शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड
स्नेहसंमेलन १९९२
आमचे स्नेहसंमेलन तीन दिवस चालायचे. साधारण जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा फ़ेब्रुवारीचा पहिला आठवडा. पहिल्या दिवशी सकाळी टाय डे आणि साडी डे. तेव्हा आमच्याकडे फ़क्त टायच असायचे आणि आमच्या सहाध्यायी मुलींकडे साडीच. इव्हिनींग गाऊन, वन पीस वगैरे त्यांच्याकडे नसायचेच आणि असले तरी महाविद्यालयात त्यांनी परिधान करावे अशी त्याकाळची सार्वजनिक परिस्थिती नव्हती. पहिल्या दिवशी संध्याकाळी स्नेहसंमेलनाचे उदघाटन होत असे. त्या उदघाटन कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू यायचेत. मला आठवतय आम्ही प्रथम वर्षाला असताना त्यावेळेच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि आम्ही तृतीय वर्षात असताना पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू श्री शं. ना. नवलगुंदकर आलेले होते. त्यांची खूप विचारप्रवर्तक भाषणे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आवडली होती.
उदघाटन झाले की चार एकांकिका व्हायच्यात. आमच्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण तीन अंकी नाटक असायचे. त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालयाचे सत्र सुरू झाले की विद्यार्थ्यांची निवड व्हायची. आणि मग जवळपास महिनाभर तालमी व्हायच्यात. दररोज रात्री ९ ते थेट रात्री २, २.३० पर्यंत. महाविद्यालयाच्याच एखाद्या प्रयोगशाळेत. या तीन अंकीचे दिग्दर्शक असलेल्या आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या उपस्थितीत. आम्ही प्रथम वर्षाला असताना "सौजन्याची ऐशीतैशी", द्वितीय वर्षाला असताना "प्रेमाच्या गावा जावे" तृतीय वर्षाला असताना "लग्नाची बेडी" आणि अंतिम वर्षाला असताना "तीन चोक तेरा" अशी तीन अंकी नाटके सादर केली होती. त्यात "प्रेमाच्या गावा जावे" आणि "तीन चोक तेरा" या दोन नाटकांमध्ये मी सहभागी होतो. तर इतर दोन वर्षे आम्ही एकांकिका सादर केलेल्या होत्या. तीन अंकीत काम करायला मिळणे हा विद्यार्थ्यांसाठी एक बहुमान असायचा. पण प्रत्येक नाटकात पात्र मर्यादित. ७ ते ८. आणि चांगले अभिनेते असलेले इच्छुक विद्यार्थी २० ते २५ असायचेत. हा मेळ कसा बसावा ? मग ज्या विद्यार्थ्यांची निवड तीन अंकी नाटकासाठी होत नसे ती सर्व मंडळी एकांकिका करायला घेत. सुंदर सुंदर एकांकिका, खूप समजून सादर व्हायच्यात.
दुस-या दिवशी सकाळी ट्रॅडिशनल डे व्हायचा. संध्याकाळी तीन अंकी. तिस-या दिवशी सकाळी रोझ डे,चॉकलेट डे आणि फ़िशपॉंडस व्हायचेत. तिस-या दिवशी संध्याकाळी गाणी, नकला आदि व्हेरायटी एन्टरटेनमेंट चा कार्यक्रम असायचा. त्यात प्रत्येक वर्षात एखादा असा जबरदस्त गाणारा / गाणारी असयचेत की त्यांच्या गाण्यासाठी तो कार्यक्रम हाऊसफ़ुल्ल व्हायचा. वन्समोअर मिळायचेत. संजय मोतलिंग, प्रफ़ुल्ल देशपांडे, साधना पाटील, सतीश तानवडे ही मंडळी त्यांच्या गाण्यांसाठी अगदी प्रसिद्ध होती. वाईट गाणी, नाच, नकला यांची हुर्यो उडायची. (अशाच एका भयानक नाचाची हकीकत नंतरच्या ब्लॉगमध्ये.) हा कार्यक्रम झाला की आमच्या स्नेहसंमेलनाचे सूप वाजायचे. आम्ही सगळे आपापल्या अभ्यासांमध्ये गुंतायचोत. हे तीन दिवस अगदी भारलेले, मंतरलेले असायचेत.
१९९२ च्या स्नेहसंमेलनाची गोष्ट. आम्ही सगळे तृतीय वर्षात आलेलो होतो. तोवर आपल्या नकला, अभिनयामुळे मी, अतिशय गोड गाण्याने सतीश तानवडे, आपल्या सामाजिक कार्याने अतुल लिमये (विद्यार्थी परिषदेचा सातारा जिल्हा प्रमुख म्हणून अतुलने खूप छाप पाडली होती. आता अतुल राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठा अधिकारी आहे.), आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे व हुशारीमुळे कमलेश म्हात्रे आणि आपल्या गोड स्वभावामुळे विजय कुळकर्णी (आता विजय या जगात नाही. 2011 ला त्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला.) आम्ही मुलांमध्ये आपापले स्थान निर्माण केलेले होते. त्या वर्षी ट्रॅडिशनल डे ला काय बरे करावे ? असा विचार आम्ही त्या दिवशी सकाळी करीत बसलेलो होतो.
आजसारखी त्यावेळी तयार कॉस्चुम्स पुरविणारी दुकाने कराडमध्ये नव्हती. असतील तरी वेषभूषांचे भाडे वगैरेवर खर्च करण्याची आमची मानसिक (कुणाकुणाची आर्थिकही) तयारी नव्हती. इतर सगळी मुले झब्बा पायजामा या पारंपारिक पोषाखात निघालेली असताना या सगळ्यांपासून वेगळे आपण काय करू शकतो ? यावर आमचा खल चाललेला होता. अचानक मला कल्पना सुचली.
त्यावेळी चाणक्य ही टी व्ही सिरीयल आम्हा विद्यार्थ्यांमध्ये फ़ार लोकप्रिय होती. म्हणून मग चाणक्य ही थीम वापरून आम्ही वेषभूषा करण्याचे ठरवले. त्यासाठी मुख्य अडचण होती ती धोतर नेसण्याची. आम्हा कुणाकडेही धोतर नव्हते आणि ते नेसायचे कसे हे ही माहिती नव्हते. त्यावरही आम्ही उपाय शोधला.
आमच्या महाविद्यालय परिसरात आमची प्राधापक मंडळीही त्यांच्या त्यांच्या शासकीय निवासस्थानात रहात होती. त्यात आमच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातले प्रा. राघवेंद्र रामाचार्य मंगसुळी सर पण रहायचे. (त्यांचे पूर्ण नाव मला अजूनही लक्षात आहे. आणि सरांचे नाव प्रा. आर. आर. मंगसुळी असे लिहीले तर त्यांच्या व्यक्तीमत्वाला कमीपणा येईल असे मी मानतो.) सर अत्यंत कर्मठ कर्नाटकी वैष्णव. व्यायामाने कमावलेली उत्तम, पिळदार शरीरयष्टी, उत्तम शिकवणे आणि कमालीचा शांत स्वभाव यामुळे सर महाविद्यालयात आम्हा मुलांमध्ये प्रिय होते. सरांचा मुलगा पण इलेक्ट्रीकल ब्रॅंचमध्ये आम्हाला दोन वर्षे सिनीयर होता. त्याचे नाव पूर्णप्रज्ञ राघवेंद्र मंगसुळी. तो सुद्धा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आणि शांत स्वभावाचा होता. महाविद्यालयात सर पॅंट शर्ट या पोषाखात असले तरी घरी गेल्या गेल्या ते धोतर उपरणे असल्या पारंपारिक पोषाखात असायचेत हे आम्हाला माहिती होते. काही कामानिमित्त त्यांच्या घरी जाण्याचे योग आलेत तेव्हा आम्ही सरांना या पारंपारिक पोषाखांमध्ये बघितलेले होते. आपली परंपरा, उपासना इत्यादि उपचार सर अगदी कसोशिने पाळत असत हे आम्हाला माहिती होते. त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याकडून धोतरे आणायचीत आणि त्यांनाच नेसवून पण मागायचीत असा बेत ठरला.
त्याप्रमाणे आम्ही पाच जण सरांकडे गेलोत. सरांकडून आणि त्यांच्या खालीच प्राध्यापक निवासस्थानात राहणारे प्रा. डॉ. मुळे सर यांच्याकडून आम्ही पाच धोतरे मिळवलीत. आमच्यापैकी कुणालाही धोतर नेसता येत नसल्याने सरांनीच ती आम्हाला नेसवून दिलीत. उत्तरीय म्हणून वर पांघरायला आम्ही आमच्याजवळ असलेल्या शाली घेतल्या. मी माझी दैनंदिन स्नानसंध्या, पोथीपूजा हॉस्टेलच्या खोलीतही करीत असल्याने माझ्याकडे भस्म होतेच. ते आम्ही सगळ्यांनी कपाळाला लावले. आणि आम्ही चाणक्याची आधुनिक शिष्यमंडळी तयार झालोत.
अभ्यासाचे वातावरण म्हणून प्रत्येकाने आपापल्या विषयाचे सगळ्यात जाड पुस्तक घेतले. मी "खुर्मीं"चा ग्रंथ घेतला, कुणी "थेराजा" घेतले, कुणी "डोमकुंडवारां"चा ग्रंथ घेतला आणी पायात चप्पल न घालता आम्ही सगळे हॉस्टेलवरून महाविद्यालयात पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिथल्या कॉरिडॉर्समधून श्रीगणपती अथर्वशीर्षाची मोठ्या आवाजात आवर्तने करीत सर्व परिसर दुमदुमून सोडला. महाविद्यालयात असलेले विद्यार्थी, आमचे सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर आमच्या या आगळ्यावेगळ्या वेषभुषेचा खूप छान प्रभाव पडलाय हे आमच्या लक्षात येत होते. आणि वेषभुषेचे पहिले पारितोषिक आम्हालाच मिळणार याची आम्हाला खात्री पटत चालली होती.
फ़िरता फ़िरता आम्ही त्याकाळच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या इमारतीसमोर (जी व्हाईट हाऊस म्हणून तेव्हा प्रख्यात होती.) आलो. तिथे आमचा एक फ़ोटो निघाला. तेव्हा फ़ोटोज काढणे अत्यंत मर्यादित होते. आमचा एक फ़ोटो कॉलेज कॉरिडॉरमध्ये आणि एक व्हाईट हाऊससमोर निघाला आणि ही आठवण आमच्या मर्मबंधातली आठवण बनून राहिला.
आता मी स्वतःच एक अभियांत्रिकी शिक्षक आहे. आमच्या महाविद्यालयात दरवर्षी साजरे होणारे ट्रॅडिशनल डेज मी मोठ्या उत्साहात, नवनव्या वेषभुषांसह साजरे करतो. माझ्या स्वतःच्या महाविद्यालयीन जीवनात जाऊन पुन्हा तो काळ अनुभवतो.
स्नेहसम्मेलन २०१४: फ़ॅबटेक कॉलेज, सांगोला. थलायवा पोषाख.
स्नेहसम्मेलन २०२२: पल्लोट्टी कॉलेज, नागपूर. नारदीय कीर्तनकार पोषाख.
स्नेहसम्मेलन २०२४: पल्लोट्टी कॉलेज, नागपूर. वारकरी कीर्तनकार पोषाख.
- शिक्षक असलो तरी विद्यार्थीदशा पुन्हा अनुभवू इच्छिणारा, प्राध्यापक वैभवीराम प्रकाश किन्हीकर.