Tuesday, October 28, 2025

जुळल्या सगळ्या त्या आठवणी : N 9456

 बालपणी चंद्रपूरला जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्र एस. टी. च्या तीन प्रकारच्या बसेस होत्या.

सुपर (अती जलद) : या बसेस फ़क्त जांबचा थांबा घ्यायच्यात आणि नागपूर ते चंद्रपूर हे १५३ किलोमीटर अंतर ३ तास ते ३ तास २० मिनीटांत पार करायच्यात. या बसेसचा मार्गफ़लक पांढ-या पार्श्वभूमीवर लाल, केशरी अक्षरे आणि असे तिरप्या स्टाईलमध्ये हिरव्या अक्षरांमध्ये सुपर लिहीलेले असे असायचे. सुपर एक्सप्रेस बसेसबाबत आठवणींचा व्हिडीयो इथे.



1512 टाटा कमिन्स. बी. एस. 3 इमिशन स्टॅण्डर्डस ची बस. २०११.

एक्सप्रेस (जलद) : या बसेस जांब बरोबर वरोरा, भद्रावती (आणि काहीकाही बसेस डिफ़ेन्स, भद्रावती) पण थांबा घ्यायच्यात. नागपूर ते चंद्रपूर या १५३ किलोमीटर प्रवासासाठी या प्रकारच्या बसेस ३ तास ३० मिनीटे ते ४ तास असा वेळ घ्यायच्यात. अर्थात हा वेळ या मार्गात लागणारी खापरी, बुटीबोरी, ब्राह्मणी, (एक्सप्रेस बसेससाठी) वरोरा, ताडाळी आणि (क्वचितच) डिफ़ेन्स, भद्रावती इथली रेल्वे फ़ाटके मोकळी मिळताहेत की बंद मिळताहेत आणि बंद मिळालीत तर किती खोळंबा होतोय या बाबींवर पण अवलंबून होता.

या बसेसचा मार्गफ़लक पांढ-या पार्श्वभूमीवर लाल रंगातली अक्षरे असा असायचा.



नागपूर सुपर राजुरा. राजुरा आगार, चंद्रपूर विभाग. २०१० - ११ या वर्षात मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेली २३३ वी नवीन टाटा बस.

साधारण सेवा (ऑर्डिनरी) : या बसेस चंद्रपूरला दोन मार्गे जायच्यात. पहिला मार्ग हा धोपट मार्ग. त्यात त्या बुटीबोरी, जांब, खांबाडा, व्होल्टास फ़ॅक्टरी, आनंदवन, वरोरा, भद्रावती, ताडाळी, पडोली असे अनेक थांबे घेत नागपूर ते चंद्रपूर हे १५३ किलोमीटर अंतर ४ तास ते ४ तास ३० मिनीटांत पार करायच्यात. या गाड्यांमध्ये आगाऊ आरक्षण करून बसण्याची सोय नव्हती.

आणखी एक मार्ग म्हणजे नागपूर ते चंद्रपूर जुना रस्ता. उमरेड, भिवापूर, नागभीड, सिंदेवाही, मूल मार्गे. या मार्गाने नागपूर ते चंद्रपूर हे अंतर २०० किलोमीटर्स पडत असे. त्यासाठी या बसेसना तब्बल ५ तास लागत असत. 

प्रवासासाठी आमची पसंदी कायम सुपर बसेसना असे. अगदीच नाईलाज झाला, कधी आरक्षणे मिळालीच नाहीत तरच मग जलद बस. पण साधारण सेवा बसेसनी आम्ही या मार्गावर कधीही प्रवास केला नाही.

१९९० च्या दशकात खाजगी बसेसची सेवा सुरू झाली आणि एस. टी. बसेसचे एकूणच ग्लॅमर ओसरले. रिझर्वेशन करून जाणे वगैरे प्रकार इतिहासजमा झालेत. स्पर्धेत आपली एस. टी. खूप मागे पडली. मग सुपर, जलद, ऑर्डिनरी हे प्रकार जणू विस्मृतीच्या कप्प्यातच गेलेत.




साधारण १४ वर्षांपूर्वी नागपूरच्या हिंगणा मध्यवर्ती कार्यशाळेत बनलेली ही बस आणि या बसवरचा सुपर हा बोर्ड दिसला आणि गाण्यांच्या ओळीच आठवल्यात.

स्वर आले दुरूनी

जुळल्या सगळ्या त्या (सुपर बसच्या, बालपणाच्या) आठवणी.

- बसप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


Wednesday, October 22, 2025

अरनॉल्ड तानवडे आणि सिल्व्हेस्टर किन्हीकर

बालपणापासूनच आमची तब्येत म्हणजे सिंगल हड्डी, अगदी काडी पहेलवान अशी. त्यामुळे आम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलला प्रवेश घेतला तेव्हा आम्ही वयाची विशी आणि वजनाची तिशी गाठायचीच होती. हॉस्टेलला चार वर्षानंतर पदवी मिळवताना आमचे वजन फ़क्त ४२ किलो होते हे मी आज अत्यंत आनंदाने नमूद करू इच्छितो. तडतडा स्वभाव आणि त्यामुळे काटक शरीर. शिवाय आज जेव्हढा मी फ़ूडी आहे तेव्हढा माझ्या तरूणपणात नव्हतो. माझी आई अगदी अन्नपूर्णा होती. तिला विविध पदार्थ करता येत असत आणि तिच्या हाताइतकी उत्तम चव कुठेच नाही म्हणून बाहेरचे काही खाऊन बघण्याचा फ़ार सोस आम्हाला नव्हता. अगदीच आपदधर्म म्हणून बाहेर खावे लागले तर गोष्ट वेगळी पण मुद्दाम बाहेर जाऊन खाणे हा प्रकार नव्हता. एकतर तो काळ तसा नव्हता आणि तशा सोयीही फ़ारशा उपलब्ध नव्हत्या. तात्पर्य काय ! अनेकविध कारणांमुळे आम्ही सिंगल चे सिंगल हड्डीच राहिलेले होतो.


कराडला गेल्यानंतर पहिल्या वर्षीचे बुजरेपण गेल्यानंतर मग नवनवे मित्र, मैत्रिणी मिळायला लागलेत. मनुष्य नागपूरचा असो, नगरचा असो, सांगलीचा असो किंवा अगदी नाशिकचा असो त्याच्या घरी आपल्या घरच्यासारखेच वातावरण, संस्कार आहेत. एखाद्या गोष्टीबाबत त्याच्या क्रिया प्रतिक्रिया अगदी आपल्यासारख्याच आहेत ही जाणीव पटली की मग भौगोलिक अंतरे मनाच्या अंतरांशी कसलेही संबंध ठेवत नसत. "काय बेटे तुम्ही पुण्या मुंबईची माणसे !" असे वाक्य बोलणा-या माणसाने आयुष्यात एकदाही अकोला जिल्ह्याच्या पश्चिमेला पाऊल ठेवलेले नसते आणि "काय तुमच्या विदर्भात कायम दुष्काळ !" असे म्हणणा-या माणसाने त्याच्या आयुष्यात मुंबई - पुणे - नाशिक हा त्रिकोण ओलांडलेला नसतो. घराबाहेर रहायला लागल्यानंतर वृत्ती विशाल होते, दृष्टीकोन व्यापक होतो. "वसुधैव कुटुंबकम" ही वृत्ती अंगी बाणायला सुरूवात होते.


तसाच एक अत्यंत गुणी मित्र मला लाभला तो म्हणजे सांगलीचा सतीश सुरेश तानवडे. एक अत्यंत उत्तम गायक, अंगात एक उपजतच सांगलीकर फ़टकळपणा, कुठल्याही अवघड प्रसंगात अजिबात दडपण न घेता एखादा अत्यंत मार्मिक विनोद वापरून तो प्रसंग अगदी हलका करून टाकण्याचे त्याचे कसब आणि मित्र म्हणून जिवाला जीव देणारा "सत्या" आम्हा सर्व मित्रमंडळींमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. त्याउलट मी. एक "न कलाकार", भीडस्त स्वभावाचा, "नाही" म्हणायचे मनात असताना बहुतांशी वेळा "हो" म्हणून नंतर पस्तावणारा, अवघड प्रसंगांचे पटकन दडपण घेणारा. अशावेळी त्याची आणि त्याच्या अत्यंत विरूद्ध स्वभावाच्या माझी मैत्री कशी जुळली ? आणि इतकी वर्षे कशी टिकली ? हे एक कोडेच आहे. 


तसे आमचे मित्रमंडळ मस्तच होते. पण सगळे माझ्यासारखेच, अगदी सिंगल हड्डी. आमच्या मित्रमंडळींमध्ये मात्र आपण असे सिंगल हड्डी आहोत असा एक बोचणारा न्यूनगंड होता. बरे, जिम लावावी का ? या विषयावर प्रचंड मतभेद होते. बहुतांशी जणांचे म्हणणे असे की जिम लावायची, तिथे नियमाने जाऊन घाम गाळायचा आणि एव्हढे करून आपल्या अंगावर सध्या असलेले अडीच किलो मासही जिममध्ये जाऊन अंगावरून उतरून गेले तर ? नको, नकोच ती जिम. त्यामुळे जिमचा प्रश्नच निकालात निघाला होता. 


त्याकाळी बाजारात १० - १० रूपयांमध्ये अशी ए - 3 आकाराची, गुळगुळीत कागदांवर छापलेली नटनट्यांची, प्रसिद्ध क्रिकेटियर्सची पोस्टर्स मिळायचीत. आता हॉस्टेल म्हटले की तिथे ही सगळी पोस्टर्स भिंतींवर चिटकवणे आलेच. आमच्यातली काही अतिउत्साही मंडळी त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या विदेशी नटी "शेवंताबाई कोल्हे" (समझनेवाले समझ गये है.) यांचीही अर्धावृत्त, अनावृत्त पोस्टर्स लावायचीत. (आणि मग हॉस्टेल वार्डन सर किंवा प्राचार्य सरांचा हॉस्टेल राऊंड असल्यावर त्या पोस्टर्सवर तात्पुरते टॉवेल्स टाकून, कपडे लटकवून ती पोस्टर्स झाकायचा अगदी आटोकाट प्रयत्न करायचीत.)


आमच्या मित्रमंडळींनी मात्र आपल्या डोळ्यासमोर बॉडीबिल्डींगचा आदर्श असावा म्हणून त्याकाळच्या तगड्या क्रिकेट प्लेयर्सचे पोस्टर्स आमच्या रूम्सवर लावलेले होते. रोज सकाळी उठल्यानंतर आमच्या तत्कालीन मांडीएव्हढा दंड असलेल्या त्या क्रिकेट्पटूचे दर्शन घायचे आणि कधीतरी ५ - १० वर्षांनी आपलाही दंड त्याच्यासारखा होईल अशी दुर्दम्य आशा बाळगायची म्हणजे आज ना उद्या आपणही तितकेच बलदंड नक्कीच होऊ असा आमचा स्वतःवरच एक अत्यंत पॉझिटिव्ह असा मानसिक प्रयोग होता.


त्यात सतीश ने भर घातली. एकेदिवशी त्याच्या मनात काय आहे कुणास ठाऊक ! तो मला म्हणाला, "राम्या, आजपासून तू मला अरनॉल्ड स्वार्तझनेगर च्या धर्तीवर अरनॉल्ड तानवडे म्हणायचे आणि मी तुला सिल्व्हेस्टर स्टॅलीनच्या धर्तीवर सिल्व्हेस्टर किन्हीकर म्हणणार." झाले. त्याच्या अत्यंत आग्रही स्वभावानुसार आम्ही हा प्रयोग ते सेमीस्टरभर चालवला. कुठेही भेटलोत की "हाय अरनॉल्ड !" किंवा "हाय सिल्व्हेस्टर !" असे एकमेकांना अभिवादन करीत असू. या अभिवादनामुळे आमच्या मनात स्वतःविषयी तशी उच्च भावना जागृत होऊन काहीही विशेष प्रयत्न न करता आम्ही असेच मनाच्या पॉझिटिव्ह विचारसरणीच्या जोरावर तसे हट्टेकट्टे बनू ही आमची अगदी भाबडी समजूत. आज ते आठवलं की हसू येते. 


एव्हढही करून कॉलेजमधून पास होऊन परतताना आमच्या वजनांनी धड पन्नाशी सुद्धा गाठली नव्हती. हा फ़ोटो मी फ़ायनल इयरच्या परिक्षेनंतर कराड सोडून नागपूरला परतताना कराडच्या बसस्टॅंडवर काढलेला आहे. सतीश, मी आणि आमच्या दोघांचीही एक छान मैत्रिण वैशाली. आम्ही सगळेच अगदी काटक होतो. आज या सगळ्या वजनांचा आणि आपण तेव्हा किती काटक आणि फ़िट होतो याचा अक्षरशः हेवा वाटतो. मध्यंतरी सुखावण्याच्या काळात वजनाने ७५ गाठले होते आणि प्रकृतीच्या नवनवीन कुरबुरी सुरू झालेल्या होत्या ते आठवले की अंगावर काटा येतो. किती प्रयत्नांनी वजनाला काबूत आणता आले हे माझे मलाच माहिती.



जिममध्ये जाऊन कृत्रिम फ़ूड सप्लीमेंटस घेऊन, औषधे, इंजक्शने घेऊन बनविलेल्या त्या सिक्स पॅक शरीरांविषयीही आता काही वाटेनासे झाले आहे. वाटलीच तर फ़क्त कीव वाटतेय. या औषधांचे, इंजेक्शनांचे दुष्परिणाम जेव्हा या लोकांना जाणवायला लागतील तेव्हा यांच्यासारखे दुर्दैवी जीव हेच असतील असेही आज वाटून जाते. पण कॉलेजच्या काळात आमच्याकडे नसलेल्या या डबल हड्डी बॉडीचा आदर्श आमच्या डोळ्यांसमोर होता हे मात्र नक्की.


- पुन्हा एकदा कॉलेज जीवन अनुभवू इच्छिणारा, सिंगल हड्डी - डबल हड्डी आणि पुन्हा सिंगल हड्डी असा प्रवास करून आलेला एक विद्यार्थी सिल्व्हेस्टर किन्हीकर.





Tuesday, October 21, 2025

सध्या इंटरनेटवर अत्यंत व्हायरल झालेला मी काढलेला एक फ़ोटो.

१९९९ मध्ये मी काढलेला हा फ़ोटो सध्या इंटरनेटवर फ़ार व्हायरल झालेला आहे. खूपशा ग्रूप्समधून हा फ़ोटो महाराष्ट्र एस. टी. च्या जुन्या बांधणीच्या बसचा फ़ोटो म्हणून फ़िरतो आहे. गोष्ट खरी आहे. महाराष्ट्र एस. टी. च्या साध्या बसचे हे डिझाईन जवळपास चार दशके तरी तसेच होते.



हा फ़ोटो मी कोडॅक के. बी 10 या कॅमे-याने काढलेला आहे आणि नंतर त्याला स्कॅन करून डिजीटल रूपात बदललेला आहे. या फ़ोटोची प्रिंट आणि त्याचे निगेटिव्हज माझ्याकडे आहे. जुन्या काळी (साधारण २००८ - २०११ पर्यंत) फ़ोटोवर कॉपीराईट कसा टाकायचा ? याबद्दल मी अनभिज्ञ होतो आणि म्हणूनच १५ वर्षांपूर्वी हा फ़ोटो माझ्या फ़्लिकर अकाऊंटवर मी टाकला. तिथेही त्या फ़ोटोला जवळपास २४०० व्ह्यूज आलेले आहेत आणि एस. टी. मधल्या जाणका-यांच्या कॉमेंटसही.


मुंबईला दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापन करताना दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांच्या SURVEYING या विषयाचा कॅम्प म्हणून आम्ही सेंट झेव्हियर्स व्हिला, खंडाळा इथे आठवडाभर मुक्कामी असायचोत. या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाजवळच पुणे - मुंबई (जुन्या, NH 4) या महामार्गाचा बसथांबा होता. ज्यांनी जुन्या NH 4 ने मुंबई - पुणे - मुंबई प्रवास केलाय त्यांना ठाऊक असेल की खंडाळा गावातून मुंबई - पुणे व पुणे मुंबई हे दोन मार्ग वेगळे व्हायचेत. 


त्याच पुणे - मुंबई महामार्गावर जुन्या NH 4  वरील खंडाळा बोगद्याच्या अगदी वर हा राजमाची पॉइंट होता. इथे एक छोटेसे उद्यान सुद्धा होते. त्या उद्यानालगतच आपल्या महाराष्ट्र एस. टी. चा हा एक ब्रेक टेस्टिंग पॉइंट होता. आपल्या महाराष्ट्र एस. टी. ची एक शेड होती. त्यात काही अधिकारी, बदली चालक, काही तंत्रज्ञ वगैरे मंडळी बसलेली असायचीत. या ठिकाणी थांबणे हे सर्वच्या सर्व बसेसना अनिवार्य होते.


या ठिकाणी थांबून सर्व चालक मंडळी त्या शेडमध्ये जायचीत. तिथे त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले आहेत की नाही याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी व्हायची. गाडी संपूर्णपणे थांबल्यामुळे गाडीचीही चाचणी व्हायची. कारण या राजमाची पॉइंटनंतर अमृतांजन पुलापर्यंत जुन्या पुणे - मुंबई घाटाला एक तीव्र उतारांची आणि शार्प वळणांची अशी साखळीच होती. त्यामुळे या ठिकाणी चालकाची आणि वाहनाची तपासणी अत्यावश्यकच होती.


ही तळेगाव डेपोची बस लोणावळा - राजमाची - लोणावळा अशी सर्वसामान्य (ऑर्डिनरी) सेवा घेऊन लोणावळ्यातील पर्यटकांना राजमाची उद्यानापर्यंत आणून थोडावेळ थांबून परत जायची. अशाच एका संध्याकाळी काढलेला त्या बसचा हा फ़ोटो. त्या काळी प्रत्येक विभाग हा आपापल्या बसचे दर्शनी भागातील ग्रील्स आणि काहीवेळा खिडक्यासुद्धा वेगवेगळ्या रंगांनी रंगवीत असत. पुणे विभाग आपल्या बसेसना तेव्हा असा गुलाबी रंग ग्रील्सना आणि खिडक्यांना देत असे. ग्रील्सभोवती पांढरी बॉर्डर ही पण पुणे विभागाचीच खासियत होती.


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीने बांधलेली ही टाटा बस आज महाराष्ट्र एस. टी. च्या बसबांधणीतले एक मानचिन्ह झालेले पाहून माझ्यातला बसफ़ॅन खरोखर आनंदित होतो.


आपल्याला आठवतात का आपापल्या विभागातल्या जुन्या बसेसच्या ग्रील्सचे आणि खिडक्यांचे रंग ?


उदाहरणार्थ


1. चंद्रपूर विभाग समोरच्या बफ़रला काळ्या बॉर्डरमध्ये छोटासा पिवळा पट्टा मारयचेत. ग्रिल व खिडक्या हिरव्या रंगाच्या असायच्यात.

2. यवतमाळ विभागातल्या बसेसचे ग्रिल्स आणि खिड्क्या आकाशी निळ्या रंगाच्या असायचेत.

3. अकोला विभागातल्या बसेसच्या काळ्या ग्रिल्सभोवती अशीच एक पांढरी बॉर्डर असायची.

4. अहिल्यानगर व जळगाव विभागातल्या बसेसची ग्रिल्स निळ्या रंगांची असायचीत.

5. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा काही काळ अशी गुलाबी रंगाची ग्रिल्स असायचीत नंतर मग काळपट चंदेरी (Steel Grey) रंगांच्या ग्रिल्स असायच्यात.

6. नांदेड विभागाच्या बसेस तर पिवळ्या धमक ग्रिल्ससाठी प्रसिद्ध होत्या.


कळवा आणखी काही रंग जे कदाचित आज माझ्या आणि काही बसफ़ॅन्सच्या विस्मृतीत गेलेले असतील. तुमच्या उत्तरांमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.


- एक अत्यंत जुना बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Thursday, October 2, 2025

कालौघात हरवलेले बालपण : चंद्रपूर बस स्थानक

३१ आॅक्टोबर २००८ म्हणजे जवळपास १७ वर्षांपूर्वी एका हिवाळ्यातल्या दुपारी काढलेला चंद्रपूर बसस्थानकाचा हा फोटो.



त्यावेळी या बसस्थानकाला फक्त ५ फलाट होते. फोटोत एक बस उभी दिसतेय तो सगळ्यात डावीकडला म्हणजे फलाट क्र. १.

या फलाटावरून शेगाव, शिर्डी, निर्मल, मंचेरीयल, गोंदिया, तुमसर , आर्वी, अमरावती, अकोला येथे जाणार्या बसेस सुटायच्यात.

त्याबाजूला दुसरी बस उभा असलेला फलाट म्हणजे फलाट क्र. २. या फलाटावरून नागपूर, जबलपूर या बसेस सुटायच्यात.

छायाचित्रात रिकामा दिसतोय तो फलाट क्र. ३. या फलाटावरून बल्लारपूर, राजुरा, अहेरी आणि त्या मार्गावर जाणार्या साधारण फेर्या सुटायच्यात.

त्यानंतरचा रिकामा फलाट म्हणजे फलाट क्र. ४. या फलाटावरून मूल, ब्रह्मपुरी, वडसा आणि त्यामार्गावर जाणार्या साधारण फेर्या सुटायच्यात.

एक निमआराम बस उभी आहे तो फलाट क्र. ५. तो फलाट घोट, चामोर्शी आणि गडचिरोली व त्यामार्गावर जाणार्या इतर सामान्य फेर्यांसाठी होता.

हे छायाचित्र आमच्या अत्यंत आवडत्या जागेवरून, म्हणजे चंद्रपूर डेपोच्या प्रवेशद्वारावरून काढलेले आहे. चंद्रपूर बसस्थानकावर गेलो आणि आपण जर नागपूरला प्रवास करणार असू तर डेपोच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन आजच्या आपल्या प्रवासाची चं. चंद्रपूर डेपोची सुंदरी कोण असणार ? याविषयी अंदाज घेणे हा आमचा आवडता कार्यक्रम असे.

नुसत्या बसफॅनिंगसाठी चंद्रपूर बसस्थानकावर गेल्यानंतरही एक चक्कर डेपोच्या प्रवेशद्वारावर टाकून चं. चंद्रपूर आगारात कुणा नवीन सुंदर्यांचे आगमन झालेय का ? याची नोंद घेणे हे आमचे आवडते काम असायचे.

या छायाचित्रात फलाट क्र. १ वर उभी असलेली बस MH 40 / 87XX सिरीजमधली चंद्रपूर आगाराची नागपूर सुपर फेरी आहे. त्याबाजूला उभी असलेली MH 40 / 85XX सिरिजमधली भंडारा विभागाची बस. बहुतेक चंद्रपूर जलद तुमसर मार्गे मूल, नागभीड, पवनी, भंडारा जाणारी. थोडासा काळपट रंगाकडे झुकणारा आणि थोडासा मोठ्ठा पिवळा पट्टा हे त्याकाळच्या भंडारा विभागाच्या गाड्यांचे वैशिष्ट्य होते.

छायाचित्रात उभी असलेली निम आराम बस म्हणजे MH 31 / AP 9XXX सिरीजमधली चंद्रपूर निमआराम गडचिरोली बस आहे. या सिरीजमधे खूप कमी निमआराम गाड्या मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेल्या होत्या.

आता मात्र महाराष्ट्रातल्या इतर बसस्थानकांप्रमाणे चंद्रपूर बसस्थानकाचा विस्तार आणि नूतनीकरण झालेले आहे. स्वारगेट, बारामती वगैरे बसस्थानकांप्रमाणे curvilinear terminal (वर्तुळाकार स्थानक) ही कल्पना नवीन बसस्थानकाच्या डिझाईनमध्ये अवलंबिली आहे. उलट नागपूर, यवतमाळ या बसस्थानकांच्या नूतनीकरणात linear terminal (एकरेषीय सरळ बसस्थानक) ही कल्पना अवलंबिली आहे.

वर्तुळाकृती रचनेत प्रवाशांची जास्त सोय होते हे माझ्या लक्षात आलेले आहे. वर्तुळाकृती रचनेत प्रवाशांना या फलाटावरून त्या फलाटावर जाण्यासाठी कमी अंतर चालावे लागते तर एकरेषीय सरळ रचनेत प्रवाशांच्या धावपळीचा परीघ वाढतो. वर्तुळाकृती रचनेत बसेसना थोडे जास्त अंतर धावावे लागेल पण प्रवाशांच्या धावपळीपेक्षा हे बरे.

दक्षिण भारतातील तिरूपती सारख्या विशालकाय बसस्थानकात ही अशी वर्तुळाकृती रचना आढळते ती यामुळेच.

चंद्रपूर बस स्थानक म्हणजे बालपणापासून जुळलेला ऋणानुबंध, अनंत आठवणींचे गाठोडे आणि माझ्या मनाला पुन्हाला बालपणात नेणारी जादू.

- पक्का चंद्रपुरी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Tuesday, September 23, 2025

भांडण देवाशी

कधी कधी देवाशी भांडावं पण लागतं. आपल्याला काही मिळालं नाही म्हणून नाही, आपल्या क्षमतेच्या बाहेर आपल्याला काही मिळावं म्हणूनही नाही. देवाचे देवपण, त्याच्या देवपणातली शक्ती या गोष्टींचा त्या देवालाच कधी विसर पडलाय का ? हे त्याला बजावून सांगण्यासाठी. 


"एखाद्या दुस-या भक्ताच्या अशा भांडण्याने, दुरावण्याने मला काही फ़रक पडत नाही" अशी त्या देवाची मनोवृत्ती झालेली आहे का ? हे पडताळून बघण्यासाठी सुद्धा.


एकीकडे माणूस देवत्वाकडे वाटचाल करीत असताना देवाने मात्र असे माणसांचे गुणधर्म आत्मसात करायला सुरूवात केलीय का ? याचा जाब त्याला विचारायला नको ? उद्या देवाने असेच माणसासारखे वागायचे ठरवले तर माणूस देवत्वाकडे वाटचाल कशाला करील ? जशी मनुष्याला देवाची गरज आहे तशी त्यालाही ख-या भक्तांची गरज आहेच ना ?


मला श्रीगुरूचरित्रातला पहिला अध्याय आठवतो आणि त्यातली त्या भक्ताने भगवंताला केलेली आळवणी आठवते. 


दिलियावांचोनि । न देववे म्हणोनि ।

असेल तुझे मनी । सांग मज ॥३॥

 

समस्त महीतळी । तुम्हा दिल्हे बळी ।

त्याते हो पाताळी । बैसविले ॥४॥

 

सुवर्णाची लंका । तुवा दिल्ही एका ।

तेणे पूर्वी लंका । कवणा दिल्ही ॥५॥

 

अढळ ध्रुवासी । दिल्हे ह्रषीकेशी ।

त्याने हो तुम्हासी । काय दिल्हे ॥६॥

 

सृष्टीचा पोषक । तूचि देव एक ।

तूते मी मशक । काय देऊ ॥८॥


घेऊनिया देता । नाम नाही दाता ।

दयानिधि म्हणता । बोल दिसे ॥१३॥

 

सेवा घेवोनिया । देणे हे सामान्य ।

नाम नसे जाण । दातृत्वासी ॥१६॥


आणि मग अगदी तशाच आविर्भावात विठ्ठलाशी भांडणारे आमचे नामदेव महाराजही आठवतात


घेसी तेव्हा देसी देवा,ऐसा असशी उदारा l

काय जाऊनियां तुझे कृपणाचे नाचे द्वारा ll 


नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही l

प्रेम असो द्यावे कीर्तनाचे ठायी ll 


म्हणून देवाशी असे मधेमधे भांडण उकरून काढायला हवे. मला वाटतं त्याशिवाय त्यालाही मजा येत नसावी. किंवा त्याची भक्ती आपल्या मनात किती खोलवर रूजलेली आहे याची पडताळणी तो असे भांडणाचे प्रसंग आणून आपल्या मनातला त्याच्या भक्तीचा खुंटा हलवून बळकट करत असावा.


- देवांशी, सदगुरूंशी कायम आत्मनिवेदन भक्तीत रहात असल्याने त्यांच्याशी भांडणारा एक भोळा भक्त, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Friday, September 5, 2025

नागपूर ते नाशिक, वंदे भारत एक्सप्रेसने ?




नाशिकला तातडीने जायचं होतं. पण नियमित गाड्यांच्या स्लीपर क्लासची, ए सी क्लासची आरक्षणे मिळालीच नाही्त.


आता माझ्यातल्या रेल्वेप्रेमीचा प्लॅन वेगळाच असतो. अजनी–पुणे वंदे भारतने मनमाडपर्यंत जायचं आणि मग अमरावती–नाशिक मेमूने नाशिकला पोहोचायचं. अजनी पुणे वंदे भारतची तिकीटे उपलब्ध असतात. मनमाड ते नाशिक ही तिकीटे तर ऐनवेळी आणि करंट बुकिंग विंडोतून काढायची असतात. जनरल क्लासची.



मग हा प्लॅन जमला का ? Vlog मध्ये बघा.


आणि हो, ही माझी वंदे भारतमधली पहिलीच ट्रिप होती.

Sunday, August 31, 2025

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते

समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकातला हा श्लोक.


"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे

अकस्मात तो ही पुढे जात आहे

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते

म्हणोनी जनी मागुता जन्म घेते."


या जगातल्या मानवी जीवनातल्या अनित्यतेचे चिंतन आणि हे जीवन अनित्य आहे हे जाणून घेऊन या जगात कसे वागायचे हे चिंतन या श्लोकातून आलेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परवा महाविद्यालयातून परतताना गाडीत हे श्लोक लागले होते. त्यातल्या "पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते" या ओळींनी माझे मन वेधून घेतले आणि चिंतन सुरू झाले.


हे जग कर्मभूमी आहे. इथे कुठलेही कर्म न करता, अकर्मण्य अवस्थेत कुणीही राहू शकत नाही. आणि सगळ्या सहेतूक, अहेतूक कर्मांचे चांगलेवाईट फ़ळ आपल्याला मिळतच असते. संतकवी दासगणू महाराजांनी श्रीगजाननविजय ग्रंथात "मागील जन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे, ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे" हा संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा उपदेश लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे कर्मे आणि त्यांची फ़ळे यातून मनुष्याची सुटका नाही. आणि कर्माची फ़ळे भोगीत राहण्यासाठी वारंवार जन्म घेत राहणे यातूनही सुटका नाही. जगदगुरू शंकराचार्यांनी "पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम" या ओळींद्वारे या वारंवार जन्म घेणे आणि मृत्यू पावणे या फ़े-यातली भयानकताच विषद केलेली आहे. कारण पुढला जन्म कुठला मिळेल ? हे आपल्या हातात नाही. त्या जन्मात आपल्या देहाला भगवंताचे स्मरण, अनुसंधान राहीलच याची खात्री नाही. मग आपली साधना पूर्णत्वाला जाईपर्यंत, आपण कायमचे भगवंत चरणी सामावून जाईपर्यंत या मृत्यूलोकात जन्म मरणाचे किती फ़ेरे घ्यावे लागतील याच्यावर आपले कसलेही नियंत्रण नसणे ही अत्यंत भयावह आणि भगवत्भक्तांच्या हृदयाचा थरकाप उडवणारी अवस्था आहे.


मग यावर उपाय श्रीमदभगवतगीतेत, श्रीमदभागवतात प्रत्यक्ष भगवंताने सांगून ठेवलेला आहे. अनेक जन्मांना कारणीभूत होणारी कर्मे करणे जर आपण टाळू शकत नसू तर किमान ती कर्मे भगवंताच्या स्मरणात करू, त्याला ती कर्मफ़ळे अर्पण करून आपण श्रीमदभागवतात सांगितलेल्या "नैष्कर्म्य" अवस्थेत जाऊ. त्यासाठीचे पथ्यच श्रीसमर्थांनी या मनाच्या श्लोकात सांगितले आहे. जर आपल्याला अशा "नैष्कर्म्य" अवस्थेत जायचे असेल तर लोभ आणि क्षोभ या दोन्हीहीपासून आपल्याला दूरच रहावे लागेल. 


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा एक दृष्टांत आहे. ते म्हणायचे, स्टेशनवर गाडी पकडायला जाताना एखाद्या गृहस्थाशी भांडण झाले म्हणून गाडी चुकली काय ? किंवा स्टेशनवर जाताना एखादा मित्र भेटला आणि त्याच्यासोबत सुखाच्या चर्चेत गाडी चुकली काय ? दोन्हींचा परिणाम एकच झाला; गाडी चुकली.


तात्पर्य आपण एकवेळ क्षोभावर मात करू शकू पण इथल्या वस्तूंच्या ममतेवर, लोभावर मात करणे कठीण आहे. मोठमोठ्या योगी पुरूषांना अखेरच्या क्षणी झालेल्या लोभामुळे त्यांच्या साधनेतले तेवढे न्यून पुरे करायला पुन्हा जन्म घ्यावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. श्रीमदभागवतात वर्णन केलेल्या जडभरताची कथा अशीच. म्हणून श्रीसमर्थ आपल्याला आधीच जागृत करत आहेत. मृत्यूच्या पथावर चालणे या जगात कुणीही चुकवू शकलेला नाही. आज एक तर उद्या आपण हे नक्की आहे. किंबहुना या जगात तेच आणि तेव्हढेच नक्की आहे. म्हणून या जगात आपल्या मनात कुणाविषयीही अपुरा क्षोभ तर नसावाच पण कुणाहीविषयी असा पूर्ण न होणारा लोभसुद्धा नसावा. "हे होऊच नये" असे म्हणणे योग्य नाही तसेच "हे झालेच पाहिजे" असेही म्हणणे योग्य नाही. जे होतेय ते त्या सृष्टीनियंत्याच्या मनाप्रमाणे होतेय हे समजावे. आपण फ़क्त साक्षीभावाने त्याकडे बघावे. त्याविषयी क्षोभ किंवा लोभ ठेऊन त्यात अडकून राहू नये. तरच ते कर्म आपल्याला चिकटणार नाही आणि कर्मांचा हा बॅलन्स बरोबर झाला की "पुनरपि संसारा येणे नाही" ही सकल जीवमात्रांची अत्त्युच्च अवस्था आपण गाठू शकू.


- प्रभातचिंतन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर भाद्रपद शुद्ध अष्टमी, ३१ / ८ / २०२५



Wednesday, August 27, 2025

बाजरीची भाकरी आणि अमूल बटर वगैरे

आत्ता एका फूड व्लाॅगरची रील बघत होतो.

उत्तर कर्नाटकात कुठेतरी तो अगदी authentic कन्नड जेवण करीत होता.
केळीच्या पानावर छान जेवण. "ग्रीन व्हेजिटेबल विथ दाल" असे वर्णन केल्यानंतर लगेच जाणवले की "अरे, ही तर आपली वैदर्भिय दाळभाजी" !
मोकळी दाळ वगैरे चटणीवर्गीय प्रकार तिथे वाढलेले होते पण त्याने "I don't know what it is" असा शेरा मारून अगदीच अरसिकतेने अक्षरशः गिळून टाकलेत. "त्या रात्री तो पोटातल्या गॅसने हैराण झाला असणार." हा एक विचार माझ्या मनात आला एव्हढंच.
कहर म्हणजे बाजरीच्या छान, मस्त फुलक्यांवर त्या हाॅटेलवाल्याने त्याला अमूल बटरचा एक छोटासाच चौकोनी तुकडा वाढला. त्या अज्ञानी माणसाने तो तुकडा बाजरीच्या त्या गरमागरम फुलक्यावर चोळला आणि तो फुलका खाल्ला.
त्याक्षणीच त्या फूड व्लाॅगरला, जुन्या संगीत नाटकांमधल्या नटांसारखे "हा, मूढा भरतकुलोत्पन्ना" असे म्हणावेसे वाटले. अरे! बाजरीच्या फुलक्यासोबत बटर ? त्यापेक्षा बासुंदीसोबत बनपाव खाल्ला असतास तर ते क्षम्य होते. बाजरीच्या गरमागरम फुलक्यावर अस्सल बेळगावी लोणी कढवून काढलेले दाणेदार, रवाळ तूप घ्यायचे असते रे. नसेल परवडत तर त्या फुलक्यावर लाकडी घाण्यातून काढलेले, मस्त शेंगदाण्याचा वास असलेले, अस्सल फल्लीतेल (शेंगदाणे तेलाला parallel वैदर्भिय शब्द) कच्चेच घ्यायचे असते रे.
बटरचा तुकडा हा पावभाजीचे टाॅपिंग म्हणून किंवा पावभाजीच्या पावाला लावून खायला ठीक आहे. बाजरीच्या फुलक्यासोबत तो खाणे हे बघणार्यालाही (लाक्षणिक अर्थाने) पचत नाही आणि खाणार्यालाही (खर्या अर्थाने) पचत नाही.
- खाण्याच्या बाबतीत सगळे कुळधर्म नीट पाळणारा, बेळगावी लोण्याइतकाच स्निग्ध आणि बेळगावी कुंद्याइतकाच गोड स्वभावाचा, रा(व)म साहेब किन्ही(हरि)हर.

Sunday, August 24, 2025

काटा रूते कुणाला ?

चंद्रपूरला जाणा-या वातानुकूलित बसमध्ये तो शिरला तेव्झ बस सुटायला अवकाश असला तरी बहुतेक मंडळी बाहेरच्या रणरणत्या उन्हापेक्षा आतच आरामशीर बसलेली होती. वास्तविक खाजगी कंपन्यांचे पेव फुटुन त्यांच्यात स्पर्धा सुरू झाल्यानंतर संपूर्ण भरलेली बस हे दृश्य दुर्मिळ झाले होते. खाजगी गाड्यांच्या पोऱ्यांची प्रवाशी मिळवण्यासाठी काशीच्या पंड्यांशी स्पर्धा करणारी धावपळ पाहून तो कुठेतरी सुखावत होता. त्याला त्याच्या बालपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याच्या सुट्या, आजोळी जाण्याचे एक महिना आधीचा बेत, मोजक्याच एस. टी. गाड्या, ८ दिवस आधी रांगेत उभे राहून वेळप्रसंगी ३ तासाच्या प्रवासासाठी ३ तास उभे राहून मिळवलेली आरक्षणे, ती विजयी मुद्रा. सगळं आठवून त्याचं त्यालाच हसू आलं.



५, ६ रांगा टाळत तो आसनांपाशी आला. तिथे आधीच कुणीतरी बसलं होतं. त्याच्या मिशांमधून पुन्हा हसू ओघळलं. मुद्दाम आरक्षण करून उशिरा बसमध्ये चढायचं आणि आपल्या आसनावर बसलेल्या माणसांवर रुबाब दाखवत त्यांचा 'मोरू' करायचा ह्या गोष्टीत तो तरुण असताना त्याला विलक्षण आनंद व्हायचा. पण आता ? "आपलं एवढं वयोमान झालं." त्यानं विचार केला, "तरीही तश्शीच मजा अजूनही येते." यातल्या ’आपलं वयोमान झाले' या विचाराशी तो थबकला. छे ! आपण एवढे काही म्हातारे दिसत नाही काही ? हं आता केस थोडे पांढरे झाले असतील. चाळीशीही नाकावर असेल. पण एकंदर पूर्वीचा रुबाबदारपणा कायम आहे. परवा कुणीतरी बोलताना म्हणालं देखील की हा चष्मा तुम्हाला शोधून दिसतोय म्हणून. केससुद्धा आज कसे अगदी स्टाईलमध्ये.....


"तुमचा सीट नंबर काय?" अचानक त्या बसलेल्या व्यक्तीने प्रश्न विचारला आणि त्याची विचारशृंखला तुटली.


त्यानं तिच्याकडे बघितलं आणि अक्षरशः हादरून, स्वप्न बघितल्यासारखाच तो बघत राहिला. तिनंही बहुधा त्याला तेव्हाचं नीट बघितलं. ती सुद्धा त्याच्याकडे विस्कारित नेत्रांनी बघत राहिली.


"तू ?” ती जवळ जवळ किंचाळलीचं


"तू?" नेमका तोही त्याचवेळी ओरडला.


"अरे आहेस कुठं ? करतोस काय ? आज इकडे कसा ? आणि अचानक ?"


"अगं हो! हो ! पहिले मला नीट बसू तर देशील. आणि हे सगळे प्रश्न मीच तुला विचारायला हवेत." 


"छे ! छे! लेडिज फर्स्ट"


"वा ! प्रश्न विचारताना 'लेडिज फर्स्ट' म्हणे आणि उत्तरे देताना ?"


"तस्साच भांडकुदळ आहेस अजून. झालं."


एव्हाना त्या बसमधलं इस्त्रीचं वातावरण बिघडलं होतं. अनेक भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पुढल्या आसनांवरच्या काही मााना १८० अंशच्या कोनांमधून वळल्या होत्या. त्यासरशी दोघंही ओशाळले. खिडकीशी ती सरकून बसली आणि तो तिच्या शेजारी.


"गाडी फक्त जांबला थांबेल" कंडक्टरने दार लावून घेता घेता पुकारा केला. बस सुरू झाली.


"कुठे जातोयसं ?"


"आवारपूरला जातोय. अगं माझ्या मोठ्या मुलाला तिथे जॉब मिळालाय ना ? त्याला भेटायला."


तिनं त्याच्याकडे पाहिलं. खरंच की ! हा एवढ्या मोठ्या पोराचा बाप झालाय. आपलीही पन्नाशी फारशी दूर नाही. केवढा काळ गेला नाही मधे !


"किती वर्षांनंतर भेटतेस गं ?" ती विचारात गढली असताना त्याने प्रश्न विचारला. तिला आश्चर्य वाटलं. हा मनकवडा वगैरे आहे की काय ? "आणि तू कुठे जातेयसं ?"


"चाल्लेय चंद्रपूरला. माझ्या मुलीसाठी स्थळ आलंय तिथलं. जरा चौकशी करून येते. ह्यांना वेळच नाही नं. अजिबात, म्हणून आपली एकटीच."


"कॉलेज सोडल्यानंतर आपण पहिल्यांदाच भेटतोय न गं ? मधे तू पत्रंही पाठवलं नाहीस. हं! सोडताना मारे आपण वचनं, शपथा घेतल्या होत्या. नंतर विसरलीस ? तशी तू काय म्हणा....." पुढलं वाक्य त्यानं अर्धवटच सोडलं होतं. ती मात्रा अस्वस्थ होऊन खिडकीबाहेर पाहू लागली होती. एव्हाना बस गावाबाहेर पडली होती.


तो सुद्धा अस्वस्थ झाला. "एवढ्या वर्षांनी बिचारीची भेट होतेय आणि आपण पुन्हा तस्सेच हट्टी."


बराच वेळ शांततेत गेला. कंडक्टर येऊन तिकीटं तपासून निघून गेला होता. दोघंही सीटवर माना टेकवून झोपल्याचा आभास निर्माण करत होते. पण मनातली खळबळ चेहेऱ्यावर दोघांनाही लपवता येत नव्हती.


कॉलेजचे दिवस. मोरपीस गालांवरून फिरून जावं तसले दिवस. अतिशय हळुवार भावनांचे तरंग मनाच्यां त्या सरोवरात नुसत्या हवेच्या झुळुकीने उठायचे दिवस कॉलेजला असताना..


"पुण्यावरून कधी आलास, बाय द वे ?" तिच्या प्रश्नाने त्याची तंद्री पुन्हा भंगली.


"अं ? अगं पुण्याला माझी फॅमिली फक्त असते. मी हल्ली मुंबईत असतो. आज सकाळीच विदर्भ एक्सप्रेसने आलो आणि लगेच स्टॅण्डवर."


"हे रे काय ? घरी नाही का यायचं ?"


घरी येऊन तरी आपली चुकामूकच झालेली बघायची नं ? आणि तुझा लग्नानंतरचा पत्ता कुठाय मायाकडे ? साधी पत्रिकापण पाठवली नाहीस ?" तो अगदी वय विसरून २०-२५ वर्षांपूर्वीच्या गोष्टींवर तावातावात भांडायच्या पावित्र्यात आला होता. तिचा हिरमुसलेला चेहेरा पाहून मात्र तो वरमला "बाय द वे, वाय करतात तुझे मिस्टर ?"


"सध्या अमरावतीला असतात. इंजीनियर आहेत. पण मी आणि मुलं नागपूरलाच असतो." 


"आणि मुलं किती ?" तो बराच ’नॉर्मल’ला आलाय हे त्याच्या आवाजावरून जाणवत होतं.


"अरे दोन्ही मुलीचं. थोरली यंदाच एम. कॉम. झाली. धाकटी मेडिकलला. अजून शिकतेय. ए ! मीच मघापासून बडबडतेय. तुझ्याविषयी सांग ना."


"माझ्याविषयी ? हं! काय सांगणार ? मधल्या इतकी वर्षांनी आपल्याला एकमेकांपासून एवढं दूर नेलं की एकमेकांच्या संगतीत जीवन घालवण्याच्या शपथा विसरून आपण एकमेकांच्याच जीवनाविषयी विचारतोय. सांगतो. सदगुणी, सुंदर बायको आहे. एकच मुलगा जाहे. दोन वर्षांपूर्वी आपल्याच कॉलेजमधून इंजीनियर झाला आणि आवारपूरला लागलाय."


"छान ! बापाचं नाव मुलानं काढलं तर ! ए, बाकी तू अजूनही गातोस वगैरे का रे?"


बराच वेळ तो गप्प होता. बहुधा शब्दांची जुळवाजुळव करत असावा. मोठा सुस्कारा सोडून, विचारांना पूर्णविराम देत तो म्हणाला "खरं सांगू? तू निघून गेल्यानंतर मैफिलीतली सतार जी अबोल झाली ती कायमचीच. मैफिल विस्कटली ती विस्कटलीच. आताशा् तंबो-याची गवसणीसुद्धा काढत नाही मी वर्षानुवर्ष. खरंच गेले ते दिन गेले. 


वर्षा ! आठवते तुला माझी ती शेवटली मैफिल ? ’लाख चुका असतील केल्या.....' गाण्यातून तू मधूनच उठून गेलीस. खरंच वर्षा. अगं, जीवनाच्या पहाटे एखादं सत्य, सत्य वाटलं म्हणजे ते अगदी तसंच संध्याकाळी ही वाटेल असं नाही. सुरूवातीला असंच वाटलं होतं गं. पण तुला अजूनही विसरू शकलो नाही. सुखी संसाराच्या ह्या वाटचालीत कधीकधी जुन्या आठवणींचे सल असे बोचतात. थांबून थोडं मागे पहायला लावतात आणि मग वर्षा, तुझ्या नावाचं वळण आपोआप येतचं गं" बोलताना त्याला धाप लागली होती. त्याचा आवाजही कापरा झाला होता.


"शांत हो अभि. शांत हो. अरे या सगळ्या गोष्टी आत्ता पुन्हा बोलायलाच हव्यात कां ?"


अभिजित थोडा सावरला "बघ. अजून तशीच निगरगट्ट आहेस. भावनेच्या भरात अजिबात वहात नाहीस."


बस जांबच्या स्टँडमध्ये शिरली होती. फक्त तो उत्तरला, परतताना हातात एक मोठं कागदी पुडकं होतं.


"काय आणलंस ? बघू ?"


"समोसे आहेत. तुला आवडतात नां."


आता मात्र तिला भडभडून आलं. अजूनही ह्याचं आपल्या आवडी निवडी जपणं सुरूच आहे ? नकळत ह्या विचाराने मनात आणि अश्रुंनी डोळ्यात दाटी केली होती. न संकोचता तिने ते अश्रू ओघळू दिले.


बस पुन्हा सुटली होती. समोसे संपेपर्यंत कुणीही बोलत नव्हते.


"तू कशी आहेस ?" त्यानं थोड्या काळजीनं विचारलं.


"तशी सुखीच आहे. हे चांगले आहेत म्हणजे शांत, मनमिळावू वगैरे. मुलीसुद्धा छान आहेत. तुझ्यासारखंच अगदी. ए, तू नागपूरला परत कधी येतोयस? ए, रहायलाच ये ना एक दिवस आमच्या घरी. सगळ्यांशी तुझी ओळख होऊन जाईल."


"होऊन जाईल" ला तो सातमजली हसला. तो पुण्याचा आणि ती अस्सल वऱ्हाडी. त्यामुळे कॉलेजला असतानाच तिच्या 'करून राहिले, घेऊन राहिले' अशा शब्दप्रयोगांना तो असंच सातमजली हसायचा. त्याच्य असल्या हसण्याने तिचा कावराबावरा झालेला चेहरा बघून आणखीनच त्याला हसायला यायचं.


"तसं माझं नक्की नाही गं. त्यातून चिरंजिवांनी परस्पर बल्लारपूर-मुंबई रिझर्वेशन केलं असेल तर कठीण आहे."


पुन्हा बराच वेळ दोघंही गप्प होते. वरोरा मागे पडलं होतं. भद्रावतीची लालभडक कौलारू घरं दिसायला लागली होती.


"अभि, हे सगळं लौकिक, ऐश्वर्य, हे सुख, म्हणजे खर समाधान असतं का रे ? किती वेगळ्या कल्पना होत्या नाही आपल्या; आपण कॉलेजात असताना ? खरंच आपणच बदलतो की ती सगळी गद्धेपंचवीशी असते रे?"


तो काहीच बोलला नाहीं. जीवनप्रवास एकत्रे करण्याची शपथ घेतलेले ते दोन जीव 'यथा काष्ठं च काष्ठ च" प्रमाणे कॉलेजनंतर प्रवाहातून वेगळे झाले होते. कॉलेजात असताना वर्षा म्हणजे अभिजितच्या मैफिलीचा प्राण होती आणि तो आपल्या गोड गळ्यामुळे कॉलेजच्या सगळ्या स्वप्नाळूच्या गळ्यातला ताईत. दोघांचं जोडीनं फिरणं, सिनेमाला जाणं वगैरेमुळे कॉलेजात दोघांच्याही नावाची चर्चा होतीच. वर्षासारख्या हि-याला  अभिजितसारखंच कोंदण हवं यावर सगळ्यांचं एकमत होतं. नकळत एकामागून एक दाटी केलेल्या विचारांनी तो अस्वस्थ झाला. मनाच्या बंद, पारदर्शी खिडकीवर जुन्या आठवणीचे थेंब ओधळून जात होते. तो नुसता फुलून गेला होता.


बस आता चंद्रपुरात शिरली होती.


"ए, मी पाण्याच्या टाकीजवळच्या स्टॉपवर उतरते. हा माझा पत्ता, नागपूरला आलास की नक्की ये. मी उद्याच परत जातेय.


"एक मिनीट, वर्षा, एक प्रश्न गेली पंचवीस वर्ष माझ्या मनात सलत्तोय तेवढा तू मला आज विचारू दे." त्याचा आवाज त्याच्याही नकळत कापरा झाला होता.


"त्या दिवशी तू मला विचारल्यावर मी तुला नकार का दिला? हाच न तो प्रश्न ?"


"हूं."


"अभिजित अरे त्याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मी गेली पंचवीस वर्षे होती. काही क्षण काही आठवणी फार सलतात रे. मी पहिल्यापासून थोडी निष्ठुर आणि दगड मनाची. पण तू भावनेत लगेच वंहावत जायचास पण आज जाणवतंय मी वेदना भोगत असताना हा विचार तरी करू शकले की तू सुद्धा तेच भोगत असशील. तू तो विचारसुद्धा करू शकला नाहीस. हे लौकिक समाधान सगळं वरवरचं आहे रे. आत अंतर्मनातला आवाज माझ्याविरुद्धच कधी बंड करून उठतो. पण तू? तुला तो आवाज कधी जाणवलाच नाही. जीवनात सगळ्याच प्रश्नांची उत्तरे गाईडसारखी तयार मिळत नाहीत, जाऊ दे. तू फार आत्मकेंद्रित होतास आणि आहेसही. एनीवे, मी चलते."


स्टॉप आला होता. ती उतरली. तो बघत असतानाच तिने रिक्षाला हात केला "गांधी चौक चलो"


रिक्षात बसताना तिने डोळ्यांना लावलेला रुमाल आणि मागे वळून न पहता निरोपादाखल हलवलेला हात त्याच्या मनात घर करून होता.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


ही कथा दै. तरूण भारत नागपूरच्या रविवारी प्रकाशित होणा-या "विविध विषय विभाग" या पुरवणीत दिनांक २७ नोव्हेंबर १९९४ रोजी प्रकाशित झालेली आहे.




Friday, July 4, 2025

आयसेनहॉवर मॅट्रिक्स आणि भेदरलेले, धांदरलेले आम्ही

आज आमच्या VNIT मधल्या प्रशिक्षणानंतर मी सध्या VNIT मध्येच काम करणार्या एका सहकर्मीकडे गेलो होतो. त्यांची सुंदर, कलात्मकरित्या सजवलेली केबिन मी बघतच राहिलो. त्यातलेच हे एक "आयसेनहाॅवर मॅट्रिक्स" माझ्या दृष्टीस पडले.

यापूर्वीही अनेकदा मी हे मॅट्रिक्स बर्याच पुस्तकांमध्ये, भाषणांमध्ये आणि बर्याच मानव विकास वर्कशाॅप्समध्ये ऐकले आणि बघितले होते.

हे कामांचे वर्गीकरण मला पटते. महत्वाच्या आणि तातडीच्या कामांना कायम प्राधान्य देऊन महत्वाच्या पण विना तातडीच्या कामांना क्रम देऊन नंतर करायचे ठरविणे.
बिन महत्वाच्या पण तातडी असलेल्या कामांना दुसर्यांकडे सोपविणे आणि बिन महत्वाचे आणि बिन तातडीचे काम सरळ टाळायचे असे हा आयसेनहाॅवर सुचवतो. कागदावर दिसायला हे मॅट्रिक्स अगदी आदर्श वाटते.
पण आमचा मुळातला स्वभावच इतका पापभिरू, भित्रा आणि धांदरट आहे की पुढ्यातली सगळीच कामे आम्हाला महत्वाची आणि तातडीची वाटतात. आता काय करायचे ? आमच्याकडून कुठल्याही कामाचे "बिन तातडीचे" किंवा "बिन महत्वाचे" असे वर्गीकरण होतच नाही. आपल्याला करावी लागणारी सगळी कामे महत्वाची आणि तातडीची असतात यावर आमचा अत्यंत दृढ म्हणावा तसा विश्वास आहे.
मग हे "आयसेनहाॅवर मॅट्रिक्स" कसे आचरणात आणायचे ? हाच सध्या आमच्यापुढला 'क्रायसिस' आहे.
- पुस्तके वाचायला आवडणारा पण त्याहूनही प्रॅक्टीकल जगायला आवडणारा एक साधा मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, July 3, 2025

बॉलीवूडच्या गाण्यांमधले हिंदी, उर्दू, पंजाबी शब्द आणि आम्हा मराठी मुलांचा होणारा गोंधळ

आधीच आपल्याला ऊर्दू मिश्रित हिंदी कळत नाही. "मकसद" हे सिनेमाचे नाव वाचून मराठीत एक "अबकडई" या नावाचे नियतकालिक निघायचे तशातला हा काही प्रकार असेल असे आम्हाला वाटले होते. त्यामुळे "दीदार ए यार", "मुगल ए आजम" वगैरे नावे कळण्याचा प्रश्नच नव्हता. मुळात अशा ऊर्दू नावांचा अर्थच कळण्याची बोंब तर मग टाॅकीजमध्ये जाऊन तो सिनेमा पाहण्याची एवढी तसदी कोण घेणार ?

तसेही त्याकाळी टाॅकीजमध्ये शिरल्यानंतर तेव्हाच्या सिनेमांचा आवाज त्याकाळच्या टाॅकीजेसमध्ये एवढ्या मोठ्यांदा घुमायचा की सुरूवातीचे काही मिनिटे एकही डाॅयलाॅग ऐकू येत नसे. टाॅकीजमधल्या अंधाराला आपले डोळे आणि आवाजाला आपले कान सरावलेत की मग सिनेमा नक्की काय आहे ? हे थोडेथोडे समजू लागायचे.
याच अजाणतेपणाने एकदा घरी "आप जैसा कोई, मेरे जिंदगीमे आएँ, तो बाप बन जाएँ" असे मोठ्याने गाताना "आचरट कार्ट्या" म्हणून थोबाड रंगवून घेतल्याची आठवण अजूनही ताजी आहे. "अहो ते सिनेमावाल्यांनीच ते गाणे तसे लिहिलेय यात माझा काय दोष ?" हा माझा निरागस प्रश्न तेव्हा कुणीही ऐकलेला नव्हता.
९० च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी सिनेमांवर पंजाबी शब्द आणि प्रथांनी आक्रमण केले. त्यामुळे आमच्यासारख्या मराठी मुलांची अधिकच पंचाईत झाली हो.
आता हेच बघा ना, "जब वी मेट" मी टाॅकीजमध्ये बघितला. घरी टी व्ही वर ही अनेकदा बघितलाय. पण अजूनही "नगाडा, नगाडा, नगाडा बजा" यानंतर ती सगळी पंजाबी मंडळी "Aqua Regia, Aqua Regia" असे केमिस्ट्रीतल्या कंपाऊंडचे नाव जोराने का ओरडतात ? हे मला न उलगडलेले कोडे आहे.
- पाचव्या सहाव्या वर्गात केमिस्ट्री शिकवणार्या सरांनी अत्युकृष्ट शिकवल्याचा परिणाम की सोन्याला विरघळवणारे कंपाऊंड "Aqua Regia" ची भुरळ पडल्याचा परिणाम की स्वतःलाच एक "Alchemist" व्हायचे होते की काय ? याचा अजूनही शोध घेत असलेला सर्वसामान्य माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, July 2, 2025

एखादी बस दिसल्यानंतरचे विचारांचे काहूर

 विश्राम बेडेकरांच्या "रणांगण" कादंबरीतले एक पात्र कुठल्याही वेळी नुसताच विविध रेल्वेगाड्या त्या त्या वेळी कुठे असतील असा विचार करीत असे. "आता दुपारचे ४ वाजलेत. म्हणजे मुंबई मेल आता नागपुरातून निघालेली असेल, हावडा मेल रायपूर स्टेशनातून हावड्याकडे रवाना झाली असेल..." वगैरे. "रणांगण" कादंबरी आम्हाला UPSC Civil Services च्या मुख्य परीक्षेत मराठी साहित्य या विषयाच्या अभ्यासात होती. "रणांगण" सोबतच मराठी साहित्यातले सौंदर्यशास्त्र नावाचा एक अत्यंत कुरूप विषय (ज्याची पुलंनी "भिंत पिवळी पडलीः एक सौंदर्यवाचक विधान या लेखात भरपूर खिल्ली उडविली होती.), अनेक विरोधाभासी आणि विनोदी विधानांनी भरलेला वि. ल. भावे कृत मराठी वाङमयाचा इतिहास (ज्याची पुलंनी "मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास" लिहून येथेच्छ टर उडविली होती.) हे ही अभ्यासाला होते. या विषयांतले आता फारसे आठवत नसले तरी याच दोन विषयांनी मुख्य परीक्षेत आमचा त्रिफळा उडवल्याचे मात्र ठळक स्मरते. चुकीचे वैकल्पिक विषय घेतल्याने देश एका चांगल्या I. A. S. अधिकार्याला मुकला हे मात्र खरंय.


"रणांगण" मधल्या त्या पात्रासारखीच काहीशी सवय मलासुध्दा आहे. प्रवासात पुढून येणारी एखादी एस. टी. दिसल्यानंतर ही आपल्या प्रस्थान स्थानावरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे हिशेब माझ्या मनातल्या मनात सुरू होतात.

आता हीच बस बघा. नागपूर जलद जळगाव. उन्हाळी जादा शेड्युल.




ही बस आम्हाला नांदुर्याला दिसली तेव्हा साधारण सकाळचे १०.४५ झाले होते. आम्ही नांदुर्याच्या हनुमंताचे दर्शन घेऊन खामगावकडे परतत होतो. आता ही बस सकाळी १०.४५ ला नांदुरा म्हणजे नागपूरवरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे calculations माझ्या डोक्यात लगेच सुरू झालेत. कितीही चांगला रस्ता मिळाला तरी नागपूर ते अकोला प्रवासाला कमीतकमी ५ तास, अकोला ते खामगाव या प्रवासाला कमीतकमी १ तास आणि खामगाव ते नांदुरा अर्धा तास प्रवासाला धरले तरीही ही गाडी नागपूरवरून पहाटे ४.०० ला निघालेली असली पाहिजे. म्हणजे अगदी पहाटपक्षी बसच. (लिंक इथे) नेहमी नागपूरवरून अमरावतीकडे जाणारी पहिली पहाटपक्षी बस म्हणजे पहाटे ५ ची नागपूर - इंदूर बस. ही बस त्या बसआधी एक तास ? अशा अडनिड्या वेळेला नागपूरवरून या बसला किती प्रवासी मिळत असतील ? अनेक प्रश्न मनात रूंजी घालत सुटतात. अगदी "रणांगण" च्या त्या पात्रासारखेच.

नागपूर उन्हाळी जादा जळगाव

मार्गे कोंढाळी - कारंजा (घाडगे) - तळेगाव - तिवसा - गुरूकुंज मोझरी - अमरावती - बडनेरा - मूर्तिजापूर - अकोला - बाळापूर - खामगाव - नांदुरा - मलकापूर - मुक्ताईनगर - दीपनगर - भुसावळ.

MH - 14 / LX 9813

Ashok Leyland Comet Vishwa model

BS VI

Built by Ashok Leyland, Vijaywada plant.

२ बाय २ आसनव्यवस्था. एकूण ४१ आसने.

ज. जळगाव आगार

स्थळः नांदुरा
दिनांकः १४/६/२०२५
वेळः सकाळी १०.४५ वाजता

- एक बस पाहिली की अनेक विचारांचे, calculations चे काहूर मनात येणारा बसफॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, July 1, 2025

वेगळी वाट चोखाळणारी बस

वेगळी वाट चोखाळण्याचा मक्ता फक्त मनुष्यमात्रांनीच घेतलाय की काय ? आमच्या एस. टी. बसेस सुध्दा वेगळा मार्ग चोखाळू शकतात म्हटलं.

अमरावती वरून मलकापूर ला जाण्यासाठी मूर्तिजापूर - अकोला - बाळापूर - खामगाव - नांदुरा हा राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहे. हा महामार्ग आता खूप छान झालेला आहे. अनेक वर्षांपासून चालू असलेले या महामार्गाचे नष्टचर्य संपलेले आहे.

पण ही बस अमरावती ते मलकापूर प्रवासासाठी मात्र दर्यापूर - आकोट - शेगाव - खामगाव - नांदुरा ही जरा  वेगळी वाट चोखाळतेय. हा मार्गही छान आहे. 




अमरावती जलद मलकापूर

MH 40 / Y 5788

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने बांधलेली आणि नंतर पोलादात पुनर्बांधणी केलेली बस.

TATA 1512 Cummins

BS III

बु. मलकापूर आगार (मलकापूर आगार, बुलढाणा विभाग)

कोल्हापूर विभागातही को. मलकापूर आगार आहे.

दोन दोन मलकापूर आगारांप्रमाणेच आपल्या महाराष्ट्र एस. टी. त 

व. तळेगाव (वर्धा जिल्हा)

आणि

पु. तळेगाव (पुणे जिल्हा)

अशी सारख्या नावांची आगारे आहेत.

स्थळः शेगाव

दिनांकः १२/०६/२०२५

संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी.

आजूबाजूच्या भयंकर उकाड्यामुळे एखाद्या काकूंनी आपल्या पदराने, ओढणीने स्वतःला वारा घालावा तशी ही बस रेडिएटर वरचे छोटे ग्रील उघडून स्वतःला वारा घातल्याचे दृश्य भासमान होते आहे. त्यादिवशी वातारणात खरंच खूप उकाडा होता.

- बसेस आणि रेल्वेजना मानवी रूपात कल्पणारा, एक बसप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

Monday, June 30, 2025

माझ्या लेखनप्रेरणा अर्थात मी का लिहितो?

काल आमच्या एका गटचर्चेत प्रत्येकाने काही काही सदस्यांनी  त्यांच्या त्यांच्या  लेखनाच्या प्रेरणा सांगितल्यात आणि मी सुद्धा विचारात पडलो की माझ्या लेखनप्रेरणा नक्की काय ?


एक चांगला गायक व्हायला एक चांगला श्रोता होणे अतिशय आवश्यक आहे असे म्हणतात तसेच एक चांगला लेखक होण्यासाठी आधी ती व्यक्ती एक चांगला वाचक असणे तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते. मला आठवतंय माझ्या बालवयातच माझे खूप दांडगे वाचन झालेले होते. अक्षरओळख झाल्यानंतर अगदी चवथ्या वर्गापर्यंतच मी समग्र पु ल देशपांडे , व पु काळे, ग दि माडगूळकर , व्यंकटेश माडगूळकर, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे  वाचून काढलेले होते. आमचे दादा शाळेत लिपिक होते आणि शाळेच्या वाचनालयात तिथले ग्रंथपाल आमच्या दादांचे सहकारी आणि  मित्र असल्याने वाचनालयात आम्हाला मुक्त प्रवेश होता. त्यामुळे आमच्या सेमिस्टर्स संपण्याच्या अखेरच्या दिवशी (सुट्या लागण्याच्या आदल्या दिवशी) आम्ही शेवटल्या पेपरला जाताना एक भली मोठी पिशवी सोबत घेऊन जात असू आणि पेपर संपला रे संपला की दादांना सांगून वाचनालयात घुसत असू.


अर्थात आमच्या ग्रंथपाल काकांना आमची ही पुस्तके अशी खाण्याची सवय माहिती असल्याने ते आम्हाला अडथळा करीत नसत. आम्हीही अगदी १०० च्या आसपास पुस्तके त्या मोठ्याला पिशव्यांमध्ये भरायचोत आणि अर्धी पुस्तके आम्ही तर अर्धी आमचे दादा त्यांचे ऑफिस सुटल्यावर अशा पद्धतीने घरी घेऊन जात असू.


मग काय ! सुटयांमध्ये या सगळ्या पुस्तकांचा फडशा पाडणे हे एकाच काम उरत असे. बालवयात असे भरपूर वाचनसंस्कार झालेत खरे पण आपण या लेखकांच्यासारखे  लेखक व्हावे ही महत्वाकांक्षा मात्र मनात कधीच आली नाही.


अभियांत्रिकी शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात कराडला आणि त्यानंतर नोकरीनिमित्त मुंबईत जवळपास सव्वा तप राहणे झाले. सर्वांमध्ये मिळून जाण्याचा आणि मनमोकळा स्वभाव असल्याने तिथल्या तिथल्या जनजीवनात गुरफटून गेलोत, तिथल्या संस्कृतींशी समरस झालोत. विविधरंगी जीवन अनुभव घेता आलेत. प्रवास घडला, एक निराळे व्यक्तिमत्व घडले.


मग या सगळ्या अनुभवांचे मित्र सुहृदांमध्ये कथन सुरू झाले. मुळात जन्मच नकलाकार घराण्यात झालेला त्यामुळे परफॉर्मिंग आर्टस ची आवड आणि सवय बालपणापासूनच होती. त्या सर्वांना हे कथन आवडले आणि मग त्यातून हे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून लेखन सुरू झाले.


त्यातच साधारण २००७ - २००८ च्या सुमाराला Orkut आले. त्या माध्यमाला सरावलो आणि तिथे विचार मांडणे सुरू झाले. त्यापूर्वीही दै. तरूण भारतातून लिखाण होत होते पण इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमे ही नाटकांसारखी असतात, लगेच समोरून दाद मिळते तर छापील माध्यमे ही सिनेमांसारखी असतात, प्रत्यक्ष दाद अनुभवायला मिळत नाही हे सुध्दा लक्षात आले.


Orkut नंतर फेसबुक आले. स्वतःच्या अभिव्यक्तित जास्त लवचिकता मिळायला लागली. त्याच दरम्यान मला ब्लॉग या माध्यमाचा शोध लागला. ब्लॉगवर हळूहळू का होईना व्यक्त व्हायला सुरूवात केली. सुरूवातीच्या चार पाच वर्षात ब्लॉगला आलेला प्रतिसाद अगदी कमी होता. निरुत्साही. ब्लॉग लिहीणे सुरू ठेवावे की नको ? या विचाराप्रत येणारा. पण नंतर फ़ेसबुकवरून, व्हॉटसॲप वरून आपल्या ब्लॉगपोस्टस साठी वाचकवर्ग मिळू शकतो हे जाणवले. ब्लॉगच्या लिंक्स या माध्यमांवर द्यायला सुरूवात केली आणि ब्लॉग्जच्या संख्येत आणि वाचकसंख्येतही भरीव वाढ झाली. अधिकस्य अधिकम फ़लम या न्यायाने वाचकांचा उत्साह नवनवे ब्लॉगपोस्ट लिहायला उद्युक्त करीत होता तर सातत्याने लिहील्याने वाढता वाचकवर्ग लाभत होता.


त्यातही आपण लिखाण केल्यानंतर वाचकांना ते आपलाच अनुभव असल्याचे जाणवते आणि ते लिखाण त्यांना त्यांच्या जवळचे वाटते. त्यामुळे फ़ार जास्त अलंकारिक भाषेत, खूप संशोधन करून, एखाद्या विषयाची खूप मांडणी करून एखादे लिखाण मी केलेय असे झाले नाही. मनाला भावले ते सगळे "पिंडी ते ब्रह्मांडी" या न्यायाने लिहीले. त्यात कुठेही अभिनिवेश नव्हता, पेशाने शिक्षक असूनही "आपण या सर्व अज्ञ जनांना शिकवतोय" अशी भूमिका नव्हती. सरळ, स्वच्छ आणि मनमोकळे लेखन. माझ्या स्वभावासारखेच. मला आलेले अनुभव, मला दिसलेले जग, मला जाणवलेली माणसे असे साधे सरळ लिखाणाचे विषय असायचेत आणि वाचकांनाही अशाच प्रकारचे लेखन आवडते हे माझ्या लक्षात आले आणि मी लिहीत गेलो.


"मी लेखन का करतो ?" या प्रश्नाच्या उत्त्तरांमध्ये "मला स्वतःला अभिव्यक्त व्हायला आवडतं म्हणून", "लोकांच्या मनातले विचार ,इच्छा मी माझ्या अनुभवांद्वारे व्यक्त करतो आणि मला समानशील असलेले अनेक वाचक मित्र मिळतात म्हणून" या दोन उत्त्तरांचा क्रम पहिल्या दोन उत्त्तरांत येईल.


मायबाप वाचकांनी लिखाण वाचले आणि तसा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यानंतरही असाच प्रतिसाद मला लाभो अशी नम्र प्रार्थना.


- जूनच्या ३० दिवसात वेगवेगळ्या विषयांवर ३० लेख लिहीणारा दृढनिश्चयी लेखक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


सोमवार, ३० जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५