Monday, December 21, 2020

Luxuries and essentials : In life as well as in relationships

 रविवार म्हणजे स्वयंपाकघरातले पुढील आठवडाभराचे नियोजन करून भाजी वगैरे आणण्याचा वार.

आजही तसेच सर्वेक्षण वगैरे झाले. भाज्यांची यादीही झाली. पण का कोण जाणे ?आज आम्हा दोघांनाही घराबाहेर पडण्याचा प्रचंड कंटाळा आलेला होता.
मग आठवड्याभराचे पुनर्नियोजन सुरू झाले. आणि यशस्वीपणे पूर्ण झालेही. भाज्यांऐवजी कुठल्याकुठल्या उसळी, पिठले, फोडणीचे वरण, झुणका असा वैकल्पिक मेन्यूही मान्य झाला.
मग लक्षात आले. लाॅकडाऊन काळात ज्या काही चांगल्या गोष्टी सगळ्यांच्या जीवनात घडल्या असतील त्यातली ही एक गोष्ट. आपण Essentials आणि Luxuries मध्ये फरक ओळखून त्याप्रमाणे वागायला लागलोत.
"Luxuries म्हणजेच Essentials" असे मानणार्या आणि १९९० नंतर भारतात फोफावलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेत Luxury आणि Essentials मध्ये असा फरक करू पाहणारी माणसे म्हणजे अर्थव्यवस्थेला धोकाच की !
मनात विचार केला की ही theory नातेसंबंधांमध्येही तितकीच खरी आहे. नातेसंबंधांमध्ये आपण अनेक luxuries सहजच बाळगत असतो. पण अशा एखाद्या बेहिशेबी नातेसंबंध जोडत राहणार्या एखाद्याला जर त्यातला luxuries आणि essentials चा फरक कळून त्याने त्यात कंजुषी सुरू केली तरीही धोकादायक परिस्थिती निर्माण होईल, नाही ?

- मामेभावाच्या मामेभावाशी आणि आत्येभावाच्या आत्येभावाशी अजूनही जिव्हाळ्याचे संबंध असलेला
Luxurious नातेवाईक राम.



Sunday, December 20, 2020

एका अनपेक्षित फ़ोटोची आठवण.

 ४/१२/२००८ :

तिरूवनंतपुरमवरून हैद्राबादला जाणारी ७२२९ डाऊन शबरी एक्सप्रेस.
एका बाजूला निळा हिरवा सह्यगिरी पर्वत, त्यात असणार्या बोगद्यांमधून निघणारी, मध्येच लागणार्या सरोवरांच्या काठावरून धावणारी गाडी.
छोट्या कायल मधे थांबलेल्या हाऊसबोटी, केरळमधली विविध आकर्षक रंगात रंगवलेली रेल्वेमार्गालगतची घरे, सर्वत्र वाढलेल्या, उंच वृक्षांना लपेटून मिर्यांचे घोसचे घोस लटकणार्या वेली हे केरळमधले सुंदर दृश्यमिश्रण बघण्यासाठी तिरूवनंतपुरमवरून सकाळी ७.०० वाजता निघणार्या या शबरी एक्सप्रेसने तिरूपतीकडे निघालेले आमचे कुटुंब. तिरूपती रात्री ९.३० च्या आसपास येणार.
गाडी पूर्ण रिकामी. आमच्या वातानुकूल द्विस्तरीय शयनयानात (मराठीतः सेकंड एसी) आम्हा तिघांव्यतिरिक्त फक्त दोन प्रवासी.
गाडीचा एसी खूप बोचरा. इतक्या सुंदर प्रदेशात प्रवास करताना अंगावर ब्लँकेट पांघरून झोपी जाण्यासारखी अरसिकता नाही.
पँट्री कारमधून वेळोवेळी येणार्या चॅग्रॅम, स्सूप वगैरे गरम पेयांचा अनमान न करता आस्वाद घेणे सुरू.
तरीही बोचरी थंडी कमी होण्याचे नाव घेत नाही तेव्हा पुढल्या बर्थवर बसलेल्या लेकीने अचानक टिपलेली मुद्रा.



अंगावर पाणी पडले की मांजरे (पक्षीः बोक्या) अशीच भेदरलेली मुद्रा करीत असावीत.
- बोक्या सातबंडे सारखाच खोडकर राम शंभरबंडे.

Saturday, December 19, 2020

दुर्मिळ ते काही - ३

 बालपणापासून टाटा आणि लेलॅण्डच्या बसेसने प्रवास केला. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात आलेल्या जर्मन मर्सिडीज , स्वीडीश कंपन्यांच्या व्हॉल्वो आणि स्कॅनियाच्या आरामदायक बसेसनेही प्रवास केला. त्यातच चिनी व्हॉल्वो म्हणून आलेल्या आणि मुंबईत बेस्टच्या ताफ़्यात असलेल्या किंगलॉंग सेरीटाच्या बसेसनेही भरपूर प्रवास केला. 


आता आता आयशरने ही बसेस बांधायला सुरूवात केलीय. आपल्या महाराष्ट्र एस टी ने आपल्या काही अगदी थोड्या बसेस आयशर चेसीसवर बांधल्यासुद्धा. स्वराज माझदा (SML), ऑल्विन निस्सान, डीसीएम टोयोटा या कंपन्यांच्या मिनी बसेसनेही प्रवास झालाय.


पण मॅन कंपनीच्या बसेसने प्रवास करण्याचा योग कधीच आला नाही. तशा भारतात या बसेस फ़ारच कमी. नेहेमीच आपल्या स्पर्धकांपेक्षा काहीतरी वेगळे देणा-या गोव्याच्या पॉलो ट्रॅव्हल्सने त्यांच्या ताफ़्यात काही मॅन कंपनीच्या बसेस आणल्यात आणि सीटर स्लीपर बसेस बांधल्या. 





इंदूर ते पणजी (मार्गे धुळे - मालेगाव - मनमाड - शिर्डी - अहमदनगर - पुणे - कोल्हापूर) या मार्गावर धावणारी मॅन कंपनीची स्लीपर सीटर बस. एक दुर्मिळ योग कॅमे-यात कैद झाला.


- स्वतःच्या साक्षगंधाच्या वेळीही, व-हाडाच्या बसने वधूच्या गावाला जाताना मुद्दामहून ड्रायव्हर केबिनमध्ये बसून गेलेला एकमात्र बसफ़ॅन कम नवरदेव, कुमार राम प्रकाश किन्हीकर.


Friday, December 18, 2020

ऑटोरिक्षा चालन : एक "गहन" चिंतन

 साधारण इ.स.२००३ ची गोष्ट. माझा सांगलीचा मित्र पहिल्यांदाच नागपूरला आला होता. त्याला पी.एच.डी. साठी व्ही.एन.आय.टी. ला (पूर्वीचे व्ही.आर. सी. ई.) प्रवेश मिळाला होता. संपूर्ण बालपण आणि अर्धे तारूण्य पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात घालवून तो पहिल्यांदाच नागपूरला आला होता.

महाराष्ट्र एक्सप्रेसने २७ तास प्रवास करून तो स्टेशनवर उतरला. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सवयीने त्याने ऑटोरिक्षाला (नागपुरी ऍटो) हात केला.
मित्र: अरे, व्हीआरसीई ला जायचय.
ऑटोवालाः चला न साहेब. भाड्याचे ३०० रूपये होतील.
पश्चिम महाराष्ट्रातल्या छान, व्यवस्थित निगा राखलेल्या रिक्षा पाहिलेल्या माझ्या मित्राला नागपुरचे जुने, फ्रंट इंजिन, फाटकेतुटके ऑटो पाहून कसेसेच झाले होते. तो आधीच थोडासा फटकळ स्वभावाचा. ३०० रूपये भाडे ऐकून तो वैतागून म्हणाला.
मित्रः अरे, मी भाडे विचारले रे. तुझ्या ऑटोरिक्षाची किंमत नाही. मला फक्त व्हीआरसीईला जायचय. ऑटो विकत नाही घ्यायचाय.
रिक्षावालाही भडकला.
संपूर्ण जगात ऑटो रिक्क्षांना एकवेळ टर्बोचार्ज्ड एंजिन बसेल, तो ऑटो हवेतून उडण्याचे तंत्रज्ञानही विकसित होईल पण नागपूरचे ऑटोवाले आपला हटवादी स्वभाव बदलणार नाहीत.
विदर्भात चंद्रपूर आणि यवतमाळलाही वैदर्भिय ऑटोवालेच आहेत. पण त्यांची वृत्ती मुंबईकर किंवा (पुणे सोडून उर्वरित) पश्चिम महाराष्ट्रकरांसारखी आहे. ऑटो जेवढा चालत राहिल तेव्हढा फायदा हे त्यांना कळलेय. आणि तसे ते चालवतातही. पण नागपूरच्या ऑटोवाल्यांचा टीट्यूड म्हणजे "इतक्या कमी भाड्यात ऑटो चालवून केवळ प्रवाशांवर परोपकार करतोय" असाच आहे. समजा एखाद्या प्रवाशाने गणेशपेठ बसस्थानक ते बर्डी किंवा रेल्वे स्टेशन ते बर्डी प्रवासाचे २०० रूपये भाडे जरी कबूल केले तरी यांची कमी भाड्याची कुरकूर कायम राहणार.
पुण्यातल्या रिक्षावाल्यांबद्दल काय बोलावे. सामान्य पुणेकराविषयी बोलताना जर दहादा विचार करावा लागत असेल तर पुणेकर रिक्षावाल्यासंबंधी बोलण्यापूर्वी हजारदा विचार करावा. आधीच पुणेकर त्यात तो रिक्षा चालवणार. (कुणीही "आधीच मर्कट त्यात तो मद्य प्याला" या धर्तीवर हे वाक्य वाचू नये, कृपया) पुल म्हणतात तसे चळवळ चालवावी तसे हे पुण्यात रिक्षा चालवतात.
असो, एकदा पुण्याचे वर्णन केले की इतर अलम दुनियेचे वर्णन फिके ठरते त्यामुळे ऑटो पुराणाला इथेच विराम देणे इष्ट.
- स्वतःची कार घेऊन प्रवास केला तर साधारण ४ वर्षातच ऑटोच्या भाड्याइतके पैसे वसूल होतात हे सत्य ११ वर्षांपूर्वी उमगलेला, रामभाऊ ड्रायव्हर







Thursday, December 17, 2020

खरा संगीतप्रेमी कोण ?

 

१. सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर गळ्यातल्या रूद्राक्षाचा जानव्याशी झालेला गुंता सोडवताना ज्याला वैताग न येता जो 'लट उलझी, सुलझा जा बालमा' आठवत गुणगुणतो तो
२. गाण्यात एखादा वर्ज्य स्वर आला तर गायक / गायिकेवर एकदम "बेसूर" शिक्का मारण्याआधी तो स्वर त्या गायनसौंदर्यात एकंदर भर घालतो आहे का ही गोष्ट पडताळून बघतो तो.
— शागिर्द रामूभैय्या नागपूरवाले.



Wednesday, December 16, 2020

दत्तशिखर माहूर बसफ़ॅनिंग (२०१८ आणि २०२०): नवे पर्व, एम. एस. सर्व

 दत्त शिखरवर आम्ही बालपणी जायचो तेव्हा ती  माहूर-रेणुका-अनुसया शिखर-दत्त शिखर-माहूर ही लोकल फ़ेरी दत्त शिखरला उभी दिसणे हा एक आनंदाचा गाभा असायचा. आमच्या बालपणी ’टाटा’च्या राज्यात वाढलेल्या आम्हा भावंडांना लेलॅंण्डच्या गाड्यांचे आणि त्यांच्या एंजिन फ़ायरिंगच्या आवाजाचे विशेष आकर्षण असायचे.


बालपणी नेहेमी माहूर गावातून गडावर आणि दत्त व अनुसया शिखरपर्य़ंत सोडणारी ही गाडी आमची लाडकी होती. त्यावेळी या गाडीच्या सतत फ़े-या सुरू असायच्यात. एका फ़ेरीने रेणुका शिखरपर्य़ंत येऊन पुढल्या फ़ेरीपर्य़ंत तिथले दर्शन आटोपून आम्ही पुढल्या दोन्ही ठिकाणांसाठी रवाना होत असू. गाडीपण अनुसया शिखरला भाविक चढून उतरून परतेपर्य़ंत खाली वाट बघत उभी असायची. दत्त शिखरलाही भाविकांचे दर्शन होईपर्य़ंत ड्रायव्हर काकांचा तिथे नाश्ता (बहुतेक कढी-आलुबोंडा किंवा फ़ोडणीची खिचडी) होऊन जायचा. 

आजकाल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व गाड्यांना माइल्ड स्टीलमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला. जुन्या ऍल्युमिनियम बांधणीत बसचे वजन जरी कमी होत असले तरी इतर बरेच दोष त्या बांधणीत होते. आजकाल बहुतांशी खाजगी गाड्यासुद्धा माइल्ड स्टील बांधणीच्या येतात. त्यामानाने एस. टी. ने बांधणीत बदल करण्याचा निर्णय फ़ार उशीरा घेतला असे म्हणावे लागेल. ठीक आहे. 

आता "देर आये, दुरूस्त आये" हे म्हणायचे की "Too little, too late" म्हणायचे हे येणारा काळच ठरवेल.

२०१८ मध्ये दत्तशिखरला दिसलेली बस. 




माहूर - शिखर - माहूर

MH - 40 / N 9667

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने बांधलेली अशोक लेलॅण्ड चित्ता बस
परिवर्तन २ बाय २

नांदे माहूर आगार


२०२० मध्ये दत्तशिखरला दिसलेली बस





MH -40 / N 9667

मूळ मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने बांधलेली अशोक लेलॅण्ड चित्ता बस

पण आता मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबाद ने माइल्ड स्टीलमध्ये पुनर्बांधणी केलेली अशोक लेलॅण्ड बस.

माइल्ड स्टील परिवर्तन २ बाय २

नांदे माहूर आगार

आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही वेळी बसचा मार्गफ़लक तोच आहे.

याच विषयावर यापूर्वी लिहीलेला ब्लॉग या लिंकवर वाचायला मिळेल.

- जुन्या आणि नव्याची योग्य ती सांगड घालणारा बसफ़ॅन राम.


का ग बाई रूसलीस ? तोंड फुगवून कोपर्‍यात लपलीस.




अम. चांदूर रेल्वे डेपोच्या गाड्या नागपूरला फारशा येत नाहीत.
त्यातही ही एक गाडी आलेली होती पण डेपोच्या कोपर्यात जाऊन तोंड लपवून फुरंगटून बसली होती.
गणेशपेठ, नागपूर डेपो.
१२/११/२०२०.
Rare visitor at Nagpur Bus Stand.
MH 13 / CU 7369
MG Alma built MSRTC bus.
Mild Steel body.
Chandur Railway depots bus at Nagpur depot.

Tuesday, December 15, 2020

Google maps : एक गंडविणे

 हे Google maps म्हणजे एक चॅप्टरच प्रकरण आहे.

"How was xyz pustakalay ?" किंवा " How was Shetkari Bazar ?" असे प्रश्न आपल्याला विचारेपर्यंत ठीक आहे.
आता विचारतय "How was Mokshadham Ghat ?"
आॅ !!!
अरे, जो तिथला खरा अनुभव घेतो तो ratings, review द्यायला परत येत नसतो. आणि जो कोणी परत येतो तो कधीही "excellent" असा review देणार नाही.
अरे Google बाबू, आप अपनी objectivity को पीछे छोड, यहाँका culture और तौरतरीके सीखने की और चलिएँ. पलीज.
- गुगल मॅपने गंडवल्यामुळे नदीपात्रातले पार्किंग सोडून तुळशीबागेतले ते वर्ल्डफेमस पार्किंग शोधत दगडूशेठ ते अप्पा बळवंत चौकापर्यंत चार चकरा मारून वैतागलेला हंगामी पुणेकर, रामचंद्रपंत.

Monday, December 14, 2020

मागण्यांपासून समजुतीकडे : बद्ध ते मुमुक्षू एक परिवर्तन

 रूपं देहि

जयं देहि

यशो देहि

द्विषो जहि.
या न संपणार्या मागण्यांपासून,
"किती भार घालू रघूनायकाला ?
मजकारणे शीण होईल त्याला"
या परमेश्वराविषयीच्या कारूण्यापर्यंत आपली मानसिक अवस्था होणे म्हणजे एका साधकाचा आत्मसाक्षात्कारच, नाही का ?
- बध्दावस्थेतून वरच्या अवस्थेत वाटचाल करू इच्छिणारा एक मुमूक्षू, कुमार राम किन्हीकर.

Sunday, December 13, 2020

रामराज्य: एक नवा विचार.

 "रामराज्य आले पाहिजे" अशी आपल्या सगळ्या सश्रद्ध व्यक्तिंची आंतरिक मनकामना असतेच असते. सर्वसामान्य प्रजाजनांचा आदर करणारी, सर्वांचे, न्याय्यहित साधणारी आणि म्हणूनच सर्वांना आपलीशी वाटणारी अशी दोनच राज्ये या पृथ्वीच्या इतिहासात होऊन गेलीत. एक रामराज्य आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य.

पण एक व्यक्ती म्हणून विचार केला तर लक्षात येईल की रामराज्याची सुरूवात आपल्याला आपल्या स्वतःपासूनच करावी लागेल. आपला राजा रामच आहे आणि आपण त्याच्याच अधिपत्याखाली राहतोय ही भावना दृढ करावी लागेल. मग आपल्या राजाला (त्या प्रभू रामाला) काय आवडतेय ? काय आवडत नाही ? याचे सतत व्यवधान बाळगावे लागेल. रामाला सत्यप्रियता, मनाचा सरळपणा आणि मनातला शुद्ध भाव आवडतो. हे लक्षात घेऊन आपण आपले वागणे ठेवले तर आपण सगळेच त्याच्या राज्यात राहतोय असे होईल, नाही का ? समाजपरिवर्तनाची सुरूवात स्वतःच्या वर्तनापासून करणे आवश्यक आहे.
सुरूवातीला आपण एकटेच या मार्गाने जातोय, इतरांचे काय ? असे वाटेल. पण आपणा सर्वांना आपल्या साधनावर दृढ विश्वास ठेवून आणि या मार्गाने सुरूवातीला न जाणा-या इतरांचा दुःस्वास न करता, निर्धाराने पुढे जावे लागेल. एकेकाला आपल्या वागणुकीने आपल्यात समाविष्ट करावे लागेल. आज कदाचित आपण अल्पसंख्येत असू पण ही चळवळ वाढली तर या रामराज्यात राहणारे बहुसंख्येने होतील आणि खरोखर रामराज्य येईल. आणि सत्यसंकल्पाचा पूर्णकर्ता प्रत्यक्ष प्रभू रामच असतो.
येत्या नववर्षानिमित्त आपण सगळे हा संकल्प करूयात का ? नववर्षाच्या संकल्प सिद्धीसाठी सर्वांना शुभेच्छा आणि प्रभू श्रीरामांना प्रार्थना.
- भाबडा वाटला तरी सत्यसंकल्पात अपार शक्ती असते या वचनावर दृढ विश्वास असलेला राम

Saturday, December 12, 2020

जाहि न चाहिय, कबहुँ कछु.

 माझे मातामह कै. श्री. गोपाळराव केशवराव उपाख्य बाबुराव सगदेव यांचा प्रचंड प्रभाव माझ्यावर आहे. माझी मुंज झाल्या झाल्या त्यांनी मला संध्यावंदन शिकविले. ते स्वतः वयाच्या ८९ वर्षांपर्यंत रोज सकाळ संध्याकाळी संध्यावंदन करायचेत. आयुष्याचे अखेरचे सहा महिने अस्थिभंगामुळे त्यांनी अंथरूणावर काढलेत, तेवढ्याच काळात त्यांची संध्या चुकली असेल फक्त. बाकी दररोज संध्या आणि पहाटे उठून देवपूजा त्यांनी कधीही चुकविली नाही. आपल्या वागणुकीचा आदर्श त्यांनी आम्हासमोर ठेवला.

मी पण मुंज झाल्यानंतर काॅलेजला जाईपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ साग्रसंगीत संध्यावंदन करायचो. अगदी भस्मधारण विधी, अघमर्षण, अर्घ्यदान आणि गायत्रीजपादि सगळे विधी. काॅलेजला हाॅस्टेलला रहायला गेल्यावर सायंसंध्या होईनाशी झाली. पण मग प्रातःसंध्या मात्र नियमाने करायचोच.
अजूनही प्रवासाचे दिवस सोडलेत तर भस्मधारण आणि साग्रसंगीत प्रातःसंध्यावंदन करणे सुरूच आहे. कारण माझ्या आजोबांचा प्रचंड प्रभाव.
माझी मुंज झाल्या झाल्या बालपणी त्यांनी मला केलेला उपदेश माझ्या चांगलाच लक्षात आहे.
एकदा सहज बोलताना ते म्हणालेत, "राम, देवाजवळ आपल्यासाठी कधीही काही मागू नये." बालपणी त्याचा अर्थ कळलाच नाही.
नंतर आमच्या गुरूघरी (प.पू. बापुराव महाराज, प.पू. मायबाई महाराज, नागपूर) अनेक उत्सवांमध्ये अत्यंत उत्कृष्ट कीर्तने ऐकलीत. आणि देवाजवळ स्वतःसाठी का मागू नये ? याचा अर्थ कळला.
एक राजाने नवीन राजवाडा बांधण्याचे काम काढले. बर्याच दिवसांनी काम बघायला तो बांधकामाच्या ठिकाणी गेला. तिथे काम करणार्या एका कारागिराचे काम पाहून तो प्रसन्न झाला. त्याची कारागिरी, कामातली त्याची एकाग्रता, त्याची कामाप्रती निष्ठा पाहून तो खूप प्रभावित झाला.
जुन्या राजवाड्यात परतून त्याने त्या कारागिराला बोलावणे पाठवले. राजा त्यादिवशी त्या कारागिरावर एवढा प्रसन्न होता की त्या कारागिराने अक्षरशः अर्धे राज्य मागितले असते तरी ते द्यायला राजा तयार होता. तो कारागीर राजाकडे आल्यावर राजाने त्याला विचारले, "बोल, तुला काय हवे ?"
तो कारागिर खूप विचारात पडला आणि मग एकदम म्हणाला, "राजेसाहेब, सकाळधरनं एक कप चहा बी नाही प्यालो पहा. तेवढा चा पाजा."
त्या कारागिराने जर "राजेसाहेब, तुम्हाला योग्य वाटेल ते द्या." असे म्हणाला असता तर अर्धे राज्य त्याला मिळू शकले असते पण स्वतःच्या क्षुद्र इच्छेने त्याचा घात केला.
आपणही भक्तिमार्गात असेच करतो का ? आपली उपासना, भक्तिभाव पाहून भगवंत आपल्याला खूप काही जगावेगळे, पारलौकिक असे ऐश्वर्य द्यायला निघाला असतो पण आपण आपल्या देहबुध्दीने या लौकिक जगातलेच मागत बसतो, त्या चहा मागणार्या कारागिरासारखे.
म्हणून आपल्यासाठी आपण भगवंताकडे काही मागूच नये असा त्या उपदेशाचा अर्थ होता.
खूप उशीरा गोस्वामी बाबा तुलसीदास बाबांचा हा दोहा श्रवणात आला.
"जाहि न चाहिय, कबहुँ कछु, तुम्ह सन सहज सनेहु।
बसहु निरंतर तासु मन, सो राउर निज गेहु ।।"
(रामराया, ज्या व्यक्तिला आपल्याकडून कधीच, काहीच नको असते त्याच्याशी तुमचा सहज स्नेह होतो.
प्रभू रामा, तुम्ही त्याच्या मनात निरंतर वास करा कारण तेच तुमचे खरे निवासस्थान आहे.)
बाबा तुलसीदासांचा दोहा श्रवणात तर नंतर आला पण आचरणात आणण्याचे शिक्षण मातामहांकडून फार पूर्वीच मिळाले होते. असे आजी आजोबा मिळण्याचे भाग्य लाभायला पूर्वसुकृत निश्चित जबर असावे लागते, नाही ?
- या बाबतीत खरोखर भाग्यवान असलेला रामराया.

Friday, December 11, 2020

एस. टी. आणि इतिहास.

 शिरपूरवरून नागपूरला कारने येताना वाटेत, दरवेळी सकाळी १० च्या सुमारास, मुक्ताईनगर ते भुसावळ पट्ट्यात, "बर्हाणपूर जलद औरंगाबाद" बस दिसायची.

तेव्हा आमच्या कन्येच्या इतिहासाच्या धड्यात नुकताच मुघल इतिहास झाला असल्याने तिने निरागसपणे एकदा प्रश्न विचारला, " बाबा, औरंगजेब याच बसने नेहमी बर्हाणपूरवरून औरंगाबादला जात होता का ?"
माझ्या डोळ्यासमोर ८० वर्षे पार केलेला औरंगजेब उभाच राहिला. त्याच्या संपूर्ण दरबारी पोषाखात (तो टोप वगैरे चढवून), कमरेला तलवार लटकावून, ज्येष्ठ नागरिकांचे सवलत तिकीट घेऊन, चालकाच्या अगदी मागच्या सीटवर, खिडकीचे गज एका हाताने घट्ट धरून अधीरतेने प्रवास करणारा औरंगजेब गाडीतल्या प्रवाशांच्या चेहर्यावर स्मितहास्य फुलवणारा होता.
तसही इतिहासकारांच्या मते तो खूप साधा (स्वतःचा खर्च टोप्या विणून वगैरे चालवणारा) होता. मग तेव्हा एस. टी. असती तर तो एस. टी. ने नक्कीच गेला असता.
तसेच मी पहिल्यांदाच माणगाववरून ठाण्याला परतताना "महाड जलद सूरत" या GSRTC च्या रातराणी एस टीने प्रवास करताना माझे झाले होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथे प्राध्यापक असणार्या मित्राला भेटून रात्री ९.०० च्या सुमारास लोणेरे फाट्यावरून या गाडीत बसलो. माणगाव स्थानकावरून निघाल्यावर थोड्याच वेळात ड्रायव्हर साहेबांनी गाडीतले मुख्य दिवे मालवले आणि निळसर दिव्यांच्या मंद प्रकाशात आमचा प्रवास सुरू झाला. आता कुठलाही प्रवास म्हणजे केवळ "अ" ठिकाणाहून "ब" ठिकाणापर्यंत जाणे एव्हढाच विचार आम्ही बसफॅन मंडळी करीत नसल्याने या बसचा "महाड जलद सूरत" हा मार्ग डोक्यात फिट्ट होता. आणि थोड्या वेळाने काय विचारता ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने, रायगडाच्या पायथ्याशी महाडमधे, बहिर्जी नाईकांच्या गुप्त सरंजामात जमलेली मावळे मंडळी सूरत लुटायला गुजरातकडे चाललेली आहेत असेच मला वाटू लागले. त्या अंधारात जो प्रवासी म्हणावा तो गुप्त वेषातला मावळाच वाटत होता. पनवेलला या गाडीतून उतरलो खरा पण दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात "मावळ्यांनी सुरतेवर चाल करून ती लुटली" अशी हेडलाईन वाचायला मिळेल की काय ? असे वाटत होते.
पुलंचे हरीतात्या त्यांच्या चाळीतल्या मुलांना घेऊन पहिल्यांदा पुण्याला गेले होते तेव्हा खंडाळ्याच्या घाटातून रेल्वेने प्रवास करणार्या या सगळ्या मुलांना "एकदा तरी मराठी सैन्य घोड्यांवर स्वार होऊन या घाटात चढ उतार करताना दिसावे" अशी तीव्र इच्छा मनात आल्याचे पुलंनी लिहून ठेवलेले आहे. अगदी तसेच मला झाले होते. नुसते "महाड जलद सूरत" नाव वाचून.
पुलंना ही ऐतिहासिक दृष्टी हरीतात्यांनी दिली.
आणि आम्हाला खुद्द पुलंनी.
बालपणापासून त्यांच्या साहित्याची असंख्य पारायणे करून जवळपास त्यांचे सगळे साहित्य तोंडपाठ असल्याचा असाही परिणाम होतो.
- एस टी च्या इतिहासाच्या प्रेमात असलेला आणि इतिहासात एस टी नेऊ पाहणारा एक एस टी प्रेमी मावळा रामोजी.





(फोटो प्रातिनिधिक)

Thursday, December 10, 2020

भारतीय रेल्वे: एकात्मता आणि कुरघोड्याही.

वाटवा, कृष्णराजपुरम, इज्जतनगर, अरक्कोणम, अजनी, मौला अली, बण्डामुण्डा, भगत की कोठी, इथल्या आणि यांसारख्या असंख्य छोट्या विभागातल्या नागरिकांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले पाहिजेत. भारतीय रेल्वेमुळे त्यांना एक राष्ट्रीय ओळख प्राप्त होऊ शकली आहे. भारतीय रेल्वे या ठिकाणांच्या एंजिन शेडसना अनुक्रमे अहमदाबाद, बंगलूरू, बरैली, चेन्नई, नागपूर, हैद्राबाद, राऊरकेला, जोधपूर अशी नावे सहजच देऊ शकली असती पण भारतीय रेल्वेने त्या त्या शहरातील या छोट्या विभागांचे नाव आपल्या एंजिनांव्दारे भारतभर नेले. प्रचलित केले.


भारतासारख्या खंडप्राय देशात राष्ट्रीय एकात्मता सुस्थापित करण्याचे फ़ार मोठे आणि अवघड काम रेल्वे अखंड करीत असते. मालदा टाऊन चे एखादे एंजिन २००० किमी दूर पार पश्चिमेकडल्या टोकात हाप्याला सापडू शकते आणि उत्तरेकडे असलेल्या लुधियाना शेडचे एंजिन पार श्रीलंकेच्या व्दाराशी असलेल्या रामेश्वरमलाही सापडू शकते.


त्याचबरोबर प्रांतवादही भारतीय रेल्वेच्या संचालनात, तुरळक का होईना, बघायला मिळतो. मध्य रेल्वेत कायम प्राधान्याची वागणूक मिळत असणारी विदर्भ एक्सप्रेस, इतवारी या नागपूरच्या उपनगर असलेल्या पण दक्षिण पूर्व मध्य रेल्वे्च्या अखत्यारित असलेल्या जागी गेली की तिला मिळणारी वागणूक एकदम बदलते. जयपूर - चेन्नई सुपर एक्सप्रेस जयपूर ते भोपाळ हा प्रवास पश्चिम रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे या आपल्या राज्यातून करताना राणीसारखी प्रवास करते पण भोपाळपुढे हबीबगंजला तिचे जणू राज्यच खालसा होते.


बरीच अशी उदाहरणे आहेत.


- रेल्वे गाड्यांच्या राज्यातल्या राजा आणि राण्यांचा (नेहमीच अखिल भारतवर्षीय विचार करणारा) राजपुत्र.  




Wednesday, December 9, 2020

कायमचे लक्षात राहिलेले एक उमदे व्यक्तिमत्व.

९ डिसेंबर २०००. नागपूरचा एक तरूण त्याच्या नवपरिणीत पत्नीसह मधुचंद्रासाठी गोव्याला निघालेला होता. नागपूर ते कोल्हापूर हा प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेसने आणि कोल्हापूर ते पणजी हा प्रवास बसने असा त्यांचा बेत होता. सगळा प्रवास त्याने स्वतः आखलेला होता. गोव्यातल्या हॉटेल्ससकट सगळी आरक्षणे त्याने स्वतः केलेली होती. नागपूर ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसचे तिकीट त्याने तत्कालीन नियमानुसार बरोबर ६० दिवस आधी आरक्षित केलेले होते आणि व्दिस्तरीय वातानुकूल शयनयानात (सेकंड एसी) सगळयांपासून अलिप्त आणि सगळ्यात कमी वर्दळीची जागा म्हणून मुद्दाम आसन क्र. २३ आणि २४ निवडून घेतले होते. (कोचमधल्या अगदी मधोमध असलेल्या बर्थ बे मधले साइड लोअर आणि साइड अप्पर बर्थस.)


सकाळी ११ वाजता नागपूरवरून सुटणारी नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (तेव्हा ती गोंदियापर्यंत वाढवलेली नव्हती.) सकाळी १० वाजता फ़लाटावर लागली. त्या दांपत्याला स्टेशनवर सोडायला त्या तरूणाचे धाकटे भाऊ, मित्र आदि मंडळी. थट्टा मस्करी चाललेली. गाडी आली. सेकंड एसीचा एकुलता एकच असलेला कोच सापडला. दांपत्य गाडीत शिरले. बर्थखाली सामानसुमानाची व्यवस्था वगैरे झाली. आणि सगळेच आता निवांत गप्पांमध्ये रंगलेत. आता थोड्या वेळात गाडी सुटणार आणि प्रवास सुरू होणार हे खुषीचे वातावरण.


इतक्यात तिथे एक गृहस्थ आलेत आणि त्यांच्याकडल्या पेपर तिकीटांवरही ए-१ कोचमधल्या २३ आणि २४ नंबरचा बर्थ त्यांना दिलेला असण्याची नोंद. बर ते गृहस्थ म्हणजे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष आणि कोल्हापूरचे आमदार श्री. बाबासाहेब कुपेकर यांचे स्वीय सहाय्यक. ते स्वीय सहाय्यक आणि खुद्द विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर याच नंबरच्या बर्थस वरून प्रवास करणार होते. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर २००० रोजी संध्याकाळी संपलेले होते आणि विधानसभाध्यक्ष त्यांच्या स्वीय सहाय्यकांसह ९ डिसेंबरला त्यांच्या गावी परतत होते. विधीमंडळ सचिवालयाने आरक्षित केलेले पेपर तिकीट आणि त्यावर ए -१ / २३ आणि ए -१/ २४ ही अक्षरे पाहून त्या तरूणाचा, त्याच्या पत्नीचा आणि सोबत आलेल्या भावंडांचा गोंधळच उडाला.


मग नववधूशिवाय इतर मंडळी फ़लाटावर उतरली. बाबासाहेब कुपेकर अजूनही आपल्या नागपूरकर कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात गप्पा मारत रमलेले होते. स्वीय सहाय्यकांनी टीटीई साहेबांना पाचारण केले. ते आलेत. पुन्हा एकदा त्या तरूणाकडे असलेल्या तिकीटाची आणि रिझर्वेशन चार्टची पाहणी झाली. आणि धक्काच बसला. गाडीला लावलेल्या आणि टीटीई साहेबांकडे असलेल्या चार्टवर त्या तरूणाचे आणि त्याच्या पत्नीचे नावच नव्हते. रेल्वेकडून काहीतरी घोळ झाला होता. बरोबर रिझर्वेशन उघडल्याच्या दिवशी रिझर्वेशन करूनही ऐनवेळी चार्टमध्ये नाव नसणे म्हणजे भरपूर अभ्यास करून, छान परिक्षा देऊन निकाल "राखीव" यावा असे टेन्शन.




तरूणाकडे असलेल्या तिकीटाची रेल्वे अधिका-यांकडून पुनर्तपासणी झाली. तिकीट तर अधिकृत होते. त्यावर रेल्वे अधिका-यांच्या मान्यतेची पावतीही मिळाली. मग फ़लाटावर रेल्वे अधिका-यांची धावपळ सुरू झाली. त्या डब्यात एकही जागा शिल्लक नव्हती. नागपूरपासूनच आर ए सी, वेटींग लिस्ट चे प्रवासी ताटकळत होतेच. मधल्या स्थानकावरूनही असेच आर ए सी, वेटींग लिस्ट चे प्रवासी असणार हे उघड होते. अधिका-यांची फ़लाटावर नुसती धावपळ आणि धावपळ. कारण प्रवास करणारी व्यक्ति म्हणजे राज्यातल्या राजशिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) नुसार व्ही व्ही आय पी व्यक्ति होती.


मग साधारण ११ च्या सुमासास गाडीचे एंजिन गाडीपासून विलग होताना दिसले. नागपूर यार्डात जाऊन त्याने तिथला एक राखीव व्दिस्तरीय वातानुकूल (सेकंड एसी) डबा काढला आणि परत येऊन महाराष्ट्र एक्सप्रेसला जोडला. त्या दिवशी महाराष्ट्र एक्सप्रेस दोन व्दिस्तरीय शयनयान घेऊन धावली. आर ए सी, वेटींग लिस्ट सगळ्या प्रवाशांना त्यादिवशी अगदी कन्फ़र्मड जागा मिळाली असणार.


ते स्वीय सहाय्यक त्या तरूणापाशी आले. तोपर्यंत बाबासाहेब स्वतः त्या तरूणाजवळ येऊन उभे होते. आपल्या जागेवर आरक्षण असलेला तरूण हाच याची त्यांना कल्पना आलेली होती. शांतपणे त्या तरूणाशी ते गप्पा मारीत उभे होते. स्वीय सहायक तरूणाला म्हणाले, " साहेब, आता नवीन डबा लागलाय. तुम्ही त्यात शिफ़्ट व्हा. वाटल्यास तेच बर्थ नंबर्स मी टीटीईंना द्यायला सांगतो." 


त्यावर बाबासाहेब कुपेकरांनी दिलेले उत्तर कायमचे लक्षात राहणारे आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उमदेपणा अधोरेखित करणारे आहे. एव्हढ्या मोठ्या पदावरच्या राजकारण्याचे पाय किती जमिनीवर आहेत हे दाखवणारे आहे.

 ते आपल्या स्वीय सहाय्यकाला म्हणाले, " अहो, ते आता ए-१ मध्ये आधी बसलेयत ना. ते सेट झालेले आहेत. अनायासे आपण आपल्या सामानसुमानासकट बाहेर उभे आहोत. आपणच त्या जादा डब्यापर्यंत जाऊयात." 

आणि त्या तरूणाला म्हणाले, " तुम्ही बसा हो निवांत. गुड लक." 

आणि लगेच एंजिनाच्या मागे लागलेल्या सेकंड एसीकडे ते रवाना झालेसुद्धा. तो डबा सध्या उभे असलेल्या डब्यापासून ७ ते ८ डबे दूर होता पण कार्यकर्त्यांसह ते तिकडे चालत गेलेत आणि कोल्हापूरपर्यंतचा प्रवास त्यांनी त्या डब्यातून केला. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्ता नसलेला, त्यांच्या मतदारसंघातला मतदार नसलेला एव्हढेच काय साधीओळखही नसलेल्या एका माणसासाठी त्यांनी हा  उमदेपणा दाखवला. अगदी अकृत्रिम. कुठलाही अभिनिवेश नसलेला साधेपणा. 




एका एका बर्थसाठी आपापसातच भांडणे करणारी, टीटीईला धमक्या देणारी लोकप्रतिनिधी मंडळी यानंतर मला पहायला मिळाली. (लिंक इथे) त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब कुपेकरांचा हा उमदेपणा माझ्या कायमचा लक्षात न राहिला तरच नवल.


- कथानकातला तो तरूण, प्रवासी पक्षी राम किन्हीकर.

 

Saturday, December 5, 2020

महाविद्यालयीन जीवनातले आमचे psephology चे प्रयोग.

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराडला सप्टेंबर १९८९ मध्ये आमची ऍडमिशन झाली आणि लागलीच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध पदांसाठी अंतर्गत निवडणुकांचे वारे वाहू लागले. तत्पूर्वी नागपूर विद्यापीठात या निवडणुका व्हायच्यात पण राजकीय पक्षांचा हस्तक्षेप फ़ार वाढू लागल्याने त्यात हाणामा-या आणि राडेच जास्त होऊ लागलेत. ही वाढती डोकेदुखी नको म्हणून नागपूर विद्यापीठाने सर्व प्रकारच्या विद्यार्थी निवडणुका रद्द करून विविध पदांसाठी थेट नियुक्त्यांचे धोरण अवलंबिले होते. पण आमच्या शिवाजी विद्यापीठात मात्र या निवडणुका अगदी गांभीर्याने आणि शांततेच्या वातावरणात व्हायच्यात.

त्यावेळी आमच्या महाविद्यालयात २२ जागांसाठी निवडणुका व्हायच्यात. General Secretary, Social Gathering Secretary, Debating and Cultural Secretary, Magazine Secreatry, Cricket Secretary, Football Secretary अशा २२ जागा आणि प्रत्येक वर्गाचा Class Rpresentative (CR) अशा जागांसाठी निवडणुका घेतल्या जायच्यात. त्यातले General Secretary (GS) आणि Social Gathering Secretary (SGS) म्हणजे वर्षभरासाठीचे जणू पंतप्रधान आणि गृहमंत्री असा त्यांचा थाट असायचा. Debating and Cultural Secretary कडे वर्षभराच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी असे तर Magazine Secreatry कडे महाविद्यालयाच्या भित्तीपत्राची (मुक्तांगण) चावी असे. त्यावर दर आठवड्याला कुणाकुणाचे लेख प्रकाशित करायचे ? वगैरे निर्णय तो / ती स्वतंत्रपणे घेऊ शकत असे आणि दरवर्षीच्या महाविद्यालयीन वार्षिकांकाची प्रकाशन जबाबदारी असे. सगळ्याच जागांसाठीच्या निवडणुका मोठ्या हिरीरीने लढल्या जात.



या निवडणूकांचे संचालन करण्यासाठी निवडणूक आयोगाप्रमाणे आमच्याच महाविद्यालयातील काही प्राध्यापकांची समिती असे. त्यांच्याकडून निवडणुकीची तारीख, अर्ज भरण्याची तारीख, परत घेण्याची तारीख, प्रचाराची आदर्श आचारसंहिता, इत्यादि नियम जाहीर होत असत. अर्ज भरले जात, अक्षरशः लोकसभा निवडणुकीसारखी प्रचाराची रणधुमाळी वगैरे होई. मतदान पत्रिकांवर मतदान होई. पांढरी मतदान पत्रिका महाविद्यालयीन स्तरावरच्या २२ जागांसाठी आणि रंगीत मतपत्रिका Class representatives साठी अशी विभागणी असे. त्यासाठी आमच्या कार्यशाळेतली शिक्षकेतर कर्मचारी मंडळी मतपेट्या तयार करीत. आमची प्राध्यापक मंडळीच निवडणुकांची निरीक्षक असत. मतपत्रिकेची पहिली उभी घडी नंतर आडवी घडी, निवडणूक समितीने दिलेल्या विशिष्ट प्रकारच्या पेननेच विशिष्टच ( √ किंवा x ) खूण करून मतदान हा सगळा तामझाम अखिल भारतीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांसारखाच असे.

निवडणुकीत दोन पॅनेल्स असायचीत. विदर्भाच्या विद्यार्थ्यांचे "फ़्रेंडस पॅनेल" आणि विदर्भाव्यतिरिक्त (जळगाव, सोलापूर , कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई) विद्यार्थ्यांचे "शिवाजी पॅनेल". कराडला तेव्हा फ़क्त तीनच शाखांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सोय होती. स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) आणि यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering).  एका शाखेत एका वर्गात साधारण ६० ते ७० विद्यार्थी असे प्रत्येक शाखेचे (७० x ४ =) २८० विद्यार्थी तर तीन शाखांचे मिळून ७०० ते ८०० च्या आसपास एकूण विद्यार्थीसंख्या असे. तेव्हा नागपूर विद्यापीठ कोट्याचे (तेव्हा नागपूर विद्यापीठाच्या अधिक्षेत्रात एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नव्हते. म्हणून नागपूर विद्यापीठ क्षेत्रातील मुलांचा कराड, सांगली, नांदेड, VJTI मुंबई, SPCE मुंबई आणि COE पुणे येथे काही विशिष्ट जागांचा कोटा असे. या सगळ्या ऍडमिशन्स विश्वेश्वरय्या प्रांतिक अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फ़े व्हायच्यात.) प्रत्येक वर्गात १२ विद्यार्थी असायचे. म्हणजे नागपूरच्या विद्यार्थ्यांची ( किमान १२ विद्यार्थी x ३ शाखा x ४ वर्षे) १४४ ते १७० संख्या असे. ७०० - ७५० मध्ये १७० मध्ये आम्ही अल्पसंख्येतच असायचो. पण या निवडणुकांमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांची एकजूट आणि नागपूरव्यतिरिक्त दुस-या गटांच्या काही विद्यार्थ्यांना शेवटल्या क्षणी आपल्याकडे वळवून घेण्याचे कसब खरोखर वाखाणण्याजोगे होते. 

मला आठवतेय १९८९ च्या निवडणुकीत जळगाव आणि सोलापूर गटाचा पाठिंबा आदल्या दिवशी मिळवून आमच्या ’फ़्रेंडस पॅनेल" ने आपला General Secretary (GS) बसविला होता. निवडणुकांच्या आदल्या रात्री खूप उशीरा आमच्या सिनीयर विद्यार्थ्यांनी काहीतरी बैठक घेतली आणि आम्हा सगळ्या नागपुरी मतदारांपर्यंत मतदानाचा पॅटर्न असलेल्या चिठ्ठ्या पोहोचल्यात. General Secretary (GS) आपला आणि Social Gathering Secretary (SGS) त्यांचा बसवायचा असा तो पॅटर्न होता. त्यांच्या पॅनेलच्या सोलापूर आणि जळगावच्या मतदारांपर्यंतही General Secretary (GS) साठी फ़्रेंडस पॅनेल ला मतदान करण्याचे निरोप गेलेत आणि अल्पमतात असतानाही आम्ही टी. व्ही. एस. भट्टात्रिपाद या आमच्या अंतिम वर्षातल्या उमद्या सिनीयरला General Secretary (GS) म्हणून निवडून आणले होते. त्यावर्षी निवडणुकांनंतर शिवाजी पॅनेलमध्ये  हे फ़ुटीर विद्यार्थी आणि निष्ठावंत विद्यार्थी यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप रंगलेत.

निवडणूकांसाठी विद्यार्थ्यांच्या खूप सभा वगैरे व्हायच्यात. कॅण्टीनसमोर असलेला पिंपळाचा बांधलेला पार हे स्टेज असायचे. एकापेक्षा एक जोरदार भाषणे व्हायचीत. आज महाराष्ट्रातले ख्यातनाम साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले मिलींद जोशी तेव्हा अगदी बाळासाहेब ठाक-यांसारखीच शाल वगैरे अंगावर पांघरून त्यांच्याच शैलीत "उद्याचा सूर्य उगवणार तो शिवाजी पॅनेलच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच." वगैरे गर्जना करायचेत. गर्दी सगळ्या भाषणांना व्हायची. टाळ्या मिळायच्यात, हुर्यो उडायची. भारतीय निवडणुकांसारखाच एक दिवस आधी जाहीर प्रचार थंडावत असे. मग वैयक्तिक भेटीगाठी, सेटलमेंट वगैरेंवर भर असायचा. एकंदर मोठी मौज असे.

पण तरीही निवडणुका या खूप छान वातावरणात व्ह्यायच्यात. दोन वेगवेगळ्या पॅनेल्समधून एकाच पोस्टसाठी निवडणूक लढवायला निघालेले दोन तरूण बहुतांशी एकत्र चहा पिताना कॅण्टीनमध्ये दिसत असत. कधीकधी ते एकमेकांचे रूम पार्टनर्सपण असत. त्यामुळे राजकीय विरोध हा वैयक्तिक विरोधापर्यंत कधीच जात नसे. ब-याचदा तर एखाद्या पोस्ट साठी हरलेला विद्यार्थी पुढे वर्षभर त्या जिंकलेल्या आपल्या मित्राला त्याच्या कार्यात सल्ला देताना (आणि तो जिंकलेला मित्रही तो सल्ला ऐकून अंमलात आणताना) दिसायचा. हिरीरीने निवडणुका लढवल्या गेल्यात तरी वातावरण अगदी निरोगी असायचे.

व्दितीय वर्षात जाईपर्यंत बरेच समविचारी मित्र जमलेत. मैत्रीमध्ये सारखीच कौटुंबिक पार्श्वभूमी, सारख्या आवडीनिवडी हे जुळून आले. मग कुठेतरी नाशिकजवळच्या ओझरच्या विजय कुळकर्णीचे (आता कै. विजय. २०११ मध्ये त्याचे अपघाती दुःखद निधन झाले.) घट्ट मैत्र नागपूरच्या रामशी जमले, सांगलीचा गायक सतीश तानवडेचे सूर नागपूरच्या नकलाकार रामशी चांगलेच जुळले. आम्हा सर्वांनाच निवडणुकीच्या राजकारणात स्वारस्य नव्हते. निवडणुकांमध्ये भाग घेणारे भावी उमेदवार म्हणून आमच्याकडे बघितले जायचे.  आमच्या अंतिम वर्षात Social Gathering Secretary म्हणून सतीशच उभा राहणार याविषयी आमच्या दुस-या वर्षात इतर मुलांची खात्री झाली होती. विजयचे नाव भावी Magazine Secretary  म्हणून आणि माझे नाव भावी Debating and Cultural Secretary  म्हणून घेतले जात होते. दरम्यान आम्ही सगळेच विद्यार्थी परिषदेच्या कामात गुंतलो होतो. सातारा जिल्ह्याच्या तत्कालीन कार्यकारिणीत आम्हा सगळ्यांना विविध जबाबदा-याही मिळालेल्या होत्या. (याविषयीची गंमत कथा नंतर कधीतरी.)  त्यामुळे महाविद्यालयातल्या निवडणुका लढवायला आम्ही अगदी नाखुषच होतो. पण तृतीय वर्षात त्या लढवाव्या लागतीलच अशीच चिन्हे सगळीकडे दिसत होती.







मग त्यावर आम्ही एक उपाय शोधला. निवडणूक आणि त्याच्याशी संबंधित कामे टाळण्यासाठी आमच्या डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली. आम्ही त्याकाळचे प्रणव रॉय आणि योगेंद्र यादव झालोत. (त्या काळचे हं. त्याकाळी प्रणव रॉय आणि योगेंद्र यादव प्रत्येक निवडणुकांचे सखोल आणि निःष्पक्ष विश्लेषण हे दोघे सादर करायचेत त्यामुळे तेव्हा ते आदर्श होते. प्रणव रॉय दर आठवड्याला The World This Week हा सुंदर कार्यक्रम दूरदर्शनवर सादर करायचेत. आम्ही सगळे तरूण त्या कार्यक्रमाचे फ़ॅन होतो. ) 

आमच्या निवडणूक अधिका-यांची या ओपिनियन पोल साठी आम्ही अधिकृत परवानगी घेतली आणि एक फ़ॉर्मच टाईप करून आणला. त्या दोन पानांच्या "निवडणूक निकाल अंदाज वर्तवा स्पर्धेच्या" फ़ॉर्मवर 

१. General Secretary (GS) कोण होणार ?

२. Social Gathering Secretary (SGS) कोण होणार ?

..

..

..

२३. सगळ्यात जास्त मार्जिनने कोण जिंकणार ?

२४. सगळ्यात कमी मार्जिनने कोण जिंकणार ?

२५. तुमच्या वर्गाचा Class Representative ( C. R. ) कोण होणार ?

वगैरे प्रश्न होते. तो फ़ॉर्म आम्ही आमच्या महाविद्यालयात असलेल्या फोटोकॉपी सेंटरवर (झेरॉक्स सेंटर) ठेवला. निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत सहभागी होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी तो फ़ॉर्म भरून आमच्या रूमवर आणून द्यायचा आणि १ रूपया स्पर्धा सहभाग शुल्क द्यायचे असे ठरले. प्रथम क्रमांकाला १५० रूपयांचे, व्दितीय क्रमांकाला १०० रूपयांचे आणि तृतीय क्रमांकाला ५० रूपयांचे बक्षीस जाहीर केले. त्याबद्दल "निवडणूक निकाल अंदाज वर्तवा स्पर्धा" असे बॅनर्स मुक्तांगण (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) आणि इतरत्र चिकटवलेत. आणि आमची हॉस्टेल रूम प्रतिसादाची वाट पाहू लागली. त्याकाळी आमचा महिनाभराचा सगळा खर्च (मेसबिल वगैरे धरून) ४५० ते ५०० रूपयांमध्ये भागायचा. तेव्हा एक रूपया गुंतवणुकीत १५० रूपये बक्षीस हे प्रलोभन मोठे होते. 

निवडणुकीच्या आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत प्रतिसाद जवळपास नव्हताच. अर्थात या उपक्रमात आमची गुंतवणूक २० रूपयांच्या वर नव्हतीच. (फ़क्त फ़ॉर्म टायपिंगचा खर्च) त्यामुळे आम्ही त्याबाबतीत निश्चिंत होतो. फ़क्त या स्पर्धेला प्रतिसाद मिळायला हवा असे आम्हा तिघांनाही मनापासून वाटत होते.

संध्याकाळी ६ नंतर जबरदस्त प्रतिसादाला सुरूवात झाली. रात्री ११.३० पर्यंत ७५० मतदारांपैकी जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आमच्याकडे वट्ट ७०० रूपये ७०० प्रतिसाद जमा झालेत. आमच्या महाविद्यालयातल्या मुली या सगळ्याच राजकारणापासून दूर रहात असल्याने त्यांच्यापैकी कुणाचा फ़ारसा प्रतिसाद नव्हता. 

७०० पैकी ३०० रूपये बक्षीसात वाटल्यानंतर आम्हा तिघांच्या वाटेला उरलेले ४०० रूपये येणार असल्याने आम्ही खुष होतो. Cambridge कंपनीचा Gold शर्ट त्याकाळी १५० रूपयात येत असे.  Cambridge च्या शोरूम समोरून जाताना तसला शर्ट विकत घेण्याची एकमेकांची मनिषा तिघांनाही माहिती होती. लगेचच तो विकत घेण्याची नामी संधी आम्हा तिघांनाही चालून आलेली होती. त्यामुळे आम्ही हरखलो होतो पण..

त्यापेक्षाही एक नामी गोष्ट त्या रात्री आम्हा तिघांच्याही लक्षात आली. निवडणूकीत मतदार संख्येच्या २.५ टक्के ते ३ टक्के मतदारांचा कौल ही योगेंद्र यादव, प्रणव रॉय सारखी Psephologist मंडळी गोळा करतात आणि त्यावर आपले निवडणूक निकाल अंदाजाचे कार्यक्रम चालवतात. आमच्याकडे उद्याच्या निवडणूकीतल्या ९० % मतदारांचा कौल आमच्या हातात होता. उद्याच्या निवडणुकीतले सगळे निकाल आदल्या दिवशीच आमच्या हातात होते. आम्ही सगळे फ़ॉर्म्स चाळलेत. उद्याच्या निवडणूकीत कोण जिंकणार ? कुठल्या पोस्ट वर धक्कादायक निकाल लागणार ? याची सगळी माहिती आमच्याजवळ होती. फ़क्त सगळ्यात जास्त मार्जिन आणि सगळ्यात कमी मार्जिनने जिंकणा-या उमेदवाराची होती.

निवडणूका झाल्यात. त्याच्या पुढल्या दिवशी मतमोजणी होती. मतमोजणीही भारतीय निवड्णूक आयोगाप्रमाणे, उमेदवाराचा प्रतिनिधी, काऊंटिंग टेबल्स, प्रत्येक टेबलवर निरीक्षक अशा पद्धतीने मोठ्ठ्या ड्रॉइंग हॉलमध्ये व्हायची. आम्ही आमच्या निवडणूक निकाल अंदाज स्पर्धेच्या निमित्ताने अधिकृत परवानगी काढून आत प्रवेश मिळवला. अधिकृतरित्या सर्वाधिक मार्जिन, सर्वात कमी मार्जिन याबाबत आकडे आम्हाला आमच्या निवडणूक आयोगाकडूनच मिळाले असते. आणि तेच प्रमाण मानून बक्षीसे द्यायची होती.

आमच्या माहितीप्रमाणेच निकाल लागलेत. साहजिकच ७०० पैकी बहुतांशी मुलांची सगळी उत्तरे बरोबर होती. विजयी उमेदवार ठरला तो "सर्वात जास्त मार्जिन" आणि "सर्वात कमी मार्जिन" अचूक वर्तवणारा विद्यार्थी.

Psephology विषयी आकर्षणातून केलेला पहिला प्रयोग यशस्वी ठरला. आम्ही निवडणूकीच्या राजकारणातून स्वतःला अलिप्त ठेवण्यात यश मिळवले, उद्या होणा-या निवडणूकांचे निकाल आदल्याच दिवशी कळल्याचे सुख अनुभवले आणि स्वतःसाठी स्वकमाईतून एक एक Cambidge Gold चा शर्टही मिळवला.


- तरूण Sephologist रामेंद्र रॉय यादव.