Wednesday, September 7, 2022

देवाचिये द्वारी - ६०

 


देवासी परम सख्य करावे I प्रेम प्रीतीने बांधावे I

आठवे भक्तीचे जाणावे I लक्षण ऐसे  II

 

देवाच्या सख्यत्वासाठी I पडावी जिवलगांसी तुटी I

सर्व अर्पावे सेवटी I प्राण तोहि वेचावा II

 

मेघ चातकावरी वोळेना I तरी चातक पालटेना I

चंद्र वेळेसि उगवेना I त-ही चकोर अनन्य II

 

ऐसे असावे सख्यत्व I विवेके धरावे सत्व I 

भगवंतावरील ममत्व I सांडूचि नये II

 

सखा मानावा भगवंत I माता पिता गण गोत I 

विद्या लक्ष्मी धन वित्त I सकळ परमात्मा II

 

पाहता देवाचे कृपेसी I मातेची कृपा कायसी I 

माता वधी बाळकासी I विपत्ती काळी II

 

देवे भक्त कोण वधिला I कधी देखिला न ऐकिला I 

शरणागतासि देव झाला I वज्रपंजरू II

 

देव प्रीती राखो जाणे I देवासी करावे साजणे I 

जिवलगे आवघी पिसुणे I कामा न येती II

 

म्हणोनि सख्य देवासी करावे I हितगुज तयासी सांगावे I 

आठवे भक्तीचे जाणावे I लक्षण ऐसे II

 

 

या सख्यभक्ती नावाच्या समासात श्रीसमर्थ आपण सर्व साधकांना भगवंताशी सख्य कसे असावे याबद्दल सांगताहेत. चातक पक्षी पाऊस पडो न पडो मेघांवर जसा रागावत नाही, चांदणे उगवो न उगवो चकोर पक्षी जसा  चंद्रावर न रागावता त्याच्याशी कायम सख्यत्व साधत असतो तसे सख्यत्व आपले आणि परमेश्वराचे असावे अशी श्रीसमर्थांची मनोमन इच्छा आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध द्वादशी, शके १९४४ , दिनांक ०७/०९/२०२२)


Tuesday, September 6, 2022

देवाचिये द्वारी - ५९

 


सातवे भजन ते दास्य जाणावे I पडिले कार्य तितुके करावे I

सदा सन्निधचि असावे I देवद्वारी II

 

देवाचे वैभव सांभाळावे I न्यूनपूर्व पडोचि नेदावे I

चढते वाढते वाढवावे I भजन देवाचे II

 

सर्वा ठायी अति सादर I आणि दास्यत्वास हि तत्पर I

कार्यभागाचा विसर I पडणार नाही II

 

ऐसे वैभव चालवावे I आणि नीच दास्यत्वहि करावे I

पडिले प्रसंगी सावध असावे I सर्वकाळ II

 

श्रीमददासबोधाच्या नवविधा भक्ती या चौथ्या दशकातील दास्यभक्ती या सातव्या समासात श्रीसमर्थांनी दास्यत्व कसे करावे यावर आपण सर्वांसाठी अतिशय मौलिक भाष्य केलेले आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध एकादशी, शके १९४४ , दिनांक ०६/०९/२०२२)


Monday, September 5, 2022

देवाचिये द्वारी - ५८

 


साहावी भक्ती ते वंदन I करावे देवासी नमन I

संत साधू आणि सज्जन I नमस्कारीत जावे II

 

भक्त ज्ञानी आणि वीतरागी I महानुभाव तापसी योगी I

सत्पात्रे देखोनि वेगी I नमस्कार घालावे II

 

जेथे दिसती विशेष गुण I ते सदगुरूचे अधिष्ठान I

या कारणे तयासी नमन I अत्यादरे करावे II

 

सर्व देवास नमस्कारिले I ते येका भगवंतास पावले I

येदर्थी येक वचन बोलिले I आहे ते ऐका II

 

नमस्कारे लीनता घडे I नमस्कारे विकल्प मोडे I

नमस्कारे सख्य घडे I नाना सत्पात्रांसी II

 

परम अन्याय करूनी आला I आणि साष्टांग नमस्कार घातिला I

तरी तो अन्याये क्षमा केला I पाहिजे श्रेष्ठी II

 

नमस्कारास वेचावे नलगे I नमस्कारास कष्टावे नलगे I

नमस्कारास काहीच नलगे I उपकर्ण सामग्री II

 

साधक भावे नमस्कार घाली I त्याची चिंता साधूस लागली I

सुगम पंथे नेऊन घाली I जेथील तेथे II

 

 

या सहाव्या समासात श्रीसमर्थांनी वंदन भक्तीबद्दल आपणा सर्वांना उपदेश केलेला आहे. वंदन भक्तीसारख्या साध्या सोप्या मार्गाचे किती फ़ायदे आहेत ह्याचा श्रीसमर्थांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला जणू प्रसादच दिलेला आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध नवमी, शके १९४४ , दिनांक ०५/०९/२०२२)


Sunday, September 4, 2022

देवाचिये द्वारी - ५७

 


पाचवी भक्ती ते आर्चन I आर्चन म्हणजे देवतार्चन I

शास्त्रोक्त पूजाविधान I केले पाहिजे II

 

हरिहरांच्या अनंतमूर्ती I भगवंत जगदात्मजगदीशमूर्ती I

शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती I देवतार्चनी पूजाव्या II

 

ऐशा परमेश्वराच्या मूर्ती I पाहो जाता उदंड असती I

त्यांचे आर्चन करावे भक्ती I पाचवी ऐसी II

 

याही वेगळे कुळधर्म I सोडू नये अनुक्रम I

उत्तम अथवा मध्यम I करीत जावे II

 

काया वाचा आणि मने I चित्ते वित्ते जीवे प्राणे I

सदभावे भगवंत आर्चने I या नाव आर्चन भक्ती II

 

ऐशी पूजा न घडे बरवी I तरी मानसपूजा करावी I

मानसपूजा अगत्य व्हावी I परमेश्वरासी II

 

मने भगवंतास पूजावे I कल्पूनि सर्वही समर्पावे I

मानसपूजेचे जाणावे I लक्षण ऐसे II

 

देवपूजा, कुळधर्म या सगळ्या गोष्टींच्या पालनाबद्दल श्रीसमर्थ किती आग्रही होते ते या अर्चनभक्ती नाम समासातून आपल्याला कळते. गेल्या १५ - २० वर्षात आपणा सगळ्यांमध्येच देवपूजा, कुळधर्म याबद्द्ल एकप्रकारचे औदासिन्य आलेले आहे त्याबद्दल आपण ही समर्थउक्ती लक्षात घेऊन पुन्हा एकदा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

साग्रसंगीत देवपूजा काही कारणांनी शक्य नसेल तर मानसपूजेचाही पर्याय श्रीसमर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध अष्टमी, शके १९४४ , दिनांक ०४/०९/२०२२)


Saturday, September 3, 2022

देवाचिये द्वारी - ५६

 


पादसेवन तेचि जाणावे I कायावाचामनोभावे I

सदगुरूचे पाय सेवावे I सद्गतीकारणे II

 

सद्वस्तू दाखवी सदगुरू I सकळ सारासार विचारू I

परब्रम्हाचा निर्धारू I अंतरी बाणे II

 

बहुधा अनुभवाची अंगे I सकळ कळती संतसंगे I

चौथे भक्तीचे प्रसंगे I गोप्य ते प्रगटे II

 

 

श्रीमददासबोधाच्या नवविधा भक्ती नामक चौथ्या दशकाच्या पादसेवनभक्ती नावाच्या चौथ्या दशकात श्रीसमर्थ आपल्याला पादसेवन भक्ती म्हणजे काय आणि हे पादसेवन नेमके कुठल्या सदगुरूचे करावे याबाबत उदबोधन करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध सप्तमी, शके १९४४ , दिनांक ०३/०९/२०२२)


Friday, September 2, 2022

देवाचिये द्वारी - ५५

 


स्मरण देवाचे करावे I अखंड नाम जपत जावे I

नामस्मरणे पावावे I समाधान II

 

नित्य नेम प्रातःकाळी I माध्यानकाळी सायंकाळी I

नामस्मरण सर्वकाळी I करीत जावे II

 

चालता बोलता धंदा करिता I खाता जेविता सुखी होता I

नाना उपभोग भोगिता I नाम विसरो नये II

 

बाळपणी तारूण्यकाळी I कठीणकाळी वृद्धाप्यकाळी I

सर्वकाळी अंतकाळी I नामस्मरण असावे II

 

काहीच न करून प्राणी I रामनाम जपे वाणी I

तेणे संतुष्ट चक्रपाणी I भक्तांलागी सांभाळी II

 

चहु वर्णा नामाधिकार I नामी नाही लहानथोर I

जड मूढ पैलपार I पावती नामे II

 

 

नवविधा भक्तीतली तिसरी भक्ती म्हणजे नामस्मरणभक्ती. ही नामस्मरण्भक्ती किती सोपी आणि भगवंताचे सान्निध्य लाभण्यासाठी किती उपयुक्त आहे हे श्रीसमर्थ या नामस्मरण्भक्ती नाम समासातून आपल्याला सांगताहेत..

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध षष्ठी, शके १९४४ , दिनांक ०२/०९/२०२२)


Thursday, September 1, 2022

देवाचिये द्वारी - ५४

 


सगुण हरिकथा करावी I भगवत्कीर्ती वाढवावी I

अखंड वैखरी वदवावी I येथायोग्य II

 

बहुत करावे पाठांतर I कंठी धरावे ग्रंथांतर I

भगवत्कथा निरंतर I करीत जावी II

 

नित्य नवा हव्यास धरावा I साक्षेप अत्यंतचि करावा I

हरीकीर्तने भरावा I ब्रम्हगोळ अवघा II

 

नाना नवरसिक श्रृंगारिक I गद्यपद्याचे कौतुक I

नाना वचने प्रस्ताविक I शास्त्राधारे बोलावी II

 

टाळ मृदंग हरिकीर्तन I संगीत नृत्य तान मान I

नाना कथानुसंधान I तुटोचि नेदावे II

 

 

नवविधा भक्तीतली दुसरी भक्ती म्हणजे कीर्तनभक्ती. ही कीर्तनभक्ती कशी करावी हे श्रीसमर्थ या कीर्तनभक्ती नावाच्या समासात वर्णन करून सांगताहेत. ही कीर्तनभक्ती का करावी याविषयीही श्रीसमर्थांचा विशेष भर आहे हे आपल्याला जाणवते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध पंचमी, ऋषीपंचमी, शके १९४४ , दिनांक ०१/०९/२०२२)