Tuesday, May 6, 2025

नामस्मरण: अचानक स्फ़ुरलेले काही विचार

श्रीमद्भगवतगीतेच्या दहाव्या अध्यायात प्रत्यक्ष भगवंताने त्याच्या स्वतःच्या विभूती सांगून ठेवल्या आहेत.

त्यात " यज्ञानाम जपयज्ञोस्मि " असे सांगितलेले आहे.


कलियुगात साधली जाणारी एकमेव साधना म्हणजे भगवंताचा जप. भगवंताने हेच सांगितले, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांसकट सगळ्या संतांनीही हेच सांगितले. " मय्येव मन आधस्त्व, मयी बुध्दीम निवेशय " ( हे साधका, तू तुझे मन, तुझी बुध्दी माझ्याकडे लाव ) इतकी या सगळ्या संत विभूतींची साधी अपेक्षा.


किती कमी साधनात, किती कमी श्रमात ही साधना होते हो. फक्त मन हेच त्याचे साधन. बरे त्याला फार नियम वगैरेंचे बंधनही नाही. अगदी हाॅस्पिटलच्या बेडवर असतानाही मन जागृत असेपर्यंत ही साधना करता येईल की नाही ?


आज अनेक सद्भक्त मंडळीही हे सोपे साधन करता करता त्या साधनाच्या आनुषंगिक बाबींच्या चर्चेत अडकलेले पाहिले म्हणजे खरोखर वाईट वाटते. जप करायला आसन कुठले घ्यावे ? माळ तुळशीची की स्फटिकाची ? जप करताना तोंड कुठल्या दिशेला करावे ? या सगळ्यातच अडकून आपण मूळ साध्यापासून तर दूर जात नाहीये ना याचा विचार खर्‍या पारमार्थिक व्यक्तींनी करायला हवा असे मनापासून वाटते.


या संदर्भात परम पूजनीय ब्रम्हचैतन्य महाराजांचेच एक वाक्य आहे. 


" साखर कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते. उभ्याने, बसून, झोपून  कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते. " हे नामाबद्दल चिकित्सा करणार्‍या साधकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.


मन एकाग्र झाल्यावर नाम घ्यावे ? की नाम घेता घेता मन एकाग्र होईल ? या चिकित्सेत फार न पडता फक्त नाम घेत जावे. 


" नकळत पद अग्निवरी पडे,

न करी दाह असे कधीही न घडे,

अजित नाम घडो भलत्या मिसे,

सकल पातक भस्म करितसे." 

हा श्लोक लक्षात ठेवावा आणि आपली जपसाधना अचल अविरत करीत जावी. 


- अचानक अंतःप्रेरणेने सुचलेले सर्वांपर्यंत सहज पोहोचवणारा साधक, वैभवीराम प्रकाश किन्हीकर




Monday, May 5, 2025

चंद्रपूर आणि व्हॉल्व्हो बस यांचे नाते

संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी बसेसचे पेव साधारण १९९१-१९९२ पासून फुटले. माझ्या लाडक्या चंद्रपूर शहरातूनही याच सुमारास नागपूरसाठी खाजगी बससेवा सुरू झाली.

सुरूवातीला फक्त चंद्रपूर - नागपूर, चंद्रपूर - गडचिरोली आणि चंद्रपूर - ब्रह्मपुरी या मार्गांवर असलेल्या सेवा काही कालावधीने चंद्रपूर - छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर - पुणे अशा विस्तारित झाल्यात.
२ बाय २ विना वातानुकूल आसनी - २ बाय २ वातानुकूल आसनी ते २ बाय १ वातानुकूल शयनयान इथपर्यंत बसेसचा दर्जा वाढत गेला.
फक्त एकच खंत आहे ती म्हणजे चंद्रपूरच्या पावन भूमीवर व्हाॅल्वो बसची चाके कधी धावलीच नाहीत. नाही म्हणायला गणराज ट्रॅव्हल्सने मधल्या काळात १५ मीटरची लांबचलांब मर्सिडीज बस चंद्रपूर - नागपूर मार्गावर चालवून पाहिली. एस. टी. ने ही चंद्रपूर - नागपूर - पुणे ही मल्टीअॅक्सल स्कॅनिया (ब्रँडनेमः अश्वमेध) चालवली. (आणि या आतबट्ट्याच्या व्यवहारात चांगलेच हात पोळून घेतले होते) पण चंद्रपूरमधल्या एकाही ट्रॅव्हल्सवाल्याला किंवा चंद्रपूरपर्यंत सेवा देणार्या महाराष्ट्रातल्या एकाही ट्रॅव्हलवाल्याला चंद्रपूर मार्गावर व्हाॅल्वो बस धाडावी असे वाटले नाही. असे का ? हा मला कायम छळणारा प्रश्न आहे.
- नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकात जगभरातल्या अनेक बसेस जरी भारतात अवतरल्यात तरी व्हाॅल्वो ती व्हाॅल्वोच या प्रांजळ मताचा, चंद्रपूरप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
यापूर्वीच्या सविस्तर आठवणींचा लेख इथे.



Sunday, May 4, 2025

नागपूरकर आणि हापूस

पु.ल. म्हणाले होते की नागपूरकरांच्या "या नागपूरला संत्री बिंत्री खायला" या आमंत्रणाला प्रतिसाद देण्याच्या भानगडीत मुंबईकराने पडू नये. मुंबई ते नागपूर जाणेयेणे प्रवासभाडे लक्षात घेता मुंबईत संत्री स्वस्त मिळतात.

त्याच्या अगदी १८० अंश विरोधात नागपूरकर (किंवा कुठलाही वैदर्भिय) आणि हापूस यांचे नाते आहे.
एकतर वैदर्भिय माणसाला हापूसचे अजिबात कौतिक नाही. खूप जणांनी शिफारस केल्यानंतर "तो हापूस हापूस म्हणतात तो आंबा खाऊन तरी बघू" असे म्हणून तो हापूस विकत घ्यायचा विचार करतो न करतो तोच...
...नागपूरातले हापूसचे दर ऐकून यापेक्षा याच खर्चात दोन माणसांनी रत्नागिरीला / देवगडला जाऊन यापेक्षा दुप्पट हापूस खाऊन परतता येते हे गणित त्याच्या लक्षात येते.
इथे एक वैदर्भिय खवैय्या माणूस किमान ५ किलो आंब्याचा रस दोन तीन दिवसात खातो हे गृहीत घेतले आहे. बादल्या बादल्यांमध्ये आंब्याचा रस भरलेला, पंगतीत आग्रह करकरून १० - १० वाट्या आंब्याचा रस वाढलेला (सोबत कांद्याचे भजे, तोंडीलावणे म्हणून भोकराचे लोणचे) त्याने बघितला असतो. तेवढा हापूसचा रस दोन माणसांनी नागपुरात खायचे ठरवले तर त्या किंमतीत तेच दोघे जण कोकणात जाऊन तेवढाच रस खाऊन परतू शकतात.
आणि सगळ्यात कहर म्हणजे शेवटी तो हापूस खातही नाही आणि रत्नागिरी /देवगडलाही जात नाही.
- ठाणे/मुंबईत मुक्कामी असताना दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत नागपूरला परतताना आवर्जून दोन तीन पेट्या हापूस घेऊन जाणारा हापूस प्रेमी, बेलमपल्ली (उच्चारी बैंगनफल्ली) धर्मी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, May 1, 2025

एक झोका : आठवणींचा

आज संध्याकाळी घरी परतताना थोडासा रिमझिम पाऊस पडत होता. गाडीत नेमका "गारवा" अल्बम लागलेला होता.

मराठी गाण्यांमध्ये मी पुण्याची गाणी आणि मुंबईची गाणी असे दोन प्रकार मानत आलेलो आहे. शब्दप्रधान गायकीची, मोजक्याच वाद्यवृंदासह घनगंभीर गायलेली गाणी पुण्याच्या (गायक / वादक / गीतकार) संचातली असतात.
तर सुंदर वाद्यवृंदात, शब्दांना हवे तितकेच महत्व देऊन केलेली मेलोडियस गाणी ही मुंबईच्या (गायक / वादक / गीतकार) संचातली असतात हे माझे निरीक्षण आहे.
तर "गारवा" अल्बम टिपीकल पुणेरी संचातला आहे. गाणी, त्यांची सुरावट ऐकता ऐकता आणि बाहेरचे कुंद, सर्द वातावरण बघता अनुभवता मी ३५ वर्षे भूतकाळात गेलो.
अचानक मला पुण्यावरून कराडचा प्रवास एस. टी. ने करणारा द्वितीय किंवा तृतीय वर्ष अभियांत्रिकीतला राम दिसायला लागला. सातारा बसस्टॅण्ड साधारण दुपारी ३.०० - ३.३० ला सोडलेले. सातार्याची खिंड ओलांडून त्यावेळेसच्या NH 4 ने बस कराडच्या दिशेने धावतेय. वातावरणात मळभ दाटून आलेले. दूरवरचा साखर कारखाना आणि तिकडे ऊस घेऊन जाणार्या ट्रॅक्टर्सची, बैलगाड्यांची रांग दिसतेय. उद्यापासून पुन्हा काॅलेज, सबमिशन्स, अभ्यास याचे रहाटगाडगे सुरू होणार या जाणीवेने मन हळुहळू कातर होत चाललेय. उंब्रज बसस्थानकावरून बस कराडकडे निघाली की चाफळ फाट्याकडे बघून बसमधूनच त्या दिशेला हात जोडत, "रामराया, सांभाळून घे रे बाबा. सीतामाई, लक्ष राहू दे गं बाई. लक्ष्मणा, वेळीप्रसंगी धावून ये रे बाबा."
"हनुमंता, सदैव सोबत रहा रे मित्रा. रामदासस्वामी महाराज, आशीर्वाद कायम पाठीशी असू द्यात." अशी अत्यंत करूणायुक्त भावनेने या सगळ्यांना घातलेली साद आठवते.
काहीकाही स्वर, काहीकाही दिवसवेळा अशा असतात की अगदी बालपणीचा कुहीकर वाडा आठवतो. त्या वाड्यातल्या दोन खोलींच्या २२५ स्केअर फूटच्या घरातली हिवाळी दुपार आठवते. आईच्या कुशीत, कधी तिच्या मांडीवर डोके ठेऊन गोधडी पांघरून पसरलोय. आई काहीतरी बोलतेय, कधी तिच्याविषयी, कधी तिच्या आपल्याबद्दलच्या स्वप्नांविषयी, कधी एखादी गोष्ट सांगतेय तर कधी संत गजानन प्रार्थना स्तोत्र पुटपुटतेय. त्या ग्लानीतच झोप लागतेय.
ते सुख, तो आनंद पुन्हा भोगावासा वाटण्यासाठी यानंतर किती जन्म घ्यावे लागतील ? हे सांगता येणार नाही. या जन्मात तर आता आईच्या मांडीवर झोपायला आता आई नाही, कुहीकरांचा वाडाही नाही आणि आता ते बालपणही नाही.
कुठल्या क्षणी कुठल्या एखाद्या वासामुळे, स्वरामुळे, वातावरणामुळे मन किती आणि कुठे जाईल ? किती भूतकाळात जाईल ? किती भविष्यात घेऊन जाईल ? काहीच सांगता येत नाही. मन तिथेच रमून जाते.
गाडीच्या टायर्सना, एंजिनला नेहेमीची सवय झाली आहे म्हणून गाडी सुखरूप घरी घेऊन आली एव्हढेच. बाकी आज मन भलतीकडेच होते. हात यांत्रिकपणे स्टिअरींगवर, गियर नाॅबवर आणि पाय सरावाप्रमाणे ब्रेकवर, अॅक्सीलेरेटरवर चालत होते, बस्स.
- मनाला जेवढे ताब्यात ठेवण्याचा जेवढा अट्टाहासाने प्रयत्न करू तेवढे मन नाठाळ घोड्याप्रमाणे उधळते हे जाणणारा (आणि त्याचबरोबर कधीकधी कसलाही प्रयत्न न करता मन इतके नितळ तळ्यासारखे होते की मनाच्या खोलखोल तळ्यात आपण आरपार बघू शकतो, त्याचा अंदाज घेऊ शकतो हा अनुभव घेणारा) सर्वसामान्य माणूस प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, April 13, 2025

चैत्र पौर्णिमेची एक आठवण: कायम काळजात रुतून बसलेली

मी बालपणापासूनच खूप नातेवाईकांशी, मित्रांशी अगदी नियमित पत्रसंवाद साधलेला आहे. आणि मलाही तितकीच पत्रे अनेक नातेवाईक आणि मित्रांकडून प्राप्त झालेली आहेत. मला आलेली सगळी पत्रे मी अगदी जतन करून ठेवलेली आहेत कारण त्यातले काही काही नातेवाईक असे आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात अवघी दोन तीन पत्रे लिहीली असतील त्यातले एक पत्र मला आलेले आहे. 


मी आणि माझ्या प्रिय पत्नीचे लग्न फ़ेब्रुवारी २००० मध्ये ठरले, मार्च २००० मध्ये साक्षगंध साखरपुडा विधी झाला आणि लग्न मात्र डिसेंबर  मध्ये झाले. त्या ८-९ महिन्यांच्या प्रियाराधनाच्या काळात मी माझ्या वाग्दत्त वधूला आठवड्यातून तीन अशी पत्रे पाठवलीत. तिनेही तितक्याच उत्कटतेने तेव्हढीच उत्तरे मला लिहीलीत. मी पाठवलेल्या पत्रांची तिने एक फ़ाईलच करून ठेवली होती तर तिने पाठवलेली एकूण एक पत्रे मी जतन करून ठेवली होती.



लग्नानंतर मग आम्ही माझे पत्र त्यावर तिचे उत्तर अशी ती सगळी पत्रे पुन्हा लावून जपून ठेवलीत. तो काळच वेगळा होता. 


चैत्र पौर्णिमेला सौ. वैभवीच्या माहेरी कुळाचार असतो. मला अत्यंत आवडते म्हणून तिने पुरणपोळी आणि वडाभात याच दिवशी शिकून घरचा कुळाचार केलेला होता. बरोबर २५ वर्षांपूर्वी. तिने पाठवलेले ते पत्र आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याची एखादी गोष्ट शिकून घेण्याची तिची मनिषा ही माझ्या काळजात खोल रूतून बसलेली आहे. दरवर्षीची चैत्र पौर्णिमा माझ्या अशीच, ह्याच आठवणीत लक्षात राहते.




एका संपूर्ण अनोळखी व्यक्तीशी जन्मभराचेच नव्हे तर अनंत जन्मांच्या पलिकडले नाते असेच जोडले जात असेल का ?


- सौ. वैभवीच्या सहवासात असताना "अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी" या वृतीने जगत असलेला, संपूर्ण वैभवीमय झालेला प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



सजणा पुन्हा स्मरशील ना




Sunday, February 9, 2025

काहीकाही मंडळी व्यवसाय का करतात हे कोडे

काहीकाही माणसे आपापला व्यवसाय कसा करीत असावीत ? हा प्रश्न मला पडतो. आणि ते जाणून घेतल्यानंतर ती माणसे तो व्यवसाय करीत तरी का असावीत ? हा सुध्दा प्रश्न पडतो.

मागे मी माझ्या अत्यंत आवडत्या अशा नागपूर - चंद्रपूर मार्गावर साधारण १९९२ पासून धावत असणार्या खाजगी गाड्यांविषयी एक सविस्तर लेख लिहीला होता. (लेख इथे)
साधारण १९९२ पासूनच नागपूरच्या R G Gupta यांच्या धनश्री ट्रॅव्हल्सची एक बस या मार्गावर नियमित सेवा देतेय. इतर सगळ्या ट्रॅव्हल्स आपापल्या बसेसच्या या मार्गावर किमान ४ फेर्या (दोन वेळा चंद्रपूर ते नागपूर जाऊन येणे) व्हाव्यात या अट्टाहासात असताना ही ट्रॅव्हल्स मात्र सुरू झाल्यापासून फक्त २ फेर्या करते. सकाळी ९.३० च्या सुमारास नागपूरवरून निघून १२.३० - १२.४५ वाजता चंद्रपूर गाठणे आणि तिथून दुपारी ३.४५ ला परतीचा प्रवास सुरू करून संध्याकाळी ७.०० - ७.१५ पर्यंत नागपुरात परत येणे एवढाच प्रवास ही ट्रॅव्हल्स करीत आलेली आहे. दोन्हीही कडून या वेळा Non Prime अशा वेळा आहेत. या वेळांमध्ये फारसे प्रवासी उपलब्ध नसतात, कुठल्याही मौसमात. या मार्गावरचा prime time म्हणजे सकाळी ६ ते ८ पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते ८ पर्यंत.
बरे या मार्गावर यांची बसही कायम मिडी बस असते. बाकी ट्रॅव्हल्स चालवतात तसली पूर्ण लांबीची ४५ आसनी बस यांनी कधी चालवलीच नाही. कायम २५ ते ३० आसनी बस हे चालवतात.
बरे पहिल्यापासून इंदूर इथल्या कुठल्यातरी स्थानिक बस बाॅडी बिल्डरकडे बांधलेली बसच हे लोक निवडतात. बाकी ट्रॅव्हल्स आपल्या मिडी बसेस टाटा मार्कोपोलो, भारत बेन्झ सतलज वगैरे आणून चालवत असताना मात्र यांनी इंदूरशी आपली निष्ठा सोडली नाही. कुणाशीही कधीच स्पर्धा न करता आपली सेवा प्रदान करताना यांना किती नफा होत असेल ? किंबहुना काही नफा होतोय की ३० वर्षांपासून ही सेवा तोट्यातच चाललेली आहे ? असे प्रश्न मला पडतात. बरे यांच्या गाडीची ना कधी खूप जाहिरात ना यांच्या गाडीचे काही विशेष आकर्षण (USP).
मग आजच्या या स्पर्धात्मक जगात ही ट्रॅव्हल कंपनी आपला व्यवसाय कसा करतेय ? आणि मुळातच का करतेय ? या व्यवसायात गेल्या ३० - ३३ वर्षात स्वतःच्या बिझिनेस माॅडेलमध्ये यांना काही बदल आणावेसे वाटलेच नाहीत का ? हे प्रश्न मला कायम छळतायत.
नित्य बदलणार्या आजच्या जगात ही अशी न बदलणारी माणसे, कंपन्या आशादायक आहेत असे समजावे ? की ते असा व्यवसाय करीतच का असतील या विचाराने अस्वस्थ व्हावे ?
"एक साधा प्रश्न माझा
लाख येती उत्तरे
हे खरे का ते खरे ?
ते खरे का ते खरे ?"
- बसगाड्यांचा, मनुष्यप्राण्यांचा आणि बिझिनेस माॅडेल्सचा व्यासंगी अभ्यासक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, February 1, 2025

व्यक्ति तितक्या प्रकृती आणि तितक्याच प्रतिक्रिया

 

या बसकडे बघितल्यावर वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया होईल.

आम्हा बसफॅन्सना ही बस पाहिल्यावर
"एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी" ही ओळ आठवेल.

कारण ही बस महाराष्ट्र एस टी च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने माईल्ड स्टील मध्ये साधी परिवर्तन बस म्हणून बांधण्याआधी पनवेलच्या अॅण्टोनी गॅरेजने बांधलेली निमआराम बस होती. निमआराम म्हणून तिच्या सेवेची वर्षे संपल्यानंतर नागपूर कार्यशाळेने तिला सध्याचे रूप दिले. एकाच जन्मात ती पुन्हा नव्याने जन्मली.
ब्युटी पार्लर मधले बारकावे जाणणार्या भगिनी वर्गाची प्रतिक्रिया
"अग बाई, तिच्या आयब्रोज *eye brows) किती छान कोरल्यात, न !"

अशी असू शकेल.

तर

विदर्भातल्या इच्चक पोट्ट्यांची प्रतिक्रिया
"अबे ते डिझेल भरल्यावर त्याच झाकण त लावत जा बे. पब्लिकचा माल हाये म्हनून सन्यान काई...ई करतेत ह्ये."
अशीही असू शकेल.
MH - 06 / S 8908
मूळ बांधणीः अॅण्टोनी बस बाॅडी बिल्डर्स, पनवेल. निमआराम बस. २ बाय २.
पुनर्बांधणीः एस. टी. ची मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर. परिवर्तन बस. २ बाय २
अ. रिसोड आगार
रिसोड आगार, अकोला विभाग
शेगाव जलद रिसोड
मार्गेः बाळापूर - अकोला - पातूर - मालेगाव (जहांगीर) - शिरपूर (अंतरिक्ष पारसनाथ)
खरेतर बाळापूर ते पातूर हे सरळ अंतर फक्त ३० - ३५ किलोमीटर्स असताना ही बस अकोला मार्गे जवळपास ५० किलोमीटर्स लांबचा पल्ला घेऊन का जाते ? हे एक कोडेच आहे.
- एकाच वेळी बसफॅन, काकूबाई आणि इच्चक कार्ट्याच्या दृष्टीने विचार करू शकणारा सर्वसामान्य माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.