फावल्या वेळात "नॅशनल जिओग्राफिक" चे अभ्यासपूर्ण कार्यक्रम पहायला मला आवडतात. खाली एक खूप छोट्या अक्षरांमधली पट्टी सरकत असते. त्या पट्टीवर "हा कार्यक्रम इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे" असा मजकूर असतो. हजार वर्षांपूर्वीची आणि आज जवळपास दहा कोटी लोक बोलत असलेली माझी मराठी या ज्ञानयज्ञात का नाही ? याच अपार दुःख मला होत असत.
दरवर्षी कोट्यावधी रूपयांच्या शासकीय अनुदानाची (म्हणजे सर्वसामान्यांच्याच पैशाची) भीक मागून दीड दोन दिवस मिरवणारे हे साहित्य संमेलनवाले काय फक्त अध्यक्षीय निवडणूक आणि अध्यक्षीय भाषणांपुरतेच उरलेत का ? {बर एव्हढ्या लटपटी खटपटी, उठाठेवींनंतर ते "विद्वत्तापूर्णवगैरे (खिक..) भाषणही संध्याकाळपर्यंत अध्यक्षांसकट सगळ्यांच्या विस्मृतीत जात.}
कशाला हवाय तो तथाकथित "साहित्य संस्कृती वगैरे मंडळां"चा पांढरा हत्ती ?
मराठी भाषेतून, शाळांमधून जागतिक दर्जाचे ज्ञान मिळाले तरच पुढची पीढी मराठीकडे येईल अन्यथा पुढच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात मराठी भाषा संपण्याची लक्षणे आहेत हे लक्षात न घेता आपण शहामृगासारखी चोच खुपसून का बसलो आहोत ?
यापूर्वीच्या आणि याही शासनाच्या शैक्षणिक धोरणात (अर्थात असे काही असल्यास. तसे दृष्टीपथात आजवर आलेले दिसत नाही.) या गोष्टीचा साधा विचारही नाही. नुसते पोकळ, बेगडी प्रेम दाखवून उपयोग नाही रे, बाबांनो.
No comments:
Post a Comment