गेले बरेच दिवस प्रकृतीच्या कारणास्तव आम्ही उभयता नियमित सकाळ संध्याकाळ फिरायला जातोय. फिरून झाल की त्या उद्यानालगतच एक शिव मंदीर आहे. संध्याकाळची वेळ असते. "प्रदोषकाळी शिव आराधन, घडेल तो भाग्यशाली" हे माहिती असल्यामुळे रोज शिवदर्शन घडते.
बर हे जे मंदीर आहे ते आहे पांडुरंगेश्वर शिव मंदीर. शिवपिंडी मागे पांडुरंगाची आणि रूक्मिणीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. रोज शिवासमोर नतमस्तक झालो की पांडुरंग रूक्मिणीसमोरही पांडुरंगाष्टक म्हणत नतमस्तक होण्याचा आमचा परिपाठ.
मंदीरातल्या इतर बर्याच भाविकांचे वर्तन मला थोडे वेगळे वाटले. ते सर्व नेहमी शिवासमोर आराधन करतात पण ज्याच्या नावाने हे मंदीर आहे त्या पांडुरंगाकडे अजिबात लक्ष न देता परत फिरतात.
काल आषाढी एकादशीनिमित्त मंदीराचा वर्धापन दिन समारंभ होता. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. मंदीरातही फुलांची अत्युत्कृष्ट सजावट केलेली होती. मोगर्याच्या फुलांनी शिवलिंग आणि तुळशीहारांनी पांडुरंग व रूक्मिणी सुशोभित खुलून दिसत होते.
काल मात्र सगळ्या भक्त मंडळींचे वेगळेच रूप पहायला मिळाले. काल दिनमहात्म्यामुळे सगळी मंडळी पांडुरंगाच्या चरणी लीन होती. पण मध्ये असलेल्या शंकरजींकडे त्यांचे साफ दुर्लक्ष. जणू ते तिथे नव्हतेच.
माणसामाणसांमधील संबंधांमध्ये "काम खतम, आदमी खतम" हा मतलबीपणा आपण आजकाल फार अनुभवतोय पण देवालाही आपण त्यातून सोडले नाही हे पाहून मजा वाटली आणि खिन्नताही आली.
No comments:
Post a Comment