Showing posts with label माणसांची व्यक्तीमत्वे. Show all posts
Showing posts with label माणसांची व्यक्तीमत्वे. Show all posts

Friday, May 30, 2025

माणसांची व्यक्तीमत्वे जोखण्यात काळाने घडवलेला बदल

फार फार प्राचीन नाही, अगदी ३० - ३५ वर्षांपूर्वी एक काळ खरंच असा होता की एखा माणसाचे व्यक्तिमत्व तो किंवा ती कुठले साहित्य वाचताहेत, कुठली गाणी त्याला किंवा तिला आवडतायत यावरून जोखले जायचे. ब्रँडेड कपडे, चपला बुटं, महागडे गाॅगल्स हे सगळे तेव्हाही होते पण त्यावरून माणसांची आर्थिक स्थिती कळत असे ; त्यांची व्यक्तिमत्वं, त्यांची अभिरूची नाही, त्यांची संस्कृती नाही.

पुल, जीएंचं साहित्य होतं तसंच इतरही अनेक लेखकांचं साहित्य तेव्हा होतंच. सुनीताबाईंच्या "आहे मनोहर तरी" च्या जोडीला इतर चटोर लेखकांनी प्रसवलेल्या "मनोहर कहानियाँ" सुध्दा होत्या. "केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर" हे गाणे जिवापाड आवडणार्या वर्गासोबत बाबा सैगलचं "थंडा थंडा पानी" आवडणारी पब्लिकपण खूप होतीच की. पण एकंदर समाजाचीच "उच्च अभिरूची" हा संकल्पनेतली धारणा पक्की होती.
आजकाल मात्र समाजानेच "सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते" याचा स्वीकार केलाय. महागड्या घड्याळी, गाॅगल्स ; ब्रँडेड कपडे, बुटं चपला ह्यावरच माणसांची व्यक्तिमत्व तोलली जाऊ लागलीत. एकमेकांची साहित्यिक, सांगितिक, सांस्कृतिक अभिरूची जाणून घेण्याइतपत दोन व्यक्तींमधला संवादच थांबल्याचे हे परिणाम. त्यामुळे बाह्य आवरणावरूनच व्यक्तींना समाजात जोखणे क्रमप्राप्त झाले. आजकाल तर घराघरांमध्ये अगदी निकट नात्यांमधलाही संवाद संपत चाललेला आहे.
श्रीसमर्थांनी लिहील्याप्रमाणे आज सगळ्या समाजाची स्थिती "सुख सुख म्हणता हे दुःख ठाकूनी आले" अशी झालेली आहे. माणसे झपाट्याने एकटी पडत चाललेली आहेत. व्यक्ती म्हणून, समाज म्हणून भौतिक सुखांची नवनवीन क्षितीजे गाठत असताना आत्मिक समाधानाच्या जमिनीचा आधार आपण झपाट्याने गमावत चाललोय हे आपल्या लक्षातही येत नाही इतकी आपली भौतिक सुखांकडे धाव आणि मोठेपणाची हाव वाढत चाललेली आहे. यातून थोडा वेगळा विचार करणारा, तसे जगू पाहणारा विरळा माणूस हळूहळू वेड्या माणसांच्या यादीत जातोय.
- ३० वर्षांपासून समाजातल्या सगळ्या बदलांचा तटस्थ निरीक्षक आणि स्वतःच्या शाश्वत सुखाच्या कल्पनांबाबत अगदी दृढ धारणा असलेला एक अभ्यासक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.