Wednesday, September 7, 2022

Stress Management : Finite Element Method, a few tips.

 उत्सवांमधल्या stress चे (विशेषतः घरातल्या कर्त्या स्त्रियांचे) management using Finite Element Method या विषयावर अधिक सांगा अशी विनंती बर्याच आप्त मित्र आणि सुहृदांकडून आली म्हणून हे स्वानुभवाचे बोल.

१. उत्सवाच्या / सणांच्या पुरेशा आधी घरच्या कर्त्या स्त्रियांशी सविस्तर व शांतपणे चर्चा करून एकंदर कामांची नुसती यादी करणे.
(या आणि यानंतरच्या सगळ्या स्टेप्समध्ये घरातल्या कर्त्या पुरूषाने शांतपणा धारण करायचा आहे. घरातल्या स्त्रियांचे म्हणणे शांतपणे व सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन त्यांना मदत करायची आहे ही मनोवृत्ती असणे आवश्यकच आहे. कुठल्याही क्षणी जुने दाखले देऊन "माझ्या आईला / काकूला / आजीला तर असा problem कधी आलेला नव्हता" असे म्हणून घरातल्या कर्त्या स्त्रीचा मनोभंग आणि पर्यायाने मनःक्षोभ केल्यास सगळेच मुसळ केरात जाईल हे आवर्जून लक्षात ठेवावे.)
२. सगळ्या बारीकसारीक कामांची यादी तयार झाली की त्यात सर्वांच्या सल्ल्याने त्या कामांचा क्रम लावायचा आहे. एकाचवेळ दोन किंवा अधिक कामे समांतरपणे करणे शक्य होत असल्यास ती कामे कोण करणार, त्याला लागणारी संसाधने किती ?, ती संसाधने कशी जमवणार यावरही सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावेत. उदाहरणार्थ घरी फुलोरा सुरू असताना एका व्यक्तीने पात्या, मोदक, करंज्या केल्यात आणि दुसर्या व्यक्तीने पटापट तळून दिल्यात तर एकंदर कामातला ६० % वेळ वाचतो आणि एकाच व्यक्तीला फुलोरा करा आणि नंतर उठून तळा या सगळ्यात होणारे उलटसुलट श्रम वाचतात आणि तळणाच्या वेळेत सारण, भिजवलेले पारीचे पीठ वाळून पदार्थ बिघडण्याचाही धोका टळतो तो निराळाच.
३. कुठलाही प्रसंग प्रत्यक्षात होण्याआधी त्या नियोजनकर्त्याच्या मनात पहिल्यांदा तो प्रसंग संपूर्ण घडावा लागतो असे अनेक व्यवस्थापन तज्ञ म्हणतात हे अक्षरशः खरे आहे. उत्सवाचे नियोजन करीत असताना मनातल्या मनात उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते उत्सवाच्या अखेरच्या दिवसापर्यंतचे चलचित्र मनात चालायला हवे. त्यातल्या येणार्या छोट्यामोठ्या संभाव्य अडचणी सगळ्यांसमोर चर्चिल्या जायला हव्यात. त्यांच्यावर करायची संभाव्य उपाययोजना चर्चिली जाऊन अंतिम निर्णय व्हायला हवा. "अडचणी आल्यावर ऐनवेळी बघू." ही वृत्ती उत्सव समारंभांमध्ये स्ट्रेस वाढविणारी असते हे लक्षात ठेवावे.
४. घरातल्या पुरूषांच्या मनात अशा समारंभाबाबत, त्याच्या पार पाडण्याबाबत काही निश्चित कल्पना असतात त्या त्यांनी चर्चेत स्पष्टपणे मांडाव्यात आणि त्याहीपुढे जाऊन त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण किती जास्त मदत करू शकतो ? याचा धांडोळा घेऊन त्याच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग द्यावा. याचे दोन फायदे होतील. एकतर ते काम करताना घरच्या स्त्री ला कायकाय अडचणी येतात ते कळेल आणि एरवी ते काम आपल्या मनाप्रमाणे झाले नाही की होणारी आपली चिडचिड कमी होईल. (क्वचित थांबेलही.) आणि दुसरा फायदा हा की ते क्लिष्ट / किचकट वाटणारे काम दोघातिघांच्या सहभागाने सुकर सोपे होऊन जाईल.
५. सर्व कार्यक्रमाचे, त्यातल्या कामांचे काटेकोर नियोजन झालेले आहे आणि आपल्याला योग्य वेळी योग्य मदत मिळतेय हि भावनाच घरातल्या कर्त्या स्रीला, गृहिणीला तिचा स्ट्रेस ५० % कमी करणारी असते उरलेला ४० % स्ट्रेस त्यांना मधेमधे धीर देऊन कमी करावा लागतो. उरलेला १० % स्ट्रेस चांगल्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असतो. तो घेऊ द्यावा.
- अस्सल देशस्थी वृत्तीचा असला तरी कोकणस्थांच्या नेमक्या आणि काटेकोर नियोजनाचा चाहता
आणि
"आधी केले मग सांगितले" ही वृत्ती असल्याने स्वानुभवातून आलेले हे उपदेशाचे बोल "जे जे आपणांसि ठावे" या भूमिकेतून हे सगळे प्रांजळपणे निवेदन करणारा, रामचंद्रपंत.

No comments:

Post a Comment