१९८९ च्या सप्टेंबर महिन्यात
कराडला महाविद्यालयीन शिक्षणासाठी जायला निघालो तोपर्यंत आम्हा वैदर्भीय मुलांच्या
पाहण्यात टेकडीच्या गणपतीची टेकडी, आदास्याच्या गणपतीची टेकडी हीच ठिकाणे उंच असलेली
म्हणून प्रसिद्ध असायचीत. काही काही मुले पचमढीला वगैरे जाऊन आलेली असायचीत. त्यांच्या
वर्णनावरून "क्या सातपुडा पर्बत है बे ? यें उंचा, यें उंचा. हिमालय जितनाही होंगा
करीब करीब." अशा फ़ोकनाड्या ऐकून आम्ही मनातल्या मनात हिमालयाएव्हढा म्हणजे साधारण
सातपुडा किती मोठा असेल ? याची गणिते करीत असू. नागपूरवरून वर्धेकडे जाताना बसमधून,
रेल्वेगाडीतून जाताना उजव्याबाजुला दिसणारी कान्होलीबाराची टेकडी आम्हाला पर्वतासारखी
वाटे.
तमाम वैदर्भीय जनतेप्रमाणे
पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, रत्नागिरी ही शहरे साधारण १०० ते १५० किमीच्या
परिघात असावी अशी आमची तोपर्यंत समजूत होती. ही सगळी शहरे कोकणाच्या आसपास आणि सह्याद्री
पर्वतात असली पाहिजे ही आमची धारणा. त्यामुळे पहिल्यांदा कराडला जाताना महाराष्ट्र
एक्सप्रेसने पुणे सोडले आणि अर्ध्या तासात गाडी राजेवाडी - शिंदवणेच्या घाटांमधून,
बोगद्यांमधून जायला लागली तेव्हा आम्ही सर्व वैदर्भीय विद्यार्थ्यांनी खिडकीला डोके
लावून जमेल तेव्हढे बाहेर बघत त्या घाटांची, बोगद्यांची मजा घ्यायला सुरूवात केली.
कराडला स्टेशनवर उतरलो तेव्हा कराड स्टेशनसमोरच पूर्वेला असलेला विशालकाय पर्वत आमची
जणू नजरबंदी करून गेला. कराडमध्ये थोडे रूळल्यावर त्या पर्वताचे नाव "सदाशिवगड"
आहे ही माहिती आम्हाला मिळाली. दरवेळी नागपूरला जाताना स्टेशनवर वाट बघत असताना आणि
नागपूरवरून परतल्यानंतर बसची, रिक्षाची वाट बघत स्टेशनवर उभे असताना तो सदाशिवगड आमच्या
नजरेत भरत असे.
तोवर गिर्यारोहणाविषयी आमचे
ज्ञान हे साप्ताहिक लोकप्रभा, किंवा "सकाळ"च्या दिवाळी अंकांमध्ये काहीकाही
गिर्यारोहकांच्या मुलाखती वाचून आलेले म्हणजे फ़क्त पुस्तकी ज्ञान होते. रॉक क्लाईंबिंग,
रॅपलिंग वगैरे शब्द परिचयाचे होते पण त्याकाळी लिखाणात फ़क्त शब्दांची रेलेचेल असायची.
आजसारख्या आकृत्या, छायाचित्रे त्यावेळी उपलब्ध नसत. त्यामुळे आम्हालाही हे ज्ञान फ़क्त
शाब्दिक होते. त्या गिर्यारोहणात वापरली जाणारी साधनसामुग्री कशी असेल ? याचे चित्र
आमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या मताने आपापल्या मनात चितारून ठेवलेले होते.
आम्ही द्वितीय वर्ष स्थापत्य
अभियांत्रिकीत असताना आमचा "सर्व्हे कॅम्प" सदाशिवगडावर गेला होता. त्या
गडावर वरपर्यंत जायला स्टेशनकडून दिसणा-या बाजूच्या विरूद्ध दिशेने एक रस्ताही आहे,
शिवाय पाय-याही आहेत आणि गडाच्या माथ्यावर एक शंकराचे पुरातन मंदीरही आहे हे नवनवीन
शोध आम्हाला लागलेत. तत्पूर्वी आमची समजूत अशी की सह्याद्रीच्या अनेक पर्वतमाथ्यांप्रमाणे
हा सदाशिवगडाचा पर्वतमाथाही आजवर कुणी चढलेला नाही. पण इथे तर वर्दळ वगैरे भरपूर होती. फ़क्त इथे वर्दळ आहे हे आम्हाला कराड स्टेशनकडल्या
बाजूने आजवर दिसू शकली नव्हती.
१९९१ मधल्या एका विकेंडला लागून
३ सुट्ट्या आलेल्या होत्या. त्या हिवाळी शनिवारी आम्हा दोघातिघा नागपूरकर मित्रांचा
सदाशिवगड सर करण्याचा मनसुबा ठरला. सकाळी लवकर आटोपून आम्ही कॉलेजपासून कॅनॉल स्टॉपवर
गेलो आणि तिथून कराडकडून येणा-या कराड - वाघेरी बसने ओगलेवाडीचा थांबा, रेल्वेपूल वगैरे
ओलांडून सदाशिवगडाच्या पायथ्याशी उतरलोत. पायथ्याशी असलेल्या गावातून रस्त्याने जाण्याऐवजी
स्टेशनकडून दिसणारा पहाड चढून जाऊ या आत्मविश्वासाने आम्ही त्या बाजूने निघालोत. आम्हा
तिघांपैकी एकालाही तोवर असे पहाड अशा अनवट वाटांनी चढण्याचा अनुभव नाही. पण तारूण्याचा
जोश आणि "पाहू न बे का होते तं ? काय हुईन जास्तीत जास्त ? वर नाई चढू त उतरता
त येतेच न बे." ही टिपीकल वैदर्भीय बेफ़िकीरी.
आमची सकाळची पोटपूजा वगैरे
आटोपलेली होती. दोन तीन तासात गड चढू आणि मग परतताना दुपारचे जेवण इथेच कुठेतरी उरकून
संध्याकाळपर्यंत हॉस्टेलला जाऊ असा आमचा बेत आखलेला. गावाची हद्द संपली आणि शेताशेतांमधून
गडाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो. साध्या साध्या वाटांनी गड चढायला सुरूवात केली. एकमेकांची
मजा घेत घेत, गप्पांमध्ये जवळपास अर्धा गड आम्ही चढून गेलो. मध्येच मागे वळून कराड
स्टेशनकडे नजर टाकली. एक दोन मालगाड्यांची त्याकाळात तिथून ये जा झाली तेव्हा पहाडावरून
त्या गाड्या अगदी चैत्रगौरीमध्ये मांडलेल्या देखाव्यासारख्या दिसत होत्या. कराड स्टेशनचा
आणि आसपासचा संपूर्ण परिसर तिथून आम्ही मनसोक्त न्याहाळून घेतला. आजवर स्टेशनवरून हा
पहाड आम्ही बघत होता आज या पहाडावरून स्टेशन कसे दिसतेय ते आम्ही वेगळ्या नजरेने बघून
घेत होतो. आजवरच्या आमच्याच दृश्यमिश्रणांमध्ये आम्ही अडकलो होतो.
आणखी थोडे पुढे चढल्यावर आम्हाला
एक कठीण उभी चढण लागली. आजुबाजूला असलेल्या झुडूपांना धरून एकमेकांच्या सहाय्याने ती
कठीण चढण आम्ही मोठ्या कष्टाने चढलो. त्या चढणीवर असलेल्या भुशभुशीत जमिनीमुळे पाऊल
टिकणे कठीण झाले होते. सारखी माती घसरत होती. प्रत्येक पाऊल टाकताना त्या मातीविषयी
खूप अविश्वास जाणवत असताना आम्ही ती चढण चढलोत खरे पण एकंदर पर्वतारोहणाविषयी आम्हा
तिघांचाही आत्मविश्वास डळमळीत व्हायला सुरूवात झालेली होती हे ही तितकेच खरे.
ती चढण चढून आम्ही एका अरूंद
माचीवजा जागी आलो खरे पण तिथेच थबकलोत. कारण यापुढील चढण अधिक खडी आणि अधिक भुशभुशीत
मातीतली होती. जणू भुसभुशीत मातीच्या उभा कडाच आम्हाला चढायचा होता. आत्तापर्यंत असलेला
तिघांचाही आत्मविश्वास एकदम शून्य झाला. हतबल होऊन आम्ही त्या माचीवरच थबकलोत. काहीच
सुचेना. बरं, परत फ़िरतो म्हटलं तर आत्ताच कष्टाने चढून आलेला परतीचा मार्ग कसा आहे
? याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. त्या मार्गावरून परतणे म्हणजे घसरगुंडीवरून अनिश्चित
अंतर घसरणे आणि शरीराला इजा करून घेणे हे नक्की. पण पुढे जाणेही अशक्य. इतकी कठीण चढण
आणि ती सुद्धा भुसभुशीत जमिनीतली ? आम्ही अशा गोष्टींचा कधी विचारही केलेला नव्हता.
अशा गोष्टी कधी आजवर वाचल्याही नव्हत्या. काय बरे करावे ? या विचारात आम्ही तिघेही.
सुन्न होऊन त्या माचीवर उभे. आता आपल्याला किती काळ या जागी रहावे लागेल ? याची अनिश्चितता
सगळ्यांच्या मनात आलेली जाणवत होती. आपण रात्रभर इथे अडकून पडलोत तर आपले हॉस्टेलवरचे
इतर मित्र आपला शोध घेत इथे येतील का ? आले तर एव्हढ्या मोठ्या पर्वतावर आपण त्यांना
सापडू का ? आणि आपण सापडलोत तरी आपली सुटका करायला त्यांना एखादे हेलीकॉप्टर वगैरे
आणता येईल का ? तसे सुचेल का ? आणि सुचले तरी ते परवडेल का ? वर्षाला १६५ रूपये फ़ी
भरून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारी सगळी मध्यमवर्गीय मंडळी आम्ही.
आमचे खर्च आणि विचारही मर्यादितच.
अशा हतबल आणि "संपलं सगळं"
या अवस्थेत काही काळ गेला. आमच्यातल्या एकाला एक युक्ती सुचली. "अबे वर जाण्यापेक्षा
या माचीवरून आहे त्याच लेव्हलला आजूबाजूला सरकत सरकत जाऊ. कुठूनतरी सोपी चढण सापडेलच
नं." इतर काहीही न सुचल्यामुळे आम्हाला तोच मार्ग पटला आणि आम्ही त्या अगदी अरूंद
माचीवरून उत्तरेकडे (गावाच्या दिशेने) सरकायला लागलो. पायाखालची जमीन भुसभुशीतच होती
पण गाव हळूहळू जवळ करतोय ही भावना प्रबळ होती. आणि जवळपास अर्धा तास असे सावधानतेने
सरकत सरकत गेल्यानंतर....
...आम्हाला गडावर जाणा-या पाय-याच गवसल्यात की. वा ! आम्ही तिघांनीही सुटकेचा मोठ्ठा
निःश्वास सोडला आणि भरभर पाय-या चढून गडावरच्या मंदीरात दाखल झालोत. तिथे त्या शंभू
महादेवाचे दर्शन घेऊन राजमार्गाने गडाच्या पायथ्याशी आलोत. त्या माचीवरच्या अर्ध्या
तासाची आठवण येऊन आम्हाला आता हसायला येत होते आणि तेव्हढेच घाबरायला पण होत होते.
खरेच आपण तिथे अडकून पडलो असतो तर ? हा प्रश्न घाबरवणारा आणि हादरवणारा होता.
परत हॉस्टेलला आल्यानंतर सगळ्या
मित्रांना हा किस्सा अगदी साग्रसंगीत सांगितल्या गेला. कधीही मोठी टेकडीही न चढलेल्या
या "थ्री मस्केटीयर्स"नी केलेली सदाशिवगडाची चढाई हॉस्टेलवर चर्चेचा, मनमुराद
हसण्याचा आणि आमच्या साहसाला वाखाणण्याचा विषय झाला होता.
त्यानंतर अनेक वेळा कराडला
गेलो. दरवेळी स्टेशनवर उतरलोत की नजर समोरच्या सदाशिवगडाकडे जातेच. आजही आम्ही अडकून
पडलो होतो ती माची अजूनही दृष्टीला पडते आणि तो अर्धा तास आठवतो. त्या माचीवरून दिसणारे
स्टेशन डोळ्यासमोर येते. तारूण्याच्या उत्साहात केलेले आपले धाडस आठवून हसू येते आणि
आता आपल्याला आपल्याच त्या वयाची असूया वाटते. आज मोठे झालोत, जबाबदा-या वाढल्यात आता
आपण असे साहस करू शकत नाही या भावनेने आपण थोडे खंतावतोही.
पण या सगळ्या गदारोळात तीन
भावी गिर्यारोहकांच्या स्वप्नाचा अकाली मृत्यू मात्र झाला हे नक्की.
- साहसी गिर्यारोहक (ए. हो.
इ. अ. = एकेकाळी होण्याची इच्छा असलेला) राम प्रकाश किन्हीकर.