"अवशिष्ट धुवून काढतो तो अवधूत."
आपण जन्मजन्मांतरीची साठवणूक करून या जन्मात येतो. आपल्याला गतजन्मीचे काहीच आठवत नाही आणि आपण मागच्या जन्मीचे सगळे धुवून काढण्याऐवजी ह्या जन्मात,आपल्या कर्माने, आपल्या विचारांनी, काही ना काही नवीन कर्मे तयार करत जातो.
पर्यायाने भोगण्यासाठी कर्मफळेही तयार होत जातात. वाईट फळे भोगावीच लागतात तशी चांगली फळेही भोगावीच लागतात. ती भोगायला जन्म घ्यावा लागतोच.
"या जन्मी जे करावे,
ते पुढल्या जन्मा उरवावे
आणि ते भोगण्यासाठी यावे
जन्मा हा सिध्दांत असे"
— श्रीगजाननविजय
प.पू. ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात की "स्टेशनावर गडबडीत गाडी पकडण्यासाठी जात असताना एखाद्या माणसाशी भांडत बसलो म्हणून गाडी सुटली काय ? किंवा एखाद्या मित्राशी ख्यालीखुशाली विचारण्यात वेळ गेल्यामुळे गाडी सुटली काय ? दोन्हींचा परिणाम एकच."
त्याप्रमाणे वाईट कर्मांच बंधन पुढल्या जन्मासाठी आहे, तसच चांगल्या कर्मांचही बंधन आहेच. अकर्म अवस्थेत मनुष्यप्राणी राहू शकत नाही म्हणजे कर्मे होत राहणार आणि आपल्या बँकेत लेजर एन्ट्रीज होत राहणारच.
म्हणून त्या अवधूताचे स्मरण करायचे आहे. तो भक्तांच्या चांगल्या कर्माचाही अवशिष्ट धूवून काढतो. जन्मजन्मांतरीचं संचित जो धूवून काढतो, भक्तांच संचित सगळं संपवून टाकतो आणि जो मोक्षाप्रत नेतो असा तो अवधूत.
त्याचे चिंतन आपण करीत रहावे म्हणून अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त.
— तराणा उत्सव मार्च २०१९ मधील चिंतन.
No comments:
Post a Comment