Tuesday, July 5, 2022

डुक्कर : ग्रामीण भागातले एक वाहतूक साधन.

 १९७० - ८० च्या दशकातले (विशेषतः उत्तर ) भारताच्या ग्रामीण भागातले जनसामान्यांचे हे तीनचाकी वाहतूक साधन.





मला वाटतं Tempo कंपनी (नंतरची Force Motors) ही वाहने उत्पादित करायची. त्या वाहनांच्या निमूळत्या तोंडांमुळे ह्यांना "डुक्कर" हे नामाभिधान प्राप्त झाले होते. एकावेळी २० ते २५ प्रवाशांना स्वस्तात घेऊन जाणारे हे वाहन ग्रामीण भारतात लोकप्रिय नसते झाले तरच नवल. नंतरनंतर मारूती व्हॅन, जीप, ट्रॅक्स आदि वाहनांनी या वाहनांना पर्याय दिला आणि ही वाहने काळाच्या पडद्याआड गेलीत.
महाराष्ट्रात मला अमरावती शहर सोडून इतरत्र ही वाहने फारशी दिसली नाहीत. अमरावतीतही १९८० च्या दशकातच ही वाहने अमरावती - बडनेरा - अमरावती अशा प्रवासी वाहतुकीसाठी ही वाहने दिसायचीत. पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधल्या ग्रामीण आणि आंतर शहरीय वाहतुकीसाठी ही वाहने २०१५ पर्यंत चालत असलेली मी बघितलेली आहेत.
कसाबसा उजव्या कोपर्यात तिरपातारपा बसलेला ड्रायव्हर, त्याच्याशेजारी किमान पाच प्रवासी, शेवटला प्रवासी तर अर्धे अंग बाहेर अर्धे आत अशा थाटात बसलेला.
मागच्या बाजूच्या हौदात दहा प्रवासी बाकांवर कोंबून बसलेले, त्यांच्या चरणकमलाशी बसलेले ५ - ६ प्रवासी किंवा त्यांच्यासोबतची पोती , बोचकीबाचकी, आणि मागच्या अरूंद पायपट्टीवर पाय ठेऊन टेंपोच्या वर डोकी काढून एअरकंडिशण्ड प्रवास करणारे पाच सात पोट्टी. काय मजा होती राव अशा प्रवासाची ! आता हा इतिहास झालाय.






- एस टी बस, रेल्वे यांचा प्रेमी पण जनसामान्यांच्या इतरही वाहतूक साधनांवर विशेष लक्ष असलेला एक जागरूक नागरिक, राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment