Monday, August 5, 2019

लोकमान्य टिळक टर्मिनस, यशवंतपूर, आनंदविहार, बांद्रा टर्मिनस वगैरे.

भारतीय रेल्वेची एकाच शहरातली निरनिराळी स्थानके भिन्न भिन्न स्वभावाची असतात. किमान मला तरी तशी भासतात. 

मुंबई शहराचच उदाहरण घ्या ना. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणा-या गाड्यांना जी प्रतिष्ठा आहे ती दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणा-या गाड्यांना नाही. छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून सुटणा-या गाड्या या खानदानी आणि गर्भश्रीमंत वाटतात. त्यांचा डौल वेगळाच तर दादर टर्मिनसवरून सुटणा-या गाड्या आपल्या मध्यमवर्गीय मनोवृत्तीच्या वाटतात. दादर टर्मिनस वरच्या इनमिन दोनच प्लॅटफ़ॉर्म्सच्या चिमुकल्या संसारात खुष राहणा-या आणि त्यातच टुकीने संसार करणा-या.

लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणा-या गाड्या मात्र ख-या कष्टकरी वाटतात. मुंबईची जनता या टर्मिनसला ’भय्या टर्मिनस" म्हणूनच ओळखते. (भोपाळच्या उत्तरेला जे काही लोक राहतात ते सगळे मुंबईकराच्या दृष्टीने "भय्या’ हे सुद्धा इथे जाताजाता नमूद केले पाहिजे.) तसही हे स्टेशन सुरू झाले तेव्हा इथून सुटणा-या जास्तीत जास्त गाड्या पाटणा, वाराणसी, मुझफ़्फ़रपूर, गोरखपूर इथे जाणा-याच होत्या. बिचा-या ज्ञानेश्वरी आणि समरसता या डिलक्स गाड्यांनाही, त्या केवळ या टर्मिनसवरून सुटतात म्हणून, हवी ती प्रतिष्ठा नाही.


म्हैसूर टर्मिनस. मी आजवर पाहिलेल्या स्टेशन्सपैकी सर्वोत्कृष्ट स्टेशन. स्वच्छ आणि नीट्नेटक.

आता तर काही गाड्या पनवेल पर्यंत आणून तिथूनच वापस सोडतात म्हणे. छे ! पनवेल टर्मिनस ही केवळ सोय. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठीचा तात्पुरता उपाय. पनवेलने स्वतःला मुंबईतले टर्मिनस म्हणवून घेणे म्हणजे एखाद्या वाशिंद, खडावली किंवा पार वांगणी च्या माणसाने स्वतःला मुंबईकर चाकरमानी म्हणवून घेण्यासारखेच. मुंबईची हद्द मुलुंडपर्यंतच. ठाणे म्हणजे मुंबई नाही आणि डोंबवलीकराला किंवा कल्याणकराला कितीही वाटल तरी, डोंबिवली आणि कल्याण म्हणजे मुंबई नाही. तसेही एखाद्या अस्सल ठाणेकर माणसाला (मुक्काम: नौपाडा, कोपरी, राममारूती रोड, गोखले रोड हं.  फ़ारतर साकेत, वृंदावन सोसायटी, आणि वसंतविहार पर्यंतच ठाणेकर ठाण्याची हद्द समजतात.  घोडबंदर, गायमुख वगैरे ठाण्याच्या वसाहती आहेत असेच खरा ठाणेकर मानतो. इंग्रजांच्या जशा जगभरच्या वसाहती होत्या तश्या.) ठाणे हे मुंबईचा भाग आहे हे पटवून घ्यायचच नसत. ठाण्याची निराळी अस्मिता आहे. ठाणे हे पुण्याइतकेच पुरातन शहर आहे याचा त्याला सार्थ अभिमान असतो.  म्हणजे मलाही आहे तसा अभिमान. नवी मुंबईतल्या १२ वर्षांच्या वास्तव्यात जेव्हढी नाळ ठाण्याशी जुळली तेव्हढी वाशी, बेलापूर आदिंशी जुळली नाही.

पश्चिम रेल्वेचेही तसेच. पश्चिम रेल्वेचेही तसेच. मुंबई सेंट्रल वरून सुटणा-या गाड्यांचा डौल, प्रतिष्ठा बांद्रा टर्मिनस वरून सुटणा-या गाड्यांना नाही. ती केवळ सोय. घरात पाहुणे जास्त झाले की काही बिनमहत्वाच्या पाहुण्यांच्या गाद्या घराच्या पडवीत, व-हांड्यात घातल्या जातात तसेच. तरीही मला ती स्वराज एक्सप्रेस बांद्र्यावरून  न सुटता, मुंबई सेंट्रल वरून सुटायला हवी अस प्रकर्षाने वाटत असत.

बंगळूरूलाही तसेच. क्रांतीवीर संगोली रायण्णा बंगळूरू सिटी जंक्शन (म्हणजे आपले जुने बंगलोर सेंट्रल स्टेशन) वरून सगळ्या छान गाड्या सुटतात असे माझे मत आहे. यशवंतपूर ही एक सोय. बाहेरगावच्या पाहुण्यांसाठीची पडवी. रात्री गाडी थोडी उशीरा पोचल्याने तिथून केम्पेगौडा बस स्थानकापर्यंत नेताना रिक्षावाल्याने केलेली दादागिरी आणि फ़सवणुकीचा प्रयत्न आज १० वर्षांनंतरही लक्षात आहे. "यशवंतपूर - राजेंद्रनगर म्हणजे बंगलोर - पाटणा गाडी" हे कळायला भारतीय रेल्वे कळावी लागते. तसेच "मंडुआडीह - तांबरम म्हणजे वाराणसी - चेन्नई" हे कळायला तुम्ही रेल्वेचे फ़ॅनच हवे. 

चेन्नईच मात्र तस नाही हं. चेन्नई सेंट्रल हे संपूर्ण भारतभर जाणा-या गाड्यांसाठीच अत्यंत महत्वाच स्थानक असलं तरी चेन्नई एग्मोर ही प्रत्येक तामिळ माणसाची अस्मिता आहे. ब्रॉडगेज येण्यापूर्वी हे स्टेशन मीटर गेज संस्थानाची राजधानी होते. तामिळनाडूच्या अंतर्गत भागात जाणा-या जवळपास सर्वच गाड्या इथूनच जातात. त्यामुळे चेन्नईकरासाठी चेन्नई सेंट्रल हे राजधानी असेल तर चेन्नई एग्मोर हे सांस्कृतिक राजधानी आहे. त्याला थोड जास्तच भावनिक महत्व त्यांच्या दृष्टीने आहे. 

(लेख नावासकट शेअर करायला अनुमती आहे. तरीही काहीच दिवसात हा लेख माझ्या नावाशिवाय ब-याच व्हॉटसऍप गृप्समध्ये फ़िरताना पाहण्याचे प्राक्तन नशीबी आहे यावर माझा विश्वास आहे. )


चेन्नई सेंट्रलची गॉथिक शैलीतली देखणी इमारत.



चेन्नई एग्मोर. वास्तूकलेचा उत्कृष्ट नमूना. चेन्नईकरांच्या मर्मबंधातली ठेव.

नवी दिल्लीचही तसेच. नवी दिल्ली टर्मिनस तसे उदार अंतःकरणाने खूप गाड्यांना सामावून घेत असले तरी त्याच्याही बिचा-याच्या मर्यादा आहेत. म्हणून मग हजरत निझामुद्दीन ही सोय आली. आनंदविहार टर्मिनसला दिल्लीचे "भय्या टर्मिनस" म्हणायला हरकत नाही. आणि दिल्ली सराई रोहिल्ला काय विचारता ? रोहिल्ल्यांसारखेच क्रूर असे हे टर्मिनस असेल असे वाटते पण बिचारे अगदीच एव्हढेसे आहे. तरी इथून निघणा-या गाड्या " क्यो, म्हारो ठाठ नई दिल्ली से कोई कम है के ?" अशी जाट बोली बोलतच बाहेर पडत असतील अस मला उगाच आपल वाटत असत.


छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर. शांत, निवांत.

कलकत्त्याच थोड चेन्नईसारख आहे. तसेही विचारांच्या कट्टरतेबाबत आणि उखडेलपणाबाबत वंगबंधूंची तुलना तामिळ बंधूंसोबतच होऊ शकेल. कलकत्त्यात पश्चिम आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी हावडा टर्मिनस आहे तसेच उत्तरेकडे आणि पूर्वेकडील आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालॅंडकडे जाण्यासाठी सियालदा टर्मिनस आहे. हावडा हे कलकत्तेकरांच आवडत टर्मिनस असेलही पण सियालदा हे त्यांची "मर्मबंधातली ठेव" आहे. आजकाल ते आपल संतरागाछी वगैरे पिल्लू टर्मिनस निघालय. पण शेवटी त्याची किंमत आनंदविहार टर्मिनस इतकीच.

आपल्या आयुष्यांनीही थोड रेल्वेच अनुकरण याबाबतीत केल तर ? आपली आपली टर्मिनस स्टेशन्स ठरलेली आहेत रे बाबांनो. थोड आपल्या आयुष्याचा अंतर्मुख होऊन विचार करा मग तुमच तुम्हालाच कळेल की आपल नेमक टर्मिनस कुठल आहे. सगळ्याच गाड्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला नाही पोहोचू शकत. पण मार्गात व्यवस्थित आणि सुखरूप प्रवास करणे तर आपल्याच हातात आहे न ? शिवाय छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोचणारा माणूसच मुंबई गाठू शकतो आणि लोकमान्य टिळक टर्मिनसचा माणूस कुठल्यातरी भलत्याच शहरात पोचतो असे थोडेच आहे ? उलट पूर्व उपनगरांमध्ये किंवा सांताक्रूझ, विलेपार्ले इत्यादी पश्चिम उपनगरांमध्ये पोचण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसपेक्षा लोकमान्य टिळक टर्मिनस जास्त उपयुक्त ठरेल 

तात्पर्य काय ? टर्मिनस ची सामाजिक स्थिती, प्रतिष्ठा कुठलीही असो, माझ्या जीवनाच्या प्रवासात, मला स्वतःला प्रवासाला उपयुक्त ठिकाणी मी सुखरूप पोचण्याचा थोडा स्वार्थी विचार जास्त महत्वाचा नाही का ?

-  प्रा. राम प्रकाश किन्हीकर, नागपंचमी, ०५/०८/२०१९


भारताचे सगळ्यात दक्षिण टोकाचे टर्मिनस, कन्याकुमारी. गावाबरोबरच या स्टेशनचीही शांतता मनाला भुरळ पाडून जाते.


भारताचे सगळ्यात दक्षिण टोकाचे टर्मिनस, कन्याकुमारी. गावाबरोबरच या स्टेशनचीही शांतता मनाला भुरळ पाडून जाते.

3 comments:

  1. सागर टिपणीसAugust 5, 2019 at 7:31 PM

    नेहमीप्रमाणे एक अप्रतिम लेख!

    ReplyDelete
  2. Lovely write up! We are teevaravaadhi ( extremist) for culture in Madras!

    ReplyDelete