Showing posts with label कौसल्येचा राम. Show all posts
Showing posts with label कौसल्येचा राम. Show all posts

Thursday, June 26, 2025

कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम

आमच्या बालपणी आमच्या वाड्यात सगळ्या बायका एकमेकांना त्यांच्या मुलांच्या / मुलींच्या नावाने हाक मारायच्यात. आमच्या वाड्याच्या मालकीणबाई, कुहीकर बाई, त्यांना नंदूची आई, पलांदूरकर काकूंना रवीची आई तर माझ्या आईला रामची आई. आमच्या वाड्याच्या मालकीणबाईंच्या एक वृद्ध सासूबाई होत्या. खूप धार्मिक विचारांच्या होत्या त्या. त्या तर माझ्या आईला कौसल्यामाई आणि वडिलांना दशरथराजे म्हणूनच संबोधायच्यात. अगदी एखाद्या भांडणाच्या प्रसंगी सुद्धा त्या तेच संबोधन वापरायच्यात. "हे बघ कौसल्यामाय, काल तुझा नळावरचा नंबर तिसरा होता तर आज दुसराच होईन ना ! पहिला कामून झाला ?" वगैरे


आमच्या मित्रमंडळातही एकमेकांच्या पालकांविषयी घरी बोलताना आम्ही परागची आई, राजेशची आई वगैरे भाषेतच बोलायचो. "सुतवणे मॅडम" किंवा "गोतमारे मॅडम" असले शब्दप्रयोग आम्ही कधीच वापरले नाहीत. "मॅडम" फ़क्त शाळेतल्या बाईंना म्हणायचे असाच आमचा खाक्या होत्या. "गारवे मॅडम" किंवा "सराफ़ मॅडम"


असे एकमेकींना सार्वजनिक रित्या त्यांच्या त्यांच्या मुलांच्या नावाने हाक मारण्यात किती मजा होती ! हे आज जवळपास चार दशकांनंतर मला कळू लागले आहे. आज कुणी क्वचितच अशा नामाभिधानाने एकमेकांना बोलावत असेल. अर्थात घरातल्या घरात नवरा बायकोंच्या संवादात लाडिकपणे "काय अमक्याची / अमकीची आई" असे संबोधन होत असेल तर माहिती नाही. शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या संवादात तोंड घालू नये असा संकेत आहे. कर्मविपाक सिद्धांतानुसार अशा व्यक्तीला पुढला जन्म घुबडाचा मिळतो आणि रात्र रात्रभर इकडून तिकडे हिंडत भक्ष्य धुंडावे लागते असे म्हणतात बुवा. अर्थात घटस्फ़ोटांच्या खटल्यांचे वकील, त्या कोर्टातले न्यायाधीश किंवा फ़ॅमिली कोर्टाने नेमून दिलेले समुपदेशक यांचा याला अपवाद आहे. मी आपलं ते अतिशय गाजलेलं गाणं नाही का "कधी होनार तू रानी माझ्या लेकराची आई" वरून आपला एक अंदाज बांधला.


पण मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर अशा स्वतःच्या मुलाच्या / मुलीच्या नावावरून संबोधण्यामुळे त्या स्त्री च्या मनात त्या अपत्याविषयी जास्त स्नेहभाव उत्पन्न होत असेल, नाही का ? त्या अपत्याविषयी त्यांच्या मनात जास्त ओलावा निर्माण होणे ही क्रिया त्यांच्या मनात घडत नसेलच असे कशावरून ? त्याच अपत्यांविषयी नव्हे तर आपल्या सर्वच अपत्यांविषयी तिच्या मनात अशा संबोधनांमुळे मायेचा पाझर जास्त प्रमाणात फ़ुटत असेल आणि तिचे आपल्या एकूणच संसारावरचे प्रेम सदोदित वृद्धींगत होत असेल असाही माझा एक कयास आहे. आताच्या तुलनेत पूर्वीच्या काळी साध्या साध्या कारणांवरून घटस्फ़ोटांचे प्रमाण अतिशय कमी होते याचे हे सुद्धा एक कारण असू शकेल का ? याचा समाजशास्त्रज्ञांनी आणि समाजमानसशास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केला पाहिजे. "स्वातंत्र्योत्त्तर अर्धशतकात मराठी समाजात विवाहित स्त्रियांची आपापसातली संबोधने आणि त्याचा घटस्फ़ोटाच्या गुणोत्त्तरावर होणारा परिणाम: एक तौलनिक अभ्यास". बघा मी कला शाखेतल्या एखाद्या संशोधकाला त्याच्या / तिच्या पी. एच. डी. साठीच्या प्रबंधाचे नावच उपलब्ध करून दिले की नाही ?


या संबोधनात मूल नसलेल्या एखाद्या अभागी स्त्रीचे काय होत असेल याचाही विचार मी केला. त्याकाळी अशा स्त्रियांचे प्रमाण कमी होते पण मी अशाही स्त्रिया त्याकाळी सुद्धा समाजात, इतर कार्यक्रमात सहभागी होताना बघितले आहे. पण या संबोधनाने त्यांची हेटाळणी झाली असे मला कधी निदर्शनास आले नाही. एक सहज संबोधन म्हणून "अमक्याची / अमकीची आई" हे वापरले जायचे. निपुत्रिक स्त्रियांच्या हेटाळणीचे अनेक प्रसंग इतरत्र यायचेत, नाही असे नाही. जुन्या काळी समाजव्यवस्था सर्वत्रच आणि सगळीच चांगली होती असा माझा दावा कधीच नव्हता आणि नसेलही. पण अशा मुलांवरच्या संबोधनांमुळे आपली हेटाळणी होतेय असे कुणाला वाटल्याचे मी तरी बघितले / ऐकले नाही.


काळ पुढे सरकला. जुन्या काळातही त्रयस्थ ठिकाणी एकमेकींचा उल्लेख "देशमुखीण बाई", "पाटलीण बाई", "ठाकरीण" असे करीत असलेल्या बायका आता ८० च्या दशकात हाच उल्लेख एकमेकींसमोर बोलतानाही "देशमुख बाई", "पाटील बाई", "ठाकरे बाई" अशा करू लागल्यात. मुलांच्या नावांवरून उल्लेख होणे कमी कमी झाले.


९० चे दशक तर सर्वत्रच जागतिकीकरण घेऊन आलेत. जगाची रीत सगळ्यांना कळू लागली. आपणही जगाप्रमाणे वागले पाहिजे म्हणून बायकांचे एकमेकींबद्दलचे समोरासमोरील संवादांमधले उल्लेख एकेरी झालेत. "अगं वैभवी", "अगं सौदामिनी", "अगं अनघा" असे. आणि त्रयस्थ ठिकाणी बोलताना नावांसमोर "मॅडम" किंवा नुसते "मॅम" चिकटले. "वै्देही मॅम" किंवा "पल्लवी मॅम" असे.


बाकी गेल्या २५ वर्षांमध्ये करियर करियर करताना नवरा आणि बायको या दोघांचेही संसाराकडे दुर्लक्ष होऊन नवराबायकोंमधला बेबनाव थोडा जास्त वाढलाय असे निदर्शनास आले आहे का ? कुटुंबाशी आपण जोडले गेलेलो आहोत, एका कुटुंबाचा आपण अविभाज्य अंग आहोत ह्या गोष्टीचा नवरा आणि बायको दोघांनाही विसर पडत चाललाय का ? कुटुंबातल्या भल्या बु-या प्रसंगांना / व्यक्तींना स्वीकारून आपण समग्र कुटुंबासाठी काहीतरी संपत्त्ती, संस्कार यांचे निर्माण करत चाललोय की फ़क्त स्वतःच्याच सुखांसाठी सुखोपभोगाची साधने निर्माण चाललोय ? हा विचार आपण सगळेच विसरलोय का ? आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपुढे आपल्याला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, शक्ती नाही आणि इच्छा नाही असे होतेय का ? बरे ही वैयक्तिक महत्वाकांक्षा म्हणजे तरी अगदी आय. ए. एस. / आय. पी. एस. होण्याची असते का ? माझ्या ऑफ़िसात मी सगळ्यांचा / सगळ्यांची बॉस झाली पाहिजे आणि सगळ्यांना आपल्याच तालावर नाचवले पाहिजे ही ती अतिशय क्षुद्र महत्वाकांक्षा. त्यासाठी माझे दुर्लक्ष होऊन कुटुंब मोडकळीला आले तरी चालेल ही किंमत आपण मोजायला तयार आहोत. परम पूजनीय गोंदवलेकर महाराज दृष्टांत देतात त्याप्रमाणे जि-या, मि-यांसाठी आपण केशराला नाकारत चाललो आहोत का ?


गेल्या काही वर्षात तर अजूनच एक फ़ॅड बघायला मिळतेय. "Double Income No Kids" असे. "आम्हाला मूलबाळच नको. त्याच्याकडे लक्ष देणे, सांभाळ करणे, त्याला वाढविणे आमच्याकडून होणार नाही. तेव्हढी आमची शारिरीक, मानसिक आणि आर्थिक तयारी नाही." असे म्हणणारी जोडपी वाढीला लागलीत. निसर्गदत्त्त देणगीला अशा फ़ालतू कारणानी नाकारत आलेली जोडपी पाहिली की मग वाटून जातं की आता कुठली आली "मिहीरची आई" ? कोण म्हणेल "शौनकची आई" ? कोण म्हणेल "गार्गीची आई" ? 


"कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम" आता केवळ आठवणींच्या गाण्यांमध्येच उरेल.


 - माझ्या कौसल्यामाई चा अत्यंत अभिमान असलेला पुत्र , प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


गुरूवार, २६ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५