किन्हीकरांकडे आषाढी नवमीलाच (कांदे नवमी) कांदे, लसूण, वांगी खाणे बंद होतात. बर्याच कुटुंबांमध्येही याच दिवशी होतात.
बर्याच जणांकडे संपूर्ण चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी द्वादशीला कांदे, लसूण, वांगी सुरू होतात तर काही कुटूंबांमध्ये ही सुरूवात थेट मार्गशीर्ष शुध्द षष्ठी (चंपाषष्ठी) ला असते.
पण किन्हीकरांकडे हे कांदे, लसूण, वांगे दसर्यापासून सुरू होतात. मला वाटतं यामागचे शास्त्रीय कारण लक्षात घेऊन आमच्या घरी हा बदल आमच्या आजोबा, पणजोबांनी आणला असावा. पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर झालेली असते, शेतकरीवर्गाचे नेहेमीचे शारिरीक कामपण कमी झालेले असते अशावेळी कांदा, लसूण, वांगे यांच्यासारख्या वातूळ पदार्थांचा त्याग करावा आणि पचनसंस्थेवर अत्याचार करू नये हा यामागचा शास्त्रीय हेतू आहे.
पण देवीच्या नवरात्राच्या आसपासच ऋतूबदलाला सुरूवात होते. आश्विनाच्या प्रतिपदेला वर्षा ऋतू संपून शरद ऋतू सुरू होतो. या ऋतूत पचनसंस्था पुन्हा मजबुतीकडे वाटचाल करू लागते. हा दृष्टीकोन लक्षात घेऊन मग किन्हीकरांकडे नवरात्रानंतर दसर्यापासून कांदा, लसूण, वांगे यांना परवानगी मिळाली असावी.
आमचे दादा (वडील) असेपर्यंत दसर्याच्या दिवशी ते बाजारात जाऊन वांगी, कांदे वगैरे आणायचेच. त्यादिवशी इतर पक्वान्नांसोबत "भरली वांगी" हा एक मेन्यु असायचाच.
दादा नवरात्रात नवमीला गेलेत. दसर्याच्या दिवशी संध्याकाळी त्यांचा देहही अग्निच्या स्वाधीन झाला. त्यादिवशीनंतर आम्ही भावंडे नवमी आणि दसरा साजरा करीत नाही. यादिवशी मुद्दाम गोडधोड करून खाण्याचा तर प्रश्नच नसतो.
काल संध्याकाळी धाकटा भाऊ घरी आला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर म्हणाला , "चल निघतो. वांगे, कांदे घ्यायचे आहेत, उद्यासाठी." मी खो खो हसत सुटलो. कारण मी पण नेमके तेच करणार होतो.
आता आम्ही आहोत तोवर या प्रथेमागचे कारण वगैरे आमच्या मुला नातवंडांना सांगू शकतो पण किन्हीकरांकडल्या त्यानंतरच्या तिसर्या चौथ्या पिढीत मात्र "दसर्याला आपल्या घरी गोडधोड नसतं. फक्त भरली वांगी किंवा भरीत भाकरी असाच कुळाचार असतो." असे कुणीतरी म्हणणारच नाही असे आजतरी सांगू शकत नाही. आमची ही एक डोळस प्रथा कुळाचार म्हणून रूढीबध्द होईल आणि पाळली जाईल.
- कुटुंबातल्या प्रत्येक कुळाचारांच्या पालनाविषयी तत्पर असला तरी त्यांच्या उदगमाचे कायम चिंतन करणारा डोळस भक्त, राम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment