Thursday, September 22, 2022

आणि आमचा पंगा झाला - २

 यापूर्वीचा पंगा इथे वाचा.


काय होतं की दोन वर्षांपूर्वी कन्यारत्नाच्या इंजिनीअरींग ऍडमिशनच्या वेळेला आपण त्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास वगैरे केलेला असतो. तंत्रशिक्षण संचलनालयाच्या सूचना वाचून त्यांच्या ऍड्मिशन प्रक्रियेचा, विशिष्ट महाविद्यालयात जागा वाटपाचा नक्की अल्गोरिदम काय असेल याचा आपणाला एक अंदाज आलेला असतो. कॉलेजेसचे चॉइसेस भरण्याच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यासाठी गेल्या दोन तीन वर्षांचे, आपल्याला हव्या असलेल्या कॉलेजेसचे, हव्या असलेल्या ब्रॅंचेसमधले प्रत्येक राऊंडचे कट ऑफ़ बघून, आणि जागा वाटपाचे अल्गोरिदम लक्षात आणून आपण अगदी परफ़ेक्ट चॉइसेस दिलेले असतात. आपल्या मुलीसोबत तिच्या दोन तीन मैत्रिणींनाही त्या अचूक विश्लेषणाचा फ़ायदा झालेला असतो. फ़ारसा मनस्ताप न होता सगळ्यांच्या ऍडमिशन्स (त्यांच्या त्यांच्या मार्कांनुसार) सर्वोत्तम ठिकाणी पार पडलेल्या असतात. 


मग पुढल्या वर्षी एक कॉलेजमधला मित्र त्याच्या मुलीच्या ऍडमिशनबाबत आपला सल्ला घ्यायला येतो. त्याच्या मुलीला साधारण बरे मार्कस असतात. गेल्यावर्षी आपल्या मुलीला होते त्याच्या जवळपासच. आपला गेल्यावर्षीचा अनुभव ताजा असल्याने आपण त्याला नेमस्तपणे सहज मिळू शकणारी कॉलेजेस चॉइसेस म्हणून टाक हे सुचवतो. पहिल्या फ़ेरीत आपल्या मार्कांनुसार किंवा अपेक्षेपेक्षा थोडे वरचे महाविद्यालय / त्या महाविद्यालयातली ब्रॅंच मिळून गेली की डोके किती शांत होते हा माझा अनुभव. आणि तोच अनुभव, तोच आनंद सगळ्यांना मिळावा ही प्रामाणिक नेमस्त इच्छा. 


पण त्या मुलीच्या मनात काहीतरी मोठी स्वप्ने असतात. तिला पुण्याची अगदी टॉप कॉलेजेस खुणावत असतात. पुण्याची टॉप कॉलेजेस खरोखरच टॉपच आहेत, अतिशय दर्जेदार आहेत, जागतिक दर्जाप्राप्त आहेत. पण तिथे जायला लागणारे मार्कांचे पाठबळ नको का ? तिथे ऍडमिशनला लागणारे मार्कस आणि आपल्याला मिळालेले मार्कस यात एक दोन टक्क्याचा फ़रक असला तर ही महत्वाकांक्षा नैसर्गिक आहे हे मी समजू शकतो पण तिथे लागणारे मार्कस आणि आपल्याला मिळालेले मार्कस यात १० - १२ टक्के फ़रक असताना ही महत्वाकांक्षा ठरत नाही, हे दिवास्वप्न ठरते हे मी ओळखून होतो. तसे त्या मित्राला मी नेमस्त भाषेत सांगण्याचा प्रयत्नही केला.


पण काय मुलांच्या जिद्दीपुढे ब-याच आईबापांचेही काही चालत नसते. माझे ऍनालिसीसचे एक दोन तास, फ़ोनवर चॉइसेस कुठले भरावे याबद्दल जवळपास अर्धा तास दिलेला सल्ला आणि मला वेळी, अवेळी फ़ोन आल्यानंतर सुद्धा (एखादेवेळी लेक्चरमध्ये असताना कॉल घेऊ शकलो नाही तर नंतर रिटर्न केलेला कॉल, व्हॉटसऍपवर सविस्तर सांगितलेले चॉइसेस) न वैतागता दिलेले सल्ले यांचा काहीही फ़ायदा झालेला नसतो. कारण आपल्या ऍनालिसिस पेक्षा पुत्रीप्रेम वरचढ ठरते. पहिल्या राऊंडला पुण्यातल्या जागतिक दर्जाच्या इंजिनीअरींग कॉलेजेसचा चॉइस त्या मित्राने टाकून दिलेला असतो. 


पहिल्या राऊंडचे जागावाटप जाहीर होते. अपेक्षेप्रमाणे कुठल्याच कॉलेजमध्ये तिची ऍडमिशन होऊ शकलेली नसते. मग तो चिंताक्रांत मित्र पुन्हा आपल्या खनपटीला बसतो. "चॉइस भरताना तू अभ्यासपूर्ण सांगितलेले चॉइसेस न भरता मी माझ्या मुलीच्या अपेक्षेचेच चॉइसेस भरलेले आहेत" हे त्याने त्यावेळी आपल्याला घाबरून सांगितलेले नसते. आता आपल्याला सांगण्यावाचून त्याला पर्यायच नसतो. त्याच्या मुलीपेक्षा कमी मार्कस असणा-या तिच्या मैत्रिणींना आपण सांगितलेल्या नागपुरातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला असतो. ती मात्र आता दुस-या राऊंडची वाट बघत असते. पहिल्या राऊंडपेक्षा दुस-या राऊंडमध्ये जागा खूपच कमी उपलब्ध असतात हे आत्तापर्यंत तिला आणि माझ्या मित्राला कळले असते. तरीही आपण त्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी पुन्हा ऍनालिसिस करतो, सल्ले देतो.


मग आता तिसरे वर्ष येते. पुन्हा काही मित्र आणि त्यांचे सुपुत्र, सुकन्या परिक्षेला बसलेले असतात. आपण आजवर फ़ुकट केलेली मेहेनत, कळकळीने दिलेले सल्ले यांचे काहीच मोल नसल्याचे आपल्या लक्षात आलेले असते. मित्रांचे, एरव्ही लांबचे असलेल्या पण आता निकालानंतर अचानक मी जवळचा वाटू लागलेल्या काही नातेवाईकांचे (व-हाडी भाषेत अशांना "विटेस गोटे मावसभाऊ" असे संज्ञान आहे.) फ़ोन्स येऊ लागतात. गत काही अनुभवांवरून शहाणे झालेले आपण अशा प्रकारच्या सल्ल्यांची व्यावसायिक किंमत त्यांना कळवतो. नाही म्हटले तरी अशा प्रकारच्या कन्सल्टन्सीमध्ये आपली बुद्धीमत्ता, वेळ आणि काही पैसा (जिओ काय घरी फ़ुकट इंटरनेट देत नाही.) आपण खर्ची घातलेला असतो आणि फ़ुकट सल्ल्याची काहीच पत्रास लोक ठेवत नाहीत याचा अनुभव आपल्याला आलेला असतो.


दोनच दिवसांनी एखाद्या नातेवाईकाकडून "अरे, तो अमकाढमका (तोच तो, विटेस गोटा मावसभाऊ) आजकाल तू फ़ारच पैशाच्या मागे लागला आहेस असे सांगत होता" असे वर्तमान आपल्याला कळते. पीडा सुटल्याच्या आनंदातून आपण पुन्हा एकदा त्या "पाताळविजयम" नावाच्या मद्रासी सिनेमाच्या राक्षसासारखे "हॉ..हॉ..हॉ.." करत विकत हसत सुटतो. 


- "भले तरी देऊ..." या श्रीतुकोबांच्या उक्तीवर विश्वास असलेला, पण नाठाळांसाठी अगदी पाताळविजयम या मद्रासी सिनेमातला राक्षस असणारा साधा मराठी माणूस, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment