Saturday, May 1, 2021

विदर्भ एक्सप्रेस: १ मे १९८८. तिच्या पहिल्या प्रवासाच्या आठवणी

 १ मे. आज माझ्या लाडक्या विदर्भ एक्सप्रेसचा वाढदिवस. आज विदर्भ ३३ वर्षांची झाली. माझ्या एकूण प्रवासांपैकी ३० % प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेसने, २० % सेवाग्राम एक्सप्रेसने, ४० % प्रवास विदर्भ एक्सप्रेसने केलाय. उरलेला १० % प्रवास इतर सगळ्या गाड्यांमधून केलाय. त्यामुळे या गाडीविषयी एक विशेष स्थान माझ्या मनात आहे. त्या गाडीशी निगडीत असलेल्या भावविश्वाबाबत माझा हा लेख इथे वाचायला मिळेल.

 १ मे १९८८ रोजी पहिल्यांदा विदर्भ एक्सप्रेस नागपूर ते मुंबई दरम्यान धावली तो दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. नागपूर ते मुंबई प्रवासासाठी थेट अशी एकच गाडी त्याकाळी होती. नागपूर - दादर सेवाग्राम एक्सप्रेस. (सध्याची १२१३९ /१२१४०) ही गाडी नागपूरवरून रात्री १० वाजून १० मिनिटांनी निघायची ती मुंबईत दुस-या दिवशी दुपारी ३ वाजता पोहोचायची. परतीच्या प्रवासात हीच गाडी दादर टर्मिनसवरून दुपारी १२.१० ला निघायची तर नागपूरला दुस-या दिवशी पहाटे ५.५५ ला पोहोचायची. थोडक्यात सांगायचे म्हणजे सेवाग्राम एक्सप्रेस ही "लेकुरवाळी" गाडी होती. साधारण जानेवारी १९९७ च्या सुमारास सेवाग्राम एक्सप्रेस जलद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि सध्याच्या तिच्या वेळा निश्चित झाल्यात.




१९८७ - १९८८ पर्यंत नागपूरवरून मुंबई गाठायचे किंवा मुंबईवरून परतायचे म्हणजे एकमेव सोयाची गाडी म्हणजे हावडा - मुंबई मेल.  (सध्याची १२८०९ / १२८१०) दुपारी ४ वाजता नागपूरवरून निघून सकाळी ७ पर्यंत मुंबई आणि परतताना रात्री ८ वाजता मुंबईवरून निघून सकाळी ११ वाजता नागपूर गाठणारी ही गाडी सोयीची होती खरी पण हावडा ते मुंबई अशी असल्याने नागपूरकर मंडळींसाठी या गाडीत फ़ार कमी जागा उपलब्ध असत आणि ऐनवेळी प्रवास करणा-यांची पंचाईत होई.

 तशा नागपूर ते मुंबई प्रवाससाठी आणखी दोन गाड्या होत्या. हावडा - मुंबई एक्सप्रेस (सध्याची १८०२९ / १८०३०) आणि गीतांजली (सध्याची १२८५९ / १२८६०) हावडा - मुंबई एक्सप्रेस नागपूरवरून दुपारी १२.३० ला निघायची ती मुंबईला दुस-या दिवशी सकाळी ६.०० च्या सुमारास पोहोचायची. परतताना मुंबईवरून रात्री ९.०० ला निघून नागपूरला दुस-या दिवशी दुपारी ३.०० वाजता पोहोचायची. त्यामुळे भरपूर वेळ हाताशी असल्याशिवाय या गाडीने प्रवास करणे शक्यच नसायचे. आणि गीतांजली दोन्ही बाजूंचा प्रवास दिवसाच्या वेळेला करीत असल्याने, तिच्यातून प्रवास म्हणजे ऑफ़िसवाल्यांसाठी "एक संपूर्ण दिवस वाया घालवणे" होते. (जरी रेल्वे फ़ॅन्ससाठी या गाडीचा प्रवास म्हणजे पर्वणी होती तरी सर्वसामान्य कर्मचारी या गाडीला फ़ारसे पसंत करीत नसत.)

 तेव्हा नागपूरला वसंतराव साठे (बापुसाहेब) हे ज्येष्ठ कॉंगेसी नेते होते. गांधी परिवारात भरपूर वट असलेले आणि (त्यामुळेच) दिल्लीच्या राजकारणात भरपूर वजन असलेले बापुसाहेब नागपूरविषयी अभिमानी व्यक्ती होते. बापुसाहेब तेव्हा महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त होऊन गेलेले होते. १९८८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात, तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांच्याकडून, बापुसाहेबांनी नागपूर ते मुंबई दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणारी एक सुपरफ़ास्ट एक्सप्रेस मंजूर करवून घेतली होती. नागपूरवरून सुटणारी ही पहिलीच सुपरफ़ास्ट असल्याने सगळ्या नागपूरकरांना या गाडीचे फ़ार अप्रूप होते.

 दरम्यान त्या नव्या गाडीचे उदघाटन १ मे रोजी होणार ही बातमी नागपुरात पसरली. त्याकाळी रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा झालेल्या गाड्या त्या वर्षभरातच सुरू व्हायच्याच. एका अर्थसंकल्पात गाडीची उदघोषणा करून पुढल्या ४ - ५ वर्षात गाड्या सुरू करण्याचा भंगारपणा नितीश, लालू, ममतासारख्या समाजवाद्यांच्या भोंगळ कारभारात सुरू झाला आहे. नवी गाडी सुरू होणार म्हटल्यावर नागपूरकर आनंदले. या गाडीसाठी प्रयत्न करणारे बापुसाहेब साठे स्वतः या गाडीला पहिला हिरवा झेंडा दाखवायला नागपूर स्टेशनावर येणार होते.

या गाडीचे जे वेळापत्रक मध्य रेल्वेने दिले ते सगळ्यांनाच थोडे अचंब्यात पाडणारे होते. ही सुपर गाडी नागपूरवरून रात्री ११ वाजता निघणार होती आणि मुंबईला दुस-या दिवशी दुपारी २ वाजता पोहोचणार होती. परतीच्या वेळेत हीच गाडी मुंबईवरून दुपारी ४ वाजता निघून दुस-या दिवशी सकाळी ७ वाजता नागपूरला येणार होती. म्हणजे ज्या सोयीस्कर वेळांच्या उद्देशाने ही गाडी सुरू करण्याचा घाट बापुसाहेबांनी घातला होता तो सगळाच वाया चालला होता. तरीही मूळच्याच सोशिक असलेल्या नागपूरकरांनी "वेळेच नंतर बघू. पहिल्यांदा गाडी तर पदरात पाडून घेऊ" म्हणत ही अडनिडी वेळही स्वीकारली होती. (गंमत म्हणजे मुंबई - नागपूर मार्गावर नवी कोरी सुपरफ़ास्ट गाडी टाकायची म्हटलं की मध्य रेल्वे हीच वेळ निवडते. पहिल्यांदा काही महिने मुंबई - हावडा ज्ञानेश्वरी सुपर डीलक्स एक्सप्रेस चालवली ती नागपूर ते मुंबई याच वेळेवर. अजूनही हावडा - मुंबई दुरांतो ही मध्य रेल्वेची गाडी याच वेळांवर धावते. अर्थात दुरांतोची धाव वेळ कमी असल्याने मुंबईला पोहोचणारी दुरांतो दुपारी १२ वाजता पोहोचते आणि नागपूरला पोहोचणारी दुरांतो पहाटे ३.४० ला पोहोचते.)

 बरं, दुसरा वादाचा मुद्दा होता तो म्हणजे या सुपर गाडीचे मर्यादित थांबे. विदर्भातल्या लोकांच्या सोयीसाठी असलेली ही गाडी विदर्भात फ़क्त बडनेरा आणि अकोला हे दोनच थांबे घेणार होती. नंतर वर्षभरातच वर्धा, धामणगाव, मूर्तिजापूर, शेगाव याठिकाणी प्रवाशांनी आंदोलने उभारून या सुपर गाडीचा त्या त्या ठिकाणी थांबा मिळवला होता. पण पहिल्या गाडीच्या वेळी ही एक नाराजी विदर्भातल्या जनतेच्या मनात होतीच.

कुठलीही नवीन गाडी सुरू करायची म्हटल्यावर त्या गाडीसाठी नव्या को-या कोचेसच्या रेकची व्यवस्था रेल्वेचा तो तो विभाग करीत असतो. जमलेच तर नवे कोरे एंजिनही त्या गाडीला उपलब्ध होण्याचीही व्यवस्था त्या त्या विभागाकडून होत असते. हा नियम नव्हे. पण हा एक संकेत म्हणून रेल्वे त्या काळी पाळत होते. १ मे रोजी सकाळीच आम्ही काही रेल्वेफ़ॅन आणि काही पत्रकारही नागपूर रेल्वे स्थानकावर नव्या रेकचा, नव्या एंजिनाचा अंदाज घ्यायला गेलो होतो. पण नवा रेक, नवे एंजिन काही दृष्टीपथास आले नाही. रात्रीपर्यंत भरपूर वेळ आहे, तोवर येईल नवा रेक आणि नवे एंजिन अशी मनाची समजूत घालून आम्ही परतलो.

 रात्री १० च्या सुमारास फ़लाट क्र. १ वर (नागपूरचा तेव्हाचा एकमेव "होम प्लॅटफ़ॉर्म". आता ८ नंबर सुद्धा "होम प्लॅटफ़ॉर्म" झालाय.) बापुसाहेब आणि इतर व्हीआयपी मंडळी उपस्थित झाली. पण तोपर्यंतही नव्या रेकचा, नव्या एंजिनाचा पत्ता नव्हता. नव्या गाडीला शानदार आणि छानछान फ़ुलांचे डेकोरेशन करण्याचा प्रघात रेल्वेत फ़ार पूर्वीपासून आहे. अजूनही हा प्रघात आहे. पण तशीही काही व्यवस्था प्लॅटफ़ॉर्मवर नव्हती. साधारण रात्रीचे १०.३० झाले आणि विदर्भ एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासाच्या अभूतपूर्व नाट्याला सुरूवात झाली.

 त्यावेळी नागपूरला शंटिंगसाठी कोळसा एंजिने वापरली जायची. नागपूर ते भुसावळ प्रवासासाठी महाराष्ट्र आणि सेवाग्राम एक्सप्रेसलाही कधीकधी वर्धा शेडचे कोळसा WG वर्गाचे एंजिन मिळायचे. WG  वर्गाचे एंजिन हे सहसा मालगाड्यांसाठी वापरले जायचे तर WP वर्गाचे एंजिन प्रवासी गाड्यांना लागायचे. पण नागपूर विभागातल्या महाराष्ट्र आणि सेवाग्राम एक्सप्रेसच्या नशिबात हे सुद्धा भाग्य नव्हते. रात्री १०.३० वाजता एक असेच कोळसा एंजिन नागपूर यार्डातून निघाले आणि नागपूर यार्डात रात्री मुक्कामाला असणा-या भुसावळ पॅसेंजरचे काही जनरल कोचेस, इटारसी पॅसेंजरचे काही जनरल कोचेस, सेवाग्राम एक्सप्रेसचे जादा म्हणून यार्डात ठेवलेले काही शयनयान कोचेस आणि यार्डात ठेवलेला एक प्रथम वर्गाचा डबा घेऊन शंटिंग करून प्लॅटफ़ॉर्म १ वर विदर्भ एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासाचा रेक तयार करू लागले. प्लॅटफ़ॉर्म १ च्या शेजारी दूरवर कुठेतरी इटारसी शेडचे WDM 2  वर्गाचे (अर्थात जुनेच) एंजिन या गाडीच्या पहिल्या प्रवासासाठी तयार होते. ते जुनेपुराणे डबे पाहिले आणि आतापर्यंत (अडनिडे वेळापत्रक, विदर्भात नसलेले थांबे या कारणांमुळे) रोखून ठेवलेला नागपूरकरांच्या संयमाचा बांध फ़ुटला. नागपूरकर माणूस सरका रायला न बाबू, त लय सरका रायते. पन कोनी त्याले मुद्दामून सरकवला का नाय, का त्याचा माथाच सरकते. आन मंग थो अस्सा उखडते का नाय, का बाप्पा रे बाप्पा.

 नागपूरकर जनतेने रेल्वेच्या आणि सरकारच्याही निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. बापुसाहेब साठेंनीही हा रेल्वेचा अनास्था कारभार पाहून उदघाटन करण्याचे नाकारले. प्लॅटफ़ॉर्मवर एकच गोंधळ माजला. बापुसाहेब तिथून आपल्या घरी रवाना झालेत. लोकांना आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला त्यात महाराष्ट्र टाइम्सचे श्री गोडबोले म्हणून पत्रकार किरकोळ जखमीही झालेत. ज्या स्वस्तातल्या हारात कमीत कमी फ़ुले ओवल्याने त्यातल्या सूत्राचे दर्शन होत असते असा एक तीन फ़ुटी हार घालून विदर्भ आपल्या पहिल्या प्रवासाला निघाली. सगळ्या नागपूरकरांचे मन मोडून. एखाद्या गाडीच्या पहिल्या प्रवासाची अशी सुरूवात झालेली ही एकमेव घटना असावी.

नंतर कालांतराने विदर्भ एक्सप्रेसचे विदर्भातले थांबे वाढले. वेग वाढला. आठवड्यातून तीन दिवस धावणारी गाडी रोज धावायला लागली. वेळाही खूप सोयीच्या झाल्यात. १ मे १९९७ ला गाडीला नव्या डिझाईनचा, नव्या वैशिष्टांनी परिपूर्ण नवा कोरा रेक मिळायला लागला.



Special liveried coach of Vidarbha Express.
 



आज मध्य रेल्वे या गाडीला चांगली वर्तणुक देते. अगदी मध्य रेल्वेच्या लाडक्या पंजाब मेल (मुंबई - फ़िरोझपूर १२१३७ / १२१३८) किंवा चेन्नई एक्सप्रेस (दादर - चेन्नई १२१६३ / १२१६४) एव्हढी नसेल तरीही मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्डात विदर्भ एक्सप्रेसचा दबदबा आहे हे निश्चित. नागपूरकर मंडळींनी मुंबईत जाऊन आपला ठसा उमटवण्याचे हे आणखी एक उदाहरण.





 

- विदर्भच्या पहिल्या प्रवासापासून आजवरच्या प्रवासाचा एक जवळचा साक्षीदार, राम - द रेलफ़ॅन.

1 comment: