Friday, August 9, 2019

सूर मागू तुला मी कसा ? जीवना तू तसा मी असा.


आजचा जीवनानुभव काही वेगळाच होता. गेले काही महिने प्रकृती अस्वास्थामुळे डॉक्टरांनी सक्तीचे दिवसातून सात आठ किलोमीटर फिरायला सांगितलेले आहे. त्यामुळे आम्ही उभयता सकाळ संध्याकाळ जमेल तेवढे फिरण्याचा प्रयत्न करतो. सकाळी चार किमी आणि संध्याकाळी साधारण साडेतीन पावणेचार किमी असा नित्यक्रम आहे.
गेल्या पंधरवड्यापासून त्याची फळेही दिसायला सुरुवात झालेली आहेत. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते आहे.
आज आमची दुचाकी सर्व्हिसिंगला टाकायची होती. खूप दिवस झालेत तिचे सर्विसिंग ड्यू आहे. पण आज मुहूर्त निघाला.
बरं आमचा भरवशाचा मेकॅनिक म्हणजे मनीष नगरचा "विनोद ऑटोमोबाईल्स" त्याच्याकडे गाडी नेऊन टाकणे आणि घरी इंद्रप्रस्थ नगरला परतणे असा आजचा सकाळचा कार्यक्रम.
मग काय ? अस्मादिक निघाले. दुचाकीवर स्वार होऊन.
विनोद कडे सकाळी साडेनऊला गाडी टाकली. संध्याकाळी त्याच्याकडून परत देण्याचे आश्वासन घेतले आणि परतताना लक्षात आल की आता रिक्षा, ओला टॅक्सी करण्यापेक्षा विनोबा ट्रॅव्हल्सने (पायी पायी) जाऊयात. गेल्या महिन्याभराच्या भटकंतीची फिटनेस टेस्ट तरी होईल.
मोबाईल मध्ये map my walk या नेहेमीच्या अॅपमध्ये अंतर मोजत मोजत जाऊयात. तसेही आपल्याला सकाळी साधारणतः चार किलोमीटर फिरण्याची सवय आहेच. मग म्हटलं निघूयात. आपल घर चार, साडेचार, गेला बाजार पाच किमी पेक्षा इथून दूर नाही.
आमच्या बालपणी अगदी बाराव्या वर्गापर्यंत आम्ही खूप पायी चालायचो. नंदनवनच्या घरून पायी पायी अयाचित मंदीरचा बसस्टाॅप गाठणे. तिथून २ किंवा ३ नंबरच्या बसने लाॅ काॅलेज स्टाॅप ला उतरणे आणि तिथून पुन्हा पायी C P & Berar, रवीनगर गाठणे. हाच उलट क्रम संध्याकाळी परतताना. परतताना तर लाॅ काॅलेज स्टाॅपवरून जागा मिळत नाही म्हणून संध्याकाळी अगदी लक्ष्मीभुवनपर्यंत वाट तुडवायचो. तिथून गिरीपेठ मार्गे जाणार्‍या १ आणि ४ नंबरच्या बसेसही २ व ३ नंबरच्या बसेससह मिळायच्यात.
आज माझ्या मनातल्या डिकास्टाला (संदर्भः सिंहासन, १९७९, अरूण साधू, जब्बार पटेल) मीच विचारल, "आज जवळपास तीस वर्षांनी तुला हे जमेल अस वाटतय तुला ?"
माझ्या मनातल्या डिकास्टाने अगदी त्याच बेदरकारपणे उत्तर दिल, "अरे अगदी सहज जमेल. मजेत जाऊ, हसत, खेळत."
पण नागपूरच्या उन्हाला मी अंडरएस्टिमेट केल्याचे थोड्याच वेळात लक्षात आलं. थोडावेळ मौजेत निघालो पण पहाटे चार किलोमीटर फिरणे आणि नागपूरच्या भर उन्हात सकाळी दहा साडेदहा वाजता दोन अडीच किलोमीटर फिरणे यात काय फरक आहे ? ते फिरल्या वरच कळायला लागल. ऊन चांगलंच लागत होत. नागपुरी भाषेत "चांगलीच शेकल्या गेली". मग काय ? जयप्रकाश नगर पाशीच, पावणे तीन, तीन किलोमीटर नंतर, पाय इतके दुखायला लागले की बस रे बस. आणि कंटाळाही यायला लागला. असं वाटू लागलं की कोणीतरी ओळखीचं भेटावं आणि घरी घेऊन सोडाव.
पण कसंच काय ? अशा प्रसंगी "सारा गाव मामाचा, एकही नाही कामाचा" या म्हणीप्रमाणे एकही ओळखीचा माणूस भेटत नव्हता. रस्ताही जवळपास निर्मनुष्य होत चाललेला होता.
तसेच पाय ओढत ओढत, ओढत ओढत ५२ मिनीटांत पावणेपाच किमी कापून घरी पोहोचलो आणि सोफ्यावर कोसळत कानाला खडा लावला. यापुढे असल्या भयंकर ऊन्हात असले साहस पुन्हा करायच नाही.
एक नवीन जीवनानुभव. त्याचीही आपली वेगळीच मजा.
१९ वर्षांपूर्वीचा असाच एक कलंदर अनुभव यानिमित्ताने आठवला.


No comments:

Post a Comment