Friday, January 22, 2016

मनाचे श्लोक - ५




मना सांग पा रावणा काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी
बळे लागला काळ हा पाठीलागी II १३ II 


खरेतर रावण हा केव्हढा (लौकिकदृष्ट्या) ऐश्वर्यसंपन्न विद्वान आणि पराक्रमी ! पण केवळ परस्त्रीच्या वासनेमुळे त्याने स्वतःचा विनाश ओढवून घेतला. स्वतःच्या मनाचे तर ऐकले नाहीच पण पत्नी, बंधू, प्रजाजन यांचेही न ऐकता आपल्यासोबत त्यांनाही विनाशाचे खाईत ढकलले. श्री समर्थ आपणास त्या उदाहरणावरून सावध व्हायला सांगताहेत. आज आपल्याकडे कितीही संपत्ती, सत्ता, सामर्थ्य असले तरी मन चांगले नसेल तर उद्या विनाश हा ठरलेलाच आहे. त्यामुळे मनाचा विचार करून मन शुद्ध ठेवून जगणे अतिशय महत्वाचे ठरते. 
श्री समर्थांनीच लिहून ठेवलेय की " यमाशी करूणा नाही ". कारण सर्वसत्ताधीश काळ हा कुणाकडूनही लाच घेत नाही, कुणासाठीही थांबत नाही आणि त्याचे काम सदासर्वकाळ चोख बजावत असतो. त्यामुळे आपल्या सत्तेचा, शक्तीचा, पैशांचा अहंकार काळापाशी चालत नाही. तेव्हा त्या्ची गती ओळखून सदाचरणात आयुष्य घालवावे हेच बरे.


जिवा कर्मयोगे जनी जन्म झाला
परी शेवटी काळमुखी निवाला
महाथोर ते मृत्यपंथेचि गेले
कितीयेक ते जन्मले आणि मेले II १४ II 


भारतीय अध्यात्म शास्त्रांनुसार अनेकानेक योनींमध्ये जन्म घेउन आपण पुन्हा मानव देहाप्रत जन्म पावत असतो. या मानवी देहातच आपणास चांगले काय ? वाईट काय ? हे ओळखून आपले कर्म निवडण्याचा विशेषाधिकार प्राप्त होत असतो. मनुष्यदेह (मानव जन्म) हा दुर्लभ मानला गेलेला आहे. हा जन्मात जर आपण आपल्या कर्मांद्वारे मुक्तीचा प्रयत्न करू शकलो नाही तर पुन्हा सगळ्या जन्माप्रत जाऊन पुढल्या मनुष्य जन्माची वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि पुढल्या जन्मात तरी आपल्याला मुक्तीची आठवण राहील, त्या मार्गावर चालण्याची स्फ़ूर्ती होईल याची काय खात्री ? म्हणून जे काही साध्य करायचेय ते याच जन्मात. 

पण आपण याचा खोल विचार न करता Soloman Grandy सारखे केवळ जन्मतो आणि मरतो. त्या Soloman Grandy  ने काय केले ?  अमुक  on Sunday, तमुक  on Tuesday. आणि सरतेशेवटी died on Saturday and buried on Sunday. And that is the end of Soloman Grandy. तसे करू नका हे श्री समर्थ आपणास कळकळीने सांगताहेत. आणि त्याच बरोबर कितीही मोठा माणूस असला तरी मृत्यू हे अटळ सत्य आहे या जीवनाच्या क्षणभंगूरपणाची जाणीव श्री समर्थ आपणास करून देताहेत.


मना पाहता सत्य हे मृत्यभूमी
जितां बोलती सर्वही जीव मी मी
चिरंजीव हे सर्वही मानिताती
अकस्मात सांडूनिया सर्व जाती II १५ II 


या जगात मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि आपला प्रवास जन्मानंतर निरंतर मृत्यूकडेच होत आहे हे सत्य एकदा डोळ्यांसमोर सतत असल्यानंतर मनुष्याचा पापाचरणाकडचा कल कमी होतो. 

दोन कथा आहेत. एक संसारी माणूस एका खूप प्रसिद्ध आणि निस्पृह अशा साधूला भेटायला त्याच्या आश्रमात गेला. त्याच्याकडे जाऊन आपल्यासाठी संसारोपयोगी काही रहस्ये शिकता आली तर बरे,  या भावनेने तो गेला. त्याच्या कुटीत प्रवेश करतो तो काय ? त्याने बघितले की त्याच्या कुटीत केवळ तुटपुंजे वाटावे आणि रोजच्या अत्यावश्यक गरजाही पु-या होऊ शकणार नाहीत इतकेच सामानसुमान होते. त्याला आश्चर्य वाटले. त्याने विचारले " बाबाजी आपले इतर साहित्य कुठाय ? " साधू म्हणाला " तुझेतरी  इतर साहित्य कुठाय ? " तो म्हणाला " अहो, मी इथे पाहुणा म्हणून आलोय ना. मग ? " त्यावर साधू हसत उत्तरला " अरे बाबा, मी सुद्धा इथे पाहुणा म्हणूनच आलोय. " या पृथ्वीतलावर वावरताना पाहुणा म्हणून आलोय याची जाणीव ठेवून वावरले की आपलेपणाच्या जाणीवेचा आपसूकच विसर पडतो आणि पापाचरणाकडचा कल आपसूकच कमी होतो.

संत एकनाथ महाराजांची कथा आहे. एक गृहस्थ त्यांच्या शांत संसाराचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या खनपटीलाच बसला. महाराजांनी त्याला सांगितले " अरे, हे शांतपणाचे रहस्य वगैरे विचारण्यात वेळ घालवू नकोस. तुझी पत्रिका मी पाहिली आणि तुझा मृत्यू आजपासून बरोबर एका आठवड्याने आहे. तेव्हा आता निरवानिरव करून घे बाबा. "  तो मनुष्य घरी गेला. आता आठवडाभरात मृत्यू अटळ म्हटल्यावर त्याने शांतपणे सगळी निरवानिरव सुरू केली. सगळ्या नातेवाईकांना भेटला. आजवर काही चुका झाल्या असतील, दुःख दिले असेल तर माफ़ करा अशी क्षमायाचना केली. सगळी कर्जे चुकती केलीत. प्रेमळपणे पत्नी, मुले, सुना, नातवंडे यांचा निरोप घेतला आणि बापुडवाणेपणे मृत्यूदिनाची वाट पहात बसला. सांगितलेल्या दिवशी पुन्हा एकदा महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून तो संत एकनाथ महाराजांकडे गेला. महाराजांनी त्याला विचारले की बाबा, गेल्या आठ दिवसात किती वेळा राग द्वेष, कपट भांडणांची आठवण झाली ? तो म्हणाला महाराज " त्यांची कसली आठवण होतेय ? सतत मरण समोर दिसत असताना त्या क्षणभंगूर विकारांची संगत अजिबात नकोशी वाटली. " महाराज हसले आणि म्हणाले " अरे वेड्या. मग आम्हा संत मंडळींचेही तसेच आहे. आम्हाला नेहमी मृत्यूची आठवण असते आणि म्हणून हे क्षणभंगूर विकार नकोसे वाटतात. त्याची प्रचिती तुला यावी म्हणून हे मृत्यूचे खोटेच भाकीत मी आठवड्यापूर्वी केले. "


" मरणाचे स्मरण असावे. हरीभक्तीत सादर व्हावे. " हे श्री समर्थांनी लिहून ठेवलेय ते याच साठी.पण या सत्याचा जगरहाटीत विसर पडल्यावर आपण स्वतःला जणू काय इथे आपण कायम रहाणार आहोत असे मानतो आणि त्यादृष्टीने वागायला लागतो. पण काळाच्या सर्वशक्तीमानतेसमोर कुणाचेही चालत नाही आणि म्हणूनच त्याचे बोलावणे आल्यावर हातातली सगळी कामे टाकून जावेच लागते. इलाजच नाही.

 म्हणून या्च जीवनात उत्कर्षाचा उन्नतीचा मार्ग आपणच आपला साध्य केला पाहिजे. त्यासाठी आपले सदगुरू आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील पण त्यावरून वाटचाल मात्र आपणच केली पाहिजे.


II जय  जय रघुवीर समर्थ II

Saturday, January 16, 2016

दक्षिण दिग्विजय : ३ (मदुराई - रामेश्वरम - मदुराई - कन्याकुमारी.)

यापूर्वीचे भाग:
दक्षिण दिग्विजय भाग १
दक्षिण दिग्विजय भाग २


दि. ०१/१२/२००८ : हॉटेलमधून आम्ही कालच एक टॅक्सी ठरवली होती. हॉटेल रिसेप्शनला टॅक्सी चालक हिंदी किंवा इंग्रजी भाषा समजणारा आणि बोलणारा हवा अशीही मागणी केली होती. (आम्ही पहिल्यांदाच तामिळ प्रदेशात आलेलो होतो आणि यापूर्वीच्या लोकांनी इथल्या भाषेच्या आणि जेवणाबाबत आपल्या होणा-या गैरसोयीच्या प्रश्नावरून आम्हाला खूप घाबरवून सोडले होते. पण तुरळक अपवाद वगळता आमचा अनुभव मात्र छान होता. अपवादसुद्धा अगदी चेन्नई आणि तिरूवनंतपुरमला पहायला मिळाले. ग्रामीण तामिळनाडू किंवा केरळ मध्ये चांगले अनुभव आलेत.) त्याप्रमाणे त्यांनी एक चांगली टॅक्सी आणि तितकाच भला माणूस चालक व मार्गदर्शक म्हणून आम्हाला दिला.


आमची टॅक्सी . मदुराई - रामेश्वरम रस्त्यावर रामनाथपुरम रेल्वे क्रॉसिंगवर थांबलेलो असताना काढलेला फ़ोटो.

मदुराईवरून सकाळी निघायला ८ वाजताहेत. मदुराई ते रामेश्वरम हे अंतर जवळपास १८० किमी आहे आणि ४ तास लागतील अशी माहिती आमच्या चालक व मार्गदर्शकाने दिलीय. दुपारी १ च्या आसपास रामेश्वरम मंदीर दर्शनासाठी बंद होत तेव्हा त्यापूर्वी आपल्याला पोहोचायला हवय ही नवीन माहिती. मदुराई शहरातून आम्ही निघालोय. भरपूर मंदीरांचे शहर आहे मदुराई. सोबतच तलावांचेही. पण आत्ता ते थांबून पहायला वेळ नाहीये. संध्याकाळी येताना बघूयात या बोलीवर आम्ही तामिळ प्रदेशाच्या हृदयातून झपाझप मार्गक्रमण करतोय.

मंदीर आणि त्याच्या परिसरात छोटासा तलाव अशी दृश्ये मदुराईत आणि परिसरात वारंवार बघायला मिळत होती.





वाटेत माझ्या तामिळ मैत्रिणींचे फ़ोटो काढायला मी विसरलो नाही. ही बहुतेक खाजगी बस असावी. मदुराई ते रामेश्वरमपर्यंत ही बस आमच्या मागेपुढेच धावत होती. तामिळनाडू मधले बस चालक बहुधा फ़ॉर्म्युला वन मधला प्रवेश थोडक्यात हुकल्याने नाराज झालेल्या व्यक्ती असाव्यात अशी दाट शंका मला येवून गेली.

आता थोड्या भुका लागल्या होत्या. पण तामिळनाडूच्या एव्हढ्या अंतर्भागात खायला कसे आणि काय मिळणार ? हा प्रश्न होताच. पण आमच्या मार्गदर्शकाने तो प्रश्न चुटकीत सोडवला. रामनाथपुरम म्हणून एका गावात एका उत्कृष्ट उपहारगृहासमोर त्याने गाडी थांबविली. तिथे वडा पाव, पाव भाजी, पुरी भाजी वगैरे उत्तर भारतीय पदार्थ सगळे आणि छान उपलब्ध होते. (तामिळी लोकांसाठी तुंगभद्रेच्या उत्तरेला उत्तर भारत सुरू होतो. खुद्द हैद्राबादसुद्धा ही मंडळी उत्तर भारतात मानतात.) पण ज्या प्रदेशात जातोय त्या प्रदेशाचे वैशिष्ट्यपूर्ण खाणे आपण खाल्लेच पाहिजे असा माझा आग्रह असतो. कितीही छान छोले भटुरे मुंबईच्या हॉटेलमध्ये आपण खाल्ल्याची शेखी मिरवली तरी पठाणकोट स्टेशनवरच्या हातगाडीवरचे गरमागरम छोले भटुरे हे सरसच ठरतात. आणि म्हणूनच " श्रीनगरला सुद्धा आम्ही आमच्या पर्यटकांना पुरणपोळीच जेवण दिल " किंवा " कन्याकुमारीत आमचा श्रीखंड पुरीचा बेत रंगला" असल्या पर्यटन कंपन्यांशी आणि त्यांच्या प्रवाशांशी आमचे गोत्र जुळत नाही. (पु. लं. च्या च कथाकथनाचा भाग घेऊन पुढे चालतो की ही मंडळी लक्ष्मी रोड पुणे आणि रानडे रोड, दादर च्या पुढे मनाने जायलाच तयार नसतात.) अरे, जर श्रीनगरला जाऊन तिथेला राजमा भात खाल्ला नाही तर डाल लेक पाहिल्याच पारण होत नाही. आणि तामिळनाडूत खास केळीच्या पानावर वाढले जाणारे डोसा, उत्तपम, इडली खाल्ली नाही तर आपण फ़क्त कन्याकुमारी डोळ्यांनी बघितल्याच पुण्य मिळत. अंगात तो लहेजा भिनत नाही.





स्वच्छ उपहारगृह.  छान ताटात त्याच आकाराचे कापलेले चांगले जाड केळीचे पान. डोस्यांचा, उत्तपमचा खमंग वास. भूक जागृत करायला योग्य ते वातावरण.






आमच्या बाईसाहेबांना मात्र तिथली पावभाजी खायची होती. आमचे विचार तिच्या मनाला पटणे शक्य नव्हते. मग थोडा निषेध सोहळा.




वा ! कुरकुरीत डोसा. अनलिमीटेड खाण्यासाठी सोबतच ठेवलेले सांभार चटण्यांचे ओगराळे, विविध रंगांच्या चटण्या. रंग, रस गंध यांचा सुंदर मिलाप.



रामनाथपुरम च्या रेल्वे फ़ाटकात थांबावे लागले. एक एक्सप्रेस गाडी रामेश्वरमकडे रवाना झाली.






फ़ाटकात थांबलो असताना सहज बाजुच्या पाणथळ जागेचा हा फ़ोटो काढण्याचा मोह मी टाळू शकलो नाही.


सुंदर तामिळ रस्त्यांवरून प्रवास करताना खरोखर मजा येतेय. ह्या परिसराच्या प्रेमात पडावे असाच हा सगळा परिसर आहे. गाडी जोरात जात होती. मध्येच आमच्या चालकाने रामेश्वरमला फ़ोन करून आमच्या आगमनाची वर्दी दिली आणि दर्शनासाठी घाई घाई होणार असल्याचे ताडून तिथली पूजा साहित्य, पुजारी आदींची व्यवस्था आधीच करून ठेवली. यात त्याचा स्वार्थ असेलही पण आमची खरोखर सोय झाली. रामेश्वरम आधी पांबन चा मोठा पूल आहे. रामेश्वरम हे बेट आहे. जवळपास ४ किमी चा हा पूल आणि त्यालाच लागून असलेला रेल्वे पूल ही भारतीय स्थापत्य अभियंत्यांची आश्चर्यकारक आणि अभिमानकारक रचना आहे. जाताना वेळ नव्हता म्हणून परतताना येथे मुद्दाम थांबण्याचे ठरविले.

रामेश्वरम ला मोठी मजेदार प्रथा आहे. मंदीराच्या अगदी दक्षिणेला लागून समुद्र (बंगालचा उपसागर) आहे. तिथे पहिल्यांदा सचैल स्नान करायचे आणि ओलेत्यानेच जवळपास ५० - ६० मीटरचे अंतर कापून मंदीर परिसरात प्रवेश करायचा. मंदीर परिसरात जवळजवळच असलेली २१ कुंडे आहेत. त्यात स्नान करायचे. विशेष काही नाही. आपल्यासोबत एक स्थानिक माणूस फ़िरत असतो. प्रत्येक कुंडात तो सोबतची बादली बुडवतो आणि आपल्याला सचैल स्नान घडवतो. त्याचा मजेशीर अनुभव मी पण घेतला. प्रत्येक कुंडाच्या पाण्याचे तापमान वेगळे. कुणाचे उष्ण तर कुणाचे कुडकुडवणारे. अगदी १० फ़ुटांच्या परिसरातील दोन कुंडांच्या पाण्याच्या चवीतही अक्षरशः जमीन अस्मानाचा फ़रक होता. एकाचे खूप गोड तर दुस-याचे तितकेच क्षारयुक्त, खारट. हा सृष्टीचा चमत्कार प्रत्येकाने अनुभवायलाच हवा. आणि तसेच ओलेत्याने भगवंताच्या दर्शनाला जायचे. साधारणतः या अर्ध्या तासात मी पूर्णपणे कोरडा झालो. (भगवंताच्या दर्शनाला कोरडेपणाने जाणे हे सुद्धा भगवंतानेच ठरवले त्याला आपण पामर तरी काय करणार ?)


निवांत दर्शन झाले आणि थोडावेळ मंदीराचे आणि त्यातल्या अदभुत स्थापत्यशास्त्राचे अवलोकन झाले. आत छायाचित्रणाला परवानगी नाही त्यामुळे बाहेर निघाल्यावरच मंदीराच्या गोपुरांचा फ़ोटो काढला.


परतताना निवांत पांबनच्या पुलावर थांबलो. निसर्ग छायाचित्रात आणि शब्दांतही न मावणारा. पांबनच्या आखाताचे फ़ोटो काढलेत. निळयाशार आखाताखाली त्याच्या निळाईशी स्पर्धा करणारा निळाशार समुद्र. त्यांत नांगरलेल्या होड्या. 


रस्त्यावरच्या पुलाशेजारी असलेला हा रेल्वे पूल. हे पण स्थापत्य शास्त्रातले एक आश्चर्य आहे. पुढल्या वेळेला इथे रेल्वेने यायचे आणि पुलावरून गाडी जाताना गाडीच्या दारात खाली पाय सोडून बसण्याची कल्पना मी मनाशी पक्की केली.



दोन्ही बाजुला पसरलेल्या रेल्वे पुलाचे विहंगम छायाचित्र.


पुलाखालून मोठ्या बोटी जाणार असतील तर हा पूल या ठिकाणी मधोमध दुभंगणार आणि मोठ्या बोटींना जायला मार्ग तयार होणार.


या गो दरियाचा , दरियाचा, दरियाचा दरारा मोठा......


पूल ओलांडताच भारतीय मुख्य भूमीवर पांबनला एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. तामिळनाडूच्या पर्यटन विभागाने फ़ार छान आणि व्यवस्थित ठेवलेले हे स्थळ,  प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावे असेच आहे. तिथे तळाशी काच लावलेल्या मोटारबोटीची सुंदर सफ़र करवितात. आम्ही गेलो तेव्हा अजिबातच गर्दी नव्हती. आम्ही केवळ आमच्यासाठी ही मोटारबोट ठरवली पाण्याखालील प्रवाळांचे दर्शन हा मुख्य हेतू आणि पांबन पुलाचे जवळून दर्शन हा उपहेतू.


बोटीचा फ़ेसाळता प्रवास आणि दूर जाणारा पांबनचा किनारा.


अथांग समुद्रात बोट.


प्रवास करता करता बोट रेल्वे पुलाजवळ गेली. पाण्याची पातळी आणि रेल्वे पूल यातले फ़ार कमी अंतर.


डावीकडील रेल्वे पूल आणि उजवीकडील रस्त्यावरचा पूल. मधोमध आमची बोट.


आमचे नावाडी दादा.




इथल्या मऊसूत वाळूच्या किना-यावर वेळ घालवायला खूप मजा येत होती. आम्ही तिथे थोडे रमलोत.


नैसर्गिक नितळ स्वच्छ पाणी. फ़ार कुठे दूर नाही. अगदी आपल्याच देशात.




आम्ही दोघेही बापलेक समुद्रवेडे आहोत. लाटा परतताना पाउलांना होणारा मऊ वाळूचा थंड स्पर्श सोडून बाहेर निघण्याची इच्छाच होईना.


" चला, आता आपल्याला परत जायचय नं " अशी परतण्याची तयारी सुरू झाल्यावर चि. मृण्मयीची " बाबा, आपण अजून थोडावेळ इथेच थांबू नं " म्हणून विनवणी.


या निसर्गरम्य ठिकाणाचा निरोप घेताना अक्षरशः जिवावर आले होते. " पुढल्या वेळी इथे जास्त वेळ घालवूयात " असे आश्वासन चि. मृण्मयीला देऊन आणि आपल्याही मनाशी ठरवून परतलोत.




आमचा हा प्रवास अधिक सुंदर व सुखकर व्हावा म्हणून मनापासून प्रयत्न करणारे आमचे चालक आणि मार्गदर्शक ड्रायव्हर साहेब त्यांच्या टॅक्सीसह.

परतताना मदुराईला पोहोचायला थोडा उशीरच झाला. आम्हाला मीनाक्षी मंदीरात जाऊन अंबेचे दर्शनही घ्यायचे होते पण आमच्या ड्रायव्हर साहेबांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे ते सुद्धा शक्य झाले. मंदीराच्या बाहेर समस्त स्त्री वर्गाची आवडती जागा म्हणजे साड्यांची दुकाने आहेतच. साड्याही चांगल्या आणि रास्त किंमतीला उपलब्ध होत्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतांशी दुकाने मराठी माणसांची आहेत. हो. मराठी माणसांची. 


मीनाक्षी मंदीराची प्रतिकृती. आत छायाचित्रणाला परवानगी नाही म्हणून या सुंदर वास्तूच्या छायाचित्रणाची हौस त्याच्या प्रतिकृतीच्या छायाचित्रणाने भागवावी लागली.



अंबेचे दर्शन छान झाले. पुन्हा येण्याची खूणगाठ मनाशी बांधली. आणि जड मनाने पुढील मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले. आता मुक्काम कन्याकुमारी.

Friday, January 15, 2016

संस्कृत सुभाषिते - ५ गोड (च) बोला

वाचा:
संस्कृत सुभाषिते - १
संस्कृत सुभाषिते - २
संस्कृत सुभाषिते - ३ 
संस्कृत सुभाषिते - ४  

संस्कृत सुभाषित आहे,

"सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात
न ब्रूयात सत्यमप्रियम
प्रियं च नानृतम ब्रूयात
देश धर्म सनातनः "

अर्थ : खरे बोला पण प्रिय वाटेल असे खरे बोला. खरे पण अप्रिय असे बोलू नका. प्रिय वाटणारे पण खोटे फ़क्त देश आणि धर्म वाचवण्याच्या वेळेस (आपदधर्म म्हणून) बोला. 

दरवर्षी मकर संक्रांत आपल्याला सत्य बोला पण प्रिय बोला असे बजावून सांगत असते आणि आज जेव्हा मी माझ्याच जीवनाचा विचार करतोय तो कळतय की ज्यावेळी मी नको तेव्हढं परखड बोलून (असते एक तारूण्याची धुंदी. जेव्हा माणस जपण्यापेक्षा आपली मतं महत्वाची वाटत असतात. वाद घालण्याची आणि निभावून नेण्याची खुमखुमी असते.) माणस दुखावली, त्यावेळेस जर मी तेच म्हणण वेगळ्या शब्दांमध्ये, वेगळ्या आवाजाच्या पट्टीत मांडल असत तर माणस दुखावली गेली नसती. पण आज हे कळतय यालाच अनुभव म्हणत असावे.

असो. हा लेख लिहीण्याचा प्रपंच माझ्या सर्व तरूण मित्रांसाठी. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा व्हावा" या हेतूने. केवळ मकरसंक्रातीलाच नव्हे तर सदैव गोड आणि गोडच बोला.

Tuesday, January 12, 2016

मनाचे श्लोक - ४




सदा सर्वदा प्रीती रामी धरावी
दुःखाची स्वये सांडि जीवी करावी
देहेदुःख ते सुख मानीत जावे 
विवेकी सदा सस्वरूपी भरावे II १० II 

मनुष्यमात्राला दुःख का भोगावे लागते यावर श्री समर्थांनी आणि इतरही तत्ववेत्त्यांनी खूप विचार करून ठेवला आहे. किंबहुना संताच्या कार्याचा जन्मच हे जगतातले दुःख पाहून त्याच्या निवारण्याच्या तळमळीतून झाला आहे. मनुष्यमात्राच्या "देह म्हणजे आणि म्हणजेच मी"  या भ्रामक समजुतीशी त्यांचे सगळे दुःख जोडल्या गेले आहे. देहाला दुःख झाले की आपल्याला दुःख होते पण त्याच बरोबर देहाशी आपण आपल्याला जोडले की जास्त दुःख वाटते. अपमान झाला, उपेक्षा झाली की याच देहबुद्धीमुळे संताप येतो, दुःख वाटते. श्री ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात देह हा एकदा प्रारब्धाच्या ताब्यात आहे हे ओळखले की मग "मी म्हणजे देह नाही" ही भावना दृढ होते. आणि मग देहाशी संबंधित सुखदुःखांची आपल्याला बाधा होत नाही. आपल्या सगळ्यांचा स्वकर्तृत्वाचा अहंकार येव्हढा जबरदस्त असतो की आपणच आपल्या आयुष्य़ातले सर्वेसर्वा आहोत अशी समजूत करून आपण घेतो.

"प्रभू रामचंद्र माझे स्वामी आहेत, सर्वेसर्वा आहेत. माझ्या आयुष्यातले सगळे बरे वाईट प्रसंग केवळ त्यांच्याच इच्छेने येत आहेत" ही भावना दृढ झाली की कसले दुःख आणि कसले सुख ?  या अर्थाने श्री समर्थ आपणा सर्वांनी श्रीरामांप्रती प्रिती करायला सांगताहेत त्यामुळे देहाचे दुःख आणि सुख यात आपण फ़रक करणार नाही. श्री ब्रम्हचैतन्य महाराज छान दृष्टांत देतात. " दोन मुली भातुकलीचा खेळ करीत होत्या. एकीने पाहुण्यांसाठी श्रीखंड पुरी केली आणि दुसरीने साधासाच गुळांबा केला. एकीचा गुळांबा जसा पोट भरायला उपयुक्त नाही तसा दुसरीचा श्रीखंड पुरीचा बेतही उपयुक्त नाही " आयुष्याकडे या समदृष्टीच्या विवेकाने पाहण्याची शिकवण आपल्याला श्री समर्थ देत आहेत.

जनी सर्वसूखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधूनि पाहे
मना त्वां चि रे पूर्वसंचित केले
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले II ११ II 

या जगात सुखी माणसाचा सदराच नाही. जगात सर्वात सर्व अर्थाने सुखी असा कुणीही नाही. सर्वसुखी संतमंडळीच असतात. श्री समर्थ आपणा सर्वांना त्या समस्त सर्वसुखी माणसांच्या (संतांच्या) सौख्याचा धांडोळा घ्यायला सांगताहेत. ते सुखी आहेत कारण त्यांनी आपले सुख श्रीरामांसारख्या शाश्वत गोष्टींशी निगडीत केलेले आहे. आपण आपली सुखाची कल्पना भौतिक जगतातल्या नश्वर गोष्टींशी निगडीत केली तर शाश्वत सुख कसे मिळेल ? देहाशी संबंधित जी सुखदुःखे असतात ती आपल्या पूर्व कर्मांना अनुसरून असतात. चांगली कर्मे केली तर सुखस्वरूप चांगलेच फ़ळ प्राप्त होईल आणि वाईट कर्मांमुळे वाईट फ़ळांचा स्वीकार करावाच लागेल हा कर्माचा सिद्धांत एकदा स्वीकारला की मनाला शांती लाभेल.

मना मानसी दुःख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहेदुद्धी सोडूनि द्यावी
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. II १२ II 

म्हणूनच श्री समर्थ आपणा सर्वांना विवेकाने विचार करून ही देहबुद्धी सोडायला सांगताहेत. "मी देह नाही" यावर दृढ विश्वास बसला की मग मनातल्या शोक, चिंता, दुःखांना पूर्णविराम मिळेल आणि मुक्ती मुक्ती म्हणजे तरी दुसरे काय ? "पुनरपी जननम पुनरपी मरणम" च्या फ़े-यातून सुटका तर आहेच पण ज्या विदेही पुरूषाला शोक चिंता उद्वेग, दुःख यांची जाणीवच नाही त्याला आयुष्यात मुक्तीच मिळाली असे म्हणावे लागेल. 

 II जय  जय रघुवीर समर्थ II

Saturday, January 9, 2016

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५

जानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरीयल विषयात फ़क्त आम्ही ८ च विद्यार्थी उत्तीर्ण झालो होतो. भगवंताविषयी एक कृतज्ञता दाटून आली. आम्ही एव्हढे हुशार वगैरे नसताना हा बहुमान मिळणे म्हणजे आश्चर्यच होते. मग मी श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे ठरविले. तसेही सुरूवातीच्या काळात महाविद्यालयात काही विशेष शिकवण्याचा भाग होत नाही हे तर आत्तापर्यंत केलेल्या तीनही सत्रांमधून पाहिलेले होते. म्हटलं जाउयात ३ - ४ दिवस. मित्रांना विचारून पाहिले पण प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी, मी यापूर्वीचा शिर्डी प्रवास १९७८ मध्ये केला असल्याने यावेळी जायला अगदी उत्सुक होतो. मग एकट्यानेच जायचे ठरवले.

घरी महिन्याच्या खर्चाव्यतिरिक्त फ़ार जास्त पैसे मागणे जिवावर आले होते. बर पैसे मागवायला आणि घरून एम. टी.  ने यायला कमीतकमी आठवडा गेला असता. मग एकट्याने जाताना थोडे "इकॉनॉमी मोड"ने जाऊयात असा विचार केला. आणि मग सुरूवात झाली एका अनपेक्षित रित्या गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवासाला.

११/०१/१९९१ रोजी सकाळी ८.०० वाजताच्या पॅसेंजरने निघायचे ठरले. महाराष्ट्र एक्सप्रेस होती खरी पण ती खूप पहाटे कोपरगावला पोहोचायची आणि जरा बचत करत जायच म्हटल तर विचार केला पॅसेंजरनेच जाउयात. वेळ वाचवून तरी काय करायचाय ? पैसा वाचवूयात. प्रश्न होता आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयापासून कराड स्टेशनपर्यंत कसे यावे ? त्यावेळी स्टेशन अगदी आडबाजुला वाटे आणि जाण्यायेण्यासाठी रिक्षा परवडण्याजोग्या नव्हत्या. कराडच्या आमच्या महाविद्यालयापासूनच्या स्टेशनपर्यंतच्या रिक्षा भाड्यात पॅसेंजरने कराड-कोपरगाव-कराड असे रिटर्न तिकीट झाले असते. (रिक्षाचालक हा एक गरीब, परिस्थितीने गांजलेला वगैरे असतो हे माझे मत कराडमध्ये पार धुळीला मिळाले होते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात टगेगिरी केलेली आहे असे दाखवल्याशिवाय रिक्षाचे लायसन मिळत नसावे.) मग एका बसचा शोध लागला. कराड- वाघेरी ही बस सकाळी ६.३० च्या सुमाराला आमच्या महाविद्यालयासमोरून जायची आणि साधारण १५ मिनीटांत स्टेशनवर पोहोचायची. (या ६ ते ७ किमी च्या प्रवासासाठी रिक्षा ५० रू. त्या काळात मागायचेत. कराड ते कोपरगाव पॅसेंजरचे तिकीट २६ रूपये आणि एक्सप्रेसचे तिकीट ५८ रूपये होते.) मग त्या बसने निघण्याचे ठरवले. भाडे ४५ पैसे फ़क्त.

११/०१/१९९१ : सकाळी पावणेसातलाच कराड स्टेशनवर पोहोचलो. कराड स्टेशनवर टाईमपास करण्याचा काही प्रॉब्लेमच नव्हता. पु. लं. नी " काही अप्स, काही डाऊन्स " या लेखात याच मार्गावरच्या स्टेशन्सचे वर्णन केलेले आहे. तिकीट खिडकी उघडण्याची वाट बघत बसलो. पावणेआठाच्या सुमाराला तिकीट खिडकीवर चुळबुळ सुरू झाली. थेट कोपरगावचे पॅसेंजर तिकीट घेतले आणि गाडीची वाट बघत बसलो. गाडी चांगली अर्धा तास उशीरा आली. आणि पंधरा मिनीटे थांबून रवाना झाली. तशीही या मार्गावर गाड्यांना गर्दी विरळाच. त्याला ही पण अपवाद नव्हती. खिडकीची जागा पटकावून या इकॉनॉमी प्रवासाचा आनंद मी लुटायला सुरूवात केली.



नीरा स्थानकात खाण्यापिण्याची छान व्यवस्था व्हायची. जुन्या, वाफ़ेच्या एंजिनांच्या काळात, नीरा स्थानकात एंजिनात पाणी भरत असावेत. ती पाणी भरण्यासाठी असणारी सोंड बराच काळ तिथे बघायला मिळाली होती. म्हणजे गाडीची पण पोटपूजा आणि प्रवाशांचीही इथेच व्हायची. मला आठवतेय १९९० च्या दशकात महाराष्ट्र एक्सप्रेस चांगली अर्धा तास नीरा स्थानकात उभी असायची. फ़ळफ़ळावळीचा भरपूर मेवा विकायला इथे असायचा. यावेळेसही अशीच पोटपूजा करून आम्ही मार्गस्थ झालोय.

घोरपडी स्टेशन आल की पुण्याच्या नागरी पाउलखुणा दिसायला लागायच्यात. मग पुण आलच आहे म्हणून दारापाशी उभा ठाकलो. पुण्यावरून पुणे - मनमाड पॅसेंजर घ्यायची हे ठरले होते. पण ती केव्हातरी दुपारी निघते या व्यतिरिक्त माहिती तेव्हा मला नव्हती. त्यामुळे थोडी रुखरूख. घोरपडी स्टेशनवरून तीन वाजता निघालेली गाडी पुण्याच्या आउटर सिग्नलला उभी राहिली. पुणे जंक्शनपाशी. इथूनच सोलापूर - वाडी हैद्राबाद / गुंटकल कडे जाणारा मार्ग आणि मिरज - कोल्हापूरकडे जाणारा मार्ग वेगळा होतोय. ५ मिनीटे वाट बघून दारातूनच बाजूने जाणा-या रेल्वे कर्मचा-याला विचारले की " दादा, गाडी का थांबवलीय ? पुण्यात कधी घेणार प्लॅटफ़ॉर्मला ? " त्याच उत्तर ऐकून दरदरून घामच फ़ुटला. तो म्हणाला " आत्ता प्लॅटफ़ॉर्म ४ वर मनमाड पॅसेंजर उभी आहे. ती आणखी ५ मिनीटांत निघेल मग या गाडीला प्लॅटफ़ॉर्म ४ वरच घेतील. " बापरे, आता काय करावे ? बरं, ही मनमाड पॅसेंजर निघून गेली तर पुण्यावरून कोपरगावकडे रात्रीशिवाय दुसरी गाडी नव्हती. म्हणजे एव्हढ्या मेहेनतीने बनविलेला आपला प्लॅन फ़िसकटणार तर.  



मग एक धाडसी निर्णय घेतला. तसाच गाडीखाली उतरलो आणि रेल्वे रूळांवरून पुणे स्टेशनकडे चालायला लागलो. धोका होता पण त्या काळात असे धोके स्वीकारण्याची खुमखुमी होती. जवळपास धावतच निघालो. दूरवरून प्लॅटफ़ॉर्मवर दौंडच्या दिशेला तोंड करून असलेले डिझेल एंजिन आणि त्यापाठी असलेली गाडी दिसली. त्याच रूळांवरून त्या दिशेने निघालो. जणू ती गाडी सुटली तर माझ्यासाठी ती थांबणारच होती. पण सुदैवाने प्लॅटफ़ॉर्मवर पोहोचेपर्यंत सुटली नाही. आत बसल्या बसल्या गाडी सुटली. हा निर्णय घेण्यात थोडा आणखी उशीर झाला असता तर मात्र नक्की गाडी मिळाली नसती.



हा प्रवास मात्र थोडा रटाळ झाला. गाडीत दौंडपर्यंत ब-यापैकी गर्दी होती. दौंडनंतर अंधारात फ़ारसे रेल्वेफ़ॅनिंग करता आले नाही. गाडी कोपरगावला किती रात्री पोहोचणार याबद्द्ल ठाम माहिती नसल्यामुळे मधेच झोपपण उरकून घेतली. १९७८ मधल्या प्रवासातल्या काय काय गोष्टी आठवतायत याचा विचार करीत प्रवास संपला.

कोपरगाव बस स्थानकावरून थोड्याच वेळात शिर्डीसाठी बस मिळाली.





प्रवासाची तिकीटे जपून ठेवण्याचा माझा छंद. या २५ वर्षांपूर्वीच्या प्रवासाची ही तिकीटे.


 कोपरगाव ते शिर्डी बस प्रवासाचा एकूण खर्च ४ रूपये ५० पैसे.

१२/०१/१९९१ : रात्री १ वाजता शिर्डीत हॉटेल / लॉज शोध मोहिम सुरू झाली. फ़ार खर्च करायचा नव्हताच आणि त्याकाळी शिर्डीत आजइतकी चकाचक आणि खूप सारी हॉटेल्सपण नव्हती. मंदीराजवळच एक साधेसे लॉज सापडले. पण मला एकट्याला तो खोली देईना. " साहेब इथे परवाच अशाच एकट्या मुलाने आत्महत्या केलेली आहे " हे त्याचे वाक्य मला हादरवून गेले. कसेतरी बाबापुता करून लॉजच्या गच्चीवरची एक खोली मिळवली. भाडे ६० रूपये फ़क्त. रात्रीचे २ वाजत आले होते. पहाटे लवकर उठण्याच्या इराद्याने झोपलो. झोपण्यापूर्वी त्या तथाकथित आत्महत्येचे स्थळ म्हणजेच मला दिलेली खोली नव्हे ना ? याची खातरजमा करून घेतली.

पहाटे काकड आर्तीच्या आवाजाने जाग आली. आवरून दर्शनाला गेलो. मंदीर परिसरात निवांत वेळ घालवला. साईबाबांचे निवांत दर्शन घेतले. त्यांना आत्म परिस्थिती निवेदन केली. परिसरातील इतर दर्शने घेतलीत. दुपारी जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि लॉजवर परतून परतीच्या प्रवासाला निघालो.

दुपारी शिर्डीवरून थेट कराडला जाणारी कोपरगाव - हुबळी ही कर्नाटक सरकारची एक्सप्रेस बस होती. इतका लांबचा प्रवास कर्नाटक राज्याच्या बसने करायचा म्हणून मी हरखलो होतो. शिर्डीच्या बसस्थानकावर बसची चौकशी केल्यानंतर कळले की दुपारी ३ वाजता ही बस येते आणि बसभाडे ७३ रूपये आहे. प्रवासाच्या या शेवटल्या टप्प्यासाठी मी माझ्या पाकिटातली रक्कम मोजली आणि हादरलोच. पाकिटात सगळे मिळून वट्ट ७० च रूपये होते. पुन्हा पुन्हा मोजले पण त्यामुळे पैसे वाढणार होते थोडेच ? मोठ्ठा प्रश्न उभा राहिला. आता परतायचे कसे ? बस आल्यावर आपली परिस्थिती कंडक्टरला सांगून पहावी का ? त्याला पटेल का ? परराज्यातल्या कंडक्टरला बाजू पटली नाही तर काय करावे ? 

डोळ्यासमोरून आत्तापर्यंत बसस्टॅण्डवर पाहिलेल्या " साहेब, आम्हाला आमच्या गावाला परत जायला पैसे नाहीत हो. पाकीट मारल्या गेलय़ " वगैरे सांगून भाड्यापुरती पैशाची याचना करणा-या व्यक्ती आल्या. आज आपल्यावरही ही पाळी आलीय का ? 

साता-याला सुधीर गोखले, विश्वास सुतार वगैरे मित्रमंडळी होती. साता-यापर्यंत तिकीट ६५ रूपये होते. साता-यात उतरून यांच्याकडे जावे की काय ? पण ही मंडळी या क्षणी कराडला हॉस्टेलला होती आणि यांच्या घरी यांचे पालकच असतील. शिवाय घरी जाउन रिक्षाचे पैसेही यांच्या पालकांना मागणेसुद्धा फ़ारसे स्वीकारार्ह नव्हते.

सुरूवातीला भांबावलो. मग घाबरलो. स्वतःवरच चरफ़डलो. " जेवताना तो पापड उगाच घेतला. नसता घेतला तर हा ३ रूपयांचा प्रश्न आला नसता. सकाळी दुस-यांदा चहा प्यायलो नसतो तर आणखी एक रूपया वाचला असता. " एक ना दोन, हज्जार विचारांनी डोक्याला मुंग्या आल्या होत्या. दिड;मुढ झालो. हनुवटी छातीत खुपसून किती वेळ शिर्डीच्या प्लॅटफ़ॉर्मवर बसलो होतो कुणास ठाउक ? जीवनात अगदी हरल्यासारखे वाटण्याचे जे काही क्षण जीवनात आलेत त्यातलाच हा तास.

आणि मग अचानक विजेसारखा एक विचार चमकला. पुन्हा स्थानक प्रमुखांकडे गेलो. आणि विचारले की औरंगाबादचे तिकीट किती ? त्यांनी सांगितले की २६ रूपये. एकदम हायसे वाटले. आता प्लॅन बदलून
औरंगाबादला जाउ. तिथे अण्णाकाकांकडे जाउ. त्यांना खरे खरे सगळे सांगू. आपली चूक अशी वडीलधा-यांसमोर मान्य करण्यात कसली आलीय लाज ? चलो औरंगाबाद.

कोपरगाव वरून औरंगाबादला जाण्याला जास्त ऑप्शन्स मिळतील या विचाराने पुन्हा कोपरगाव गाठण्याचे ठरवले. लगेच एक साधी बस मिळाली.







शिर्डी ते कोपरगाव साधारण बसचे तिकीट ३ रूपये ५० पैसे फ़क्त.



कोपरगावला औरंगाबादकडे जाणा-या बसेसच मिळाल्या नाहीत. एक तास बसफ़ॅनिंग मध्ये तिथे घालवला. मग शिर्डीवरूनच येणारी बस मिळाली.



जीव भांड्यात पाडून निघालो. त्यावेळी सध्या अस्तित्वात असलेला नागपूर - वर्धा - कारंजा - मेहेकर - सिंदखेड राजा - जालना- औरंगाबाद - शिर्डी - सिन्नर - घोटी - मुंबई हा हायवे नव्हता. सगळ्या बसगाड्या शिर्डी ते औरंगाबाद हा प्रवास एकतर नेवासे मार्गे नाहीतर येवला मार्गे करायच्यात.


कोपरगाव ते औरंगाबाद प्रवास तिकीट २६ रूपये फ़क्त.



औरंगाबादला अण्णाकाकांकडे गेलो तर ती सगळी मंडळी पुण्याला गेलेलीत. पुन्हा रिक्षा करण्याइतपत पैसे आता जवळ होतेच. त्यामुळे मग गारखेड्याला मावशी कडे गेलो. दोन्ही मावसभाऊ साधारण माझापेक्षा ५ एक वर्षांनी मोठे त्यामुळे समवयस्कच. त्यांना खरी खरी परिस्थिती सांगितली. मोठ्ठा हशा झाला आणि औरंगाबाद ते कराड प्रवासाच्या पैशाचा प्रश्न विरून गेला.

१३/०१/१९९१ : दुपारी औरंगाबादवरून निघालो. आता मात्र " इकॉनॉमी मोड " चा नाद सोडला होता. औरंगाबाद ते मनमाड आणि पुन्हा मनमाड - पुणे - कराड ह्या पॅसेंजर सलग नव्हत्या. मध्ये चांगली ८ - ८ तासांची गॅप होती. तो नाद सोडला आणि सरळ बसनेच निघालो.




औरंगाबाद ते पुणे जलद बसचे प्रवासभाडे ४६ रूपये फ़क्त. प्रवासाचा वेळ ५ तास ३० मिनीटे.


तिकीटांमागे लिहून ठेवण्याची ही मीच शोधून काढलेली पद्धत १९८३ पासूनची. तेव्हापासूनची सगळी तिकीटे, आरक्षणे माझ्या अमूल्य संग्रहात आहेत.

पुण्यात नेहेमीप्रमाणे शिवाजीनगर ते स्वारगेट प्रवास आणि पुढे कराड करता प्रस्थान.





कराड ते पुणे जलद प्रवासभाडे २६ रूपये ७५ पैसे.



आज २५ वर्षांनी मी विचार करतोय या प्रवासाने मला काय दिल ? या प्रवासाने मला प्रवासातल्या पैशांच्या व्यवस्थापनाचा धडा दिला. नंतरच्या आयुष्यातही असे खूप वेगळ्या वळणावरचे आणि संपूर्णपणे स्वतः आखलेले प्रवास केलेत. ब-याचदा एकट्याने, ब-याचदा नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या सोबत. पण दरवेळी व्यवस्थापनाचा धडा पक्का होता. आज अनेकदा शिर्डीत जाणे होते. दरवेळी दर्शनही होते. आता बसचा प्रवास नाहीये. पण गाडीतूनही जाताना शिर्डी बस स्थानकासमोरून जाताना माझा मीच मला आठवत राहतो. हताशा, निराशेचा शिर्डी बस स्थानकावरचा तो तास मी विसरू शकत नाहीये. त्या तासाने मला खूप दिल. त्याच्याविषयी कृतज्ञता भरून येते. ते दिवस आठवून डोळे आपसूकच पाणावतात, ओलावतात. बायको विचारते " काही झालय का ? "

" काही नाही. गाडीच्या काचा लावून घे. ए.सी. सुरू करूयात. शिर्डीत हल्ली धूळ किती झालीय ? काही काही कण उगाच असे डोळ्यात जातात. " मी गाडीची काच वर सरकवत उत्तर देतो. डोळ्यात नव्हे तर मनात सतत खुपणारा आणि जाणीवेचा कणच हे माझ्यावतीने बोलतो.