होती घरी)

श्रीखंडः ३ पावकिलो २४ रूपयांना

२५ विड्याची पाने १ रूपयात. घरी पानाचे साग्रसंगीत तबक असायचेच. तंबाखू, चमन बहार सकट. 

तरीही आम्हा तिघा भावंडांपैकी एकालाही त्यातल्या सुपारीच्या खांडाचीही चव घ्याविशी वाटली नाही मग व्यसन तर फार दूर. तीर्थरूप दादा १९९७ साली गेल्यानंतर मग घरी कधीही पानदान म्हणून सजले नाही. ती शान त्यांच्यासोबतच इतिहासजमा झाली.

शेंगदाणे तेल ३४ रूपये किलो.

दूध ५ रूपये ५ पैसे लीटर.

तीर्थरूप दादांनी बरेच वर्षे हा रोजमेळ लिहीला. मी पण कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला असताना आणि त्यानंतरही बरेच वर्षे हा रोजचा खर्च लिहून ठेवत असे. सगळ्या डायर्‍या अजूनही शाबूत आहेत.

कधीतरी उघडून वाचल्या की तत्कालीन सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक जीवनाचे प्रतिबिंब त्यात दिसते. 

जमाखर्च म्हणजे केवळ पैशांचाच आरसा असतो असे नाही तर नात्यांचे, समाजाचे आणि इतर असंख्य गोष्टींचे ते प्रतिबिंब असते. फक्त आपल्याकडे पैशांपलीकडे वाचन करता येणारी नजर मात्र हवी. 


- जीवनाकडे जमा खर्चाच्या पलिकडे जाऊन कायम बघणारा, गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

Friday, September 25, 2026

दुर्मिळ ते काही - १०

सर्वसाधारणपणे, MSRTC च्या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये (Central Workshops) खालीलप्रमाणे बसेसची बांधणी केली जाते:


चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) : अशोक लेलँड (Ashok Leyland)


हिंगणा, नागपूर: टाटा (Tata)


दापोडी, पुणे: टाटा आणि अशोक लेलँड (दोन्ही)


मात्र, काही प्रसंगी चिकलठाणा कार्यशाळेत टाटा बसेस आणि अत्यंत दुर्मिळ घटना म्हणून नागपूर कार्यशाळेत अशोक लेलँड बसेसची बांधणी केली गेली आहे.


नागपूर कार्यशाळेत 'सेमी-लक्झरी' (निम आराम, ब्रॅंड नेम हिरकणी) बसेसची बांधणीही क्वचितच झाली आहे. (केवळ काही मोजक्या बसेस - जसे की MWY 98XX मालिका, MH 31 / 90XX मालिका आणि MH 40 / N 83XX ते 84XX मालिका).


त्यामुळे, नागपूर कार्यशाळेत अशोक लेलँड सेमी-लक्झरी बसची बांधणी होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे.



MH 40 / N 8381.


अशोक लेलँड 'चीता' (CHEETAH) मॉडेल.


पूर्वीची सेमी-लक्झरी बस.


आता 'परिवर्तन' (Parivartan) श्रेणीत रूपांतरित.



२ x २ आसन व्यवस्था.


ठाणे - २ आगार, ठाणे विभाग.


NH 4 (जुना मुंबई-पुणे महामार्ग) वर खोपोली आणि खंडाळा दरम्यान दिसली.




२५/१२/२०१२.


सकाळी ०८:४५ वाजता.

Thursday, September 24, 2026

एका आशावादी तरूणाच्या पत्रांचा बदललेला मायना

एकेकाळी पत्राच्या शेवटी समारोप करताना

"कळावे, लोभ आहेच तो वृद्धींगत व्हावा ही विनंती"

असे लिहीणारा एक स्वप्नाळू, आशावादी तरूण 


आता 

"कळावे, लोभ असावा. नसलाच तरी काही हरकत नाही. सर्वांना समाधानी ठेवणे ही जबाबदारी फ़क्त ईश्वराची आहे, आमच्यासारख्या मनुष्यांची नाही."

हे लिहू लागला की त्यावर या जगाच्या जगरहाटीच्या कृत्यांनी त्याच्या स्वप्नाळूपणाला किती जमिनीवर आणून ठेवलेय याची जाणीव होते. 


तरीही जगाच्या चांगुलपणावर जो पुन्हा विश्वास ठेवतो आणि त्याच जुन्या उर्मीने जगाला सामोरे जातो त्याच हट्टी तरूणाचा आदर्शवाद, आशावाद आणि स्वप्ने खरी ठरतात हे सांगायला कुणाही ज्योतिष्याची गरज नसते.


- प्रभातचिंतन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. भाद्रपद शुक्ल त्रयोदशी, शके १९४८, दिनांक २४/९/२०२६




बेसनाच्या वड्या, तिळगुळाच्या वड्या, किलवर, इस्पिक, बदाम, चौकट वगैरे

आजकाल कुणाच्या घरी बेसनाच्या वड्या होतात की नाही ? (बेसनाच्या लाडूंसारख्या बेसनाच्या वड्या)


आणि संक्रांतीत तिळगुळाच्या वड्या होतात की नाही ? की तीळ आणि साखरेच्या कडक वड्याच खाता ?


बरं, तीळगुळाच्या वड्यांमध्ये इस्पिक, किलवर, चौकट आणि बदामाच्या आकाराच्या वड्या अजूनही होतात का हो ?


बाकी वैदर्भिय भाषेत किलवरला "चिडी" आणि चौकटला "वीट" म्हणणारी मंडळी आहेत का हो अजून ? की आपल्या "तथाकथित" इंग्रजी शाळांमध्ये घातलेल्या मुलांच्या नादाने "spade, hearts " च सुरू झाले आहे सगळ्यांचे ?


- बालपणीच्या मजेच्या खूप छानछान आठवणी असणारा, कुमार राम प्रकाश किन्हीकर.




Wednesday, September 23, 2026

आजारी पडलेले रामोबा आणि त्यांचे चिंतन

ऋतूबदल होत असताना संधीकाळात दरवेळी आजारी पडणे हे निसर्गाशी अती तादात्म्य पावल्याचे लक्षण आहे असे मी मानतो आणि दरवेळी आजारपणाची नवी मजा घेतो.


त्यानिमित्ताने स्वतःचा स्वतःच्याच शरीराशी संवाद होतो. आपले शरीर समजून घ्यायला मदत होते हा माझा प्रामाणिक अनुभव आहे.

तसाही मी निसर्गवेडा माणूस आहे. निसर्गाशी जास्तीत जास्त तादात्म्य पावून जगण्याचा माझा अगदी जागरूक प्रयत्न असतो.

सेवानिवृत्तीनंतरचे जीवन ऋषीमुनींसारखे जास्तीत जास्त वनांमध्ये, sustainable आणि self sufficient काढणे हे माझे स्वप्न आहे. वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम हे सुध्दा आनंददायक जगण्याचे टप्पेच आहेत ही माझी दृढ धारणा आहे. 


महाविद्यालयात असताना पुलंच्या "तुझे आहे तुजपाशी" त आचार्यांची भूमिका केली होती. त्यातल काकाजींच आचार्यांना उद्देशून असलेल एक वाक्य मनाला खूप भावल होत. (तस ते नाटकच खूप मनाला भावलेल होत. मराठी सारस्वतातल्या सर्वश्रेष्ठ कलाकृती कुठल्या ? या प्रश्नाला पहिल्या क्रमांकावर मी या नाटकाचे नाव घेईन.)


त्यात काकाजी आचार्यांना म्हणतात, "ऋषीमुनींनी अस सारखसारख समाजामध्ये वावरायला येऊ नये. पोरंसोरं दाढी ओढतात मग." 

तसच वानप्रस्थात संसारी जनांमध्ये फार लुडबुड न करता "उरलो (कुणी विचारल तरच) उपदेशापुरता" अशी भूमिका घेत 

आणि 


संन्यासामध्ये जनसंपर्क कमीत कमी करून स्वचिंतन करीत मृत्यूला शांतपणे सामोरे जाणे यात जीवनाची कृतार्थता आहे असे मानणार्‍या वर्गातला मी आहे. (किती non competetive आणि बुरसटलेले विचार आहेत, नाही ?)


म्हणून ऋतूबदलात नेहेमी आजारी पडत असलो तरी "पडू आजारी, मौज हीच वाटे भारी" अशी माझी अवस्था होऊन जाते.

आजारपणाला निसर्गचक्राचाच एक भाग मानल तर ते पण एक आनंददायी अनुभव ठरेल, नाही ?


— ईशावास्योपनिषदांमध्ये म्हटल्याप्रमाणे १०० - १२५ वर्षे मस्त, मुक्त आणि कृतार्थ जगण्याची जिजीविषा बाळगणारा रामोबा.



Tuesday, September 22, 2026

गाडीतली प्ले लिस्ट, Gen X, Gen Z वगैरे

गाडीने लांबचे प्रवास करताना स्वतःच्या आवडीची प्ले लिस्ट ऐकत ऐकत जाणे यासारखा दुसरा आनंद नाही तुम्हाला सांगतो. बालपणापासूनच "मी कार घेतली तर..." या माझ्या स्वप्नात ही अशी आवडीची गाणी ऐकत जाण्याची फँटसी अपरिहार्यपणे आणि अविभाज्यपणे होतीच.


पण लेकरू आता मोठे झालेय. जेन झी. त्यांची प्रतिक्रिया असते की "बाबा, ही गाणी ऐकत प्रवास करताना अगदी ट्रकच्या केबिनमधून क्लीनर म्हणून प्रवास केल्यासारखा फील येतोय." लगेच वेडेवाकडे चेहरे करणे सुरू होते. ही प्लेलिस्ट लवकर संपावी अशी प्रार्थना देवाकडे सुरू होते.





पण बाप आखिर बाप होता है. ही साडेतीन तासांची प्लेलिस्ट संपेपर्यंत प्रवासच संपतो आणि मुक्कामाचे ठिकाण येते.


Gen X = 1 : Gen Z = 0




Monday, September 21, 2026

भाव तसा देव

18/09/2026

आज सकाळपासूनच (तसे तर काल संध्याकाळपासूनच) मनात अपार खिन्नता दाटून आली होती. तशी ती गेल्या ४ वर्षांपासून या दिवसांमध्ये मनात येतेच.

१९७७ पासून आमच्याकडे असलेल्या महालक्ष्म्यांच्या सणात, ज्येष्ठा कनिष्ठा गौरी व्रतात  गेली ४ वर्षे सुपत्नी नसल्याने खंड पडलाय. या दिवसांमध्ये मनात अपार उत्साह असायचा, कामे करण्याचा उरक असायचा, घरात दिवाळीपेक्षाही अधिक उत्साहाचे वातावरण असायचे.

पण पहिल्यांदा वडील गेलेत, मग आई आणि त्यानंतर लगेचच सुपत्नीही अचानक निवर्तली. या उत्सवाचा इतका मोठा उरक आणि तयारी बघता आम्हा बापलेकांकडून हे होणे शक्य नव्हते. गेली चार वर्षे या पारंपारिक व्रतात खंड पडलाय. पण अजूनही हे दिवस आलेत की जुन्या अनेक आठवणींचे मोहोळ भूतकाळातून उठते आणि वर्तमानात आपल्या मनाला चावून चावून त्याच्या चिंधड्या चिंधड्या करते. कालपासून अशाच विध्द, खिन्न मनाने मी वावरत होतो.

आज घरी स्वयंपाक सुध्दा करावासा वाटेना. मग घराजवळच असलेल्या आणि साधे, ताजे आणि शुध्द मराठी थाळी पोटभर देणार्‍या भोजनालयात जाऊन बसलो. तिथे कायम गर्दी असल्याने एकच टेबल अनेकविध जणांसह वाटून घ्यावे लागते.

मी जिथे बसलो त्याच टेबलवर माझ्या अगदी समोर एक माझ्यापेक्षा कमी वयाचा तरूण बसला होता. किडकिडीत शरीरयष्टीचा, खोल गेलेल्या डोळ्यांचा, साधेसे कपडे अंगावर असलेला. 

माझे ताट येईपर्यंत मी बाजूच्या काचेतून बाहेर रस्त्यावर नजर टाकत होतो. एक अॅक्टीव्हा त्या भोजनालयासमोर थांबली. सुरेख, सुंदर नवरा बायको आत आलेत. नवरा माझ्याशेजारी आणि अगदी नवर्‍यासमोर त्याची सुपत्नी बसून जेवणथाळीची वाट बघू लागलेत. दोघांचेही कपडे अगदी टापटिपीचे होते. त्या स्त्री च्या अंगाखांद्यावर भरपूर दागिनेही होते. एकंदर सुखवस्तू, संपन्न जोडपे होते.

आमच्या थाळ्या पुढ्यात आल्यात तोवर बाहेर एक क्रेटा येऊन थांबली आणि त्यातून अत्यंत साध्या, थोड्या मळलेल्या, चुरगळलेल्या कपड्यांतले, क्रेटातल्या प्रवाशांना विजोड वाटावे असे एक जोडपे उतरले. भोजनालय अगदी फुल्ल असल्याने ते दोघेही आमच्याच टेबलवर येऊन बसलेत. माझ्याशेजारच्या छान कपड्यातल्या पुरूषाशेजारी तो पुरूष आणि त्याच्या अगदी समोर त्याची ती बायको. आमचे टेबल आता पूर्णपणे भरले. सगळ्यांच्या थाळ्या पटकन आल्यात. हातातोंडाची लढाई लढत पटापट सगळ्यांचे भोजन सुरू झाले. भोजन नेहेमीप्रमाणेच साधे, ताजे आणि सुग्रास होते.

माझे भोजन आटोपले, सोबतच दोन्हीही जोडप्यांची भोजने आटोपली आम्ही हात धुवायला उठलोत सुध्दा, पण माझ्यासमोर बसलेल्या तरूणाच्या जेवणाचे मध्यंतर सुध्दा व्हायचे होते हे माझ्या लक्षात आले. जेवत असताना दुसर्‍याच्या ताटाकडे, खाण्याकडे मुद्दाम लक्ष देऊ नये असा एक सभ्यतेचा संकेत आहे पण मुद्दाम लक्ष न देतासुध्दा मला आपोआप जाणवले की समोरच्या तरूणाच्या शरीरयष्टीच्या मानाने त्याचे खाणे अवाढव्यच आहे.

हात तोंड धुवायला मी उठलो आणि आत्तापर्यंत माझ्या लक्षात न आलेली एक गोष्ट चटकन माझ्या दृष्टीस पडली आणि माझे डोळे पाणावले. त्या तरूणाचे उदर त्याच्या शरीरयष्टीच्या मानाने भलतेच लांब होते. मनाच्या अगदी खोल खोल आत जाणवले की अरे आपण ज्याच्या अथर्वशीर्षाची कायम सहस्रावर्तने करतो तो लंबोदर तर हाच. आपल्या कल्पनेतल्या रूपातच देवाने आपल्याला दर्शन द्यावे हा आपला अट्टाहासच आपल्याला अनेक अलौकिक अनुभवांपासून वंचित ठेवतो.

अंतर्मनात ही जाणीव झाल्यासरशी मी त्या दोन जोडप्यांकडे पुन्हा बघितले आणि जाणवले की अॅक्टीव्हावरून आलेले सुंदर कपड्यातले, दागदागिने घातलेले जोडपे म्हणजे ज्यांच्या सहस्रनामांचा उच्चार आपण रोज करतो ते भगवान विष्णु आणि पुत्र नसला तरी आपला अत्यंत लाडक्या असलेल्या लंबोदराच्या बाजूला बसून भोजन करणारी श्रीविष्णुंची सुपत्नी महालक्ष्मी आणि साध्या कपड्यातले पण क्रेटातून आलेले अत्यंत श्रीमंत जोडपे म्हणजे प्रत्यक्ष माता पार्वती आणि पिता श्रीशंकर. मनोमन नमस्कार केला. मनातली खिन्नता पार पळाली होती. वर्षानुवर्षे ज्यांची आराधना केली, ज्यांची सूक्ते गायली, सहस्रनामजप केलेत, अभिषेक केलेत, ज्यांना नैवेद्य दाखवून भोजनाचे निमंत्रण केले ती सगळी मंडळी आज माझ्या मनाच्या खिन्न अवस्थेत अगदी अनपेक्षितपणे माझ्या पंक्तीला जेवलेली होती. माझ्या मनातला भाव तसा होता. आणि भाव तसा देव यावर माझी पूर्ण श्रध्दा आहे.

वाॅशबेसिनवर चूळ भरल्यानंतर हात तोंड पुसायला खिशातला रूमाल काढला खरा पण हाता तोंडाच्या ओलाव्यापेक्षा तो माझ्या डोळ्यांमधून वाहणार्‍या अश्रूंच्या ओलाव्यानेच जास्त भिजला. 

झाले, संपलेच ना आता इथले काम. मनुष्यजन्माला येऊन आता काय मिळवायचे राहिलेय इथे ? आपण आजवर करीत असलेल्या अनुष्ठानांची, व्रतांची, उपोषणांची सांगता आज झाली. आपण भरून पावलोत.

- "भाव तसा देव" यावर दृढ विश्वास असलेला आणि देव कुठल्याही रूपात आपली अनुभूती मनुष्यमात्रांना देऊ शकतो याचा अनुभव घेतलेला एक कृतकृत्य जीव, राम. 



Friday, September 18, 2026

महालक्ष्म्या (ज्येष्ठा कनिष्ठा गौरी) पूजन २०२०

* ज्येष्ठा कनिष्ठा गौरींनी आगमनाआधी पाहिलेली तन, मन आणि धनाची परीक्षा. मर्यादित संसाधनांची उपलब्धता.

* आजच्या दिवशीचा नेमका मुहूर्त साधून स्वयंपाक व इतर सेवा पुरवणार्‍यांनी वाढवलेले अव्वाच्या सव्वा दर.

* "मारे 'शेफ, शेफ' म्हणून मिरवत असतोस ना, मग दाखव आता तुझी शेफगिरी" हा गौराई कडून आलेला आणि हृदयाला जाणवलेला संदेश.

* "चला, आता या परीक्षेला बसून उत्तीर्ण होऊनच दाखवू" हे स्वीकारलेले आव्हान.

* सहधर्मचारिणीच्या साथीने पहाटे पासूनच अक्षरशः कंबर कसून (उत्तरीय कंबरेला बांधून) स्वयंपाकघरात केलेला प्रवेश.




* आपल्या आईला आज आपल्याकडूनच ही सेवा करून घ्यायची आहे या जाणीवेने आलेला अमाप उत्साह.

* पती पत्नींच्या सहा, साडेसहा तासांच्या मेहेनतीनंतर तयार झालेला प्रसाद.





* प्रसाद ग्रहण करणार्‍या अभ्यागतांनी त्यावर उत्तम अभिप्राय नोंदवल्यानंतर, डोळ्यांच्या कडांशी दडवलेले अश्रू.

।। सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा।। 

Thursday, September 17, 2026

महालक्ष्म्यांचा (ज्येष्ठा कनिष्ठा गौरी) सण आणि पाहुणवेडे आम्ही

आम्ही सगळेच पाहुणवेडे आहोत. बालपणापासूनच घरी आमचे दादामामा, मामी किंवा इतर मावशी, काका काकूमंडळी येणार असली की आमचा दसरा दिवाळीच सुरू व्हायची. या मंडळींबरोबर "नागपूर बससेवेचा गाईड" या नात्याने नागपूरात मनसोक्त भटकता यायचे. खूप निरनिराळ्या आप्त, संबंधी मंडळींची गाठभेट व्हायची. शाळा, क्लासेस बुडविण्याची आॅफिशियल परवानगी घरून असायची. मग काय ? आनंदा नाही तोटा.

महालक्ष्म्या घरी असताना मला अगदी तसेच वाटायला लागते. आपले कोणी तरी ज्येष्ठ, प्रेमळ नातेवाईक आपल्या घरी त्यांच्या मुलाबाळांसह मुक्कामाला आलेले आहेत. त्यांच्यासाठी काय करू ? आणि काय नको ? अशी मनाची लहान मुलासारखी अवस्था होऊन जाते.



 आपण एवढ्यातच एक नवीन सूक्त शिकलोय. ते त्यांना म्हणून दाखवूयात ? की परवा आपण एक नवीन भजन शिकलोय. तेच म्हणूयात ? मनाची अशी अवस्था. स्वतःला ३० वर्षे लहान करून टाकणारी.

जाणते झालो. जबाबदार्‍या अचानक अंगावर पडायला लागल्यात. पती झालो, बाप झालो. मुले मोठी व्हायला लागलीत. आजही अशा महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी अचानक मुलांच्या वयाचे आपण आपल्यालाच दिसू लागतो. आपल्या वयाचे आपले वडील असतानाचा काळ जाणवू लागतो. अक्षरशः १२५ स्केअर फुटांच्या, मातीच्या भिंती  असलेल्या जुन्या घरात महालक्ष्म्या करताना त्यांची कल्पकता, त्यांचे कष्ट प्रकर्षाने जाणवतात.  बरे प्रसादासाठी निमंत्रित मंडळीही भरपूर. सगळी प्रेमाची मंडळी गैरसोयी सोसून, ऊनपाऊस झेलत सहभागी व्हायची. ते दिवसही प्रकर्षाने डोळ्यात दाटून येतात.

"आठवणी दाटून आलेल्या,

ओल्या पापण्यांत जपाव्यात.

आणि डोळ्यांतील पाण्यानेच,

आठवणींची पाने उलटावीत."

।। बारम्मा ।।

।। भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ।।

- कृपाभिलाषी (शरीराने वाढलेला असला तरी मनाने अजूनही शालेय वयाचा असलेला) चि. राम प्रकाश किन्हीकर,

कुहीकर वाडा, पोथी गल्ली, इतवारी, नागपूर.

Sunday, September 13, 2026

मोदक : एक चिंतन

खरेतर मोदक या शब्दाचा अर्थच मुळात मोद (आनंद) तयार करणारा (मोद+क) आहे. त्यामुळे मोदकावर चिंतन काय करायचे ? हा माझ्यासमोर असलेला मोठा "क्रायसिस" होता तुम्हाला सांगतो. आमच्या देशस्थी पद्धतीप्रमाणे कमीतकमी अर्धा डझन मोदक खाल्ल्यानंतर मोदक या विषयावरच काय पण आपण आज काय जेवलोय याचे चिंतन करण्याइतपत सुद्धा आपला मेंदू सक्रिय नसतो. आपसूकच डोळे मिटू लागतात आणि आपण निद्रादेवीच्या राज्यात सामील होऊन जातो. दुपारची अशी फ़र्मास वामकुक्षी वगैरे झाली की उठल्यानंतर दुपारच्या चहाआधी पुन्हा एखाद दोन मोदक फ़स्त होतातच. त्यात कसले आलेय चिंतन ? पण दरवर्षी गणपती उत्सव जवळ आला की "मोदक उकडीचे की तळणीचे ?" या विषयावर फ़ेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अनेक वाद झडतात, कारण दोन्हीही बाजूंकडून भांडी वाजो लागतात. तसे "भांडी वाजो लागली" हे युध्द आणि पाकक्रिया या दोहोंचे सामायिक लक्षण आहे. आणि आपल्यालाही असे चिंतन वगैरे करण्याची सुरसुरी वगैरे येते.


ही भांडणे इतक्या टोकाला जातात की तिस-या महायुद्धाचे कारण "मोदक: उकडीचे की तळणाचे ?" हे होऊ शकेल अशी भिती वाटू लागते.


उकडीच्या मोदकांचे "मोम्मोज" शी असलेले साधर्म्य लक्षात आणून देऊन, चीन, मंगोलिया, जपान, फिलीपाईन्स आदि पूर्वेकडच्या, अती पूर्वेकडच्या देशांचा पाठिंबा घ्यायला, दामले ओक लेले फडकें, त्या त्या राष्ट्रांना इ मेल लिहीण्याचा सपाटा लावतात.


इकडे तळणासाठी "तेल" लागत असल्याने आपण मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांचा पाठिंबा घ्यायला हवा अशी चर्चा देशपांडे, कुळकर्णी, पांडे यांच्यात होते. पण मुळातच बेशिस्त असल्याने कुणाच्या इ मेल वरून पत्र पाठवून पाठिंबा मागायचाय यावर एकमत झालेले नसते. आणि याच बेशिस्त पणामुळे महायुध्द व्हायचे टळते बहुतेक. Blessing in disguise.


पुढल्या गणेशोत्सवापर्यंत या विषयावर शांतता असते आणि गणेशोत्सव जवळ आला की पुन्हा युद्धाचे ढग जमू लागतातच. त्यात आमच्यासारखे काही जन्माने देशस्थ पण कर्माने आणि सवयींने कोकणस्थ असलेले लोक दोन्हीही प्रकारचे मोदक खायला मिळावेत म्हणून त्या आगीत तेल ओतत असतातच.


तर एकूण विषय काय ? मोदक खाल्ल्यानंतर पाच मिनीटांमध्ये झोप येणे आणि त्या झोपेचा परिणाम म्हणून आपलेही उदर आपल्या दैवतासारखे विशाल होणे आणि त्यात अधिकाधिक मोदक सामावले जाण्याची शक्ती येणे हेच या मोदक आख्यानाचे मोदकावरील वादांचे अंतिम फ़लित. मग ते मोदक उकडीचे असोत की तळणाचे असोत.


- खाद्यपदार्थोदभव युध्द तज्ञ (कशी वाटली मी मलाच दिलेली पदवी ?), उत्तमोत्तम शाकपाक प्रेमी, (थोडक्यात 'खादाडखाऊ') आणि आप्त मित्रांचा "मोदक" (मोद = आनंद निर्माण करणारा), रामभाऊ. 


(ही पोस्ट सुध्दा गणेशोत्सवाच्या काळात अनेक व्हॉटसअॅप गृप्सवर फिरणार, यात शंका नाही.)  

Tuesday, September 8, 2026

वेदमूर्ती ?

आजकाल स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घेणाचे हे एक नवीनच फ़ॅड गुरूजींमधे सध्या आलेय.

श्रीगणपत्यथर्वशीर्ष, पुरूषसूक्त, श्रीसूक्त, एकादष्णी आणि पवमान येव्हढेच येत असले तरी स्वतःच स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घ्यायचे. एकेका वेदाचे भेद किती आहेत ? शाखा किती आहेत ? याची साधी मोजणी सुध्दा येत नसलेल्या व्यक्ती "वेदमूर्ती" ?

श्रीगुरूचरित्र नियमीतपणे वाचणा-यांनी तरी त्यातल्या सव्विसाव्या अध्यायाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन स्वतःला वेद कळतात असा दावा करू नये.

- अशावेळी नेमके पुल आठवणारा 

"चड्डी फाटली तर लेकाला टीप मारता येत नाही, नीट. आणि हा ठिगळ्या टेलर स्वतःला "प्रोफेसर" म्हणवून घेतो ? "

पुल भक्त, प्रा वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Monday, September 7, 2026

आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही

पु. ल. देशपांड्यांनी वर्णन केल्याप्रमाणे आम्ही म्हणजे रोज दुपारचा आणि (संध्याकाळचाही) ताकभात उरकून हातावरचे पाणी वाळायच्या आत निद्रादेवीच्या राज्यात सामील होणारे वीर.  पत्रिकेच्या सुखस्थानी गुरू असला की असली सुखे लाभतात असे म्हणतात.  टचवुड. ते जाऊ देत बापडे.


रोज कामधंद्यावर दुपारच्या वामकुक्षीची होणारी पंचाईत सुट्यांच्या दिवशी भरून काढण्याच्या दृष्टीने आमची कायम वाटचाल असते. कधीकधी दुपारी साधारण चांगल्या चार पाच  घटिका वामकुक्षी पार पाडल्यानंतर उठताना घड्याळाकडे बघून क्षणभर अपराधी वाटतही, नाही असे नाही.


पण लगेच पाडगावकरांची "खरं सांगतो यात काही पाप नाही.आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही" या ओळी आठवतात. आणि आपणच आपल्या मनाची समजूत घालतो. आणि या तात्पुरत्या अपराधगंडातून बाहेर येतो.


- खरेतर "आयत्यावेळी आपल्या समर्थनार्थ अगदी convincing अशी योग्य ती वाक्ये, योग्य त्या कवितांच्या ओळी सुचणे यासारखे खरे सुख नाही" असे मानणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Saturday, September 5, 2026

कालचे पालकत्व आणि आजचे पालकत्व : नक्की काय बरोबर ?

साधं LHS = RHS सांगितल्यावर जणू काही या कार्ट्याने 

e = mc(square) चा शोध लावल्यासारखे अत्यंत लाडात येऊन "ब्रेक ले ले यार पार्टनर" म्हणणारी आई,

आणि 

मुलगी डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करकरून साधं आपलं डोळ्यांच्या अंतर्रचनेचा अभ्यास करत असताना "ब्रेक ले ले यार पार्टनर" म्हणणारे वडील

आमच्यावेळी का नव्हते हो ? आमच्याकाळी आम्हाला पुस्तकाच्या पहिल्या पानावरील प्रतिज्ञेपासून मधल्या सगळ्या पानांवरील धडे, त्यातल्या solved assignments (आणि त्यातले unsolved questions पण त्यांच्या उत्तरांसकट) ते शेवटल्या पानांवरच्या धड्यांपर्यंत जवळपास पाठ असूनसुध्दा (आणि आपला कार्टा असला एकपाठी आहे हे जन्मदात्यांना माहिती असूनसुध्दा), "मेल्या, परीक्षेआधी असा उंडारण्याऐवजी पुन्हा एकदा सगळे पुस्तकातले धडे वाचून काढलेत तर डोळे फुटणार आहेत का तुझे ?" अशी दटावणी आमच्या जन्मदात्यांकडून मिळायची.

पण त्यामुळेच आम्ही tough झालोत. छोट्याशा स्तुतीने हुरळून स्वतःविषयी अवास्तव कल्पना करून न घेता (आणि त्यामुळेच छोट्याशा अपयशाने खचून जाऊन स्वतःचे devaluation करून न घेता) Right Evaluation करायला शिकलोत.

जाहिरातवाले काय हो ? काय वाट्टेल ते सांगतात. पण नुसते LHS = RHS सांगितल्यावर गणितातली मोठ्ठी theory मांडल्याच्या पराक्रमाचे कौतुक करून तुम्ही पाल्याचे over evaluation करुन त्याच्याच पुढल्या आयुष्यात प्रश्न निर्माण करू शकता हे सुजाण पालकांना कळायला हवे.

- "जुने ते सोने" मानणारा आणि तरीही आधुनिक शिक्षणपध्दतीतून उत्तम गोष्टी घेऊन त्यांचे कसोशीने अवलंबन करत असणारा, आपला right evaluator, पंतोजी, रामशास्त्री किन्हीकर. 

Thursday, September 3, 2026

जन्मस्थानं न खलु विमलम

चंद्रपूर माझे जन्मस्थान. आजोळ चंद्रपूर. बालपणापासून माझ्या प्रेमाची सगळी माणसे चंद्रपुरात. परम पूजनीय बापुराव महाराजांच्या परिवारात सामील झाल्यावर परम पूजनीय मायबाई महाराजांच्या मुखातून परम पूजनीय महाराजांचे चंद्रपुरातले वास्तव्य आणि त्यांना चंद्रपूर विषयी वाटणारी आत्मीयता धन्य कानांनी ऐकली होती. 


"चंद्रपूर म्हणजे सत्पुरूषांचे माहेरघर" ही महाराजांची उक्ती मनोमन पटलीही होती.


कृष्णस्वरूप श्री हयग्रीव महाराज.


प.पू. हयग्रीव महाराज समाधी

योगायोगाने पत्नीही चंद्रपूरचीच लाभली. त्यामुळे चंद्रपूरच्या फ़ेर्‍या नियमीत व्हायला लागल्यात. 


चंद्रपूरची भेट म्हणजे ग्रामदैवत महाकाली, जागृत आणि उपेक्षित असलेले तीर्थक्षेत्र अंचलेश्वर, महाराजांचे कुलदैवत असलेली एकवीरा जगदंबा, कृष्णस्वरूप असलेले योगी परम पूजनीय हयग्रीव महाराज, परम पूजनीय निकालस महाराज आणि ज्यामुळे आमचा धार्मिक पिंड घडला ते आजोळी असलेले श्रीलक्ष्मीनृसिंहाचे जागृत देवस्थान यांचे दर्शन अत्यावश्यकच. या सगळ्या ठिकाणांना भेटी देऊन मनाला परम समाधान लाभते. 


चंद्रपुरात घडून येत असलेले बदल पाहून मन सुखावले. या शहराची स्वच्छतेकडे होणारी वाटचाल स्पृहणीय. त्याचबरोबर अंचलेश्वर देवस्थानाकडे होणारे दुर्लक्ष आणि परम पूजनीय हयग्रीव महाराजांच्या समाधीची उपेक्षित अवस्था पाहून मन खिन्न होत असते. भाविकांनी या ठिकाणांकडे आस्थेने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.




श्रीक्षेत्र अंचलेश्वर तटबंदी.



श्रीक्षेत्र अंचलेश्वर मंदीर परिसरातली पुरातन बावडी.






आई महाकाली जगदंबा भवानी

Wednesday, September 2, 2026

दहिहंडीचे बदलते स्वरूप आणि आपल्या सगळ्यांचीच परिस्थितीशरणता

पुण्यातल्या गणेशोत्सवातल्या ध्वनीप्रदूषणाबद्दल आणि त्या उत्सवाच्या एकंदरच बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल समस्त पुणेकरांनी आवाज उठवायला सुरूवात केलेली ही एक अतिशय चांगली बाब गेल्या आठवड्यात घडलेली आहे. मला वाटतं, सगळ्या मराठी माणसांनी दहिहंडीच्या बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल सुद्धा असाच आवाज उठवायला हवा. पण अनेक वर्षांपासून आपण दहिहंडीचे सध्याचे स्वरूप पाहत आल्याने आपण सर्वांनी हेच स्वरूप वास्तव म्हणून स्वीकारलेय की काय ? अशी शंका मला येते. किंवा सध्याचे दहिहंडीचे स्वरूप बरोबर नाही पण आपण काहीही करू शकत नाही अशी परिस्थितीशरणता आपल्यात आलेली आहे की काय ? अशीही शंका माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात येते.


अनेक वर्षांपासून मुंबई ठाण्यात चाललेल्या या अतिशय फालतू चालिरीतीचे खूळ हळूहळू, गेल्या दहा पंधरा वर्षात चाणाक्ष आणि संतुलित समजल्या जाणार्‍या वैदर्भिय जनतेच्या मनात भरवून देण्याची टूम इथल्याही काही काही दिखाऊ, शोबाज राजकारण्यांमधे येत चाललेली पाहून मी अस्वस्थ झालो होतो. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा न ऐकता, "तो एक खेळ आहे" वगैरे भंकस युक्तिवाद करत, सोयीस्कर पळवाट काढून, सर्वपक्षीय राजकारण्यांनी ती दहिहंडी आपल्या बोकांडी मारलेलीच आहे. 


ती जास्तीत जास्त थरांची जीवघेणी स्पर्धा, त्यात ही असली जत्रा भरवून, आपला मोठेपणा दाखवण्यासाठी, भव्य मंच वगैरे उभारून, आपलीच तरूण मतदार मंडळी जखमी होताना, मरताना निर्विकारपणे पाहणारे, मध्ययुगीन राजे सरदारांच्या मानसिकतेचे आपले राजकारणी आणि कोट्यावधी रूपयांच्या लालसेला भुलून आपला आणि आपल्या सहकार्‍यांचा जीव पणाला लावणारी ती भुरटी दहीहंडी मंडळे. हे लोण विदर्भात कधीही नकोय.



विदर्भात गोकुळाष्टमी म्हणजे घरोघरी कान्होबाची मूर्ती आणून अष्टमीच्या रात्री तिची पूजा, रात्री भजन, मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचा आनंदोत्सव आणि दुस-या दिवशी घरच्या आणि आसपासच्या बाळगोपाळांसाठी छोटीशी दहीहंडी असे स्वरूप असते. दुस-या दिवशी इष्टमित्र, सोयरे धायरे यांच्यासह भोजन करणे असा आनंदी उत्सव असतो.



दहीहंडी उत्सवाचा आत्मा हा असा फार निराळा आहे रे. हे बाजारू स्वरूप म्हणजे दहीहंडी नाही. श्रीमदभागवतात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सामान्य कुटुंबातील सोबत्यांना, सवंगड्यांना दूध दुभत्याचा लाभ व्हावा, त्यांचीही शरीरे पुष्ट व्हावीत, त्यांना पुरेसे पोषण मिळावे म्हणून दहीदुभत्याच्या हंड्या फ़ोडल्या होत्या. आणि त्यातल्या मेव्याचे वाटप सगळ्यांना केले होते. वनात गुरे राखयाला जाताना श्रीमंत गरीब सगळ्यांनी एकत्र शिदोरी खाताना कुठलीही उच्च नीच भावना मनात सवंगड्यांपैकी कुणाच्याही मनात राहू नये, गरीबाला आपली शिदोरी सगळ्यांसोबत वाटून खाल्ल्याचे समाधान मिळावे म्हणून सगळ्यांच्या शिदोरीचा एकत्र गोपालकाला करून खाल्ला होता. ती भावना आजसुद्धा आपण रोजच्या व्यवहारात जोपासली तर आपल्या आपल्या सामाजिक वर्तुळात नकळतपणे किती समरसता आपोआप साधली जाईल याचा विचार आपण करायला हवा. तो खरा गोपालकाला, तो त्या श्रीकृष्णाचा संदेश. आज दहीहंडी साजरी करताना, गोपालकाला खाताना किती जणांना हे आठवते ?


बाय द वे, उंची वाढवण्यासाठी म्हणून ती क्रेनला बांधलेली दहीहंडी पाहून सूटबूट, गॉगल आणि मोजे घालून देवपूजेला बसणार्‍या बावळट माणसाला पाहिल्यासारख वाटत.

 

काहीही थेरं!


- दरवर्षी उत्सवात दहीहंडी फोडल्यावर त्या हंडीच्या आतले अस्सल सायीचे गोड दही मटकावणारा आणि दोन्ही मुठी भरून गोपालकाला खाणारा, पुराणकालीन कृष्णसखा, पैंदाराम.


Sunday, August 30, 2026

सगुण उपासनेतला साधा सरळ आणि तरीही लोभसवाणा भक्तीभाव

श्रीमदभागवतकारांनी 

"सच्चिदानंदरूपाय, विश्वोत्पत्यादि हेतवे. तापत्रयविनाशाय, श्रीकृष्णाय वयं नुमो." 

असे वर्णन त्या पूर्णब्रम्हाचे केलेले आहे. त्या वर्णनातला 'वयम' हा शब्द श्रीकृष्ण उपासनेचे सामूहिक स्वरूप विशद करतो खरे, पण त्याचबरोबर आपली वैयक्तिक उपासना  आपले त्या परब्रम्हाशी वैयक्तिक नाते दृढ करून भगवंताशी आपले अनुसंधान कायम टिकवायला मदत करील हे नक्की.

आपले आजोबा, पणजोबा नियमितपणे भगवंताची पूजा करीत असत आणि पूजा करताना देवांच्या त्या मूर्तींशी त्यांचा संवादही चालत असे. बर्‍याचदा कृतक कोपाने आपले आजोबा लंगड्या बाळकृष्णाला रागावतही असत. ("राहा न रे सरळ. सारखा गलंडून जातो बेटा" अशी त्या लंगड्या बाळकृष्णाला अभिषेक करता करता तंबी);

किंवा एखाद्या नवसाच्या पूर्ततेसाठी आपली आजी देवाला धमकी देतानाही आपण बघितलेले आहे ("पहा बरं, माझे हे काम झाले नाही ना तर मी उद्यापासून चढत्या उतरत्या वातींचा नेम करणारच नाही" वगैरे)

शांतिब्रम्ह एकनाथ महाराजांच्या "लंगडा ग लंगडा" या गवळणीतही हाच सख्यभाव, देव माझा पुत्र आहे हा भाव जाणवतो.

सगुण उपासनेतून त्या निर्गुण निराकार परब्रम्हाशी अनुसंधान साधणारी ही साधी सरळ  भक्तमंडळी. त्यांचा भक्तीभाव अतिशय लोभसवाणा आणि अनुकरणीय. 



आमच्या गुरूमहाराजांकडे झालेल्या एका श्रीमदभागवतसप्ताहात आम्हा पती पत्नींना "नंदबाबा आणि यशोदामैय्या" होण्याचा योग लाभला. प्रत्यक्ष परब्रम्हाचे मायबाप होण्याचा अतिशय आनंददायक हा प्रसंग.आम्ही खूप मनापासून तो प्रसंग उपभोगला. 

श्री. विवेकजी घळसासींनी आपल्या प्रवचनांमधून सांगितल्याप्रमाणे दररोज सकाळी आपल्या सगळ्यांच्याच घरी (आणि मनातही) असाच नंदोत्सव साजरा व्हावा, दररोज आपण सगळे नंदबाबा, यशोदामैय्या व्हावेत, तो परमात्मा आपल्या घरातील मुलांच्या, नातवंडांच्या रूपाने दररोज आपल्याला भेटावा ही त्याच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.

- आपला नंदबाबा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.