Saturday, October 8, 2022

जोड बस, शहर बस सेवा, कल्याणकारी राज्य वगैरे.



 मला आठवतंय आमच्या बालपणी नागपुरात शहर  बस सेवेच्या "जोड बस" होत्या . बर्डी ते विमानतळ आणि बर्डी हे वाडी या दोन सरळसोट मार्गांवर त्या चालायच्यात. आम्ही राहात असलेल्या महाल, इतवारी विभागात या जोड बसेस का येत नाहीत याचे आम्हाला वैषम्य वाटे पण एकदा ही जोड बस विमानतळापासून वळविण्याची त्या ड्रायव्हर काकांची कसरत पाहिली आणि ही बस आपल्या भागातल्या रस्त्यांवर का येत नाही हे बालवयातही कळले. 


पुढल्या बाजूला नेहेमीच्या बससारखी (तिच्यापेक्षा लांबीने थोडी छोटी पण एंजिनाने दणकट प्रकृतीची असावी कारण जवळपास दीड ते पावणेदोनपट ओझे त्या बसला वाहावे लागे.) सहाचाकी बस आणि मागे तिला जोडलेली पुढल्या बसच्या पाऊणपट लांबीची आणि पुढल्या बसच्या पाऊणपट प्रवासी क्षमतेची चारचाकी ट्रेलर बस असा त्या जोडबसचा थाट असायचा. दोन बसेना जोडणारा बोगदाही (vestibule) असे. त्या काळात रेल्वेच्या दोन कोचेसना जोडणारा बोगदा दिसणेही अगदी दुर्मिळ होते. नागपूरवरून जाणाऱ्या हावडा - मुंबई मेल, गीतांजली एक्सप्रेस, जीटी एक्सप्रेस, तामिळनाडू एक्सप्रेस वगैरे निवडक गाड्याना ही बोगद्याची (vestibule) सुविधा बघायला मिळत असे. त्यामुळे एका बसमधून दुसऱ्या  बसमध्ये प्रवासादरम्यान जाता येणे ही एक मोठीच मौज होती. आम्हा लहानांना आणि बऱ्याच  मोठयांना सुद्धा. त्यामुळे या जोड बसचे आकर्षण सगळ्यांना होते. या बसमधून प्रवास करायला मिळावा म्हणून तत्कालीन पालक वर्ग आपापल्या पाल्यांना, घरी आलेल्या पाहुण्यांना घेऊन मुद्दाम विमानतळाची सहल काढायचेत. त्याकाळी नागपुरात सकाळी दोन विमानांचे आवागमन आणि संध्याकाळी दोन विमानांचे आवागमन होत असे. तितकेच पाहून पुन्हा जोडबसने परतणे हा सगळ्या मुलांसाठी, पाहुण्यांसाठी आणि यजमानांसाठीही आनंदाचा गाभा असे. एखाद्या गर्दीच्या मार्गावर एकाच वेळी एका बसमध्ये जास्त प्रवासी वाहून न्यायाचे असतील तर ही जोड बस किंवा डबल डेकर बस सोयीच्या होत्या.

नागपुरात डबल डेकर  बसेस १९८७-८८ च्य्या आसपास सुरू झाल्यात आणि चांगल्या १९९५ पर्यंत तरी त्या होत्या. त्यांचे मार्गही बर्डी ते वाडी आणि बर्डी ते मेडिकल  कॉलेज असे होते. 


"बहुजन हिताय बहुजन सुखाय" हे धोरण ठेवून या सरकारी सेवा चालायच्यात . लोकांच्या हिता, अहिताचा विचार लक्षात घेऊन मार्गांचे , त्यावरील सेवांचे नियोजन व्हायचे. पण हळूहळू "कल्याणकारी राज्य" ही संकल्पना असते हे सर्वसामान्य नागरिकच विसरलेत आणि सर्वत्र खाजगीकरणाचा वरवंटा फिरू लागला. खाजगीकरण सर्वत्रच वाईट असते असे नाही पण मूलभूत सोयी सुविधांमध्ये सगळीचकडे नफातोटा ना पाहता काहीकाही सेवा जनतेसाठी द्यायच्या असतात ही भावना सर्वपक्षीय सरकारे १९९१ नंतर जणू विसरूनच गेलीत.

आज नागपुरात गेली १२ वर्षे खाजगी शहर बस सेवा आहे. एस टी ने चालवलेल्या शहर बस सेवेच्या पासंगालाही पुरेल एव्हढीही  ती  नाही. एकेकाळी मध्यमवर्ग या शहर बस सेवेने शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत बहुतांशी प्रवास करीत असे. ऑफिसला जाणाऱ्या  चाकरमान्यांच्या सोयीसाठी म्हणून सकाळी ९, ९.
३० च्या सुमारास शहराच्या बहुतांशी सगळ्या भागांमधून "जिल्हा कचेरी', "जीपीओ", "आयकर भवन" किंवा "रवीभवन" अशा बसेस निघायच्यात आणि संध्याकाळी ५, ५.३० च्या सुमाराला या बसेस त्या चाकरमान्यांना ऑफिसमधून परत त्यांच्या त्यांच्या घरापाशी अगदी वक्तशीर आणून सोडायच्यात. बरीच शासकीय अधिकारी मंडळी या सेवांचा लाभ घेत असत. माणसे आणि जगणे दोन्हीही साधे होते. आज अशा सेवांचा विचार महापालिकेतले मुखंडही करू शकत  नाहीत आणि खाजगी बस ऑपरेटर्स ना त्यांचा त्यांचा प्रति किलोमीटर दर मिळाल्याशी मतलब. बसमध्ये दोन प्रवासी असोत किंवा दोनशे,  त्यांची वृत्ती "कुत्ता जाने और चमडा जाने" अशीच असते. कोण कशाला प्रवाशांचा वगैरे विचार करत बसतोय ?


२००९मध्ये कर्नाटकात म्हैसूर येथे प्रवासादरम्यान तिथल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासमोर ही जोड बस दिसली. कॅमेरा सरसावून फोटो काढेपर्यंत ती एव्हढीच फोटोत आली. बालपणीची हरवलेली मैत्रीण भेटावी एव्हढा आनंद मला त्यावेळी झाला होता. नंतरच्या मुक्कामात शहरात मी तिचा भरपूर शोधही घेतला पण तोपर्यंत तिचे दर्शन दुरापास्त झाले होते. 

- शहर बस सेवा कार्यक्षम वक्तशीर, स्वछ आणि परवडणारी असेल तर खाजगी वाहने बरीच कमी होऊन प्रदूषणादि समस्या कमी होतील या विचारांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य प्रवासी, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment