Monday, July 26, 2021

श्रद्धाळू लोकांनी आवर्जून टाळावे असे काही.

 आपण श्रध्दाळू लोक खूप तीर्थश्रेत्रांना भेटी देतो. क्वचित प्रसंगी तिथल्या सुंदर विग्रहांच्या तसबिरी किंवा तिथे होत असलेल्या उपासनेचे पुस्तक किंवा त्या संताची चरित्रात्मक पोथी घरी घेऊन येतो. त्या तसबिरी आपल्या देवघरात विराजमान होतात.

पण कालौघात आपल्या स्मृतींवर थोडी धूळ बसल्यासारखी होते. ती स्तोत्रे विस्मरणात जातात, एकाच पारायणानंतर आपण ती पोथी पुन्हा वाचतही नाही, त्या तसबिरींची नित्य पूजा होते पण ती तसबीर घरी आणण्यामागे जो हेतू असतो तो लोप पावल्यागत होतो.
असे करू नये. हे म्हणजे आपण आमंत्रण देऊन बोलावलेला पाहुणा घरी आलेला असताना त्याला केवळ बसण्यासाठी जागा देऊन नंतर त्याची / तिची दखलच न घेता उपेक्षा केल्यासारखे होईल.
आपण सश्रध्द असू, तर देवघरात विराजमान प्रत्येक देवाची थोडीतरी उपासना (एखादे स्तोत्र, अष्टक किंवा आर्ती) रोज व्हायलाच हवी, नियमित कालावधीत (वर्ष, सहा महिने) ती पोथी वाचनात आणल्या गेली पाहिजे, हे कटाक्षाने पाळले पाहिजे. हे अनुसंधान नित्य टिकवले गेले पाहिजे. त्यासाठी फक्त काही मिनीटांचा वेळ आपल्या दिनचर्येतून आपल्याला काढता आलाच पाहिजे. अशा रितीने आपण हळूहळू त्या देवतेशी आणि त्या तीर्थक्षेत्रांशी मनाने संलग्न होत जातो, अविभक्त कृपेची अनुभूती घेत जातो. "जो विभक्त नाही तो भक्त" ही व्याख्या लक्षात घेतली तर आपली "भक्त" होण्याकडे वाटचाल वेगाने होत जाते.
- स्वानुभवात्मक चिंतनातून उपयुक्त विचार मांडणारा एक भक्त, रामभाऊ.

Sunday, July 25, 2021

दुर्मिळ ते काही - ४

यापूर्वीचे याच मालिकेतील लेख.

दुर्मिळ ते काही - १

दुर्मिळ ते काही - २

दुर्मिळ ते काही - ३

मुंबई महानगर परिसरात मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका, वसई - विरार महापालिका, कल्याण - डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी - निजामपूर महापालिका, पनवेल महापालिका, मीरा - भाईंदर महापालिका अशा अनेक महापालिका आहेत. माझ्या मते मुंबईची भौगोलिक हद्द इकडे मुलुंड आणि तिकडे दहिसरला संपत असली तरी जिथपर्यंत ती नकटी लोकल प्रवाशांची रोज ये जा करते तिथपर्यंत मुंबईची हद्द. लोकलने प्रवास करीत आपापल्या कामावर जाणारे आणि घराच्या ओढीने परतणारे सगळे मुंबईकरच. मग तो टिटवाळा, आसनगाव किंवा थेट वांगणीचा चाकरमानी का असेना.

वर उल्लेख केलेल्या महापालिकांपैकी पनवेल आणि भिवंडी - निजामपूर महापालिका वगळता प्रत्येक महापालिकेची स्वतःची शहर बस सेवा आहे. उल्हासनगर महापालिकेची स्वतःची शहर बस सेवा आहे हे मला २०१२ पर्यंत माहिती नव्हते. २०१२ मध्ये डिसेंबरमध्ये सांगोल्यावरून मुंबईला अचानक प्रवास करावा लागला तेव्हा टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला जाताना अचानक या बसचे दर्शन झाले. RUBY Coach ने बांधलेली ही मिडी बस. 


आता उल्हासनगर महापालिकेची ही बससेवा सुरू आहे की नाही याची कल्पना नाही. पण माझ्या जवळच्या प्रकाशचित्र संग्रहातले हे एक दुर्मिळ प्रकाशचित्र.


- बसफ़ॅन राम किन्हीकर.

Theorem of relationship inside a family.

 माझे एक प्रमेय आहे.

१ % अपवाद असतीलही पण ९९ % वेळा हे प्रमेय खरे ठरलेय. कारण त्यामागचे निरीक्षण तटस्थ व प्रामाणिक आहे.
प्रमेय:
"पाठच्या दोन भावांच्या लग्नांमधले अंतर जेव्हढे जास्त असेल, तितके त्या दोन जावांमधले नाते घट्ट असते."
असे का ? या निरीक्षणाचे मी विश्लेषण केले आणि यामागील (मनो)शास्त्रीय कारणांचा शोध लागला की.
थोरल्याचे लग्न झाले की धाकटा दीर आणि वहिनी यांच्यात 'थोरली बहीण धाकटा भाऊ' किंवा 'आई - मुलगा' हे बंध नैसर्गिकरित्या निर्माण व्हायला थोडा काळ जाऊ द्यावा लागतो. ही नाती निर्माण होण्याचा तो काळ मिळण्यापूर्वीच धाकट्याचे लग्न झाले की मग जावाजावांमध्ये एक बरोबरी होते आणि घरात एक अकारण स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते.
वर म्हटल्याप्रमाणे या प्रमेयाला अपवाद आहेत. दोघांच्या लग्नात बरीच वर्षे अंतर असूनही दोन जावांमध्ये स्पर्धा असणे किंवा दोघा भावंडांच्या लग्नात फार कमी अंतर असूनही भावजई - दीराचे आई लेकराचे नाते निर्माण होणे.
पण हे अपवाद अगदी १ %. शिवाय नियम हा अपवादानेच सिध्द होतो ना ?
- माणसांमधील, कुटुंबांमधील आंतर्संबंधांचा त्रयस्थ अभ्यासक आणि तटस्थ निरीक्षक आणि "सर्वे भवन्तु सुखिनः" ही वृत्ती कायमच हृदयात जोपासणारा, माणूस, प्रा. राम किन्हीकर

Saturday, July 24, 2021

मनुष्यमनोव्यापार

 कधीतरी एखाद्या सुटीच्या दिवशी दुपारी आपल्याला "घोडे बेचके सोना" या म्हणीला साजेल अशी झोप लागते. भरपूर वेळ झोपल्यानंतर आपण जागे होतो...

...त्यानंतर काही क्षण आपण कुठे आहोत ? ही सकाळ आहे की संध्याकाळ ? आजुबाजूची मंडळी कोण आहेत ? काय बोलताहेत ? आपल्याला पुढे नक्की काय करायचे आहे ? याबाबतचे निर्णय आपला मेंदू घेऊ शकत नाही. म्हणजे १२८ एम बी रॅममध्ये एकाचवेळी गेम्स आणि भरपूर applications उघडण्यासारखी आपली मेमरी होते. आपल्याला "बूट" व्हायला जरा वेळ लागतो.
तुम्हालाही आला असेल ना असाच अनुभव ? एकदा किंवा अनेकदाही ?

- "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" हे जरी खरे असले तरी "पिंडी तेच ब्रम्हांडी" हे ही तितकेच खरे मानणारा, मनुष्यमनोव्यापारतज्ञ (कशी वाटली मीच मला बहाल केलेली नवी पदवी ?) रामचंद्रशास्त्री किन्हीकर.

Friday, July 23, 2021

रिता मंडप

 हळदीच्या दिवशी मैत्रिणी, नातेवाईकांच्या थट्टेत बुडून, लाजून गेलेली नवरी लग्नाच्या दिवशी (मंगल कार्यालय किंवा लाॅनमध्ये उभारलेल्या) लग्नमंडपात जाते.

लग्नाच्या दिवशी सगळे लग्नविधी आटोपून नवरी आपल्या नियोजित घरी रवाना होते. मुलीकडली वर्हाडी मंडळी परततात.



मुलीकडे उभारलेला मंडप अशा वेळी सगळ्यात केविलवाणा भासत असतो. या मंडपातून मंगल कार्यालयात गेलेली सगळी पाहुणेमंडळी परत मंडपात परतली असतात. फक्त उत्सवमूर्ती त्यात नसते. त्यात परतण्याची वेळ ही तिन्हीसांजेची कातरवेळ असते. हा असला मंडप खरोखर हृदय कातरत जातो. माणसांनी भरलेला असला तरी हृदयाने रिता. दिलासादायक बाब एव्हढीच असते की दोन तीन दिवसांनी नवी नवरी आणि नवे जावईबापू त्या मांडवात परतणार असतात. हा दूरदृष्टीचा मनोवैज्ञानिक विचार करूनच आपल्याकडे "मांडवपरतणी"ची ही प्रथा आली असावी.
असेच रितेपण गणेशोत्सवाची, श्रीमदभागवतसप्ताहाची विसर्जन मिरवणूक आटोपून परतल्यानंतर त्या मंडपात जाणवत असते. उगाचच उदास होण्याचे, सगळं काही असूनही आतून रिते रिते वाटण्याचे हे प्रसंग.
- स्वतःला सख्खी बहीण नसेलही पण कुठल्याही पाठवणीच्या प्रसंगी हळवा होणारा आणि नकळत डोळ्यांच्या कडा पुसणारा गृहस्थ रामचंद्रपंत.

Thursday, July 22, 2021

परिवर्तन मार्क २

यापूर्वीच्या परिवर्तन मार्क१ बाबत इथे वाचा.

 

आपल्या ताफ़्यातल्या साध्या (निम आराम नसलेल्या) बसेसच्या संरचनेत इ. स. २००३ मध्ये पहिल्यांदा मोठा बदल केल्यानंतर एस. टी. महामंडळाने २००५ मध्ये आणखीही छोटे छोटे बदल करून परिवर्तन बसेसचे दुसरे मॉडेल आणले. हेच ते परिवर्तन मार्क २. 

हा मी काढलेला आणि (नावासकट व नावाशिवायही) खूप कॉपी झालेला फ़ोटो.

ह्या मॉडेलमध्ये बसेसचा लुक महामंडळाने बदलला होता. आजवर एस. टी. बसेसचे समोरचे काऊल टाटा किंवा लेलॅण्ड कंपनीकडून चेसिससोबत जसे आले, तसेच वापरत होते. यावेळी पहिल्यांदा समोरचे काऊल टाटा किंवा लेलॅण्ड कंपनीकडून आलेले जसेच्या तसे न लावता, फ़ायबर रिएन्फ़ोर्स्ड प्लास्टिकचे (FRP) पॅनेल बनवून महामंडळाने वापरले होते.

 


 गाड्यांना जुन्या गाड्यांप्रमाणे लाल + पिवळा किंवा परिवर्तन मार्क १ चा निळा + हिरवा रंग न देता संपूर्ण लाल रंगात रंगविण्यात आले होते. बाजूने जुन्या एशियाड (निम आराम) बसेसना असायचे तसे पण पांढ-या रंगांचे दोन छोटे पट्टे मारण्यात आलेले होते. निम आराम गाड्यांना असा एकच पट्टा फ़िकट निळ्या रंगातला असे.


 परिवर्तन मार्क १ मध्ये प्रवासी सामान ठेवण्याच्या रॅकमध्ये बदल झालेले होते. रॅक्ची जाळी जाऊन तिथे आता अखंड पत्रा आलेला होता. ते बदल या ही मॉडेलमध्ये कायम ठेवण्यात आले.

 


फ़क्त परिवर्तन मार्क १ मध्ये बसच्या शेवटी छताला जो गोलाकार असायचा, तो बदलून पुन्हा जुन्या बसेससारखा सपाट भाग त्या ठिकाणी आलेला होता.

काही दिवसांनी ह्या FRP पॅनेल्सचा तकलादूपणा एस. टी. च्या लक्षात आला असावा. मग त्या पॅनेल्सना काही दुरूस्तीची गरज पडली तर एस. टी. पुन्हा टाटा किंवा लेलॅण्डची स्टॅण्डर्ड काऊल त्याठिकाणी लावून देत असे. आणि परिवर्तन मार्क ३ नंतर असे काऊल बदलण्याचा प्रयोग एस. टी. ने पुन्हा केला नाही. अगदी अगदी आता आता माइल्ड स्टीलच्या बसेसपर्यंत.





मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीत या बसेस MH - 12 / CH 75XX आणि MH - 12 / CH 76XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.

मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबादमध्ये या बसेस MH - 20 / D 84XX आणि MH - 20 / D 85XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.

मध्यवर्ती कार्यशाळा हिंगण्यात या बसेस MH - 40 / 84XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.


- या बसनामक प्रेयसीच्या प्रेमात असल्याने तिच्या कुठल्याही रूपावर प्रेम आणि प्रेमच करणारा, बसफ़ॅन राम किन्हीकर.

 

अवघाची संसार सुखाचा करेन

 "नातेसंबंध हे काचेच्या भांड्यांसारखे असतात. तडा गेल्यावर तो तडा सांधता येतो पण ती खूण कायम असते." असे theoratically वाचून त्यावर विश्वास ठेवून एकेक विविक्षित प्रसंगात आपली तशी प्रतिक्रिया देण्यापासून

ते
"नातेसंबंधांमध्ये अगदी ०.०००००००००१ टक्के जरी दुवा शिल्लक असेल तर त्याला जपून, त्याच्या सहाय्याने नातेसंबंधांमध्ये १०० % स्नेहाचा ओलावा निर्माण करता येतो" या अनुभवातून घेतलेल्या ज्ञानापर्यंतचा प्रवास म्हणजेच प्रगल्भता असावी, नाही का ?

- "Tit for tat", "तो / ती तशी का वागली ? मग मी पण तसाच वागलो तर चुकले कुठे ?" पासून "अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक" पर्यंतचा प्रवास करणारे, अनुभवी गृहस्थ रामजी.
(स्वानुभवातून मिळवलेले ज्ञान लगेच हृदयापर्यंत जाते आणि आपसूकच त्याचे आचरण घडत जाते असे म्हणतात, ते खोटे नाही.)

Wednesday, July 21, 2021

मनकवडा घन घुमतो, दूर डोंगरात.





पाच वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला काढलेला हा फोटो. प्रदूषणमुक्त आकाश असेच निळाईने भरून असते आणि खूप प्रदूषण असलेल्या ठिकाणी आकाश राखाडी रंगाचे दिसते.
त्यापूर्वी ही अशी निळाई मी म्हैसूरच्या वास्तव्यात, २००९ मध्ये, बघितलेली होती. तेव्हाही असाच हरखून गेलेलो होतो.
मध्यंतरी लाॅकडाऊनमध्ये नागपूरातूनही हे असे निळे आकाश दिसले असल्याच्या बर्याच पोस्टस फेसबुकवर, इंस्टावर बघितल्या होत्या.
प्रदूषण आणि आकाशाचा निळा रंग यातल्या परस्परसंबंधाचे प्रमेय पुन्हा अधोरेखित झाले.
-निळ्यासावळ्या नाथाचा एक भक्त रामाजी निळोपंत.

Tuesday, July 20, 2021

परिवर्तन मार्क १

 २००३ च्या सुमारास आपल्या एस. टी. ने त्यांच्या साध्या गाड्यांच्या ताफ़्यात मोठ्ठा बदल करण्याचे ठरविले. आणि त्याप्रमाणे पहिली प्रोटोटाईप बस दापोडी कार्यशाळेत बांधल्या गेली. बसेसमधल्या संरचनेच्या परिवर्तनाचा हा पहिली मोठा प्रयत्न होता. तत्पूर्वी २००० मध्ये बसेसचे मागचे दार पुढे आणून बसच्या वरखाली होणा-या (dropping down) खिडक्यांऐवजी पुढेमागे होणा-या (sliding) खिडक्या आणल्या होत्या. पण जवळपास ४० - ४५  वर्षे तशाच असणा-या बसच्या संरचनेतले पहिले परिवर्तन या बसेसने आणले होते. म्हणून त्या बसेसपासून साध्या बसेसना (निम आराम नसलेल्या) परिवर्तन म्हणण्याची सुरूवात झाली.


एस. टी. महामंडळाच्या तिन्ही कार्यशाळांनी अशा प्रकारच्या बसेसची बांधणी सुरू केली. 


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीने  MH - 12 / AU 90XX  व AU 91XX सिरीजमध्ये

मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबादने MH - 20 / D 64XX व D 65XX  सिरीजमध्ये

मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने MH - 31 / AP 95XX व AP 96XX सिरीजमध्ये


दापोडी कार्यशाळेची MH - 12 / AU 9194. अम. दर्यापूर आगार.


१. तोवर प्रवासी विभागात असलेल्या १० ते ११ छोट्या खिडक्यांऐवजी ६ मोठ्या खिडक्या या परिवर्तनात आल्यात. पूर्वी जवळपास प्रत्येक एका बाजूच्या एका आसन रांगेला एक खिडकी मिळायची आता दोन आसन रांगांमध्ये एक सामायिक खिडकी आली. (प्रवाशांच्या भांडणांना निमंत्रण)


२. बसेसची रंगसंगती बदलल्या गेली. लाल + पिवळ्या रंगांऐवजी निळा + हिरवा ही नेत्रसुखद रंगसंगती आली. पण नंतर महामंडळाने जुनीच रंगसंगती (लाल + पिवळा) आणण्याचा निर्णय घेतला. कारण पहिल्यांदा गाड्या जेव्हा पुन्हा RTO पासिंगसाठी रंगवायला आपापल्या विभागीय कार्यशाळाममध्ये गेल्यात तेव्हा त्या पुन्हा जुनाच साज घेऊन आल्यात. काही काही गाड्या मात्र नमुना रंगसंगती म्हणून महामंडळाने निळ्या + हिरव्या रंगातच जपून ठेवलेल्या होत्या.


पुन्हा लाल + पिवळ्या रंगसंगतीत रंगवलेली परिवर्तन मार्क १


३. चालकाच्या केबिनला पाठ लावून प्रवाशांकडे तोंड करून बसणारा तो ६ आसनी लांबच लांब बाक जाऊन आता नवीन आसनव्यवस्थेत सगळी आसने प्रवासाच्या दिशेलाच तोंड करून असणारी झाली होती.

४. परिवर्तन गाडीतली आसनव्यवस्था जरी जुन्या आसनव्यवस्थेप्रमाणेच ३ बाय २ असली तरी आसनामध्ये वापरल्या जाणा-या PU Foam मध्ये बदल झाला होता. प्रवाशांना अधिक आरामदायी आसने देण्याचा हा महामंडळाचा प्रयत्न होता.

५. बसच्या पुढील बाजूला असलेल्या दोन्ही आरशांसाठी (rear view mirrors) साठी खाजगी गाड्यांसारख्या दोन मोठ्या लोखंडी कांबी देऊन त्यावर मोठे आरसे दिलेले होते. तत्पूर्वी हे आरसे (rear view mirrors) छोट्याशा आकाराचे असायचे आणि चालकाच्या बाजूच्या दाराला अगदी लागूनच असायचेत.

६. बसेसच्या मागील बाजूला छताला पुढील बाजूप्रमाणे गोलाकार वळण देण्यात आलेले होते. यापूर्वी असे गोलाकार छत १९७० च्या दशकातल्या बसेसना असायचे.


                                 पाठीमागील छताला गोलाकार आकार असलेली परिवर्तन मार्क - १




७. या बसेसची नंबरप्लेट त्यापूर्वीच्या निम आराम गाड्यांना असायची तशी मधोमध आणल्या गेली होती.

८. मागील बाजूस निम आराम गाड्यांप्रमाणे मोठ्या काचेच्या खिडक्या देण्यात आल्या होत्या. जुन्या मॉडेल्समध्ये त्या ठिकाणी एकच मध्यम आकाराची संकटकालीन खिडकी असायची. आता बसच्या आतील अधिक चांगल्या प्रकाशयोजनेसाठी मोठ्ठ्या खिडक्या आल्या होत्या.


या बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरल्यात आणि नंतर मग एस. टी. महामंडळाने त्यात अधिकाधिक बदल करून परिवर्तन मार्क - २ (पूर्ण लाल रंगातली आणि समोरचा काऊल बदललेली), परिवर्तन मार्क - ३ (लाल + पिवळी, ३ बाय २ पण समोरचा काऊल नेहमीप्रमाणे असणारी), परिवर्तन मार्क - ४ (पूर्ण लाल आणि २ बाय २ आसनव्यवस्था असलेली) या बसेस आणल्यात. 

या परिवर्तनाची सुरूवात करणारी ही परिवर्तन मार्क - १

- बसफ़ॅन प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

मध्य रेल्वेः नागपूर विभाग, एक गरीब बिच्चारा विभाग.

 अरे वा ! शेवटी महाराष्ट्र एक्सप्रेस मध्यप्रदेशमधल्या रीवापर्यंत वाढवण्याचा निर्णय मागे घेतला तर.

मला वाटलं होतं की या गतीने आणि गाड्या पळविण्याच्या वृत्तीने ही गाडी
२०२१ मध्ये रीवा,
२०२२ मध्ये प्रयागराज,
२०२३ मध्ये मंडुआडीह,
२०२४ मध्ये मालदा टाऊन,
२०२५ पर्यंत कामाख्या
आणि
२०२६ मध्ये आगरताळ्यापर्यंत ही गाडी नेऊनच रेल्वेवाले स्वस्थ बसताहेत की काय ?
तरी बरं, इकडे कोल्हापूरला dead end आहे म्हणून. उद्या कोल्हापूर - रत्नागिरी रेल्वे मार्ग झालाच तर ही गाडी रत्नागिरी, कणकवली, करमाळी, मडगाव, मंगलोर, शोरनूर, एर्नाकुलम, थिरूवनंतपुरम मार्गे कन्याकुमारीपर्यंत वाढवली असती.
मध्य रेल्वेचा नागपूर विभाग हा "मुकी बिचारी कुणीही हाका" असा आहे ? की यांनाच आपल्या गाड्यांचा maintenance करण्याचा कंटाळा येतो ? हे कळण्यापलिकडचे आहे.
नागपूर - कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस पार धनबादपर्यंत पळवली.
नागपूरकर चाकरमान्यांना नागपूरवरून रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता निघून सोमवारी सकाळी ७.३० पर्यंत मुंबईत पोहोचवणारी, अत्यंत सोयीची, समरसता एक्सप्रेस पार हावड्यापर्यंत (ती पण चक्रधरपूर - पुरूलिया या आडमार्गाने) पळवली.
सिकंदराबाद - नागपूर एक्सप्रेस रायपूरपर्यंत पळवली.
विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या गोंदियाच्या तत्कालीन खासदारांच्या दबावाखाली उगाचच गोंदियापर्यंत वाढवल्या.



Computerised ticketing system च्या आजच्या काळात खरेतर गेल्या १५ वर्षांपासून आजवर किती प्रवाशांनी गोंदिया / तुमसर / भंडारा येथून थेट मुंबईपर्यंत प्रवास केलाय ह्या माहितीचे विश्लेषण काही मिनीटांत होईल आणि ९५ % प्रवासी नागपूरवरून प्रवास करताहेत हे लक्षात येईल. (कामठी ते मुंबई प्रवास करणारे प्रवासीही नागपूरचेच पकडायला हवेत कारण नागपूर - मुंबई प्रवासासाठी pooled quota waiting list लागल्यावर त्यात तिकीट घेऊन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ ४० - ५० ₹ जास्त दराने उपलब्ध असलेले कामठी ते मुंबई boarding at Nagpur असे तिकीट सगळे काढतात हे उघड गुपीत आहे.)
मग विदर्भ आणि महाराष्ट्र पुन्हा नागपूरवरूनच सोडून त्या गाड्यांच्या वेळात गोंदिया - नागपूर - गोंदिया या मार्गावर सर्व अप डाऊन करणार्यांना सोयीची, सर्व स्टेशनांवर थांबणारी, झपकन वेग घेणारी, चढ उतार करायला सोयीची अशी "मेमू" (Mainline Electric Multiple Unit) लोकल सुरू करायला हवी.
मध्येच सेवाग्राम एक्सप्रेसलाही रामटेकपर्यंत वाढवण्याची एक अशीच हास्यास्पद मागणी पुढे आली होती. आतासुध्दा सेवाग्राम एक्सप्रेस नवीनच रूंदीकरण केलेल्या मार्गाने छिंदवाड्यापर्यंत वाढविण्याचीही चर्चा सुरू आहेच.
आता नागपूर दुरांतो भोपाळपर्यंत वाढवा म्हणजे सुटलात सगळे.
नागपूरच्याच सगळ्या गाड्या यांना बरोबर सापडतात ते. इतके वर्षांपासून सुरू असलेली गोंदिया - बरौनी एक्सप्रेस कधी नागपूरपर्यंत (मध्य रेल्वेची एव्हढीच allergy असेल तर तुमच्या हद्दीत असलेल्या इतवारीपर्यंत तरी ?) वाढवण्याची साधी मागणीही होत नाही.
गोंदिया - रायगड जनशताब्दी, गोंदिया - झारसुगडा पॅसेंजर कम एक्सप्रेस, उन्हाळी मौसमात सुरू होत असलेली गोंदिया - हावडा उन्हाळी विशेष या गाड्यांच्या मार्ग विस्तारावर नागपूरकरांचे कधीच लक्ष जात नाही. इथल्या प्रवासी संघटनांमध्येही सगळ्या अमराठी लोकांचे वर्चस्व असल्याने ते पण नागपूरच्या गाड्या मध्यप्रदेशात, छत्तीसगढमध्ये वाढवायला विरोध करीत नाहीत.
हैद्राबाद - तिरूपती एक्सप्रेसचा विस्तार पहिल्यांदा निजामाबाद आणि नंतर आदिलाबादपर्यंत होतो. पण आदिलाबादवरून १८० किमी दूर असलेल्या नागपूरपर्यंत होत नाही. याउलट नंदिग्राम एक्सप्रेसचा नागपूर ते नांदेड मार्ग रद्द करून ही गाडी नांदेडपर्यंतच धावते.
आता गरज आहे नागपूरच्या लोकप्रतिनिधींनी यावर ठाम भूमिका घेण्याची. नागपूरकरांनी एक गब्बर शेर खासदार म्हणून संसदेत पाठवलाय हे दाखवून देण्याची.
याबाबत चंद्रपूरचे माजी खासदार हंसराजभैय्या अहिर यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. चंद्रपूर / बल्लारशहाला रेक मेन्टेनन्स सोयी नाहीत म्हणून मुंबई - बल्लारशहा, पुणे - बल्लारशहा या गाड्या त्यांनी काजीपेठ पर्यंत वाढवायला परवानगी दिली पण या दोन्ही गाड्यांना वर्धेपर्यंत आरक्षणाचा जनरल कोटा ठेवायला त्यांनी आग्रह धरला आणि तसे करून घेतले. म्हणजे काजीपेठ - मुंबई किंवा पुणे प्रवासा इतकीच तिकीटे बल्लारशहा / चंद्रपूर / वरोरा / हिंगणघाट / वर्धा ते मुंबई किंवा पुणे या प्रवासासाठी उपलब्ध असतात आणि प्रवाशांची गैरसोय होत नाही.
पण अशी उदाहरणे विरळा आहेत.
- नागपूर विभागावर रेल्वेतर्फे होत असलेल्या घोर अन्यायाचा एक मूक दर्शक , रेल्वेफॅन राम.

Monday, July 19, 2021

बर्शेनच्या आठवणी

आमची आजी गॅस सिलींडरला "बर्शेन" म्हणत असे. आजोळी, चंद्रपूरला, सोवळेओवळे अगदी कडक असल्याने सोवळ्याचा स्वयंपाक हा खास घातलेल्या आणि दररोज दुपारी स्वयंपाकानंतर शेणाने सारवलेल्या चुलींवर होत असे आणि ओवळ्याचा स्वयंपाक गॅसवर. आमच्या आजोळच्या वाड्यातल्या त्या स्वयंपाकघराचे क्षेत्रफळच मुळी १००० ते १२०० चौरस फूट असेल. (आणि बाथरूमचे २५० चौरस फूट. त्यात पाण्याचे मोठ्ठे टाके, पाणी तापवायला लागणारी लाकडे ठेवण्याची जागा आणि पाणी तापविण्याचा बंब.)

जुन्या काळची ही मंडळी (आमची मातामही, तिच्या बहिणी, तिचे भाऊ) गॅसला "बर्शेन" म्हणण्याचे कारण काय ? याचा आम्ही बरेच वर्षे विचार केला.
आत्ता आत्ता समजतय. सध्याच्या Bharat Peroleum Corporation Limited या कंपनीचे जुने (१९७६ च्या राष्ट्रीयीकरणापूर्वीचे) नाव "बर्मा शेल कंपनी" असे होते. ब्रिटीशकालीन भारतात पेट्रोलियम पदार्थांचे उत्खनन प्रामुख्याने ब्रम्हदेशात होत असावे. म्हणून "बर्मा शेल"
त्या "बर्मा शेल" चा अपभ्रंश "बर्शेन" असा झाला असावा आणि जुन्या मंडळींच्या तोंडात "स्वयंपाकाचा गॅस" म्हणजे "बर्शेन" हे नाव दृढ झाले असावे. (जसे वनस्पती तूपाला डालडा)
- जुने ते सगळेच टाकावू नसते या मतावर दृढ विश्वास असणारा आणि आताही गीझरच्या जमान्यात तांब्याच्या बंबामध्ये तापवलेल्या पाण्याची ऊब, लाकडांचा जळका वास वगैरे शोधणारा पुरातन माणूस रामशास्त्री.

Sunday, July 18, 2021

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद

 "इतरांनी माझ्याविषयी काय समज, गैरसमज करून घ्यायचेत तो त्यांच्या दृष्टीकोनाचा आणि थोडा खोलवर विचार केला तर त्यांच्या प्रारब्धाचाही भाग आहे.

पण त्यावर react होत बसण्यापेक्षा माझा responce हा केव्हाही positive वागणुकीचाच राहील हा माझ्या आजच्या कर्माच्या आणि पुढे तयार होणार्या प्रारब्धाचा भाग आहे."
हे ज्या व्यक्तिच्या लक्षात आणि आचरणात आले ती व्यक्ति अजिंक्य ठरते.

- "मनुष्य जीवनविषयक स्वानुभवात्मक तत्वज्ञान" या माझ्याच आगामी ग्रंथातून साभार.

Thursday, July 8, 2021

Gaunleted Tracks : काही जुन्या आठवणी.

 भारतीय रेल्वेवर आजवर तीन वेगवेगळ्या मितींचे लोहमार्ग होऊन गेलेत. आजकाल मेट्रोचा धरला तर चार.


१. ब्रॉड गेज : रूंदी १६७६ मिमी. (किंवा १.६७६ मी) आता हा असा अडनिडा आकडा ब्रॉड गेजसाठी का निवडला असेल ? याचे कुतुहल मला बरेच वर्षे होते.  मग लक्षात आले की ५ फ़ूट ६ इंचाला जर आजकालच्या मिमी मध्ये बदलले तर १६७६ मिमी होतात. ब्रिटीश शासित देशांमध्ये हाच रेल्वेमार्ग प्रामुख्याने आढळतो.


२. मीटर गेज : रूंदी १००० मिमी (१ मीटर) ज्या ठिकाणी भौगोलिक रचना जरा कठीण आहेत, जिथे ब्रॉड गेज शक्य नाही तिथे हा मार्ग वापरलाय. ब्रॉड गेजची वळणे अधिक अंतराची असतात. म्हणून ज्या पहाडी प्रदेशात तितकी जागा उपलब्ध नाही, तिथे हा गेज वापरलाय. इंदूर - महू - पाताळपाणी - ओंकारेश्वर - खांडवा - तुकईथड - अकोट - अकोला. हा मार्ग विंध्य आणि सातपुडा पर्वतांमधून जायचा आणि त्याकाळात आजच्या एव्हढ्या रेल्वे बांधकामाच्या सोयी / यंत्रे उपलब्ध नसायची म्हणून आत्ता आत्तापर्यंत हा मार्गे मीटर गेज होता. आता याच्या बदलाचे काम सुरू आहे.


३. नॅरो गेज : यात दोन प्रकार आहेत. 

अ. : रूंदी ७६२ मिमी (पुन्हा अडनिडा आकडा. अहो हे अंतर बरोबर २ फ़ूट ६ इंचाचे आहे. मोबाईल फ़ोनवर distance converter वरून करून बघताय ना ?)


आ : रूंदी ६१० मिमी (म्हणजे बरोब्बर २ फ़ूट अंतर)

४. स्टॅण्डर्ड गेज : आजकाल मेट्रोच्या निमित्ताने भारतात शिरकाव झालेली ही गेज. तसही जगभरात ५५ % गेजेस याच प्रकारातल्या आहेत म्हणा. "ब्रिटीश साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता" वगैरे कितीही वल्गना ब्रिटीशांनी केल्यात तरी जगाच्या फ़ार थोड्या भूभागावर त्यांनी राज्य केलेय ही वस्तूस्थिती आहे. ब्रिटीशांच्या राज्यांशिवाय इतर सर्व जगात ही गेज वापरली जाते. 

रूंदी : १४३५ मिमी (४ फ़ूट साडेआठ इंच) कलकत्ता मेट्रो आणि इतर मेट्रोंसाठी याच रूंदीचा लोहमार्ग वापरला गेलाय. 


भारतात जुन्या छोट्या गेजेसचे मोठ्या गेजेसमध्ये परिवर्तन करताना, कठीण भूप्रदेशातून मार्ग काढताना, बहुतांशी वेळा रेल्वेने पूर्णतः नवीन आखणीचा रेल्वेमार्ग तयार केला. त्यामुळे काही काही ठिकाणी जुना मार्ग पूर्णपणे बंद न करताही नवा मार्ग टाकला गेला. महत्वाच्या स्टेशन्सवर दोन्ही रेल्वे मार्ग एकत्र यायचेत. अशावेळी जो रेल्वे मार्ग टाकायचे त्याला इंग्रजीत Gaunleted Track म्हणतात. (याचा मराठी प्रतिशब्द मी शोण्याचा प्रयत्न केला, पण नाही मिळाला.)


२०११ मधील मथुरा ते इंदूर प्रवासात उज्जैन जवळ हा अशा प्रकारचा रेल्वेमार्ग सापडला. रतलाम ते इंदूर हा मीटर गेज आणि नागदा ते उज्जैन हा ब्रॉडगेज मार्ग असे एकत्र आलेले होते. दोन्हीही रेल्वेमार्गासाठी एक रूळ कॉमन आणि इतर दोन रूळ दोन प्रकारच्या रेल्वे मार्गांसाठी. खर्चात बचत. या प्रकारच्या रेल्वे मार्गांसाठी खाली आधारासाठी असलेले स्लीपर्स पण विशिष्टच प्रकारचे लागतात.

दोन्हीही लोहमार्ग एकत्र.


काही अंतर एकत्र चालल्यानंतर उज्जैन जवळ दोन्हीही मार्ग आपापल्या वेगळ्या वाटा चोखाळताना.

एकेकाळी मनमाड - औरंगाबाद - परभणी - पूर्णा मार्गाच्या रूंदीकरणातही अशा प्रकारचा Gaunleted Track वापरण्याचा तत्कालीन रेल्वेमंत्री सी के जाफ़र "शरीफ़" (शरीफ़ तरी कसे म्हणावे ?) यांचा बेत होता. मनमाड ते अंकाई किल्ला स्थानकापर्यंत तसा लोहमार्ग टाकून पण झाला होता. पण नंतर रेल्वेमंत्र्यांच्या त्या आग्रहामागचे कारण उघडकीस आले. मंत्रीमहोदयांच्या जावयाचा असे विशिष्ट स्लीपर्स तयार करण्याचा कारखाना होता म्हणे. हे अशा प्रकारचे लोहमार्ग भारतात कमी ठिकाणीच आणि फ़क्त काही किलोमीटर्ससाठीच असल्याने त्यांच्या कारखान्यातला मालाला पाहिजे तसा उठाव नसावा. म्हणून काचीगुडा (हैद्राबाद) पर्यंत हा पूर्ण ६८० किमीचा मार्ग, असा अभिनव पध्दतीचा बांधून जावयाला मोठ्ठे कंत्राट मिळवून देण्याचा हा मंत्रीमहोदयांचा विचार असावा. काही सामाजिक संस्थांच्या आक्षेपामुळे हा बेत बारगळला आणि मराठवाड्यातले प्रवासी मोठ्ठया त्रासातून वाचलेत. मीटर गेज डब्यांच्या उंचीनुसार फ़लाट कमी उंचीचे बांधावे लागले असते आणि त्यावर ब्रॉडगेज प्रवाशांना चढायला आणि उतरायला त्रास झाला असता. आणि एकेरी मार्गावरून जाणा-या मीटर गेज गाडीच्या कमी वेगामुळे त्याच मार्गावरून पाठीमागून येणा-या किंवा पुढून येणा-या ब्रॉडगेज गाड्यांचा खोळंबा झाला असता तो निराळाच. म्हणजे ब्रॉडगेज बांधल्याचा म्हणावा तसा फ़ायदा झाला नसताच.


तर अशी ही Gaunleted Tracks ची कथा.


- Railfan Ram