Friday, May 7, 2021

लॉकडाऊन आणि आमचा आहार.

 या लाॅकडाऊनमध्ये दोन दिवस आधीच घरात पुरेशा भाज्यांचा साठा करून ठेवला खरा...

पण लक्षात आले की मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्येही भाज्या नसतानाही आपले काही अडले नाही.
मुळात सकाळ संध्याकाळ चारीठाव स्वयंपाक हवाच ही आमच्या कुटुंबात सवयच नाही. ९० % वेळा संध्याकाळी one dish meal ने भागतं. ही कालपरवाची नव्हे तर गेल्या १५ वर्षांची सवय लागलीय. हल्ली तर संध्याकाळी आयोजित केलेल्या लग्नसमारंभामध्ये जाऊन रात्री ९ नंतर ते जड जेवण करायचे जिवावरच येत. अशावेळी यजमानांची नजर चुकवून थोडासा भात खाऊन "छान कॅटरर बोलावलाय हो. मस्त झालय सगळं." असे यजमानांशी सपशेल खोटे बोलून सटकण्यामध्येच शक्ती खर्च करावी लागते.
सकाळी भाजीऐवजी बेसन (पिठलं नाही ह), झुणका, चिंचगुळाचे आंबटगोड फोडणीचे वरण (आमटी नव्हे हं), वरणफळे, शेवभाजी, गोळाभात, वडाभात, भरडाभात, मुगवड्या, डुबुकवड्या (चुबकवड्या), कढीगोळे आणि मसुरापासून मटकीपर्यंत असंख्य कडधान्यांच्या उसळी असताना कशाला भाजीची आठवण येतेय ?
अर्थात यात आमच्या सुगरण सुगृहीणीचा सिंहाचा वाटा आहे. वपु काळे म्हणतात "कुठल्याही पदार्थाची चव तो पदार्थ ज्या भावनेने तुम्हाला offer केला जातो त्याची असते. नंतर त्यातल्या साहित्याची."
त्याप्रमाणेच घरी कांदा लसूण असो नसो, लिंबू, मिरच्या, आले इत्यादी accessories असोत, नसोत तरी मन लावून स्वयंपाक करून तो पदार्थ चविष्ट बनविण्यामध्ये त्या गृहिणीचा खूप मोठ्ठा हातगुण असतो. एखाद्या अन्नपूर्णेने नुसती पाण्याला जरी फोडणी घातली तरी ते पाणी चविष्ट लागेल. बालपणापासून अशाच अन्नपूर्णास्वरूप असलेल्या माझ्या आईचा हातचा आणि लग्नानंतर तितकीच सुगरण असलेल्या माझ्या पत्नीचा हातचा स्वयंपाक खाण्याचे भाग्य मला लाभले याचे कारण म्हणजे श्रीसदगुरूकृपेने माझ्या नित्यपाठात असलेले,
"माता च पार्वती देवी
पिता देवो महेश्वरा..."
आणि
"पत्नीं मनोरमां देहि
मनोवृत्तानुसारिणीम.."
हे दोन श्लोक.



यानिमित्ताने शिरपूर मुक्कामी असताना खाल्लेल्या धुळे जिल्ह्यातल्या गावठी मटक्यांची आठवण झाली. खान्देशातल्या मातीचा गुण तिथल्या माणसांइतकाच धान्यामध्येही उतरला आहेच. नुसत्या मोड आलेल्या मटक्या इतक्या गोड लागायच्यात की भाजी करण्याआधी अर्ध्या तर नुसत्याच खाऊन संपायच्यात.
- खादाड असला तरी "अमुकच पदार्थ हवा" असा आग्रह न करणारा, आशुतोष वृत्तीचा राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment