१ जुलै १९९० रोजी गोवा एक्सप्रेसची सुरूवात झाली. तत्पूर्वी १९९० च्या रेल्वे अर्थसंकल्पात या गाडीची घोषणा झाली होती. तेव्हा फ़ेब्रुवारीत रेल्वे अर्थसंकल्पात नवीन गाड्यांची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली की प्रतिष्ठेच्या गाड्या त्यावर्षी १ जुलै ला सुरू व्हायच्यात आणि मग इतर गाड्या वर्षभरात धावायला लागायच्यात.
भारतीय रेल्वेत राज्यांच्या नावाच्या अनेक गाड्या आहेत. त्या त्या राज्यांच्या नावाच्या गाड्या त्या त्या राज्याच्या राजधानीच्या शहरापासून ते देशाच्या राजधानीपर्यंत प्रवाशांना जलद आणि प्रतिष्ठेची सेवा पुरविणा-या गाड्या म्हणून प्रसिद्ध आहेत. अर्थात याला काही काही राज्ये अपवाद आहेत.
तामिळनाडू एक्सप्रेस : चेन्नई ते नवी दिल्ली खूप कमी थांबे घेऊन जाणारी अती जलद एक्सप्रेस. एकेकाळी या गाडीला विजयवाडा - वारंगल - बल्लारशाह - नागपूर - भोपाळ आणि झाशी एव्हढेच थांबे होते. नंतरच्या काळात भोपाळ ते नवी दिल्ली या प्रवासात एक दोन थांबे वाढलेत तरी इंजिनांच्या वाढत्या शक्तीमुळे या गाडीची धाववेळ तितकीच राहिली. अजूनही ही गाडी रोज रात्री १० च्या सुमाराला चेन्नईवरून निघते आणि तिस-या दिवशी सकाळी ७ च्या सुमाराला नवी दिल्लीला पोहोचते. साधारण २२०० किलोमीटर प्रवास ३३ तासांत ही गाडी करते. परतीचा प्रवाससुद्धा ही गाड्या याच वेळा राखून करते. नवी दिल्ली वरून रात्री १० च्या सुमाराला निघून चेन्नईला तिस-या दिवशी सकाळी ७ च्या सुमाराला ही गाडी पोहोचते.
अत्यंत प्रतिष्ठेची गाडी. कमी थांबे असल्याने जलद व प्रवाशांसाठी सुखकर प्रवास करवून देणारी ही गाडी. एकेकाळी भारतीय रेल्वेच्या नियमानुसार या गाडीसाठी किमान ६०० किलोमीटर अंतराचे तिकीट घ्यावे लागे. त्यापेक्षा कमी अंतराच्या तिकीटावर या गाडीतून प्रवास करता येत नसे. लाल + पिवळ्या रंगांचे डबे आणि बहुतांशी वेळेला त्याला मॅचिंग रंगसंगतीची दोन दोन डिझेल एंजिने ही या गाडीची ओळख होती.
आंध्रप्रदेश एक्सप्रेस : जुन्या एकीकृत आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या हैद्राबादमधून दररोज सकाळी ७ वाजता निघणारी ही गाडी दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता नवी दिल्लीला पोहोचत असे. परतीच्या प्रवासात हीच गाडी संध्याकाळी ५ च्या सुमारास नवी दिल्लीवरून निघून दुस-या दिवशी संध्याकाळी ७ च्या सुमाराला हैद्राबादला पोहोचत असे. १७०० किलोमीटर अंतर साधारण २६ तासात.
या गाडीलाही काजीपेठ - बल्लारशाह - नागपूर - भोपाळ - झाशी - ग्वाल्हेर एव्हढेच मर्यादित थांबे होते. तामिळनाडू एक्सप्रेससारखी किमान अंतराच्या तिकीटाची मर्यादा या गाडीलाही होती. या गाडीसाठीही किमान ६०० किलोमीटर अंतराचे तिकीट घ्यावे लागे. त्यापेक्षा कमी अंतराच्या तिकीटावर या गाडीतूनही प्रवास करता येत नसे. या गाडीलाही लाल + पिवळ्या रंगांचे डबे आणि दोन दोन डिझेल एंजिने मिळायची
आंध्र आणि तेलंगण वेगळे झाल्यानंतर या गाडीला तेलंगण एक्सप्रेस असे नाव मिळाले.
कर्नाटक एक्सप्रेस आणि केरळ एक्सप्रेस : खरेतर ही गाडी सुरूवातीला केरळ - कर्नाटक एक्सप्रेस म्हणूनच आलेली होती. १९७७ साली जनता पक्ष सरकारने नवी दिल्लीवरून दक्षिणेच्या दोन राज्यांना एकसाथ जोडणारी गाडी म्हणून ही गाडी सुरू केली होती. नवी दिल्ली वरून झांशी - भोपाळ - नागपूर - वारंगल - विजयवाडा - गुडूर - रेणीगुंटा -अरक्कोणम मार्गे जोलारपेट्टी ला ही गाडी पोहोचली की केरळ एक्सप्रेस व कर्नाटक एक्सप्रेसचा मार्ग वेगवेगळा होत असे. या रेकमधले कर्नाटक एक्सप्रेसचे डबे बंगलोरला जायचे तर उरलेल्या डब्यांनिशी केरळ एक्सप्रेस कोईंबतूर - शोरनूर - एर्नाकुलम (कोचीन) या मार्गाने तिरूअनंतपुरम कडे रवाना होत असे. हिरवा + पिवळा अशा आकर्षक रंगसंगतीचे डबे या गाड्यांना लागायचेत. जुन्या केरळ - कर्नाटक एक्सप्रेसमुळे या गाडीचे नाव के के एक्सप्रेस असे पडले होते. आजही महाराष्ट्राच्या नगर - सोलापूर पट्ट्यात ही गाडी के. के . एक्सप्रेस म्हणूनच ओळखली जाते.
१९८३ मध्ये माधवराव शिंदे रेल्वेमंत्री असताना या गाड्या वेगवेगळ्या झाल्यात. आता कर्नाटक एक्सप्रेस नवी दिल्ली - झांशी - भोपाळ -इटारसी - खांडवा - भुसावळ - मनमाड - अहमदनगर - दौंड - सोलापूर - वाडी - गुंतकल - धर्मावरम मार्गे बंगलोरला जाते तर केरळ एक्सप्रेस नवी दिल्ली वरून झांशी - भोपाळ - नागपूर - वारंगल - विजयवाडा - गुडूर - रेणीगुंटा - तिरूपती - काटपाडी - जोलारपेटी - कोईंबतूर - एर्नाकुलम मार्गे तिरूअनंतपुरम ला जाते.
आंध्रप्रदेश आणि तेलंगण ही दोन वेगळी राज्ये झाल्यानंतर आंध्रप्रदेश एक्सप्रेस ही विशाखापट्टण ते नवी दिल्ली अशी धावू लागली. ही पण सुपरफ़ास्टच गाडी. खरेतर ही गाडी आंध्रप्रदेशची राजधानी अमरावती (विजयवाडा) ते नवी दिल्ली अशी धावायला हवी होती पण आंध्रप्रदेशची रेल्वे राजधानी विशाखापट्टण पासून ही गाडी धावते. सुरू झाली तेव्हा ही गाडी संपूर्ण एसी डब्ब्यांची होती. आता या रेकमध्ये काही नॉन एसी डबे पण जोडल्या जाऊ लागलेत.
या सगळ्या प्रतिष्ठित गाड्यांना अपवाद म्हणजे छत्तीसगढ एक्सप्रेस आणि आपली महाराष्ट्र एक्सप्रेस. फ़ार पूर्वीपासून छत्तीसगढ एक्सप्रेस ही बिलासपूर पासून हजरत निझामुद्दीन (दिल्ली) पर्यंत जायची. जेव्हा छत्तीसगढ हे वेगळे राज्य झाले नव्हते, एकीकृत मध्यप्रदेशचा भाग होते तेव्हापासून छत्तीसगढ एक्सप्रेस ही आपली प्रांतिक अस्मिता जपून आहे. पण ही गाडी एकंदर लेकूरवाळी आहे. खूप सारे थांबे घेत घेत हळूहळू ही आपला मार्ग कापते. काही वर्षांपूर्वी ही गाडी थेट अमृतसरपर्यंत वाढवलेली आहे.
जशी आंध्र प्रदेशची रेल्वे राजधानी विशाखापट्टण तशी छत्तीसगढची रेल्वे राजधानी बिलासपूर. इतर राज्यांना मिळालेल्या राजधानी एक्सप्रेस गाड्या त्या त्या राज्यांच्या राजधानीला दिल्लीशी जोडतात पण छत्तीसगढ राजधानी एक्सप्रेस मात्र रायपूर ते नवी दिल्ली धावण्याऐवजी बिलासपूर ते नवी दिल्ली अशी धावते. रायपूरकरांनी उदार मनाने ही गाडी बिलासपूरपर्यंत नेऊ दिली. उद्या आंध्र प्रदेशला राजधानी मिळालीच तर ती विशाखापट्टण वरून धावेल यात मला काहीच शंका नाही. विजयवाडाकर तेव्हढे उदार आहेत.
त्याच न्यायाने महाराष्ट्र एक्सप्रेस ही मुंबई ते नवी दिल्ली जाणारी प्रतिष्ठित व जलद सेवा असायला हवी होती. पण महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदिया - नागपूर ते कोल्हापूर अशी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात धावते.एकाच राज्यात सर्वाधिक प्रवास करणारी गाडी म्हणून असणारा विक्रम या गाडीच्या नावावर आहे. आणि ही गाडीही तशी लेकुरवाळीच. वाटेतली जवळपास सगळी स्टेशन्स घेऊन धावणारी ही बिनमहत्वाची बिचारी गाडी. या गाडीच्या बिचारेपणाच्या प्रवासाबद्दल मी अनेक लेख लिहीले आहेत. ते लेखाशेवटी दिलेले आहेत.
१९८९ च्या ऑगस्ट महिन्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून कराडला जाण्यासाठी मी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये पाऊल टाकले त्यानंतर जुलै १९९३ मध्ये स्नातक अभियंता म्हणून तिथून बाहेर पडेपर्यंत मला महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास अक्षरशः शेकडो वेळा करावा लागला. पहिल्याच वर्षात सात आठ वेळा प्रवास केल्यानंतर हा प्रवास अत्यंत बोअरींग आहे याची जाणीव आम्हा सगळ्यांना झाली आणि प्रवासाचे वेगवेगळे विकल्प आम्ही शोधायला सुरूवात केली. आणि १ जुलै १९९० रोजी गोवा एक्सप्रेसची सुरूवात झाली.
या गाडीचे नाव जरी गोवा एक्सप्रेस असले तरी अजूनपर्यंत गोव्यात ब्रॉड गेज रेल्वे पोहोचली नव्हती. कोकण रेल्वे १९९८ मध्ये सुरू झाली आणि मिरज - लोंडा - दूधसागर (तेच ते चेन्नई एक्सप्रेस सिनेमात दाखवलेले गाव) - मडगाव - वास्को द गामा हा रेल्वेमार्ग १९९० मध्ये मीटर गेज होता. त्यामुळे गोवा एक्सप्रेस ही गाडी हजरत निझामुद्दीन ते मिरज हा प्रवास ब्रॉड गेजने करायची आणि मिरजेच्या स्टेशनवर बाजुच्याच फ़लाटावर मीटर गेजची गोवा एक्सप्रेस उभी असायची. थेट गोव्याचे तिकीट असलेले प्रवासी या गाडीतून उतरून शेजारच्या मीटर गेज गाडीत बसायचेत. (पुलंचे पेस्तनकाका आठवलेत ना ? त्या प्रवासातही पुल मुंबईवरून बेळगावच्या आपल्या प्रवासात मिरजेला गाडी बदलून मीटर गेजने पुढला बेळगावपर्यंतचा प्रवास करते झाले होते.) ती मीटर गेज गोवा एक्सप्रेस गोव्याला जायची. परतीच्या प्रवासातही तसेच मीटर गेज गोवा एक्सप्रेस वास्को द गामा ते मिरज हा प्रवास करायची आणि मिरजेवरून ब्रॉड गेजची गोवा एक्सप्रेस हजरत निझामुद्दीन पर्यंत धावायची. नंतर मग मिरज - लोंडा ते मडगाव या मार्गाचे रूंदीकरण झाले आणि गोवा एक्सप्रेस थेट वास्को द गामा पर्यंत धावायला लागली.
ही गाडी मिरज - सातारा - पुणे - दौंड - मनमाड - भुसावळ - इटारसी - भोपाळ असे कमी थांबे घेत दिल्ली गाठायची. त्या गाडीचा नंबर २७०१ डाऊन आणि २७०२ अप असा होता. १ जुलै १९९० पासूनच भारतीय रेल्वेत दोन किंवा तीन आकडी गाडी नंबर्स बदलून चार आकडी नंबरांची व्यवस्था सुरू झाली होती. या गाडीला दक्षिण मध्य रेल्वेच्या सुपरफ़ास्टचा पहिला नंबर मिळाला होता. पुणे मिरज या एकेरी रेल्वे मार्गावर धावलेली ही पहिली सुपरफास्ट गाडी. या गाडी च्या आकर्षणाचा आणखी एक भाग म्हणजे आमची नेहेमीची महाराष्ट्र एक्सप्रेस जाताना आणि येतानाच्या प्रवासातही मनमाड ते पुणे हा प्रवास किट्ट काळोखात करायची. त्यामुळे आमच्या नागपूर ते कराड या प्रवासात अहमदनगर, दौंड ही स्टेशन्स लागतात ही खबर आमच्या काही दोस्तांना २ वर्षांनंतर लागली. २७०१/२७०२ हा प्रवास दिवसा ढवळ्या करायची त्यामुळे हा भाग कधी नव्हे तो बघायला मिळायचा.
त्याकाळी या गाडीच्या डब्ब्यांची पोझिशन अशी असायची.
एस-४, एस-१, एस-२, एस-३, ए-१, ए-२, एफ़-१, एस-५, एस-६ ,एस-७, एस-८, जनरल, जनरल, जनरल + रेल्वे डाक सेवा, जनरल, गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन. (एकूण १६ डबे).
त्यावेळी ही गाडी आपला रेक ७०२१/७०२२ हैद्राबाद-ह.निझामुद्दीन दक्षीण एक्सप्रेस शी शेअर करायची. त्यामुळे ए.सी. कोचेस च्या आधी चे एस-१ ते एस-४ कोचेस ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम लिंक एक्सप्रेस चे व उरलेला रेक ह.निझामुद्दीन-हैद्राबाद असा असायचा. गाडी च्या बोर्डांवरही असेच ड्युएल मार्किंग असायचे. एकाच बोर्डावर वर हैद्राबाद-ह.निझामुद्दीन किंवा ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम आणि खाली मिरज ह.निझामुद्दीन असे मार्किंग असायचे. ७०२१ हैद्राबाद-ह.निझामुद्दीन दक्षीण एक्सप्रेस हजरत निझामुद्दीनला पहाटे पोहोचली की दुपारी हाच रेक २७०२ अप हजरत निझामुद्दीन ते मिरज गोवा एक्सप्रेस म्हणून प्रवासाला सुरूवात करायचा. तर दुपारी २७०१ डाऊन हजरत निझामुद्दीनला पोहोचली की संध्याकाळी ७०२२ अप दक्षिण एक्सप्रेस म्हणून निघत असे.
मिरजेला वास्को द गामा ते मिरज हा प्रवास करणारी गोवा एक्सप्रेस रात्रभर प्रवास करून पहाटे पहाटे यायची तर मिरज ते हजरत निझामुद्दीन गोवा एक्सप्रेस सकाळी सात वाजता मिरजेवरून निघायची. रात्री ८:३० च्या आसपास म्हणजे १३:३० तासात ९०० किलोमीटर अंतर पार करून आम्हा नागपूरकरांना भुसावळला सोडायची. भुसावळवरून आम्हाला नागपूरला जाण्यासाठी त्या काळची अहमदाबाद - हावडा एक्सप्रेस किंवा त्यामागून येणारी दादर - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस मिळायची. सकाळी सात वाजता मिरजेवरून निघालेले आम्ही नागपूरकर १२०० किलोमीटर्सचा प्रवास आम्ही चक्क २२:३० तासात करू शकायचोत. याच प्रवासासाठी आमची लेकुरवाळी महाराष्ट्र एक्सप्रेस तब्बल २७ तास घेत असे. त्यामुळे गोवा एक्सप्रेसने भुसावळ आणि नंतर नागपूर गाठणे हे आम्हा महाराष्ट्र एक्सप्रेस पिडीत विद्यार्थ्यांसाठी सुंदर प्रवासस्वप्न होते.
या प्रवासात एक अडचण अशी होती की ही गोवा एक्सप्रेस तेव्हा कराडला थांबत नसे. त्यामुळे ही गाडी पकडायला आम्हाला एकतर सातारा गाठावे लागे किंवा मिरजेला जावे लागे. त्यातल्या त्यात सातारा थोडे सुखावह होते. सकाळी कराडवरून निघून सातारा, तिथून सातारा स्टेशन आणि मग ही गाडी गाठावी लागे. एक दोन वेळा वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथे शिकत असलेल्या माझ्या मित्राकडे आदल्या दिवशी रात्री मुक्काम करून दुस-या दिवशी सकाळी मिरजेवरूनही ही गाडी पकडली आहे. या खटाटोपाचा मुख्य उद्देश म्हणजे ही गाडी कराडला न थांबता प्लॅटफ़ॉर्मवरून धाडधाड करीत धूळ उडवीत कशी जाते याचा अनुभव घेणे असा असायचा.
रेल्वे फ़ॅनिंग हे बरेचसे संसर्गजनक आहे त्यामुळे आमच्या रेल्वे फ़ॅनिंगची लागण आमच्या रूम पार्टनर्सना झाली नसती तरच नवल. माझा अगदी जवळचा मित्र आणि रूम पार्टनर विजय कुळकर्णी (आता कैलासवासी. २०११ मध्ये दुर्दैवाने विजयचा जीवनप्रवास संपला.) आम्ही दोघांनीही आमच्या नागपूर ते कराड या परतीच्या प्रवासात भुसावळ ते सातारा ते कराड हा प्रवास गोवा एक्सप्रेसने करण्याचे निश्चित केले. १९९२ च्या हिवाळी सुट्ट्यांमध्ये विजय नाशिकवरून माझ्याकडे नागपूरला आलेला होता. आम्ही दोघांनीही नागपूर, माझे आजोळ चंद्रपूर येथे खूप धमाल मजा केली. आणि परतीच्या गोवा एक्सप्रेसने करावयाच्या तशा गैरसोयीच्या पण अत्यंत उत्कंठावर्धक प्रवासाला सुरूवात केली.
आमचे अकोला ते कराड असे थेट तिकीट व भुसावळ ते सातारा हे गोवा एक्सप्रेसचे आरक्षण होते. अकोल्याला माझ्या मावशीकडे आम्ही गेलोत. तिथून शेगावला जाऊन संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन आणि आशिर्वाद घेतलेत आणि अकोल्याला येऊन आमच्या प्रवासासाठी सज्ज झालोत.
दिनांक : ६ / १ / १९९२ व ७ / १ / १९९२ ची रात्र. थंडी मी म्हणत होती. तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली. अत्यंत बोचरी थंडी, बोचरे वारे. रात्री मी आणि विजय अकोला स्टेशनवर आलोत. आपल्याला दिवसाढवळ्या धावणा-या महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करून रात्री उबदार पांघरूणात झोपता आले असते असा विचार दोघांच्याही मनात झळकून गेला पण भुसावळ ते सातारा अशा सुपरफ़ास्ट रेल्वे फ़ॅनिंगचा आनंद घ्यायचा तर काही तरी किंमत मोजली पाहिजे यावर सुद्धा दोघांचेही एकमत होते.
दिनांक : ७ / १ / १९९२ अकोला स्टेशनवर हावडा - अहमदाबाद एक्सप्रेस आली. खरेतर या गाडीपाठोपाठ येणा-या नागपूर - दादर सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये आम्हाला ब-यापैकी जागा मिळू शकली असती. पण सेवाग्राम एक्सप्रेस भुसावळला पोहोचण्याची वेळ आणि गोवा एक्सप्रेसची भुसावळवरून निघण्याची वेळ यात फ़क्त अर्ध्या तासाचे अंतर होते. तो धोका आम्हाला पत्करायचा नव्हता. हावडा - अहमदाबाद एक्सप्रेस नेहेमीप्रमाणे प्रवाशांनी भरून आलेली. दोन मिनीटांच्या थांब्यात एका डब्ब्यात आम्ही घुसलोत. रिझर्वेशन तर नव्हतेच. दरवाज्यात बसून जाऊ म्हटले तर बाहेरच्या गोठवणा-या थंडीपासून आणि गाडीच्या वेगामुळे अजून भन्नाट वेगाने वाहणा-या वा-यांपासून वाचण्यासाठी डब्ब्याचे दार बंद ठेवणे अत्यावश्यक होते. कसेबसे दार बंद करून त्याला टेकून बसलोत. दाराच्या , खिडकीच्या फ़टींमधून येणारा वारा अक्षरशः चावत होता. स्वेटर्स घालून वरून आमची पांघरूणे घेऊन आम्ही कुडकुडत ते दो्न - सव्वादोन तास काढलेत आणि भुसावळला उतरल्यानंतर पहिल्यांदा गरमागरम चहाच्या स्टॉलकडे धाव घेतली.
भुसावळनंतर मात्र आमचा प्रवास आरामदायक होता. आमची रिझर्वेशन्स होती. खिडकीच्या जागा होत्या. रेल्वे फ़ॅनिंग पूर्णपणे एन्जॉय करीत आम्ही साता-या पोहोचलोत. तिथून सातारा बसस्टॅण्ड आणि तिथून बसने कराडपर्यंत.
आजही मला ती अकोला स्टेशनवरची गोठवणारी रात्र आठवतेय. रेल्वे फ़ॅनिंगसाठी इतकी गैरसोय सोसण्याची आम्हा तरूणांची ती तयारी. त्यानंतर मग भुसावळ ते सातारा प्रवासात आलेली मजा हे सगळेच अगदी अविस्मरणीय.
- रेल्वेवर (आणि बसवरही) मनापासून प्रेम करणारा रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.