Sunday, September 4, 2022

देवाचिये द्वारी - ५७

 


पाचवी भक्ती ते आर्चन I आर्चन म्हणजे देवतार्चन I

शास्त्रोक्त पूजाविधान I केले पाहिजे II

 

हरिहरांच्या अनंतमूर्ती I भगवंत जगदात्मजगदीशमूर्ती I

शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती I देवतार्चनी पूजाव्या II

 

ऐशा परमेश्वराच्या मूर्ती I पाहो जाता उदंड असती I

त्यांचे आर्चन करावे भक्ती I पाचवी ऐसी II

 

याही वेगळे कुळधर्म I सोडू नये अनुक्रम I

उत्तम अथवा मध्यम I करीत जावे II

 

काया वाचा आणि मने I चित्ते वित्ते जीवे प्राणे I

सदभावे भगवंत आर्चने I या नाव आर्चन भक्ती II

 

ऐशी पूजा न घडे बरवी I तरी मानसपूजा करावी I

मानसपूजा अगत्य व्हावी I परमेश्वरासी II

 

मने भगवंतास पूजावे I कल्पूनि सर्वही समर्पावे I

मानसपूजेचे जाणावे I लक्षण ऐसे II

 

देवपूजा, कुळधर्म या सगळ्या गोष्टींच्या पालनाबद्दल श्रीसमर्थ किती आग्रही होते ते या अर्चनभक्ती नाम समासातून आपल्याला कळते. गेल्या १५ - २० वर्षात आपणा सगळ्यांमध्येच देवपूजा, कुळधर्म याबद्द्ल एकप्रकारचे औदासिन्य आलेले आहे त्याबद्दल आपण ही समर्थउक्ती लक्षात घेऊन पुन्हा एकदा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

साग्रसंगीत देवपूजा काही कारणांनी शक्य नसेल तर मानसपूजेचाही पर्याय श्रीसमर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध अष्टमी, शके १९४४ , दिनांक ०४/०९/२०२२)


No comments:

Post a Comment