Friday, August 30, 2019

दोन भिन्न व्यक्तीमत्वे

आमच्या सौभाग्यवती आणि आम्ही. दोन भिन्न व्यक्तीमत्वे.
कधी कार्यबाहुल्यामुळे देवपूजा करायला जमली नाही तर ती जबाबदारी आमच्या अर्धांगिनी पार पाडतात. आणि मग दुसर्‍या दिवशी मी देवपूजा करीत असताना मला उपदेशामृत सुरू होत.
काय आहे ? सौभाग्यवती देवपूजा करीत असताना पाण्याचा अगदी मोजका वापर करतात. देवांची अंघोळ वगैरे ही कमी पाण्यात. तसबिरीही एकदम ड्राय वाॅशने पुसल्यासारख्या करतात.
मी मात्र "उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया" या समर्थउक्तीची आठवण करीत सगळ्या देवांना अगदी मनसोक्त शाॅवर बाथ आणि तसबिरींनाही मनसोक्त अंघोळ घालतो. तिच्या जवळपास तिप्पट पाणी मला लागत आणि पूजा स्थानाच्या आसपास पाण्याची थोडी सांडउबड ही होते.
घरातल्या टापटिपीची ती भोक्ती असल्याने तिला ही सांडउबड आवडत नाही. नंतर सगळ तिलाच आवराव लागत म्हणा त्यामुळेही असेल.
"तू पूजा करताना इतक पाणी सांडतच कस रे?" हा तिचा नेहमीचा प्रश्न.
आता काय सांगू ? अघमर्षण विधीत "जलं नाविलोक्य क्षिप्त्वा" असतच, 
सहस्त्रनामात "किंचीद्जलम क्षिप्त्वा प्रार्थयेत" असतच.
हे तिलाही माहिती नाही अस नाही.
पण लग्न मुरल्यावर भांडणही चांगली मुरायला लागतात अस म्हणतात. त्यातलच हे घटकाभराच भांडण. पूजेपासून साधारण भोजनाच्या वेळेपर्यंत. भोजनसमयी मिटणार. थोड मजेमजेच. कृतककोपाच.
मी अशावेळी श्रीमदभागवताच्या दशमस्कंधाचा आधार घेतो.
भगवान श्रीकृष्ण रूक्मीणीची थट्टा करून नंतर ती चिडल्यावर समजूत घालताना म्हणतात, "प्रिये, रूक्मीणी, या जगात खरोखर सुख कशात असेल तर पत्नीच्या केलेल्या अशा थट्टामस्करीतच आहे. बाकी जग सगळे दुःखाने भरलेले आहे."
येथे आम्हाला भगवंतानेच अशा थट्टेचे परमिट दिले आहे, काय समजलेत ? (शेवटले वाक्य सानुनासिक सुरांमध्येच वाचावे)
— आपला श्रीकृष्णभक्त खोडकर गृहस्थ रामचंद्रपंत

No comments:

Post a Comment