Wednesday, August 7, 2019

आणि आमचा पंगा झाला — १


(पुढे भरपूर भाग येणार म्हणून हा भाग १)
काहीकाही माणसांची personality किती मवाळ असावी ? कितीही असू देत. आमच्याइतकी नसावी.
त्याच काय झाल ? मधे आमचे एक रियुनियन झाले. शाळेपासून बिछडलेले आम्ही सर्व जवळपास पाव शतकांनी एकमेकांना भेटलो. आनंद झाला. पण काही काही लोकांच judgement at first site इतक जबरदस्त असत की पहिल्या भेटीतच हे गिर्‍हाईक मवाळ आहे हे माझ्या एका मित्राने हेरले.
मग दररोज सकाळी व्हाॅटसअॅप वरून मला जीवनविषयक उपदेशामृत (सगळे ढापलेले forwards. उसनी विद्वत्ता.) मी पण सौजन्याने कधी हसर्‍या स्मायलीज, कधी थम्सप ची खूण असे पाठवून बोटचेपे धोरण सुरू ठेवत होतो.
मनातून त्याला विचारावेसेही वाटे "बाबा रे. माझ्या मनाची अस्थिर अवस्था वगैरे झालीय हे तुला कोणी सांगितल ? आणि तुला मदत मागितलीय कुणी ?
बर, बाकीच्या इतर मित्रांकडे आडून आडून चौकशी केली तर हे येडच्याप कौन्सिलर इतर कुणाच्याही व्हाॅटसअॅपवर तसला प्रकार करत नव्हते असे कळले. विचार केला. जाऊ देत ना. न वाचता, नुसते हसरे चिन्ह, प्रोत्साहन चिन्ह पाठवायला ना आपले हात झिजत, ना फोनची screen.
पुढेपुढे या महाशयांची हिंमत अधिकच वाढली. कधीही फोन करायचे आणि उचलल्या उचलल्या आपले जीवनाचे तत्वज्ञान माझ्या कानात ओतायला सुरूवात करायचे. "बाबा रे, जीवन म्हणजे काय हे ठाऊक आहे का तुला ?" अशी उपदेशामृताला (निरर्थक) सुरूवात व्हायची ती तब्बल अर्धा तास चालायची. मधेमधे मला "हं, हं, बरोबर" यापेक्षा अधिक अवाक्षर बोलू न देता हे महापुरूष सुरूच.
एकदा गाडी चालवताना यांचा फोन. "मी गाडी चालवतोय" हे माझे सांगणे त्याच्या कानापर्यंत गेले पण मेंदूत झिरपले नाही हे मला कळले कारण त्यानंतर मी गाडी बाजूला लावून त्याची तीच टेप अर्धा तास ऐकतोय. गंतव्य स्थळी पोचायला उशीर झाला तो वेगळाच.
मग आम्ही मवाळपणा टाकायच ठरवल. पुन्हा आठवडाभरात गाडीने बाहेरगावी जाताना या येड्याचा फोन. "ड्रायव्हिंग करतोय, गावाला जायला निघालोय" हे नेहेमीप्रमाणेच ignore झाले. मग मी फोन तसाच ग्लोव्ह बाॅक्समधे ठेवला. गाडी चालवत राहिलो. मधूनमधून मोठ्ठ्याने "हो,हो. बरोबर" वगैरे परवलीचे शब्द बोलत राहिलो. सहप्रवाशांना यामागील इतिहास माहिती असल्याने त्यांना ही करमणूक मस्त झाली.
अर्धा तास झाला. जवळपास ३० किमी गाडी चालवून आम्ही गंतव्य स्थानाजवळ येत होतो. मी अंदाजे फोन उचलला. हे महाशय तिकडून बोलतच होते.
आणि अगदी अनाहूतपणे माझ्याकडून "अरे, तू बोलतोच आहे का ?" निघून गेले.

पलीकडून भयाण शांतता. 
काही दिवसांनी मित्रमंडळींच्या गृपवर "राम एक आगाऊ, उद्दाम माणूस आहे" असे हे महाशय offline बोलत असल्याचे कळले आणि पंगा यशस्वी झाल्याच्या आनंदात मी त्या पाताळविजयम नावाच्या मद्रासी सिनेमातल्या राक्षसासारखा "हाॅ..हाॅ..हाॅ.." करून हसलो.

(पुलंनी आम्हाला बिकट प्रसंगी असच विकट हसायला शिकवलय त्याला आमचा नाविलाज आहे.)
— प्रा. राम प्रकाश किन्हीकर. पाताळविजयमचे राक्षस.


No comments:

Post a Comment